एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
शुक्रवार, १९ मे, २०१७ अमोल उदगीरकर

फुटकळ भूमिकांची वर्षं सरल्यानंतर कहानी, वासेपूर आले आणि नवाजुद्दीन सिद्दिकीचा संघर्ष संपला असं वाटत असलं, तरी ते खरं नाही. या न-नायकाच्या नाट्यमय संघर्षाची कथा काहीशी अशी..  

                                                      दृश्य: एक 

                                                      वेळ: आनंदाची 

                                                      स्थळ: सीएनएन-आयबीएनचा स्टुडियो

राजीव मसंद प्रत्येक वर्षाच्या शेवटी वर्षातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यांची राउंड टेबल कॉन्फरन्स घेतो. साल २०१३. या वर्षीच्या कॉन्फरन्समध्ये चार नट आहेत. आमिर खान, रणबीर कपूर, इरफान खान आणि त्यांच्यात एकदम 'मिसमॅच' दिसणारा थोडासा भांबावलेला नवाजुद्दीन सिद्दीकी. आपण या बड्या लोकांमध्ये काय करत आहोत हा अविश्वासाचा भाव चेहऱ्यावर नवाजुद्दीनच्या चेह-यावर राहून राहून दिसतोय. बाकी तिघे प्रवाही इंग्रजीमध्ये बोलत असताना हिंदीमध्ये उत्तर देणारा पण तो एकटाच आहे. एका प्रश्नावर रणबीर कपूर म्हणतो की, त्याचा सगळ्यात आवडता रोल 'गँग्ज ऑफ वासेपूर'मधल्या फैजलचा आहे आणि त्याला तो रोल करायला खूप आवडलं असत. रणबीरसारखा सगळ्यात लोकप्रिय नट असं आपल्याबद्दल आदराने बोलल्यावर नवाज अजूनच बावरतो. राजीव मसंद चौघांना एकच प्रश्न विचारतो- आज तुम्ही आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर आहात. फाईन! पण हा शो बिझनेस आहे. भविष्यकाळात समजा नियतीचे फासे उलटे पडले. तुमच्याकडे आज जे आहे, त्यातलं काहीच राहिलं नाही तर तुम्ही काय कराल? बाकीचे तिघे त्यांच्या फर्राटेदार इंग्रजीत उत्तरं देतात. नवाज अडखळत शुद्ध हिंदीत बोलतो, 'पंधरा वर्षांचा स्ट्रगल करून इथपर्यंत आलोय. मी तो विचार करूच शकत नाही. आता थोडे चांगले दिवस आलेत. मी फक्त ही फेज एन्जॉय करतोय.' दरम्यान अमिर खान पण नवाजची भरपूर तारीफ करतो आणि नवाज सुखावतो. त्याच्या डोळ्यासमोर आमिर खानच्या पहिल्या भेटीचा प्रसंगपण तरळत असणार.

                                                          कट टू

                                                      दृश्य: दोन

                                                      वेळ: संघर्षाची

                                                      स्थळ: एका चित्रपटाचा सेट

जेलचा सेट शूटसाठी उभा करण्यात आला आहे. दोन संघर्षरत अभिनेते कावरेबावरे होऊन सेटवर उभे आहेत. त्या दोघांपैकी एक नवाज आहे. इतकी वर्षं झाली मुंबईमध्ये येऊन पण अजून आर्थिक स्थैर्याचा पत्ता नाही. किती वर्ष असा स्ट्रगल करत राहायचं? गावाकडे वापस जाऊन शेतीवाडी करावी का? पण गावाकडचे मित्र हसतील आपल्याला. नकोच. पण मग किती दिवस त्या 'ड्रीम ब्रेक'ची वाट बघायची? नवाजच्या मनात विचारांचा हल्लाकल्लोळ माजलेला. इतक्यात सेटवर एकदम हलचल सुरू होते. 'आला, आला' अशी कुजबुज सुरू होते. नवाजचा रोल इतका छोटा की त्याला सीनही असिस्टंट डायरेक्टरने समजावून सांगितलेला असतो. दिग्दर्शक 'स्टार'ची वाट पाहण्यात बिझी असतो. एका दिवसाचा रोजमुर्रा मिळेल या आशेने सेटवर आलेल्या नवाजला या फिल्म मध्ये हिरो कोण आहे हेही माहीत नसतं. इतक्यात प्रसन्न चेहऱ्याचा सुबक ठेंगणा नायक समोर येऊन उभा ठाकतो. त्याला समोर पाहून नवाज तंतरतो. आपला सीन या सुपरस्टारसोबत आहे याची त्याला कल्पनाही नसते पण जातीचा अभिनेता असल्यामुळे नवाज त्याच्या तंतरण्याचा परिणाम कामावर होऊ देत नाही. एसीपीच्या भूमिकेमधला नायक महत्त्वाचा क्लू मिळवण्यासाठी पकडून आणलेल्या दोघांची झाडाझडती घेतो असा तो सीन. दोघांपैकी एक नवाज. शॉट लगेच ओके होतो. स्टार नवाजच्या अभिनयावर खुश होऊन त्याला दाद देतो आणि आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून निघून जातो. त्या रात्री परवडत नसून पण नवाज अम्मीला फोन करून सांगतो, 'अम्मी, आज मैने आमिर खान के साथ शॉट दिया.' नवाजची अम्मी मोहरून जाते. तो सेट असतो 'सरफरोश' चित्रपटाचा.  नंतर काही वर्षांनी पुन्हा अशाच एका सीनपुरती भूमिका एका चित्रपटात मिळाते. दिग्दर्शक कुणी राजू हिराणी नावाचा नवखा माणूस आणि मुख्य भूमिकेत त्याकाळात प्रोफेशनली फारस काही बरं चालू नसणारा संजय दत्त. इथं दोन प्रसंगांची भूमिका असते. इथंपण दोन्ही प्रसंगांमध्ये मार खायचा असतो. एक स्टेशनवर सुनील दत्त यांचं पाकीट मारायचा प्रयत्न केला म्हणून पब्लिक मारतं असा प्रसंग. दुसऱ्या प्रसंगात भडकलेल्या पब्लिकपासून त्याला वाचवून सुनील दत्त 'डॉक्टर' पोराच्या दवाखान्यात घेऊन जातात. तिथं मुन्नाभाईची माणसं त्याला मारतात.

किती वर्षं असा मार खाण्याचे प्रसंग करायचे? गावाकडचे लोक आपल्याला हसतात. सगळ्यात बेकार म्हणजे अम्मीला टोमणे मारतात याचं वैषम्य नवाजला वाटायचं. किती वर्ष नवाज अशा फुटकळ भूमिका करत होता पण सध्या लोक युट्युबवर नवाजच्या 'ब्लॅक फ्रायडे', 'मनोरमा सिक्स फिट अंडर', 'मुन्नाभाई एमबीबीएस आणि 'सरफरोश' मधल्या क्लिप्स शोधून शोधून बघत आहेत. व्हॉट्सअप वर एकमेकांना त्या क्लिप्स पाठवत आहेत. कित्येक वर्षाचा संघर्ष फळास आल्यानंतर नवाजच्या संघर्षाचंही जोरदार ग्लोरिफिकेशन झालं आहे पण हा संघर्ष खूप काही शोषून घेणारा होता. नवाजचा आवडता शेर आहे- कौन कहता है आस्मान मे सुराख नही हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारो.

                                                        कट टू 

                                                       दृश्य: तीन 

                                                      वेळ: वैऱ्याची

                                                      स्थळ: दिल्लीची मुतारी आणि बुधनामधलं घर

नवाज दिल्लीला नाटकांमधून काम करत होता पण नाटकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर जेमतेम पोट भरायचं. मग नाईलाजाने तो एका बिल्डिंगमध्ये वॉचमनचं काम करतो पण ती नोकरीही सुटते. मग पुन्हा नोकरीसाठी वणवण सुरू. जुन्या दिल्लीच्या रेल्वेस्टेशन मधल्या एका मुतारीमध्ये आपला जॉबचा शोध संपला असं त्याला वाटतं. त्या दुर्गंधीयुक्त मुतारीमध्ये एका जॉबची जाहिरात असते पण तो जॉब मिळवण्यासाठी त्याला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पाच हजार रुपये भरावे लागणार असतात. नवाजकडे अर्थातच पैसे नसतात. मग नवाज बुधना या आपल्या गावी जातो. संकटाच्या काळात त्याला त्याच्यामागे नेहमी खंबीरपणे उभी राहणारी अम्मी आठवते. तो अम्मीकडे आपली कैफियत मांडतो. नवाजची अम्मी दागिने मोडून त्याला पाच हजार रुपये देते. नवाज ते पैसे कंपनीमध्ये भरतो. कंपनी फ्रॉड निघते. पैसे बुडतात. आपण आईचे दागिने मोडून मिळवलेले पैसे असे वाया गेले याचं शल्य नवाजला अजूनही प्रचंड छळतं. अम्मीच तर लहानपणापासून त्याच्या पाठीशी उभी असते.

                                                           कट टू 

                                                        दृश्य: चार  

                                                        वेळ: बालपणीची सुखाची

                                                        स्थळ: बुधना 

लहानग्या नवाजला चित्रपटांचं प्रचंड वेड. पडद्यावर गोरेगोमटे नायक जे म्हणून काही करायचे त्याचं त्याला प्रचंड आकर्षण. त्या नायकांसारखं गोर दिसावं म्हणून अनेक फेअरनेस क्रीमचे डबेच्या डबे नवाजने संपवलेत. वर्णाने काळ्या नवाजला त्याचे मित्र आणि नातेवाईक 'काला बच्चन' म्हणून चिडवतात. छोट्या नवाजचं अमिताभ बच्चनबद्दलच आकर्षण पंचक्रोशीत प्रसिद्ध. आरशासमोर उभं राहून बच्चनचे संवाद म्हणणं हा नवाजचा आवडता छंद पण आजूबाजूचे लोक नवाजला यावरून चिडवतात तेव्हा नवाजच्या अम्मीचा जीव जळतो. जगाच्या सौंदर्याच्या भंपक निकषांमध्ये बसत नसला तरी नवाज तिच्यासाठी आँखो का तारा असतो. कुणी नवाजला त्याच्या रुपावरून चिडवायला लागलं की ती चवताळते. नवाजमुळे कित्येक भांडणं तिने विकत घेतली आहेत. बुधनामध्ये होणा-या रामलीलेचं छोट्या नवाजला रामलीलेचं प्रचंड आकर्षण. स्टेजवर रामायण उलगडत असताना नवाज ते हरखल्या डोळ्यांत साठवून घेतो. आपणपण स्टेजवर जाऊन अभिनय करावा या इच्छेचं बीज रामायण बघतानाच त्यांच्या मेंदूत पेरलं गेलंय. नवाजच्या घरात कुणालाच नाटक वगैरेमध्ये फारसा रस नाही. मग नवाज आईला घेऊन जात असतो सोबत. आई ही त्याची नेहमीची सोबतीण. संघर्षाच्या काळातपण आणि आता सुखाच्या दिवसातपण. आया अशाच असतात.

                                                        कट टू

                                                      दृश्य: पाच   

                                                      वेळ: असहिष्णुतेची 

                                                      स्थळ: भारत किंवा इंडिया

बुधनामधली रामलीला ही  हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक. मुस्लिम घरांमधून भरपूर चंदा मिळायचा. स्टेजवरपण अनेक मुस्लिम अभिनेते रामायणातली पात्रं वठवायचे. साउंड, लायटिंगमध्येही अनेक मुस्लिम सहभागी असायचे. या रामलीलेचा नवाजवर प्रचंड प्रभाव. एकेदिवशी आपणही रामायणातील एखादं पात्र साकारावं असं त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न. नवाज मोठा स्टार होतो. त्याची अनेक स्वप्नं पूर्ण होतात आणि अचानक लहानपणापासूनच स्वप्नपण पूर्ण होण्याची संधी चालून येते. बुधनामधली रामलीला कमिटी नवाजला रामलीलामध्ये काम करणार का अशी विचारणा करते. नवाज हरखून जातो. लगेच होकार कळवतो. शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून तो तालमीसाठी बुधनाला पोहोचतोदेखील. नवाज मारिचाची भूमिका बजावणार असतो. प्रभू रामचंद्राला सीतेपासून दूर घेऊन जाणारा मारीच. जोरदार तालमी सुरु होतात. सहकलाकारांसोबत नवाज फरशीवर बसून चहा पितो आणि तालमी करतो. एवढा मोठा स्टार आपल्यासोबत एवढं खेळकरपणे वागतोय आणि आपल्याइतकीच मेहनत घेतोय याचं नवाजच्या सहकलाकारांना काय अप्रूप. पण मुझफ्फराबादच्या त्या कुप्रसिद्ध दंगलीनंतर बुधना बदललेलं असतं. हिंदूंच्या रामलीलेत एक मुस्लिम अभिनेता काम कसं करू शकतो, असा पवित्रा बुधनातली एक अतिउजवी संघटना घेते.  या मुद्दयावरून वातावरण विखारी बनायला सुरुवात होते. दोन्ही बाजूच्या संघटनांना आयता मुद्दा मिळतो. दोन्ही बाजूंनी विषारी प्रचाराच्या तलवारी उपसल्या जातात. जसा जसा रामलीलाचा दिवस जवळ यायला लागला तसा वातावरणातला तणाव वाढायला लागतो. तो इतका वाढतो की जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागतो. प्रशासन नवाजला माघार घेण्याची विनंती करतं. नवाज निमूट माघार घेतो आणि आपलं चंबूगबाळं आवरून मुंबईला परत येतो. दोन्ही धर्माच्या बहुसंख्य लोकांना प्रचंड हळहळ वाटते पण व्हायचं ते होऊन गेलेलं असतं. दिल्ली, मुंबई, कान्स इथे विजयाचा झेंडा रोवून आलेल्या अभिनयाच्या सम्राटाला आपल्या गावातच पराभवाचं तोंड बघावं लागतं. संघर्ष अजून संपलेला नसतोच. नवा संघर्ष सुरू होतो. 

 प्रतिक्रिया द्या1947 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Nitin - सोमवार , २२ मे, २०१७
छान!वासितववादी लेख
आबिद शेख - रविवार, २१ मे, २०१७
मस्त.... नेहमीप्रमाणेच...
तक्षशिल सतीश सोनटक्के - रविवार, २१ मे, २०१७
यशस्वी होण्यासाठी अश्या ह्या चित्रपट सृष्टीमध्ये मेहनत घेणाऱ्या स्ट्रुगलरस साठी तुमचा हा निःशब्द लेख फारच प्रेरणादायी ठरलाय। स्ट्रगल काय असत याच उत्तम उदाहरण हि छानसं पटवून दिलंय। बाकी नवाज ला सलाम आहे। वाचून न कळत डोळे पणावले ।
उल्का - शनिवार, २० मे, २०१७
मस्त! छान अमोल. चांगलं लिहिलंयत.
किशोर जगताप - शनिवार, २० मे, २०१७
नवाजचे आयुष्य अत्यन्त प्रेरणादायी आहे ,विशेषतः त्याच्या मागे उभी राहणारी,त्याच्या स्वप्नाना साथ देणारी आणि त्याची कोणी टवाळी केली की चवताळणारी अम्मी तिला सलाम ती नसती त्याच्या मागे उभी तर कदाचित नवाज नवाज नसता राहिला
निशांत आण्णासाहेब घाटगे - शुक्रवार, १९ मे, २०१७
नवाझ ... हाडाचा कलाकार आणि मेहनती अभिनेता आहे ... त्याला माहित होतं की तो रेसचा घोडा आहे ... त्याने बग्गीला जुंपून घेतलं नाही ... त्याला माहित होत की एक ना एक दिवस त्याचा पहिला नंबर येणार ... आणि त्याने करून दाखवलं ...
प्रतिभा भोसले - शुक्रवार, १९ मे, २०१७
न-नायक सीरिज अप्रतिम. स्टार्सचे टुकार चित्रपट पाहण्यापेक्षा अशा कलाकारांना योग्य न्याय द्या
Sudesh Kuchekar - शुक्रवार, १९ मे, २०१७
अप्रतिम लेख. पण फारच लवकर संपला असं वाटतं...

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर