देर से आये पर खूब आये
शुक्रवार, २४ मार्च, २०१७ अमोल उदगीरकर

बहरती कारकीर्द सोडून हृषिकेशच्या ढाब्यावर हरकाम्या म्हणून राहणा-या संजय मिश्रा या गुणवान अभिनेत्याला नियतीने उशिरा दिलं, पण भरभरून दिलं. अभिनेता म्हणूनही आणि व्यक्ती म्हणूनही.

कोसलाच्या प्रस्तावनेत पु. ल. सुंदर वाक्य लिहून गेलेत- कोसलावर कोसलाइतकंच लिहिण्यासारखं आहे. संजय मिश्राच्या बाबतीतही हे वाक्य लागू पडतं. संजय मिश्रावर संजय मिश्राइतकंच लिहिण्यासारखं आहे.

'मसान'चा लेखक आणि 'मोह मोह के धागे' सारखं अप्रतिम गाणं लिहिणारा वरुण ग्रोवर माझा मित्र आहे. त्याने 'मसान'च्या सेटवर दिग्दर्शक नीरज घायवानचा असिस्टंट म्हणूनही काम केलं होत. त्याने सांगितलेला हा संजय मिश्राचा किस्सा- 'मसान'चं शुटिंग सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर सगळी टीम बोटीने घाटावर पोहोचली. टीम घाटावर पोहोचताच तिथे अगोदरच उभा असलेला आणि उन्हाने रापलेला माणूस चपळाईने समोर आला आणि टीमला शुटिंगचं सामान उतरवण्यासाठी मदत करू लागला. वरुणला काही काळ हा आगंतुक कोण आहे याची टोटल लागेना. थोड्या वेळाने त्याला कळलं की, हा तर देवीच्या (रीचा चढ्ढा) हतबल बापाची भूमिका करणारा संजय मिश्रा आहे. बाकी टीम बनारसला पोहोचण्याअगोदरच हा तिथे कसा पोहोचला याची चौकशी केली असता, जे कळलं त्याने वरुण भारावून गेला. संजय मिश्रा बनारस जगण्यासाठी दोन महिने अगोदरच तिथे येऊन राहिला होता. लॉजवर एका छोट्या रूमवर राहायचा, स्वतःच स्टोव्हवर स्वयंपाक करून खायचा. घाटावर जी दुकानं होती तिथं पडेल ती काम करायचा. हे सगळं का, तर मसान ज्या बनारसच्या घाटावर घडतो त्या घाटाच्या भवतालाला आकळून घेण्यासाठी. खरं तर 'मसान'मधली भूमिका मिळेपर्यंत संजय चांगलाच प्रस्थापित बनला होता. 'मेथड अॅक्टिंग'च्या नावाखाली भूमिकेत शिरण्याच्या बहाण्याने एखाद्या मोठ्या नटासारखा प्रोड्युसरच्या खर्चाने आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची डिमांड करण्याच्या पोझिशनमध्ये तो नक्कीच होता पण संजय मिश्रासारख्या अंतर्बाह्य नटाला असले शॉर्टकट कधीच पसंत नव्हते.

'सत्या'तली छोटी भूमिका

बॉलिवूडला वेगळं वळण देणारे सिनेमे मला खूपच महत्त्वाचे वाटतात. 'बॅण्डिट क्वीन', 'सत्या' आणि 'गँग्ज ऑफ वासेपूर' हे ते तीन सिनेमे. या तीन सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत झळकलेले कित्येक अभिनेते पुढे फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थापित झालेले दिसतात. मी संजय मिश्राला सगळ्यात पहिल्यांदा नोट केलं ते 'सत्या'मधल्या छोट्या भूमिकेत. चित्रपटाच्या सुरुवातीला एका चित्रपट निर्मात्याची हत्या करून पळणाऱ्या दोघांपैकी एक तो होता. मुंबईच्या विराट पावसात गल्ली-बोळातून स्कुटरवरून पळताना स्कुटर घसरते आणि मागे बसलेला संजय मिश्रा जबर जखमी होतो. त्या पावसाळी मुंबईत रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला संजय 'बापू' म्हणून जो टाहो फोडतो तो 'सत्या'सारख्या माणसाला अंतर्बाह्य हलवणाऱ्या सिनेमाचा जणू टोनच सेट करतो.

सात वर्षं कडवा संघर्ष

मग संजय मिश्रा वारंवार भेटत गेला. कधी छोट्या पडद्यावर तर कधी मोठ्या पडद्यावर. दिल्लीहून मुंबईत दाखल झालेल्या या नटाने तब्बल सात वर्षं भीषण संघर्ष केला. 'सत्या'नंतर त्यावेळेस गाजलेल्या ऑफिस ऑफिस या मालिकेत कामचुकार सरकारी बाबूची त्याची भूमिका गाजली. त्याचे गोलमाल आणि ऑल द बेस्ट सारखे चित्रपटही लोकांच्या पसंतीस उतरले. क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान स्पोर्ट्‌स चॅनलवर दिसणारा त्याचा 'अॅपल सिंग'ही तुफान लोकप्रिय झाला पण चांगले दिवस सुरू होत आहेत हा आभास होता.

आजारपण आणि वडिलांचा मृत्यू

'ऑफिस ऑफिस' ऐन भरात असताना त्याचा पोटाचा विकार बळावला. संघर्षाच्या सात वर्षांत मिळेल ते आणि पडेल ते खाल्ल्याचा हा परिणाम होता. त्याला दोन महिने हॉस्पिटलमध्ये काढावे लागले. त्याचे वडील त्याच्यामागे आधारस्तंभासारखे उभे राहिले. हागणं-मुतणं काढण्यापासून वडिलांनी त्याचं सगळं केलं. बाप-लेकात शब्दांमध्ये न सामावण्याइतकं प्रेम होतं. वडिलांच्या शुश्रुषेमुळे संजय हॉस्पिटलमधून बाहेर आला पण त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत त्याचे वडील वारले. संजय मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला. वैराग्याने त्याच्या मनाचा ताबा घेतला.

हृषिकेशच्या ढाब्यावर हरकाम्या

कधी कधी आपल्या सगळ्यांच्याच डोक्याचा फ्युज उडतो. मुंबईमधली आपली बहरणारी कारकीर्द सोडून संजय सरळ हृषिकेशला निघून गेला. तिथल्या एका ढाब्यावर हरकाम्याचं काम करायला लागला. यामागचं तर्कशास्त्र आपल्यासारख्या दगडाला धरून नदीत पोहणाऱ्या माणसांना कदाचित कळणारच नाही. प्रेमात व्याकुळ होऊन प्रेयसीला आपला कान छाटून देणाऱ्या व्हॅन गॉची तगमग आपल्याला कुठून कळणार? संजय ज्या ढाब्यावर काम करायचा तिथे कधीकधी त्याला ओळखणारे लोक यायचे. तुम्हीच ना ते 'गोलमाल'मधले, असं एखादा कस्टमर उत्सुकतेने विचारायचा. संजयसोबत फोटो काढून घ्यायचा. ढाब्याचा मालक असलेल्या मायाळू सरदाराला शेवटपर्यंत आपले कस्टमर आपल्या हरकाम्यासोबत फोटो का काढून घेत आहेत हे कळलं नाही. संजयला या अज्ञातवासातून बाहेर काढण्याचं श्रेय एका अनपेक्षित माणसाला द्यावं लागेल- रोहित शेट्टीला.

संजय-रोहित शेट्टीची मैत्री

कधी कधी अगदी दोन भिन्न प्रतलांत राहणाऱ्या माणसांची जवळची मैत्री होते. या दोन अतिशय भिन्न अभिरुचीच्या आणि स्वभावाच्या लोकांची मैत्री जगाला कोड्यात टाकते. याचं एक उदाहरण म्हणजे हृषिकेश मुखर्जी आणि राज कपूर यांची मैत्री. रोहित शेट्टी आणि संजय मिश्राची मैत्री याच जातकुळीतली आहे. रोहितच्या 'गोलमाल'पासून ते अगदी आताच्या 'दिलवाले'पर्यंत बहुतेक चित्रपटात संजय हटकून हजर असतोच. संजय ज्या ढाब्यावर काम करायचा तिथे जाऊन रोहित त्याला 'मै तेरे बगैर पिक्चर नही बना सकता' म्हणून पुन्हा खेचून बॉलिवूडमध्ये घेऊन आला . संजय मिश्रा आज बॉलिवूडमध्ये पुन्हा उभा आहे याच श्रेय पूर्णपणे रोहित शेट्टीला.

...लिखा है अॅक्टर का नाम

संजय मिश्राचा विषय निघाला आहे आणि 'आंखो देखी'चा उल्लेख होणार नाही हे कसं शक्य आहे? दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम असं म्हणतात. भूमिकांच्या बाबतीतही असं म्हणता येतं. 
अस्तित्ववादावर अतिशय तरल भाष्य करणारा आंखो देखी हा चित्रपट दशकातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. यातल्या बाऊजींच्या भूमिकेमुळे संजय मिश्रा या गुणवान कलावंताच्या अभिनय कारकिर्दीला नवसंजीवनी मिळाली. स्क्रिप्ट लिहिताना दिग्दर्शक रजत कपूरच्या डोळ्यांसमोर बाऊजींच्या भूमिकेसाठी संजय मिश्राच होता पण जेव्हा रजतने भूमिकेसाठी मिश्राशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो भूमिगत झाला होता. कुणालाच माहीत नव्हतं तो कुठे आहे. शेवटी नाईलाजाने नसिरुद्दीन शाहला घेऊन रजतने शूटिंग सुरू केलं आणि एक दिवस अचानक संजय मिश्रा त्याला भेटला. रजतला या भूमिकेत संजय मिश्राच पाहिजे होता. नसीर रजतचा मित्रच. एक दिवस व्हिस्कीच्या पेगवर रजतने नसीरला हा रोल सोडण्याची विनंती केली. नसीरने त्याच्या विनंतीला मान दिला. संजय मिश्रा 'आंखो देखी'मध्ये बाऊजींच्या भूमिकेत आला आणि पुढचा इतिहास घडला.

देर से मगर दुरुस्त

संजय सध्या फुल फॉर्मात आहे. 'जॉली एलएलबी'च्या दोन्ही भागांतल्या त्याच्या पाहुण्या भूमिकांचीही  प्रेक्षकांमध्ये चर्चा होते. फस गये रे ओबामा, दम लगा के हैशा या चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिका पण प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. आयुष्यात एवढं सगळं बघून झाल्यावर आणि बऱ्यापैकी यश मिळवल्यावर संजय मिश्राचं वैयक्तिक आयुष्य कसं चालू आहे? 'आंखो देखी'मधल्या बाऊजींप्रमाणेच तोही आता यश आणि अपयश या गोष्टींकडे तटस्थपणे बघतोय. त्याची दोन छोटी मुलं त्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहेत. एनएसडीमध्ये असतानाच त्याचं पहिलं लग्न मोडलं होतं. वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी वृद्ध आईच्या आग्रहामुळे त्यानं दुसरं लग्न केलं. पन्नाशी जवळ आली असताना दोन गोंडस पोरांचा बाप बनला. नियती काही लोकांना उशिरा देते पण भरभरून देते हेच खरं. आता चित्रपटात मोठ्या भूमिका करण्यापेक्षा आपल्या मुलांना आवडते पदार्थ करून खायला घालणं ही त्याची महत्त्वाकांक्षा आहे. ढाब्यावर  काम केल्याचा फायदा आता त्याला होतोय. खरंच संजय मिश्रावर संजय मिश्राइतकंच लिहिण्यासारखं आहे...

 प्रतिक्रिया द्या3034 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
सचिदानंद - बुधवार, २० डिसेंबर, २०१७
क्या बात है! संजय मिश्रा हे खऱ्या अर्थाने एक सहज आकलन न होणारं असं समीकरण आहेत हे आतापर्यंत त्यांच्याबद्दल ऐकल्या-वाचल्या माहितीवरून चांगलेच पटले आहे. त्यांच्या एका आगामी चित्रपटात त्यांचा सहकलाकार म्हणून काम केलेल्या माझ्या एका मित्राकडून त्यांच्याबद्दल आम्ही तास-दोन तास सहज गप्पा केल्या. गप्पा केल्या म्हणजे तो सांगत होता आणि आम्ही फक्त भारावून ऐकत होतो. हे असे प्रतिभावान कलावंत कधीही कुठल्या अज्ञातवासात जाऊ नयेत इतकी त्यांची इथे गरज आहे. छान लिखाण आणि उत्तम मांडणी. - सचिदानंद जाधव
Sachin raut - शनिवार, १ एप्रिल, २०१७
Well done sanjay sir
Shashank Darne - गुरुवार, ३० मार्च, २०१७
खरंच, अप्रतिम रेखाटलंय संजय मिश्राजींना. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढऊतार हे असतातच. पण त्या सगळ्यांवर मात करुन जो ऊभा राहतो तोच खरा माणुस. अशा बऱ्याच "सक्सेस स्टोरीज" आपल्या आसपास असतात. धन्यवाद रोहीत शेट्टी सर, एक गुणी अभिनेता परत आणण्यासाठी. धन्यवाद अमोल उद्गिरकर सर.
Swapnil Bhosle - सोमवार , २७ मार्च, २०१७
Hi, Mr.Sanjay Mishraji has been and will be my favorite actor till my last breath. Thank You! For this wonderful article. And bigger thanks to Mr. Rohit Shetty for bringing back Sanjayji back In the films.
Hemant Patankar - सोमवार , २७ मार्च, २०१७
Hats off Sanjay mishara ji for you and best wishes for next Journey. You did fantastic roles in lits of movies and I want to see you again n again in this industry.
Amol Oak - सोमवार , २७ मार्च, २०१७
Very nice article. He is a great man. Salute to Mr. SANJAY MISHRA...
Siddharth D. Birari - रविवार, २६ मार्च, २०१७
Apane din yaad aa gaye sanjuji, aap bharte raho. Aur hum aapko skrinpar hamesha dhekhate rahe, yehi duwa hai maa-bap ki jarurat kya hoti hai. Unke apar prem hi hai I love aai-papa.
Borde Dnyaneshwar k - रविवार, २६ मार्च, २०१७
Lajab lekha ahe,I am really fan of sanjay mishra.
अमोल - रविवार, २६ मार्च, २०१७
हाडाचा कलाकार आहे संजय मिश्रा.
AMRISH BHATIA - रविवार, २६ मार्च, २०१७
Very Nice Article. Today u come to know about Sanjay Mishra. Really .. he is a great man.
k.sachin - रविवार, २६ मार्च, २०१७
mast lekh ahe.
धिरज वाणी - रविवार, २६ मार्च, २०१७
लेख खुप प्रेरणादायक आहे. संजय मिश्रांविषयी जास्त माहिती नव्हती. उत्तम अभिनेता म्हणून ओळखत होतो. तुमच्यामुले एका जबरदस्त आणि जिवंत माणसाची ओळख झाली. तुमचे मनापासून आभार!
Shashikant Kumbhar - रविवार, २६ मार्च, २०१७
ग्लॅमरसच्या या चंदेरी दुनियेत ग्लॅमर अन पैसा नसतानाही टिकून राहणं हाच त्याच्या अभिनेत्याचा विजय आहे......
आशिष बोबडे - रविवार, २६ मार्च, २०१७
खूप छान होता लेख आवडला
अविनाश मेहेत्रे - शनिवार, २५ मार्च, २०१७
मागच्याच महिन्यात मसान पाहिला. डोकं दोन दिवस जागेवर नव्हतं. याला मोठं कारण म्हणजे संजय मिश्रा....अभिनयात फार थोडीच 'बाप'माणसं असतात.संजय मिश्रा हा त्यातलाच एक 'बापमाणूस'.
सचिन मदभावे - शनिवार, २५ मार्च, २०१७
अप्रतिम
भाग्येश - शनिवार, २५ मार्च, २०१७
अतिशय सुरेख लेख ! वाह, संकेत, बहोत खूब लिखा हैं । ु तूप क ट, गोंडस चेहऱ्याचे हिरो येत जात राहतील, पण संजय मिश्रा सारखे अ स्स ल अ भि ने ते हृ द यात कायम चे। स्था न प ट क व ता त .
Sanket Deshpande - शनिवार, २५ मार्च, २०१७
Struggle is very much important in life to achieve something. But getting to know about such struggle inspires new coming actors. After reading this article, first of all I thank Amol sir for mentioning his story in such a narrated and beautiful version. This story inspires alot and teaches us how to be on earth though we are getting recognition and success. Also, what the dedication actually means even though going through such hardships in his 7 years of span including demise of his father. And also it tells us, how imp is friendship in this industry that is to connect people with our personalities. The actors like Sanjay Mishra coming from NSD as well as theatre backgrounds are actually phinnominal and give full justice to their role whatever the length of their role will be. पण ते म्हणतात ना, कलाकार हा शेवटी जरा विचित्रच असतो आणि त्याला समजून घ्यायला कलाकारांचं लागतो । Reason to note down this line is when he worked in Dhaba even after getting fame and still continued to work there even after his owner didn't recognise him and now living a peaceful life is worth living ✌👍🙏🤘☝🙌😇
Hrishikesh - शनिवार, २५ मार्च, २०१७
Nice to read about this great actor. I liked Masan but never known about his home work. thanks a lot for pointing this another dimension about his life
Sunil Patil - शनिवार, २५ मार्च, २०१७
Nice written, and its honor to have Sanjay with s in film indstry
gopinath.patil - शनिवार, २५ मार्च, २०१७
One of my favorite Actor
बालाजी कुरडकर - शनिवार, २५ मार्च, २०१७
अमोल हॅट्स ऑफ टू यू।रिचा chaddha, सौरभ शुक्ल आता संजय मिश्रा, यांच्या बद्दल वाचतांना खूप बरे वाटते मुळात यांच्या वर कोणीतरी लिहितो हे महत्वाचे आहे हि अशी मंडळी आहेत जे अक्खा सिनेमा खाऊन टाकतात पण कोणीही समीक्षक अस आतलं लिहित नाहीत मी तुम्हाला aksharnama वर follow करतो परंतु हे सर्व जरा वेगळे, आता masan च्या नीरज घयावन वर लिहा.
Sangramsingh thakur - शनिवार, २५ मार्च, २०१७
Jewha sanjay siranna nagpur madhe Rakkhosh movie chya set war bhetlo. Tewhach janawla ki ha manus khup sangharsh karun ith paryant pohochlela aahe. Karan tyanch rahniman ani junior artist sobat wagnyachi padhhat khupach down to earth hoti.ani tyanchya jiwnatle prasang tumhi amhala sangitle tya baddal. Dhanyawad.
Meena sanjeev - शुक्रवार, २४ मार्च, २०१७
Khup chhan lihile aahe.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर