बळीराजाचे आंदोलन
मंगळवार, १३ मार्च, २०१८ टीम बिगुल

आपल्या मागण्यांसाठी महापदयात्रा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा लोलक सोशल मीडियाच्या प्रकाशात आल्यानंतर निर्माण झालेल्या विकिरणांपैकी काही वेचक खास बिगुलच्या वाचकांसाठी.

आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून विधानसभेला घेराव घालण्यासाठी सुमारे लाखभर शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकपासून पदयात्रा करत मुंबईत दाखल झाले. ९५ टक्के मागण्या मान्य करण्यास त्यांनी सरकारला भागही पाडले. साधारणपणे कोणत्याही विषयावरून व्यक्त होतात तशी मतेमतांतरे या आंदोलनाबाबतही व्यक्त झाली, होत आहेत. चालून पाय सोलवटलेल्या शेतकऱ्यांच्या फोटोंपासून ते कळकळ आणि तुच्छता या दोन टोकांमधील भावना व्यक्त करणाऱ्या पोस्टींचे वादळ सोशल मीडियावर उठले. बळीराजाच्या आंदोलनाचा हा विविधअंगी लोलक सोशल मीडियाच्या प्रकाशात आल्यानंतर कसा दिसला त्याची एक झलक.

...............................

दोन कामं होती म्हणून काल ऑफिसच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो. खरं तर मित्राकडे रहाण्याचा कार्यक्रम होता. पण अर्ध्या रस्त्यात असताना एका मित्राने वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकणार नसल्याचं सांगितलं. लगेच घरी फोन करून बायकोला कळवलं की रात्री घरी परत येतो आहे. पुण्यात ज्याच्याकडे मुक्कामाला थांबणार होतो त्या मित्रालाही फोन लावून कार्यक्रम बदलल्याची माहिती दिली. आणि एसी गाडीने आवडतं संगीत ऐकत सकाळी झपाझप गेलो. पहिलं काम पूर्ण केलं. मित्रांना भेटलो आणि संध्याकाळी तसाच परतलो. तरीही थोडा थकलो. सकाळी फेसबुक चेक केलं. मार्कबाबाने सांगितलं की आज तापमान ४० अंश सेल्सियस असणार आहे. त्यामुळे क्लासला दुपारी येणारी मुलं दमलेली असतील, यंदाचा उन्हाळा तीव्र असेल, एप्रिलमध्ये व्हेकेशन बॅचेस सुरू होण्यापूर्वी वर्गातले एसी पाण्याने नीट स्वच्छ करून घेतले पाहिजेत वगैरे मुद्दे डोक्यात आले.

तोपर्यंत फेसबुक टाइमलाईनवर शेतकऱ्यांच्या मोर्चाचे अलका धूपकर यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ आले. उन्हातान्हात फिरणारी माणसं पाहिली. म्हाताऱ्या स्त्रिया पाहिल्या. रात्री रस्त्यावर झोपलेले हजारो लोक पाहिले. तुटक्या चपलेचे. जखमी पायाचे, धुळीने माखलेल्या पायांचे फोटो पाहिले. मनातल्या मनात ए सी गाडीतून आवडतं संगीत ऐकत, शेवटच्या क्षणी कार्यक्रम बदलल्यावर सगळ्यांना कळवून, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम पूर्ण करून आणि जे अर्धवट राहिले त्याबद्दल पुढच्या भेटीची योजना करून पूर्ण झालेल्या कालच्या माझ्या प्रवासाची आणि शेतकऱ्यांच्या या मोर्च्याची तुलना झाली. स्वतःला आलेल्या शिणवट्याची लाज वाटली.

कसलीच शाश्वती नसताना, कुठलंही काम होईल याची खात्री नसताना, राजकीय स्वार्थासाठी कोण आपला कश्याप्रकारे वापर करून घेईल याबद्दल काही कल्पना नसताना हजारो लाखो लोक रणरणत्या उन्हात एकत्र चालतात. कोण आपला नेता? बोलणी करण्यासाठी सरकार त्याला मान्यता देणार का? सरकारतर्फे कोण बोलणी करणार? काय मिळालं की मोर्चा विसर्जित केला जाणार? जे तोंडी किंवा लेखी मिळेल ते प्रत्यक्षात हाती केव्हा पडणार? आणि ते नाही मिळालं तर आपण पाठपुरावा कसा लावणार? मोर्च्याचं नेतृत्व करणाऱ्यांना सत्तेत किंवा विरोधात कसं बसवणार? आपले हक्क मिळवण्यात यांना अपयश आलं तर तर दुसरा पर्याय कोणता? आणि इतर कुठले मार्ग वापरणार? त्यांच्यामागे असलेलं आपलं संख्याबळ कमी होऊ नये म्हणून स्वतः कितीवेळ तग धरणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याजवळ असतील का? हे प्रश्न महत्वाचे आहेत असं त्यांना वाटत असेल का? या विचाराने मीच अस्वस्थ झालो.

यांना आदिवासी म्हणावं की वनवासी? शेतकरी कर भरतात की नाही? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी की नाही? कर्जमाफीचा लाभ बडे शेतकरीच घेतात की नाही? या मोर्च्यात राजकीय पक्षांचे झेंडे असावेत की नाहीत? हे सगळे प्रश्न म्हणजे चक्रीवादळात उडणाऱ्या धुळीसारखे आहेत. चक्रीवादळाची खरी ताकद वादळाबरोबर उडणाऱ्या धुळीत नसून त्या वाऱ्यांना वाहू देणाऱ्या परिस्थितीत असते. आणि सध्या आपली सामाजिक परिस्थिती अशी आहे की वेगवेगळे गट सतत लढत आहेत. कुणी अस्तित्वाची लढाई लढतंय तर कुणी अस्मितेची. अस्मितेच्या लढायांकडे समाजाने तिरस्काराने पाहणं आवश्यक आहे तर कुठल्याही एका गटाच्या अस्तित्वाच्या लढाईकडे मात्र संपूर्ण समाजाने सहानुभूतीने पाहणं आवश्यक आहे.

दुर्दैवाने आपल्या देशातील अस्तित्वाच्या लढायांसाठी आपण आपलं स्वतःचं, इथल्या लोकांना जवळचं वाटेल असं तत्वज्ञान तयार करण्यात अपयशी ठरलो आहोत. सध्याच्या मोर्चाचं नावदेखील लॉन्ग मार्च वापरून मोर्चेकरी नसता विरोध ओढवून घेत आहेत. भारतातील कम्युनिस्ट विरोधकांच्या नजरेत अपयशी असतील, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि त्यानंतरही काही वर्षे त्यांचा किंवा त्यांच्यातील काही गटांचा इतिहास फारसा उज्वल नसेल. पण त्यामुळे त्यांनी आज ज्यांची बाजू घेतली आहे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न तिरस्कारयोग्य ठरत नाही.

इतके प्रश्न आपल्या समाजात आहेत यावर बहुसंख्यांचा विश्वास न बसणं. सगळे प्रश्न भांडवलशाही किंवा राष्ट्रवाद सोडवू शकेल इतकं भाबडं सामाजिक आकलन असणं, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे.

खरंतर; लोकशाही मानणारे कम्युनिस्ट, भारतीय घटना सर्वोच्च आहे हे अधिकृतरीत्या मान्य करणारे कम्युनिस्ट, विरोधी पक्ष म्हणून काम करणारे कम्युनिस्ट, लॉन्ग मार्च काढून सरकारकडे निवेदन देणारे कम्युनिस्ट ही खास भारतीय निर्मिती आहे. हिचा वापर आपण करून घेऊ शकलो तर इथल्या सर्वांचं भलं होणार आहे. त्यामुळे या मोर्च्याला पाठिंबा देऊन आगामी निवडणुकीत सर्व पक्षांना या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला लावणं, आणि सारासार विचार करून मतदान करणं आपलं कर्तव्य आहे.

आनंद मोरे

...............................

एका घरातला मोठा भाऊ तापट होता. पहिलवान होता. टग्या होता. वडील म्हातारे होते. त्यांना त्रास देऊन शेतीचा मोठा हिस्सा स्वत:च्या नावावर करून घेतला. बाकीचे तीन भाऊ गुमान ऐकून घेत. त्यातल्या दोन भावांनी मोठ्याशी न भांडता उरलेली जमीन वाटून घेतली. आता धाकटा उरला. त्याला काहीच मिळाले नाही. तो ओरडायला लागला की मोठा हसत असे. चेष्टा करत असे. मधले दोन भाऊ कानात बोळे घालून बसत.

मधले दोन भाऊ मोठ्याच्या दादागिरीबाबत काही बोलत नसत. पण त्यांना झळ बसली की धाकट्याच्या प्रश्नांवर त्याच्याशी गोड बोलत. त्यामुळे धाकट्याला वाटे की आपल्या बाजूने दोघे आहेत. तो मोठ्याशी भांडण उकरून काढत असे. मग दोघे ते सोडवायला जात. रात्री मोठा आणि मधले दोघे एकत्र बसत. तिघात मांडवली होई. धाकटा पुन्हा कोकलत बसायचा.

एक दिवस धाकट्याच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. काहीच दिवसात गावातल्या गुंडांनी मोठ्याचे वैमनस्य मनात धरून त्याच्या शेतात आग लावली. गुरं पळवून नेली. घर उद्ध्वस्त केलं. होत्याचं नव्हतं झालं. आता मोठा दोघांकडे मदत मागायला गेले ते नाही म्हणाले.

मग दोघांच्या बाबतीत हेच घडले. ते मोठ्याकडे मदत मागायला गेले. तो नाही म्हणाला. मग तिघांची बैठक बसली. एकत्र राहून मुकाबला करण्य़ाचे ठरले.

पण आता धाकटा नाहीच म्हणू लागला.

आता मोठ्या तिघा भावांनी त्याला दूषणे देण्यास सुरुवात केली. याच्यामुळे कुटुंबावर होणाऱ्या परिस्थितीचा एकत्रितपणे मुकाबला करता येत नाही. हा गावगुंडांना सामील आहे. हा त्यांना पूरक भूमिका घेतो वगैरे वगैरे. त्यांनी पंचायत बोलवली आणि त्याला गावाबाहेर काढण्याची मागणी केली. सगळं गाव धाकट्याला दूषणे देऊ लागलं. पंचांमधेही एकमत होऊ लागलं.

पंचायतीत एक वृद्ध दलित होता. त्याचं मत विचारलं.

तो म्हणाला "त्याला तुम्ही तिघं मिळून जमिनीचा चौथा हिस्सा द्या, त्यानंतर तो तुमच्यासोबत नाही आला तर मग त्याला आपण गावाबाहेर काढू."

आणि सगळ्या गावाला हे पटलं.

महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती अशीच आहे. धाकट्याच्या दु:खाला कुणी वाली नाही. त्याच्यावर मोठ्यांच्या दु:खात सामील होण्याचं दडपण आहे फक्त.

किरण चव्हाण

...............................

मागे शेतकरी संपाच्यावेळी शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारे आणि आता मोर्चातील तुटलेल्या चपला, रक्ताने माखलेले पाय, जखमा तसेच लाल झेंडा पाहून शहाणपण हेपलणारे दलित आंबेडकरवादी( सगळेच नाही बरं का नाही तर चढाल) यांना पाहून लाज वाटते. या लोकांना माहीत पाहिजे की महाराष्टातले सगळेच दलित भूमीहीन नाहीत. विदर्भातल्या ग्रामिण दलितांकडे सत्तर ऐंशी टक्के लोकांकडे शेती आहे. ह्या मोर्चा, संपातून सगळ्याच शेतकरी शेतमजूर भूमीहीन आदिवासी यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात, किमान मोर्चेकरी तशी अपेक्षा करून आहेत. असं असताना त्यांचं नेतृत्व लाल करतोय की निळा करतोय की भगवा करतोय हे पाहण्याची खाज अजूनही यांच्याकडून सुटत नाही.
किती दिवस बाबासाहेबांनी काढलेल्या मोर्च्याची आणि दादासाहेब गायकवांड यांनी केलेल्या भूमीहीन आंदोलनाचे दाखले देत राहणार. तुम्ही आता काय करत आहात?? बाळासाहेब आंबेडकर शेतकरी शेतमजुरांचे आदिवास्यांचे मूलभूत प्रश्न मांडत असतात त्यांनाही हे हार्डकोर आंबेडकरवादी कम्युनिष्टांच्या नादी लागले म्हणून टीका करतात. म्हणजे स्वत: काही करणार नाही जे करत आहेत त्यांना शहाणपणाचे नैतिकतेचे डोस पाजणार आणि आपल्या वेळेस बोंबलणार, आमच्या आंदोलनावर आमच्या मागण्यांवर कुणी बोलत नाही 
#आक्रोश_बळीराजाचा

अतुल देशभ्रतार

...............................

मुस्लीम बांधव जय्यत तयारी करून २०० किलोमीटर अंतर पार करून येणाऱ्या किसानांची वाट पाहताना दिसतायत.

काल रात्री शहादा नंदूरबारहून परत येताना बसमध्येच माहिती मिळाली. स्वागताची तयारी करणाऱ्या सीपीआयच्या लालबागच्या कार्यकर्त्यांनी जेंव्हा सांगितले की दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेला जाताना अडथळा येऊ नये म्हणून इतके दमले भागले असूनही आझाद मैदानात पोहोचण्यासाठी मध्यरात्री चालू लागलेत. ते ऐकून खूपच गहिवरून आले.

मनात आले की शेतकरी नुसता लाखांचा पोशिंदा नाही तर तो लेकरांची काळजी घेणारा 'माया' करणारा 'माय'सुद्धा आहे. हे मायाळूपण कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या कम्युनिस्ट चळवळीत नेहमीच पहायला मिळते. म्हणूनच लाख वेळा म्हणावेसे वाटते.

या लाखांच्या पोशिंदांच्या मायेला लाल लाल लाल सलाम! 
गाणं थोडं बदलून म्हणता येईल..

लेनीन अब भी जिंदा है 
हर लहू के कतरें में...!

कुंदा प्र. नी.

...............................

हिटलरने अनंत वेळा गर्जना केली. कम्युनिस्टांना जगातून संपवण्याची. जर्मनीत त्यांची कत्तल देखील केली...

त्याच हिटलरला कम्युनिस्टांच्या भीतीने आत्महत्या करावी लागली...

हिटलरचे नाझी समर्थक होते त्यांची मुलं आपल्या आईबापांचा तिरस्कार करतात. नीच होते असे म्हणतात....

सुनील देवधरांनी मिनी हिटलर गर्जना केलीये भारतातून डाव्यांना संपवण्याची...

देवधरांना शुभेच्छा

चंदू सिंधू

...............................

मसला ये भी है इस ज़ालिम दुनिया में...


शेतकरी मोर्चा घेऊन आले. मोर्चा शब्दसुद्धा काहीसा हिंसक वाटावा, इतक्या शांततेत शेतकरी मुंबईत आले. कुठे धक्का नाही. कुठे अडचण नाही. अडथळा नाही.


तुम्ही सहभागी झालात. ठीक आहे. नाही झालात. तेही ठीक आहे. कुणाचं समर्थन मागितले नाही. कुणाचा विरोध व्हावा असे काही केले नाही. कुठल्या हानीचा इशारा नाही.


सर्व शांततेत. तेही एक किंवा दोन दिवस नव्हे, सात दिवस. दोनशे किलोमीटरचा प्रवास. रखरखत्या उन्हातून चालताना पाय झिजून रक्त सांडले, तरी माघार नाही.


मागण्या आठ ते दहा होत्या. वन जमिनी ही प्रमुख. त्यावर अधिक बोलता येईल. तेही अधिक विस्तृतपणे. तत्पूर्वी सोशल मीडियावरील दोन-एक गोष्टींची दाखल घ्यायला हवी. सोशल मिडीयाला महत्त्व देण्याचे कारण, यात मेन स्ट्रिम मीडिया एवढाच किंवा कणभर जास्त वाटा सोशल मीडियाने उचलला. त्यामुळे इथली बडबड ही केवळ बडबड राहत नाही, तर एकंदरीत आंदोलनातील महत्त्वाची बाजू ठरते.


मोर्चाला समर्थन अनेकांचे दिसले. कदाचित माझ्या यादीत समविचारी अधिक असल्याने मला अधिक दिसले असतील. पण यादी पलीकडे सुद्धा असतील. खात्री आहे. तरी काही घेणे देणे नसताना, काही त्रास झाला नसताना, शेतीतला त्रास माहित नसताना, उगाच विरोध करणारे काही कमी नव्हते.


एक आक्षेप दिसला, शेतकरी आदिवासींच्या खांद्यावर बंदूक ठेवून डावे गोळ्या झाडत आहेत. शब्दशः नसले, तरी सूर असे होते. पटवर्धन बाईंचा लेख वाचता, वरील माझे विधान शब्दशः सुद्धा कुणी बोलले असावे. शक्यता नाकारता येत नाही.


प्रश्न असा आहे की, झेंडा डाव्यांचा असो वा अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षाचा. त्या झेंड्याच्या काठीला जे हात चिटकले होते, त्या हातांची व्यथा इथलीच होती ना? की तीही डावी उजवी होती?


इथले काही भाजप समर्थक दिसले, जे म्हणे, काँग्रेस राष्ट्रवादीने काही केले नाही. आज तेच पाठिंबा देत आहेत वगैरे. अरे, त्यांनी काही केले नाही असे समजू, मग तुम्हाला कशाला निवडून दिले आहे? त्यांनी काय केले नाही, याचे तुणतुणे वाजवायला का?


पूनम महाजन, पटवर्धन बाई आणि तत्सम मानसिकतेच्या प्राण्यांवर फार बोलणे बरे नाही. त्यांचा विषय आपल्या अखत्यारीत नसून, मानसोपचार तज्ज्ञांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे त्यावर बोलणे टाळतो.


आणि हो, डावे संपले. ते खूप किचकट बोलतात. असे म्हणत त्यांची टर उडवणाऱ्यांनो, डावे आर्थिक विषयावर बोलतात. म्हणजे पर्यायाने थेट पोटाच्या प्रश्नावर. आता भावनांच्या राजकारणात मोठ्या तरबेजपणे पोटाचे विषय कठीण असल्याचे भासवले जाते, यात डाव्यांचा दोष नसतो. तुमचा असतो. असो.


कुणी काही विधायक हेतूने लढाई करत असेल, तर त्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना वसीम बरेलवी साहेबांची एक शायरी अर्पण करावी वाटते :

"मसला ये भी है इस ज़ालिम दुनिया में..
अगर कोई अच्छा है तो वो अच्छा क्यू है.."


बाकी... हा देश शेती आणि संस्कृतीशी बांधील आहे. त्यापासून दूर गेलात, तर पुन्हा तिथेच घेऊन येऊ, हेच सांगतो आजचा माहौल.


कधीकाळी कॉ. कृष्णा देसाईंची हत्या करणाऱ्या आणि काल परवा 'अभी केवल केरळ बाकी है' म्हणणाऱ्या... सगळ्यांना आज डाव्यांच्या व्यासपीठावर लाल सलाम ठोकावा लागला. आहे की नाही ताकद?

नामदेव अंजना

...............................

पायाचा तळवा फाटून लटकलेलं मांस बघूनही ज्यांची मने द्रवत नाहीत हे तेच लोक आहेत, ज्यांना दलित/मुस्लीम अत्याचार झाला शेतकरी आत्महत्या झाली तरी सोयरसुतक नसतं. म्हाताऱ्या आज्ज्या पायपीट करत डोळ्यात स्वप्न घेऊन विश्वासाने आल्या. इथं आल्यावर माणुसकीच्या नात्याने कुणीतरी उभं राहिल असं त्यांना वाटलंच असेल तसे मानवतावादी उभे राहिलेच आहेत. सलाम त्यांना. पण काही जंतू आहेत जे त्यांच्या व्यथांवर वेदनेवर थुंकत गैरसोय झाली. कचरा केला वगैरे बोलणारे अन सहा डिसेंबरला येवून कचरा करतात म्हणनारे, तो जीभेने मोजणारे तर हे तेच लोक आहेत. अन हे तेच लोक आहेत जे आंबेडकरी आंदोलनात नक्षलवाद शोधत असतात. हे तेच लोक आहेत जे तापलेल्या रस्त्याचे चटके सोसत टाचा घासत लंगडत आलेल्या पण आपल्या मागण्या उद्देश यावर ठाम असणाऱ्या शोषितांच्या आंदोलनात नक्षलवाद शोधतात. हे तेच लोक आहेत जे आरक्षणावर बोलतात आमच्यावर अमुकतमुक टक्यांनी अन्याय झाला सांगतात. जगातले आठवे आश्चर्य आम्ही tax pay करतो म्हणतात. हे तेच लोक आहेत यांचे पक्ष वेगळे यांची नावे वेगळी आडनावे वेगळी परंतु मानसिकता तीच असते. हो हे तेच लोक मनुचे वंशज. तो प्रत्येकाच्या आत असतो असा कधीतरी नेमकाच उफाळून येतो.

मिलिंद धुमाळे

...............................

कोणी निर्बुद्ध शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणते, कोणी मूर्ख शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही भरलेल्या आयकरातून मिळते म्हणते, कोणी नालायक मोर्चातील शेतकऱ्यांच्या टोप्यांचा आणि अन्नाच्या खर्चाची तरतुद कोणी केली म्हणून प्रश्न विचारतो! तर ज्याच्याकडून संवैधानिक जवाबदारीमुळे अपेक्षा केल्या तो म्हणतो, या मोर्चात 95% शेतकरीच नाहीत ............

सर्व काही दिसलं तुम्हाला पण भर उन्हात अनवाणी चालून पायाची तळवे सोलून निघालेल्या कातडीची रक्ताळलेली लक्तरं तुम्हांस दिसत नाहीत!

हरामखोरांनो तुम्ही अन्नच खाता ना? अन्नच खात असाल तर ते कुठल्या फॅक्टरीत तयार होत नाही! पोशिंद्यावर निर्गल आरोप करता! अजून तरी शेतकरी केवळ स्वत:चाच जीव देतात, तुम्ही नक्षलवादी म्हणत असाल तर प्रत्येक शेतकरी नक्षलवादी होऊन काय करेल याचा विचार करा!

'कालचे सारे लफंगे बैसले सिंहासनी 
ढाळतो आम्ही भिकारी लक्तरांची चामरे'

राज कुलकर्णी

...............................

शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे त्यांच्या जेवणाचा हिशोब शेअर करणाऱ्या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. (असेच बिनडोक श्रीदेवीच्या अंत्ययात्रेत चक्कर नाही आली, नोटबंदी वेळेस बरी आली असं म्हणताना दिसले होते).

तथाकथित नवश्रीमंतांनी हे लक्षात घ्यायला हवे की एखाद्या राष्ट्राला विकसित होण्याच्या वल्गना करायचा अधिकार तेव्हाच मिळतो जेव्हा दारिद्र्य रेषेखालील एक मोठा वर्ग हा वर होतो. आणि या वर्गात शेतीधिष्ठित उद्योग करणाऱ्या लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो.

आम्ही टॅक्स भरतो म्हणून यांना कर्जमाफी मिळते अशी फुशारकी मारणाऱ्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की ज्या ढोलताशात हे सरकार मश्गुल आहे त्या पायाभूत सुविधाचा धंदा करणाऱ्या असंख्य कंपन्या कर्ज परतावा करू शकल्या नाही म्हणून "लोन रिस्ट्रक्चर" च्या नावाखाली हजारो कोटी रुपयांवर पाणी सोडलं आहे.

शेती हा उद्योग आहे. शंभर कोटी संख्या असलेला देश फक्त त्या उद्योगावर खरं तर महासत्ता बनू शकतो. पण त्याला लागणारी एको सिस्टम बनवण्यात आपण अपयशी ठरलो हा गुन्हा आहे. कर्ज माफी ही त्या गुन्ह्याला दिलेली शिक्षा आहे. बाहेरच्या देशांनी कर्जमाफी दिली नाही हे म्हणणार्यांनी एकदा पाश्चात्य देशातल्या सबसिडीचा अभ्यास करावाच.

राजेश मंडलिक

...............................

मी कधीच कुठल्या चळवळीत काम केलं नाही, नाही कधी कुठल्या मोर्चात उतरले.. हे मी मनात फार लाज बाळगून लिहितेय. पण तो पिंड नाही हे प्रामाणिकपणे सांगते. मी कधीच कोणत्या पक्षाची नव्हते आणि नाही. मी कधीच कुठला झेंडा खांद्यावर घेतला नाही. मी उजवी तर कधीच नव्हते आणि डाव्या बाजूलाही कधी झुकले नाही. पण म्हणून मी तटस्थ आहे का? नाही !!! मी माणूस आहे आणि माणसाचं दु:ख, वेदना मला अस्वस्थ करतात . माझ्या सुरक्षित जगात जगतानाही कोणाच्या पायात टोचलेला काटा माझ्या मनात सलतो .
परवा राहुल बनसोडे यांनी एक फार हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली होती.. शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या निमित्ताने. वाचताना अक्षरशः रडले. हजारो माणसांना स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं झालेल्या एका देशात अजूनही मूलभूत हक्कांसाठी अशी पायपीट करावी लागणं हेच अमानुष आहे. त्या मोर्चाचा प्रत्येक फोटो पाहताना, प्रत्येक बातमी वाचताना, त्याचे फेसबुक live पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आणि घशात आवंढा आहे! इतकं काही साचलेलं आहे मनात की काहीच लिहिता येत नाहीये. मात्र खूप अपराधी वाटतंय.  :-(

सुजाता पाटील

...............................

काय गंमत आहे ना 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही स्वयंसेवक रस्त्यावर दिसेना.

आंबेडकरी बांधव पाणी-बिस्किटे घेऊन आले.
मुस्लीम पाणी-खजूर घेऊन आले..
शीख बांधव जेवण घेऊन आले.

हिंदुत्ववादी संघी बेपत्ता.
एऱ्हवी हे पार उत्तरांचल मेघालय त्रिपुरात तथाकथित समाजकार्य करायला पुढे असतात म्हणे.की फक्त पुतळे पाडायला शाई फेकायला पुढे..?

शेतकरी मजूर आदिवासी मोर्चे सहा डिसेंबरची आपत्ती अशावेळी यांना
अखंड हिंदू,समस्त हिंदू सगळे एक,एकात्म मानववाद,हिंदुत्ववाद,वसुधैव कुटुम्बकम या सगळ्या गोलमाल संज्ञा आठवत नाही?

शेतकरी शेतमजूर आदिवासी कष्टकरी "हिंदुत्ववादी" <हिंदू> नसतो काय?
"हिंदुत्ववाद" ही कुणाची थियरी आहे? कुणासाठी आहे? विचार करूया काय?

भूषण जाधव

...............................

स्प्रिंग जेवढी जोर लावून दाबली जाते, त्याच्या दुप्पट जोर लावून उचंबळते. गेली पाच दिवस शेतकरी मोर्चाच्या बातम्या टीव्ही चॅनेल, वृत्तपत्रांनी जेवढ्या तत्परतेने दाबल्या, तेवढ्याच वेगाने त्या सोशल मीडियात व्हायरल झाल्या. लग्नात वरातीमागून घोडं यावं तशी टीव्ही चॅनेल, वृत्तपत्रे, राजकीय पक्षनेते मोर्चाचे मागे हातापायाची ढोपरं फोडत फरफटत गेली.

जयंत जोपळे

...............................

टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हालहाल सोसणाऱ्या माझ्या आईबापाला कोणी माओवादी, नक्षलवादी म्हणत बोल लावत असतील, तर अशा आईबापाच्या पोटी जन्मलेली आम्ही कोटयवधी मुले जन्माने नक्षलवादीच ठरतो! 
तेव्हा जिव्हा परजताना भान ठेवा...

भाऊसाहेब चासकर

...............................

या शेतकरी लोकांना मेहनत करायला नको, you know!
नेते म्हणले चला, हे निघाले!

बॉस, जरा नवीन कल्पना ट्राय करा, cooperative ट्राय करा हवं तर!

इस्त्रायल मधे म्हणे कमी पाण्याची शेती होते किंवा नैसर्गिक शेती बघा, सामूहिक शेती करा. खूप ऑप्शन्स आहेत; तुम्हाला ना सगळं सरकारकडून आयतं हवं!

असं नाही होत भाऊ, आता काळ बदललाय, स्वतः मेहनत करा आणि मिळवा! शेती करावी तर अदानी-विलमर सारखी!!

आणि हो, झालंच तर आदिदासचे नवीन बूट बघा ट्राय करून; परवाच डेकॅथलॉन बघितले; काय कम्फर्ट आहे चालायला राव! ते पाय वगैरे फाटणार नाहीत; मग चाला हवे तेवढे!

#फाटक्या_पायाची_कातडी_जोडू_कशी

कौस्तुभ खांडेकर

...............................प्रतिक्रिया द्या1131 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर