भिंत पाडून टाकणारी नाट्यकला
मंगळवार, १३ मार्च, २०१८ आदित्य वाडेकर

कला सादर करणारे आणि प्रेक्षक यांच्यातील अदृश्य भिंत पाडून टाकणारा प्रकार म्हणजे इंटरअॅक्विट परफॉर्मन्स आर्ट. भारतीयांना नवीन असलेल्या या कलाप्रकाराचा हा थोडक्यात परिचय.

इंटरॅक्टिव्ह परफॉर्मन्स आर्ट या कलाप्रकाराचं प्रमाण आपल्याकडे फार कमी आहे. बाहेरच्या देशात ते नक्कीच अधिक प्रमाणात आहे. मला फार काही या कलाप्रकाराबद्दल (ते खूप काहीतरी गूढ, अनाकलनीय, अगम्य असतं हे सोडल्यास) माहिती नव्हतं. म्हणून जेव्हा काला घोडामध्ये हा परफॉर्मन्स होणार आहे असं कळालं तेव्हा मुद्दाम ठरवून ते पाहायला गेलो होतो. ते सादर करणार होते अतुल कुमार आणि दानिश हुसेन. मुळात नाटकापेक्षा काहीतरी वेगळं आणि त्यात या दोघांचं कॉम्बिनेशन त्यामुळे हे चुकवणं शक्यच नव्हतं. त्या सादरीकरणावर पुढे लिहिलंच आहे पण परफॉर्मन्सनंतर या कलाप्रकाराविषयी अधिक गोष्टी जाणून घेताना खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या. म्हणून थोडं त्याबद्दल लिहितो.

इंटरॅक्टिव्ह परफॉर्मन्स ही संज्ञा नाटकाच्या दृष्टिकोनातून बघायची म्हणली तर थोडक्यात, नाटक सादर करणारा आणि प्रेक्षक ह्यांच्यात जी अदृश्य भिंत असते तिचं अस्तित्व उरत नाही. प्रेक्षक हा एका जागेवर स्थिर नसतो. तो उठून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. हे नाटक एकाच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतं, (शक्यतो ह्या प्रकारच्या नाटकांसाठी कस्टमाइज्ड जागा तयार केलेल्या असतात) प्रेक्षकाला कुठला भाग पाहायचा हे स्वातंत्र्य असतं. तो कलाकारांशी नाटकात बोलू शकतो. एखाद्या वेळेस नटदेखील त्यांना काही कामं सांगतात, काही गोष्टी (प्रॉप्स) पकडायला सांगू शकतात. नट प्रेक्षकांना प्रश्न विचारतात. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनुसार नाटकाचा प्लॉटदेखील बदलला जाऊ शकतो. थोडक्यात प्रेक्षक ठरवेल तसं नाटक घडू शकतं. आपल्याकडे अलीकडेच आलेल्या 'व्हाईट रॅबिट रेड रॅबिट' या नाटकात संहिता वाचणारा नट प्रेक्षकांना स्टेजवर बोलावून काही सूचना देत असतो, अॅक्शन्स करायला सांगत असतो हे तुम्ही पाहिलं असेल. अजून एक हार्डकोर उदाहरण द्यायचं झालं तर 'सिक्सटी मिनिट्स इन दमास्कस' या नाटकाचं देता येईल. एका इमारतीतल्या तळमजल्यावर हे नाटक घडतं. नाटकाच्या दिग्दर्शकाने या जागेचं एका हुकूमशाही सीरियन लष्करी छावणीत रूपांतर केलं आहे. ते नाटक पाहायला आलेले प्रेक्षक हे इंग्लंडवरून दमास्कस बघण्यासाठी आलेले पर्यटक असतात आणि दमास्कस बघत असतानाच प्रेक्षकांचं अपहरण होतं. त्यानंतर येणार अनुभव अजिबातच नॉर्मल नाहीये. पर्यटकांचे हात भिंतींना पॅरलल बांधले जातात. त्यांना धक्काबुक्की केली जाते. अपहरण (तेही एकदम चेहरा काळ्या कपड्याने झाकून वगैरे केलं जातं) केल्या केल्या कितीतरी वेळ त्यांच्याशी कोणी बोलतंच नाही. तिथे टॉर्चर रूम बनवलेली असते. आजूबाजूनी लोकांच्या किंकाळण्याचे आवाज येत असतात (प्रेक्षक पाहिजे तेव्हा हे नाटक सोडून जाऊ शकतात). मग काही वेळाने तिथे एक लष्करी अधिकारी येऊन पर्यटकांचं इंटेरॉगेशन घ्यायला सुरुवात करतो. तुम्ही सिरीयात का आले आहात वगैरे प्रश्न विचारतो. सुरुवातीला थोडा हसतखेळत वातावरण असतं आणि एकदम मग तो पर्यटकांवर डाफरायला सुरुवात करतो. जेणेकरून प्रेक्षक त्याच्या डायलॉग्सना पॅसिव्हली रिअॅक्ट करायला सुरुवात करतात. तिथे तुम्हाला सगळ्यात पहिला बंडखोर ज्यानी ही क्रांती सुरू केली तो भेटतो. तो वीस वर्षांपासून या तुरुंगात आहे आणि मग त्याची कहाणी सांगताना तो ती मोनोलॉगमध्ये सांगतो. म्हणजेच नॉर्मल नाटकात असणारे थिएट्रिकल एलिमेंट्स देखील पुरेपूर वापरलेले आहेत. एकाचवेळेस पर्यटक म्हणून आणि प्रेक्षक म्हणून तुमचा प्रवास सुरू असतो. दिग्दर्शक, प्रेक्षकांना पॅसिव्ह रिअॅक्ट व्हायला लावून आणि तरीदेखील त्यांना काही ठिकाणी पाहिजे तसं वागण्याची मूभा देऊन हे नाटक आपण ठरवतोय तसंच घडत चाललंय असं प्रेक्षकांना वाटायला भाग पाडतो आणि हेच या नाटकाचं यश आहे. अजून एक उदाहरण म्हणजे 'द मिस्टरी ऑफ एडविन डरुड'. चार्ल्स डिकन्सच्या अर्धवट राहिलेल्या कादंबरीवर आधारित हे नाटक आहे आणि ह्यात नाटकाचा शेवट सात वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे. मध्यंतरात प्रेक्षकांकडून मतं मागवली जातात आणि त्यानुसार नाटकाचा शेवट केला जातो. तसंच, 'नाईट ऑफ जॅन्यूअरी सिक्सटीन्थ' या नाटकात प्रेक्षकांना ज्युरीची भूमिका वठवावी लागते व न्याय द्यावा लागतो. अशी नाटकांबाबतची अनेक उदाहरणं देता येतील.

नाटक सोडून इंटरॅक्टिव्ह परफॉर्मन्स अनेक कलाकारांनी सादर केले आहेत. यात प्रत्येक कलाकाराचा परफॉर्मन्स, त्यातली सेटिंग्ज ही वेगळी असू शकतात. पण प्रत्येक कलेचं मूळ तत्त्व हे व्यक्त होणं असतं तोच विचार या परफॉर्मन्सेसच्या मागे असतो ही गोष्ट लक्षात ठेवून हे परफॉर्मन्सेस पहिले पाहिजेत अन्यथा ते अतिशय विसंगत वाटण्याची किंवा 'कहना क्या चाहते हो?' असं फीलिंग येण्याचीच शक्यता अधिक असते.

जपानी परफॉर्मन्स आर्टिस्ट योको ओनो हीचा कट पीस हा परफॉर्मन्स खूप प्रसिद्ध आहे. हा परफॉर्मन्स तिने सर्वप्रथम १९६४ मध्य सादर केला. यात योको सगळ्यात चांगला पोशाख परिधान करून स्टेजवर बसलेली असते. तिच्यासमोर कात्री ठेवलेली असते, प्रेक्षकांमधून एकेकाने वर येऊन कात्रीच्या साहाय्याने योकोच्या ड्रेसचा तुकडा कापून स्वतःकडे ठेवायचा असतो. हा व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे, सुरुवातीला काही प्रेक्षक संकोचत येतात आणि छोटे छोटे तुकडे कापून घेऊन जाताना दिसतात. जसजसं परफॉर्मन्स शेवटाकडे येतो तसं लोक येऊन मोट्ठे मोट्ठे तुकडे कापताना दिसतात आणि कचरतही नाहीत. शेवटी एक माणूस येतो व योकोच्या ब्राचा स्ट्रॅप देखील कापून टाकतो. इतकावेळ स्तब्ध असलेली योको शेवटी शेवटी मात्र अस्वस्थ झालेली दिसते आणि परफॉर्मन्स संपतो. आता तसं म्हणलं तर खूप वेगवेगळे अर्थ या कृतीतून काढता येतील. स्रीच्या शरीराकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन, स्त्रीचं समाजातील स्थान, तिची असहाय्यता, योकोचं चेहरा निर्विकार ठेऊन बसणं या सगळ्या गोष्टींवर खूप काही लिहिलं जाऊ शकतं किंवा चर्चा केली जाऊ शकते. हे मुद्दे मला जाणवतात. अजून सर्च केल्यावर, विविध कलाप्रकारात स्त्रीच्या शरीराने काय भूमिका बजावली आहे हे तपासणं हा योकोचा एक उद्देश होता हे कळालं. तिचं अजून एक उद्दिष्ट हे होतं की आपण नेहमीच कलेमधून आपल्याला काय सांगायचंय,आपल्याला काय द्यायचंय हाच विचार करतो. पण समोरच्याला जे त्यातून घ्यायचंय ते घेऊ दिलं पाहिजे (art is all about perception). हा दृष्टिकोनदेखील तिच्या या परफॉर्मन्स मागे होता. तसंच बुद्धाने वाघिणीची दया येऊन स्वतःला तिच्या हवाली केले होते ही दंतकथादेखील या परफॉर्मन्स मागचं योकोचं इन्स्पिरेशन होतं. आपण जितकं खोलात जाऊन विचार करू तितके स्तर आपल्याला या परफॉर्मन्समध्ये सापडत जातील.

मरिना अब्रामोविच हिच्या उल्लेखाशिवाय परफॉर्मन्स आर्टिस्ट्सची यादी पूर्ण होऊच शकत नाही. खरंतर तिच्यावर लिहिणं हा एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो इतके तिचे वेगवेगळे परफॉर्मन्सेस आहेत. तिच्या एकटीबरोबरच एकेकाळचा साथीदार युले यांच्यासोबत पण तिने अनेक परफॉर्मन्सेस सादर केले आहेत. परफॉर्मर आणि प्रेक्षकांचं नातं, मानवी शरीराच्या मर्यादा, मानवी मनाच्या अनेक शक्यता याबाबतीत तिने खूप काम केलं आहे.

१९७४ साली नेपल्स मध्ये तिने 'रिदम झिरो ''नावाचा एक परफॉर्मन्स सादर केला होता. एका टेबलवर ७२ वेगवेगळ्या गोष्टी उदाहरणार्थ, गुलाबाचं फूल, पीस ,पर्फ्युम, मध , ब्रेड, रेझर ब्लेड, पिस्तूल,कात्री अशा गोष्टी ठेवल्या होत्या. सहा तासांसाठी मरिना सोबत या गोष्टी वापरून हवं ते करण्याची मुभा प्रेक्षकांना होती. सुरुवातीला लोकांनी तिला गुलाबाचं फूल वगैरे दिलं. काही लोक तिला पाहिजे तसं वळवत होते, उठवत होते, बसवत होते, नॉर्मल इंटरॅक्शन चाललं होतं. काही वेळाने मात्र लोकांचा संयम सुटला. दोन तासांतच काही लोकांनी तिचे कपडे कात्रीने कापून टाकले. रेझर ब्लेडच्या साहाय्याने एकाने तिच्या गळ्यावर चीर मारली. लोक तिला नको तसा, नको तिथे स्पर्श करत होते. एकाने पिस्तूल उचलून तिच्या हातात दिलं व तिच्या गळ्यावर रोखलं. तिच्या बोटांच्या साहाय्यानेच तो ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न करत होता इतक्यातच तिथे आलेल्या बाकीच्या प्रेक्षकांनी तसं करण्यापासून त्याला रोखलं. तिथे दोन गटांमध्ये (मरिनाच्या बाजूचा व तीला जमेल त्या पद्धतीने इजा पोहोचवणारा) मोठा गदारोळ तयार झाला होता. सहा तास जसे संपले व मरिना चालत प्रेक्षकांकडे जाऊ लागली तेव्हा मात्र सगळ्यांनी हॉलच्या बाहेर पळण्यास सुरुवात केली. कोणीही तिच्या नजरेला नजर देण्यापुरतं का होईना (समोर उभं राहणं तर दूरच) तिथे थांबलं नाही. कलासमीक्षक थॉमस मॅकेव्हिली तिथे हजर होता व त्यानी लिहून ठेवलंय की, मरिना त्यादिवशी तिया परफॉर्मन्सबद्दल इतकी निग्रही होती की, त्यादिवशी तिथे कोणी बलात्कार करण्याचा किंवा खून करण्याचा जरी प्रयत्न केला असता तरी तिने विरोध केला नसता'. या परफॉर्मन्सचा व्हिडिओ यूट्यूबवर अव्हलेबल आहे.

मरिनानेच २०१० साली म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टस्, न्यू यॉर्क इथे सादर केलेला 'द आर्टिस्ट इज प्रेझेंट' हा परफॉर्मन्स जगप्रसिद्ध आहे. दोन खुर्च्या समोरासमोर ठेवलेल्या असतात. एका खुर्चीत मरिना बसलेली असते. समोर प्रेक्षकानी बसायचं असतं. पाहिजे तितक्या वेळ प्रेक्षक तिथे बसू शकतो. मरिना फक्त समोरच्या माणसाच्या नजरेत नजर मिळवून बघत असते. ११ वर्षांच्या मूलापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत अनेक लोकांनी यात सहभाग घेतला. समोरच्याकडे बघताना मरिना शक्य तितकी कमी हालचाल करते. या परफॉर्मन्स मध्ये लोकांनी खूपच इमोशनली रिअक्ट केलं. अनेक लोक भावनाविवश झालेली, रडवेली झालेली दिसतात. परफॉर्मन्स झाल्यावर अनेक लोकांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून तिचे हात हातात घेतलेत, तिला गालावर कीस केलंय, मिठी मारण्याचा प्रयत्न केलाय. १४ मार्च ते ३१ मे असे सलग तीन महिने रोज आठ तास याप्रमाणे ७८६ तास हा तिचा परफॉर्मन्स चालला. रोज लोकं येत होती. लांबच्या लांब रांगा लावून उभी राहत होती, काही लोकं नंबर येत नाही हे पाहून कंटाळून निघून जात होती. बसलेल्या लोकांनी त्यांना वेळ कसा गेला हे कळलंच नाही असं नमूद केलंय. केवळ नजरेला नजर मिळवून एवढ्या भावना उचंबळून येणं, स्वतःचं प्रतिबिंब त्यात तुम्हाला दिसणं, हे सगळंच खूप विलक्षण आहे. ह्याची कारणीमीमांसा अनेक लोकांनी सविस्तर केली आहे. ती करणे हा या लेखाचा उद्देश नाही. तिचा हा व अनेक व्हिडिओज यूट्यूब वर उपलब्ध आहेत. तिने केलेले सगळेच प्रयोग खूप वेगवेगळे आहेत. म्हणूनच तिचं या क्षेत्रातलं स्थान अतिशय उच्च आहे.

आता काला घोडात सादर झालेल्या परफॉर्मन्स कडे येऊया. शेपशिफ्ट कलेक्टिव्ह या ग्रुपने सादर केलेल्या इंटरॅक्टिव्ह परफॉर्मन्स इन्स्टॉलेशनचं नाव होतं स्कल्प्टिंग इंटिमसी. हॉर्निमन गार्डनमध्ये हिरवळीवर एक चौकोन आखून जागा निश्चित करण्यात आली होती. मागे मंद सुरावटीत शास्त्रीय संगीत चालू होतं. प्रेक्षकांमधून बोर्ड फिरवण्यात येत होता ज्यावर, आप इन शऱीरोंको आत्मीयता के भावों मे अपने हाथ से रूप दें' असं लिहिलेलं होतं. लोक एकेक करून पुढे येत होते आणि अतुल कुमार व दानिश हुसेनच्या शरीरांना आकार देत होते. प्रत्येकजण त्याला वाटणारी/दिसणारी आत्मीयतेची इमेज क्रिएट करू पाहत होता. नेहमीप्रमाणेच आधी लोकांमध्ये थोडा हेजिटन्स होता पण हळूहळू लोकांना खूप काही सुचू लागलं व एकामागोमाग एक अप्रतिम अशी इमेजरी क्रिएट होत होती. आधीच्याच पोजमध्ये थोडासा बदल करूनदेखील खूप काही नवीन तयार होत होतं. कुंभाराने मातीला आकार देऊन एक एक मूर्ती घडवत जावी तसं काहीसं होत होतं. अतिशयोक्ती नाही पण वेरूळ, खजुराहोतली शिल्पं आपल्यासमोर मिनिटामिनिटाला तयार होत आहेत, आकार घेत आहेत असा भास होत होता. आत्मीयतेची अनेक नात्यांची, अनेक रुपं तयार होत होती. कधी प्रेमी युगुल, कधी मित्रं , कधी आई आणि मुलगा, कधी देव आणि भक्त अशी असंख्य कॉम्बिनेशन्स तयार होत होती. ह्या सगळ्याच पोजेस लोकांना वेगवेगळ्या लेव्हलला भिडत होत्या. आर्ट इज ऑल अबाऊट इंटरप्रेटेशनचा अनुभव पुन्हा एकदा आला. अजून एक विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे कुठल्याही पोजमध्ये या दोघांचं पुरुष असणं जाणवत नव्हतं. केवळ 'दोन शरीरं' एवढंच त्यांचं अस्तित्त्व होतं. म्हणूनच कुठेही प्रेमीयुगुल म्हणून बघताना किंवा आई आणि मुलगा म्हणून बघताना त्या दोघांचं पुरुष असणं अडसर ठरलं नाही. लोकांचं पण विशेष कौतुक असं की कोणीच केवळ पोज क्रिएट करायची म्हणून करत नव्हतं. प्रत्येकजण ती इमेज अधिकाधिक डिटेल कशी करता येईल याकडे लक्ष देत होता. चेहऱ्यावरचे हावभाव, डोळे, भुवया, ओठ या सगळ्यांना पण लोक एखाद्या अनुभवी चित्रकाराने फायनल स्ट्रोक मारावा तसा आकार देत होते आणि कुठल्याही भाषेची, आवाजाची, गरज नसताना सगळं थेट लोकांपर्यंत पोहोचत होतं, त्यांना भिडत होतं. आर्ट ट्रान्सेन्ड्स एव्हरीथिंग हे सतत जाणवत होतं. वर सांगितलेली उदाहरणं एकवेळ लोकांना अनाकलनीय वाटू शकतील पण हा इंटरॅक्टिव्ह परफॉर्मन्स माझ्या मते कळायला अतिशय सोप्पा पण तेवढाच प्रभावी असा होता. असे नवनवीन प्रयोग आपल्याकडे होत आहेत ही गोष्ट खूप उमेद देणारी आहे.

 प्रतिक्रिया द्या2399 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर