दोन किलोमीटर त्यांच्याबरोबर पायी चाला!
मंगळवार, १३ मार्च, २०१८ राहुल बनसोडे

एका प्रगल्भ, उदात्त संस्कृतीचे शेवटचे नागरिक पायी चालत सरकार नावाच्या मूर्ख यंत्रणेला भेटायला गेले. त्यांच्यासोबत दोन किलोमीटर चालण्याचा अनुभवही खूप काही शिकवून जाणारा.

कधी कधी माझे बाबा लवंगी मिरच्या, घुंगर्‍या शेंगा आणि चहाच्या पाण्यात न बुडवता नैसर्गिकरित्या लालसर दिसणारी गावठी अंडी घेऊन येतात. मी माझ्या लहानपणचा एक मोठा काळ कोंबड्यांसोबत घालविला आहे, त्यामुळे ओरीजनल गावडी अंडे फोडल्यानंतर त्यातला पिवळा बलक सोन्याच्या दागिन्याहूनही जास्त देखणा का असतो हे सांगण्यासाठी दोन तास घेऊ शकतो. इथे तिथे तो विषय घेणार नाही. माझ्या कम्युनिस्टधार्जिणा असल्याच्या खर्‍याखोट्या गप्पांचा फायदा घेऊन पुढची गोष्ट सांगतो. सर्वप्रथम शेतीचा शोध हा मानवी इतिहासातली सर्वात मोठी फसवणूक आहे या बहुतांश मानववंशशास्त्रज्ञांच्या दाव्याशी असलेली माझी सहमती कुठल्याही विधानाने बदलणार नाही. पुर्वाश्रमीच्या शेतमजुरांचा मुलगा म्हणुन वयाच्या तिसर्‍या महिन्यात मी कामावर हजर होतो हे एक छोटेसे वास्तवही तात्पुरते हाताशी घेतो. शेतीच्या समस्येविषयी बर्‍याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ऊस, सोयाबीन आणि मक्याच्या भांडवलशाही आधारित शेतीचा आणि त्यावर सामाजिक व राजकीय कुरघोड्या करणार्‍या सरंजामी न्युसन्सच्या मी आजन्म विरोधात आहे. हे सगळे करूनही मला अन्न लागते आणि ते कुणी ना कुणीतरी पिकविलेले असतेच. हंटर्स गॅदरर्स संस्कृतीचे आणि त्यायोगे आलेल्या प्रिमिटीव्ह कम्युनिझमचे मी कितीही गुणगाण गाईले तरी आज ना तर मला शिकार करता येते, ना तर त्या शिकारीसाठी लागणारी नैसर्गिक साधनसंपत्ती कुठे शिल्लक राहिली आहे. भांडवलशाहीने अन्नव्यवस्था पूर्णतः आपल्या ताब्यात घेतल्यानंतर प्रयत्न करूनही ते नवीन अन्न जेव्हा माझ्या आईबाबांना पचविता येत नाहीये तेव्हा सेंद्रीय अन्न मिळविण्यासाठी त्यांची चाललेली धडपड मला दिसते आहे. असंख्य उटारेट्या करून माझे बाबा आजही आमच्या घरात सेंद्रीय अन्नपदार्थ शिजतील ह्याबाबत प्रयत्नशील आहेत. या आठवड्यात मात्र हे काम अधिकच अवघड झाले आहे कारण आम्हाला सेंद्रीय अन्न पुरविणारे शेतकरीच संपावर आहेत.

भारतीय किसान सभेच्या शेतकरी मोर्चात आमच्या घरचे शेतकरी सहभागी आहेत. शेतीतून भांडवलशाही आणि फ्युडलीझम वजा केल्यानंतर मागे उरणार्‍या शेतीचा हा शेतकरी आहे. त्याचे राजकीय वजन वा दबावमुल्य किती असेल याबद्दल मला काही माहिती नाही. यातले काही लोक शेतकरी नसून शेतमजुरही आहेत. ह्यांच्या काहीतरी मागण्या असतीलच ज्याचे मूल्य प्रचलित सरकारला वा त्यांच्या मांडीवर बसलेल्या निमसरकारी माध्यमांना कुठल्याही प्रकारे महत्त्वाचे वाटणार नाहीत. या मोर्चाच्या शेवटी काहीतरी शाब्दिक मागण्या उभ्या केल्या जातील, ज्यावर कदाचित काहीतरी चर्चा होईल आणि शेवटच्या दिवशी का होईना माध्यमांना थोडीशी दखल घ्यावीशी वाटेल. या मागण्या काय आहेत आणि त्या पूर्ण होतील का यासंदर्भात मला काही माहिती नाही आणि त्याच्याशी विशेष देणेघेणेही नाही. ह्या गर्दीसोबत एम. एन. पार्थ नावाचा वेडा माणूस पायी चालतो आहे आणि चालताचालता अधूनमधून या मोर्च्यात दिसणार्‍या गोष्टी फेसबुकवरून दाखवितो आहे. तो जेव्हा जेव्हा त्या मोर्चातल्या लोकांची क्षणचित्रे दाखवतो तेव्हा तेव्हा मला शेतमजुरी करताना सोबत असलेले इतर लोक लख्खपणे आठवतात. याचा संबध माझ्या भूतकाळाशी लागत असला तरी त्यांच्यासाठी तो भूतकाळ न बदलता तसान तसा वर्तमानकाळात कॅरी फॉरवर्ड झाला आहे. हे लोक लवकर मोर्चा संपवून परत यावे म्हणजे माझ्या आईवडिलांना त्यांना पचेल असे अन्न खाता येईल अशी माझी मनोमन इच्छा आहे. दरम्यान एक अभ्यासक म्हणूनही किसान सभेचा लाँग मार्च मला बुडत्या संस्कृतीच्या एका महत्त्वाच्या अंगाचे डॉक्युमेंटेशन वाटतो. सर्वप्रथम मोर्चातल्या या गर्दीचा शब्दांशी काही विशेष संबध नाही. यातल्या कित्येकांना दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या आठएकशे शब्दांव्यतिरिक्त जास्त शब्दही माहिती नाहीत. वर्तमानपत्रे, सोशल मीडिया वा टेलीव्हिजनने शब्दांपासून उभ्या केलेल्या घट्ट जाळ्यापासून हे लोक खूप दूर आहेत. ते निसर्गाची विनाशब्दांची भाषा बोलतात. कुठल्याही बीकडे पाहिल्यानंतर कुठल्या मातीत ते किती दिवसात रुजून येईल आणि त्यानंतर त्याला कुठला कुठला आजार होऊ शकतो हे या लोकांना दोन सेकंदातच कळते. कुठल्याही शब्दांविनाच.

माझ्यामते हे मागे राहिलेले सर्वात बुद्धिमान लोक आहेत, ज्यांच्या ज्ञानाचे वय बारा हजार वर्षे इतके मोठे आहे. मागण्या मान्य होतील न होतील पण अभ्यासावरून सांगतो की दहा एक वर्षात हे लोक किंवा त्यांचे ज्ञानही असणार नाही. एका प्रचंड प्रगल्भ, उदात्त संस्कृतीचे हे शेवटचे नागरिक आज पायी पायी चालत सरकार नावाच्या मूर्ख यंत्रणेला भेटायला निघाले आहेत. त्यांच्यासाठी आवाज उठवू नका, शब्दांचे इमलेही रचू नका. शक्य झाल्यास त्यांच्यासोबत दोन किलोमीटर पायी चाला. तो अनुभव तुम्हाला अशी काही गोष्ट शिकवेल जी आजपर्यंत कुठल्याही पाठ्यपुस्तकाने छापली नाही की कुठल्याही स्क्रीनने दाखविली नाही.

किसान सभेच्या मोर्चात पायी चालणार्‍या माझ्या प्रत्येक अन्नदात्याला मी मनापासून वंदन करतो. बाबांनो, रात्रीच्या अंधारात ठेचाळत, चटनी मिरची खात तुम्ही निघाला आहात. जिथे कुठे जाऊन आपले म्हणने मांडणार आहात त्यांच्या मेंदूला तुमची भाषा माहिती नाही पण तुमचे काही अस्तित्वच नाही असे कुणाला वाटायला नको म्हणून हा शब्दप्रपंच.

 प्रतिक्रिया द्या9442 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Sandip Kadam - मंगळवार, १३ मार्च, २०१८
आज तुला विराटाची शक्ती देते मी तुला लढायला बाहू देते प्रणवकराची तुला शक्ती देते डोळ्यात डोळे घालून बघायला शांत अंगाराची शक्ती देते अनेक क्षितिजे जिंकायला आज तुला पावले देते परत उरात सहस्त्र बीजासाठी मातीचा तुला गर्भ देते प्रकांड शक्ती तू मला दिलेली महाकाय ती परत देते भाजी-पाला ज्वारी बाजरीच्या अनेक राशीची शपथ घेते तुझ्या आशा आकांशाना मी आकाशाची झेप देते अतुल्य तुला तुलाच तुला किती किती देऊ सांग तुला हे शेतकऱ्या आवाज दे सर्वस्व तुला धावून येते -संदीप कदम शेतकऱ्यांच्या संघर्षाला आमची साथ

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर