आयुष्यासोबत जिहाद पुकारलेला माणूस
बुधवार, ५ एप्रिल, २०१७ अमोल उदगीरकर

पीयूष मिश्राच्या व्यक्तिमत्वाला जेवढे पदर आहेत, तेवढेच त्याच्या संघर्षालाही. ही गोष्ट आहे या 'न-नायका'ने आयुष्याशी पुकारलेल्या युद्धाची आणि मग स्वत:शी प्रस्थापित केलेल्या शांतीची.

इन्सान खुद की नजर मे सही होना चाहिये

दुनिया तो भगवान से भी दुखी है

एखादा पत्रकार किंवा लेखकू पीयूष मिश्राला भेटतो तेव्हा पीयूष त्यांना आवर्जून सांगतो, 'माझ्या संघर्षाच्या काळाचं ग्लोरिफिकेशन करू नका. मी त्या काळात अतिशय नीच माणूस होतो, माझ्या संघर्षाला रोमॅण्टिसिझमची डूब देणं म्हणजे त्या माझ्या एकेकाळच्या नीचतेचं ग्लोरिफिकेशन करणं आहे.' आपले सिनेमे बॉक्सऑफिसवर गर्दी खेचत नसले तरी आपल्या संघर्षाचा एक कल्ट तयार झाला आहे हे पीयूषला पक्कं माहीत आहे. आपल्या चुकांनाच नवीन पिढी ग्लोरिफाय करेल आणि त्या चुकांचीच पुनरावृत्ती करेल अशी भीती त्याला सतावत असते. पीयूष मिश्राने एका आयुष्यातच जितकं पाहिलं आहे, अनुभवलं आहे तितकं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. एका नास्तिकाचा (किमान तसा स्वतःबद्दल गैरसमज झालेला असताना) अस्तिकतेकडे झालेला प्रवास, एका डाव्या विचारसरणीच्या माणसाचा कुठल्याच 'इझम'वर विश्वास न ठेवण्यापर्यंतचा प्रवास, एकेकाळी चोवीस तास दारूच्या नशेत राहणाऱ्या माणसाचा पूर्णपणे निर्व्यसनीपणाकडे झालेला प्रवास असे असंख्य पदर या प्रवासाला आहेत.

यौवन इतना सत्य नाही

वो एक बार ही आता है

एक बचपन ही है जो

सृष्टी के आदी अंत तक जाता है

सतत छत्तीस वर्षं अफूचं व्यसन करून पीयूषचे वडील गेले तेव्हा पीयूष त्यांच्यापासून भावनिकदृष्ट्या तुटलेला होता. इतका की अनेक वर्ष वडिलांशी तो बोललाही नाही. बोलायचा तेव्हा 'उडान'च्या नायकाप्रमाणे वडिलांना सर असं संबोधून बोलायचा. वडील माझ्यातल्या कलाकाराला समजून घेत नाहीत हा पीयूषच्या मनातला सल, तर आपल्या पोराला जगरहाटी कळत नाही ही बापाची तक्रार यांच्यातला पूल कधी सांधला गेलाच नाही. स्वतःच्या आयुष्यातली अनेक वर्ष व्यसनात बर्बाद केल्यानंतर आणि त्यापायी अनेक वर्ष आपल्या दोन मुलांकडे दुर्लक्ष केल्याचा अपराध गंड अजूनही मनात बाळगत असताना पीयूष आता आपल्या वडिलांना समजून घेतोय. आपण वडिलांसोबत खूप चुकीचं वागलो हे त्याला आता कळतंय पण अर्थातच त्याला उशीर झाला आहे. अर्थात प्रत्येक चांगली गोष्ट उशीरा घडण हे पीयूषसाठी नेहमीचंच. अफूच्या व्यसनाने धूळधाण झालेले वडील आणि छोटा पीयूष त्याच्या खंग्री आणि वर्चस्व गाजवण्यात आनंद मानणाऱ्या आत्याच्या घरी राहायचे. थोडक्यात ते तिथे आश्रित होते. अपमान, घालूनपाडून बोलणी असं कुठल्याही आश्रिताचं भागधेय पीयूषच्या वाट्यालाही पुरेपूर आलं. कधीच पुसले न जाणारे अनेक चरे पीयूषच्या मनावर अजूनही आहेत. त्याला एकदा दही खाण्याची इच्छा झाली पण घरात भरपूर दूधदुभतं असूनही त्याला वाटीभर दही मिळालं नाही. नंतर बरीच वर्षं पीयूषने दह्याला हात लावला नाही. संवेदनशील माणसं आणि त्यांचे क्लिष्ट मनोव्यापार. पीयूषच्या आईनेही आपल्या कणाहीन नवऱ्यामुळे त्या घरात बरंच सोसलं. पीयूष मुंबईत स्थिरस्थावर झाला तेव्हा त्याने त्या घरात मोलकरणीसारखं राबणाऱ्या आईला पहिलं मुंबईला स्वतःकडे आणलं. आईला घरी आणल्यावर तिच्या पायापाशी तो बराच वेळ बसून होता. भावना व्यक्त करण्यासाठी उसने घ्यायलाही शब्द नव्हते या शब्दप्रभूकडे.

सोचता हुँ धोके से जहर दे दु,

सारी ख्वाहिशो को दावत पे बुला के

एनएसडीमध्ये पीयूषने प्रवेश घेतला तेव्हा त्याला झालेला आनंद दुहेरी होता. एक तर घरातल्या जीवघेण्या घुसमटीतून त्याची सुटका झाली होती. दुसरं म्हणजे आता तो चोवीस तास नाटकात आणि कवितांमध्ये रमू शकणार होता. आता कधीही त्याच्या न बनलेल्या घराकडे वळून बघण्याची गरज पडणार नव्हती. धरणाचे दरवाजे उघडल्यावर जसा पाण्याचा प्रपात बाहेर कोसळायला लागतो तशी पीयूषची इतके दिवस दाबून धरलेली सृजनशीलता कोसळायला लागली. स्वातंत्र्याची हवा पीयूषला चांगलीच मानवली. याच काळात दारूच्या व्यसनाचा आयुष्यात दबक्या पावलांनी शिरकाव झाला. प्रचंड संवेदनशीलता आणि आपल्याला कुणी समजून घेऊ शकत नाही या भावनेतून आलेलं प्रचंड एकाकीपण यातून दारूचा प्याला सगळ्यात जवळचा वाटू लागला. पीयूषने तब्बल वीस वर्षं दिल्लीमध्ये थिएटर गाजवलं. पीयूष करतोय म्हणजे ते नक्कीच काहीतरी भन्नाट असेल याबद्दल लोकांना इतका विश्वास होता की त्याच्या सोलो अॅक्टची तिकिटं ब्लॅकमध्ये विकली जायची. रसिकांचं इतकं प्रेम फार कमी भाग्यवंतांच्या वाट्याला येतं. 

उस घर से हमको चिढ़ थी जिस घर

हरदम हमें आराम मिला

उस राह से हमको घिन थी जिस पर

हरदम हमें सलाम मिला…

दिल्लीमध्ये घालवलेल्या वीस वर्षांपैकी अनेक वर्षं पीयूषवर एन. के. शर्माचा फार प्रभाव होता. शर्माच्या अॅक्ट वन ग्रुपमध्ये पीयूष नाटकं बसवायचा, गाण्यांना संगीत द्यायचा, कविता लिहायचा आणि नाटकात जे जे करायचं असतं ते सगळं करायचा. पीयूषला स्वातंत्र्य देणारा पहिला माणूस म्हणजे एन के शर्मा. पीयूषसाठी तो फादर फिगर होता. नाही म्हटलं तरी पीयूष त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबला होता. शर्मा डाव्या विचारसरणीचा होता, नास्तिक होता. त्याच्याकडे बघून पीयूष आपणही तसेच आहोत असं मानायला लागला होता. पण वस्तुस्थिती काय होती? पीयूष कायमच देवाचं अस्तित्व मानायचा. स्वतःचा चेहरा आणि मुखवटा एकच असला की आयुष्यातले बहुतेक प्रश्न सुटतात. इथं पीयूषने नास्तिकतेचा मुखवटा चढवून ठेवला होता. या काळात त्याची मानसिक ओढाताण झाली. दारूचं व्यसन अजूनच वाढीला लागलं. मधल्या काळात पीयूषने प्रियाशी लग्न केलं. पीयूषला नास्तिकतेचा आणि डाव्या विचारसरणीचा मुखवटा मिरवणं सहन होईना. एके दिवशी स्फोट झाला, शर्माशी कडाक्याचं भांडण झालं आणि पीयूषने अॅक्ट वन ग्रुप सोडला. पीयूष पुन्हा उघड्यावर आला. आता पुढं काय असा प्रश्न भेडसावू लागला. कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगावर होत्याच. रोजची दारूची तल्लफ भागवायलाही पैसा लागणार होता. प्रिया नोकरी करून घर चालवत होती पण पैसा पुरत नव्हता. त्याचे थिएटरमधले अनेक सहकारी आणि मित्र मुंबईला जाऊन बॉलिवूडमध्ये जाऊन सेट झाले होते पण पीयूषचा पाय दिल्लीमधून निघत नव्हता. मध्ये मुंबईला जाऊन काही दिवस राहिला. तिगमांशू धुलियामुळे 'दिल से'मध्ये त्याला काम मिळालं पण करमेना म्हणून पुन्हा दिल्लीला आला. दरम्यानच्या काळात दारूच्या व्यसनाला अनैतिकतेची जोड मिळाली होती. पीयूषकडे स्त्रिया नेहमीच आकर्षित व्हायच्या. प्रिया नोकरीसाठी घराबाहेर पडली की पीयूष आपल्याकडे आकर्षित झालेल्या मुलींना घरी बोलवायचा. घरात रंगढंग उधळले जायचे. प्रियाला काही कळायचंच नाही असंही नाही. शेवटी व्यसन आणि बाकीच्या रंगढंगांमुळे आर्थिक दिवाळखोरीची वेळ आली. आपलं श्रीमंत घर सोडून पीयूषच्या प्रेमापोटी त्याच्याशी लग्न केलेल्या प्रियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तिने पीयूषच्या इच्छेविरुद्ध त्याला दारू सोडवणाऱ्या संस्थेत भरती केलं. तिथं आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या चुकांकडे वळून पाहून त्याचं विश्लेषण करण्याइतका वेळ पीयूषला मिळाला. मेंदूवर चढलेला आत्मस्तुतीचा मेद उतरू लागला. आयुष्यात आपण लोकांना दुखावण्याशिवाय काही केलेलंच नाहीये याची जाणीव फणा वर काढू लागली. अपराधगंडाचा बोजा सहन होईना. ज्यांना ज्यांना दुखावलं त्यांची माफी मागण्याचा निर्णय मग पीयूषने घेतला. एन के शर्माची जाऊन माफी मागून आला. अजून अनेकजण होते. पण सगळ्यात मोठा समरप्रसंग घरीच होता. एके दिवशी प्रियाजवळ बसून आपल्या सगळ्या पापांची माफी मागितली. घरी किती वेळा मुली येऊन गेल्या हेही सांगितलं. त्याला हलकं हलकं वाटलं. प्रियाने मनावर दगड ठेवून वस्तुस्थिती स्वीकारली. तिच्याजागी मी असतो तर मी मला माफ केलं नसतं अशी कबुली स्वतः पीयूषच देतो. भावनांची ओझी उतरवल्यावर आता प्राथमिकता होती ती करियरला रुळावर आणायची. नियतीने मदतीचा हात एका अनपेक्षित माणसाकडून दिला. 

होनी और अनहोनी की परवाह किसे है मेरी जां

हद से ज़्यादा ये ही होगा कि यहीं मर जायेंगे

हम मौत को सपना बता के उठ खड़े होंगे यही

और होनी को ठेंगा दिखा कर खिलखिलाते जायेंगे

पीयूष दिल्लीला थिएटर करायचा तेव्हा एक टीनएजर पोरगा त्याचं एकही नाटक सोडायचा नाही. प्रेक्षकांमध्ये बसून स्वप्नाळू  डोळ्यांनी पीयूषची कलाकारी पिऊन घ्यायचा. मुंबईला आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असं पीयूषला कळलं तेव्हा तो मुंबईला आला. यावेळेस मात्र तो पळून जाण्यासाठी आला नव्हता. त्याचे शुजीत सरकार, विशाल भारद्वाज आणि मनोज वाजपेयीसारखे मित्र त्याच्या मदतीला धावून आले. पीयूष हा हिरा आहे हे त्यांना माहीत होतं. शुजीतने 'यहाँ' पीयूषकडून लिहून घेतला. विशालने 'मकबूल'मध्ये त्याला काम दिलं. एक दिवस पीयूषच्या बघण्यात 'शूल' हा सिनेमा आला. त्याला तो बेहद्द आवडला. त्याने चित्रपटाच्या लेखकाचा नंबर मिळवला आणि त्याला फोन करून त्याचं काम आवडलं असं सांगितलं. पलीकडे फोनवर तोच स्वप्नाळू डोळ्यांचा पोरगा होता- अनुराग कश्यप. अनुरागने उलट पीयूषलाच मी तुझा किती मोठा फॅन आहे हे भरभरून सांगितलं. भेटायचं ठरलं. पीयूष अनुरागच्या खोपटासारख्या ऑफिसमध्ये आला. अनुराग त्यावेळी 'गुलाल' बनवत होता. संगीतावर काम चालू होतं. घनघोर चर्चा चालू होत्या. पीयूषने बाजूचा हार्मोनियम घेतला आणि हात फिरवायला सुरुवात केली . 

ओ रे बिस्मिल काश आते, आज तुम हिन्दोस्ताँ

देखते कि मुल्क सारा ये टशन में थ्रिल में है

आज का लौंडा ये कहता हम तो बिस्मिल थक गए

अपनी आज़ादी तो भइय्या लौंडिया के तिल में है

अनुरागला तो जे वाजवत होता आणि ऐकवत होता ते प्रचंड आवडत होतं. अनुरागच्या चित्रपटातलं संगीत फारसं प्रभावी नसत असं मानणारा वर्ग आहे पण गुलाल, देव डी, गँग्ज ऑफ वासेपूर वेगळीच कहाणी सांगतात. गुलालची गाणी मार्केटमध्ये जबरदस्त हिट झाली. पीयूष मिश्रा नावाच्या फिनिक्सने राखेतून उड्डाण केलं. त्याला कारणीभूत अनुराग होता. अनुराग आणि पीयूषमधलं सगळ्यात मोठं साम्य म्हणजे दोघंही सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आहेत. स्वतःला उद्ध्वस्त करून घेण्यात त्यांना काहीतरी सॅडीस्ट आनंद मिळत असावा. पीयूष अनुरागला 'बुरी लत' म्हणतो. दोघंही प्रचंड भांडतात. अनुराग मला खूप गृहित धरतो अशी पीयूषची तक्रार आहे. दोघे अनेक महिने एकमेकांशी बोलतही नाहीत पण आपली वेव्हलेंग्थ जुळली आहे हे त्यांना पक्क माहीत आहे. पीयूष अनुरागबद्दल म्हणतो 'आपल्याला एकच अनुराग कश्यप बस आहे. अजून दोन-तीन अनुराग कश्यप आपल्याला झेपणार नाहीत.' हेच विधान खरं तर पीयूषलाही लागू पडतं. सध्या पीयूषचं बरं चाललंय. तो आता दारूच्या थेंबाला शिवतही नाही. फॅमिली ही त्याची प्राथमिकता आहे. त्याच्या 'पिंक', 'हॅपी भाग जायेगी', तमाशा' मधल्या भूमिका प्रेक्षकांना पसंत पडल्या आहेत. स्वतःला आवडेल ते काम करायला तो आता या टप्प्यात मुखत्यार आहे पण त्याचं सगळ्यात मोठं यश कोणतं आहे ते माहीत आहे का? त्याने कुठल्याही सृजनशील आणि संवेदनशील माणसाच्या शत्रूसोबत शांती प्रस्थापित केली आहे- अर्थातच स्वतःसोबत. 

हल्की फुलकी सी है जिंदगी

बोझ तो ख्वाहिशों का है

(बिगुलमधील न-नायक हे लोकप्रिय सदर काही काळासाठी विश्रांती घेणार आहे. लवकरच पुन्हा भेटूया)

 

 

                                                                 प्रतिक्रिया द्या9638 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Dhanaji pawar - शनिवार, २४ जून, २०१७
Khup chan Khup energy milali Thankyu very much
Amita Darekar - बुधवार, १० मे, २०१७
mastch.... apratim... far kahi boltach yenar nahi etak chan
पूछा अजय पाठक - बुधवार, १२ एप्रिल, २०१७
फारच छान माहिती ....
ANIKET DIGAMBAR MHASKE - सोमवार , १० एप्रिल, २०१७
अतिशय सुंदर लेख आहे
अंजली दीक्षित - शनिवार, ८ एप्रिल, २०१७
पियुष मिश्रा बद्दल कितीही वाचलं तरी अजून हवंय असं वाटत आहे.
Rushikesh Dharmadhikari - शनिवार, ८ एप्रिल, २०१७
अखेर नियतीने न्याय दिला पियूश सरांच्या आतिल महान कलाकाराला..... आज फार छान सदर वाचायला मिळाले......बिगुल ने आज चांगल्या लेखन सदराचा खरच बिगुल वाजवला.....
सौरभ दीपक बापट - शनिवार, ८ एप्रिल, २०१७
खूप छान,पियुष मिश्रा हे व्यक्तिमत्व 'आरंभ हे प्रचंड' या गण्यापूरत,गुलाल,आणि वसेपूर पुरतच माहीत होतं,आज या लेखाद्वारे ते खूप उत्तम पद्धतीने वास्तवात उतरलं
Anil koshti - शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७
आपला लेख स्फुर्तीदायी आहे. आभार.
Adarsh patil - शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७
Uttam mandni.
Dr Sunil Singh - शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७
Bahut badiya jindagi ka safar..... Kash Ham bhi voh armaro Me hote...
PRAVEEN BARDAPRKAR - शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७
तुमचं लेखन प्रथमच वाचनात आलं . मला आवडला पीयूष मिश्रा यांच्यावरचा हा लेख . विषयाला थेट भिडणं आणि भाषा , शैली आवर्जून नोंद घेण्यासारखी वाटली . -प्रब Cellphone ​+919822055799 www.praveenbardapurkar.com blog.praveenbardapurkar.com
Vinod wagh - शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७
मार्मिक
Amit Date - शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७
सर्वात जास्त आवडलेला लेख.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर