फेबुगिरी
मंगळवार, १३ मार्च, २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी..

इंटरनेटशिवाय आपल्या आयुष्याची आपण आता कल्पना करू शकत नाही इतके ते आता अंगवळणी पडलेले आहे. पण इंटरनेट आपल्यापर्यंत पोहचतं कसं?

इंटरनेट आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे tier-1 कंपनी. या कंपन्यांनी समुद्रातून optical fiber किंवा submarine वायर्सचे जाळे प्रत्येक देशापर्यंत पोहचवलेले आहे. या optical fiber मधील वायर्स आपल्या केसांइतक्या पातळ परंतु शंभर जीबी प्रती सेकंद इतकी क्षमता ठेवणाऱ्या असतात. भारतात टाटा, रिलायन्स कम्युनिकेशन अशा tier-1 कंपनी आहेत.

आता पुढे येते tier- 2 कंपनी. या कंपन्या त्या लँडिंग पॉईंटपासून आपल्या शहरा पर्यंत ते जाळे घेऊन येतात आणि tier-3 कंपनी त्या शहरातील लँडिंग पॉईंटपासून आपल्या घरापर्यंत इंटरनेट सेवा पोहचवतात.

submarinecablemap.com वर तुम्हाला जगात कुठे कुठे आणि कशी कशी ही optical fiber टाकली आहे त्याची माहिती मिळेल. या वायर समुद्रातून आलेल्या असल्यामुळे त्यांचे लँडिंग पॉईंट मुंबई कोचीन चेन्नई अशा समुद्र किनाऱ्यावरील भागात आहेत, याचाच अर्थ भारतातील सर्व इंटरनेट activity या शहरांत येऊन भिडते.

इथे एक लक्षात घ्या ते म्हणजे इंटरनेट मोफत आहे परंतु आपल्याला खर्च करावा लागतो तो इतर कारणांसाठी. म्हणजे tier-1 कंपनी त्यांना आवश्यक त्या त्या देशात समुद्र मार्गे optical fiber टाकतात तो one time परंतु अवाढव्य खर्च आहे. optical fiber चे आयुष्य असते साधारणपणे २५ वर्षे परंतु माशांनी वायर कुरतडणे वगैरे वगैरे प्रकारांमुळे दुरुस्ती खर्च मात्र येत असतो. ते हा खर्च व नफा tier-2 कंपनी कडून अमुक अमुक क्षमतेचा इंटरनेट डाटा देण्याच्या बदल्यात वसूल करतात. tier-2 कंपनी tear-3 कंपनी कडून पैसा वसूल करतात तर tier-3 कंपनी थेट ग्राहकांकडून पैसा वसूल करतात.

रिलायन्सला इंटरनेट स्वस्त दरात देणे परवडते, कारण युरोप आफ्रिका आशिया येथे one time गुंतवणूक करून त्यांनी आपले जाळे पसरवलेले आहे व तेच tier-1 ते tier-3 कंपनी असल्यामुळे मधली नफेखोरी व बोजा टाळला जातो.

तसेच इंटरनेट स्पीड कमी जास्त होण्याचे कारण म्हणजे हे जाळेसुद्धा एक प्रकारचा रस्ता आहे. खूप सारी वाहनं एकाच रस्त्यावर आली तर जसा चक्काजाम होतो तसंच एकाच भागातील खूप सारे लोक एकाचवेळी इंटरनेट वापरत असतील तर स्पीड कमी होतो कारण त्यांना सेवा पुरवणाऱ्या टॉवरची मर्यादित अशी क्षमता असते.

यावरील एक उपाय म्हणून मोठमोठ्या कंपन्या आपले सर्वर त्या त्या देशात ठेवतात. म्हणजे आपण भारतात बसून अॅमेझॉन उघडले आणि त्यांचा सर्वर इथेदेखील असेल तर आपले इंटरनेट कनेक्शन आपल्याला थेट भारतात असलेल्या त्या सर्वर कडे वळवते जेणेकरून समुद्रमार्गे टाकलेल्या त्या जाळ्यातून होणारा अनावश्यक लांबलचक प्रवास टळेल व त्यावर येणारा लोड टाळता येईल. (रात्री बहुतांश लोक झोपत असल्यामुळे यावरील traffic कमी होते व स्पीड वाढलेला आढळतो )

www.nixi.in वर तुम्हाला भारतातून दररोज त्या त्या शहरातून होणारा इंटरनेटचा वापर पाहता येईल. मला वाटतं याविषयी ही ढोबळ माहिती पुरेशी आहे.

जाता जाता सांगण्यासारखी गंमतीची गोष्ट म्हणजे आपण इंटरनेट सुरू केल्यानंतर एखादा प्रश्न गुगलवर विचारला तर कमीतकमी पाच ते सात वेगवेगळ्या ठिकाणांवरून फिरून आपल्या समोर उत्तर आलेले असते आणि ती पाच सात वेगवेगळी ठिकाणं म्हणजे भारतात कमीतकमी दोन तीन म्हणजे मुंबई दिल्ली कोचीन वगैरे वगैरे फिरुन थेट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील दोन तीन सर्वर इतका प्रवास झालेला असतो व या अर्ध्या जगाच्या प्रवासासाठी वेळ लागतो तो म्हणजे फक्त जास्तीतजास्त दोन तीन सेकंद.

विज्ञान अद्‌भूत आहे!

- तुषार दामगुडे

......................

शेतकरी नेत्यांनी हे काय केलं! रात्रीच चालत आझाद मैदानात आले. आज रस्ते अडले असते तर मोर्चाच्या विरोधकांना जरा तरी अवकाश मिळाला नसता? "सामान्य नागरिकांचे" कसे हाल होतायत याचे गळे तरी काढता आले असते.

- अरुणा पेंडसे

......................

गिल्ट
..
रात्री सगळं आठवावं 
पण पिकाला पाणी मिळावं म्हणून 
रात्रीच्या अंधारात आकडे टाकून
वीज चोरणारा आणि त्याच्या शॉकने उडालेला 
गाभ्रीच्या पावसातला किस्ना शेतकरी आठवू नये

ओलसर दु:खांची ढेकळं झाट की जू वाटावी 
ह्यासाठी आठवू नयेत रात्री
विष प्यालेल्या शेतकरी बायापोरांच्या बातम्या

रात्री तलफ आली रे आली की
हाताला मिळावी सिगारेट
पण अकारण तेव्हाच नेमकं गळफासाला लटकलेल्या शेतकर्याचे 
गार्हाणी सांगण्यासाठी देवचारासारखे
बाहेर पडलेले तांबारलेले ताठ डोळे आठवू नयेत

मी खावं पोटभर किंवा फेकून द्यावं उरलेलं एका पोटभरीचं अन्न 
पण ती सारी शितं काळ्या मातीतून सोन्यासारखी पिकवणार्या
शेतकर्याचं पोट जाळून काढणारी दुष्काळी भूक आठवू नये तेव्हा फक्त
डोळे बंद केल्यावर आतल्या अंधारात
बापाने विकलेल्या बैलाचे काजळभरले डोळे आठवू नयेत

रात्री मी प्यावा बर्फ स्टर करून 30 ml पेग
तेव्हा आठवू नये, जमिनी झालेल्या आहेत पाण्यासाठी मोताद
भाकरीच्या कोरड्या मुटक्यांना ओलं करण्यापुरतं घेतलेलं पेलाभर पाणी
कित्येक उपाशी लेकरांच्यामागे बसलेली आशाळभूत गिधाडं

रात्री झोप लागावी अनकट पण ती विस्कटली तरी 
कर्जाखाली चेंगरून पडलेल्या शेतकरी बायांची
कुंकवाने लालेलाल झालेली घामट विस्कटलेली कपाळं आठवू नयेत

साला तेव्हा आठवू नये
आपला काही काही दोष नाहीये ह्यात
पण
फालतू आहोत आपण
साला खूप फालतू आहोत
ह्या कवितेइतकेच पोकळ आणि खोटे सुद्धा.

- रेणुका खोत

......................

काही गोष्टी अशा बघता येतील का यापुढं

१. डाव्यांनी आतातरी लोकांवर वारंवार खापर फोडू नये. तत्कालीन संदर्भ असलेले प्रश्न, योग्य नियोजन, सटीक व्यूहरचना आणि चाणाक्ष राजकीय मेसेजिंग केलं, तर लोकही सोबत येतात, दबावही निर्माण करता येतो आणि माध्यमांना गरजेचं असलेलं स्पेक्टकलही निर्माण करता येतं.

२. जाहिरातीचे दोन भाग असतात. आधीचा मानसिक, जिथं ब्रँडबद्दल जागृती किंवा मान्यता निर्माण केली जाते आणि दुसरा पण महत्त्वाचा म्हणजे जागृती केलेल्या ब्रँडची प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी उपलब्धता असनं. डावे, आंबेडकरवादी, १२ महिने २४ तास ब्रँडिंग करतात, पण मतदानाच्या वेळेस बटन दाबून ब्रँड स्वीकारावा तर त्यांचा उमेदवारच तिथं नसतो. त्यामुळं यशस्वी लढ्याचं मतदानात रूपांतर होत नाही.

३. एखादी गोष्ट यशस्वी झाली की तिच्या कौतुकाचा पारावर उरत नाही आणि अपयश हाती आलं की लहान लेकरू पण सल्ला द्यायला कमी करत नाही. त्रिपुरा हरले तेव्हा डावे मूर्ख होते आणि मुंबईसारख्या शहराला दबावात आणल्यावर ते लगेच प्रगल्भ, लाल वादळ वगैरे झाले. म्हणजे आपल्या समीक्षेचा आधार फक्त सामान्यतः मान्य यशस्वीता आहे का, असा विचार सर्व सल्लागार समीक्षकांनी करायला हवा.

४. बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची स्टेजवर यायची धडपड, आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी स्टेजपेक्षा प्रत्यक्ष शेतकरी, आदिवासी आंदोलकांसोबत दाखवलेली कॉम्रेडशीप, हाच खऱ्या बदलाचा पाया आहे, हे दोन्ही विचाराच्या पाईकांनी थोडसं समजून घेतलं तर एक प्रभावी आणि व्यापक राजकीय पर्याय उभा करता येऊ शकतो हे खरं.

- प्रथमेश पाटील

......................

काँग्रेसने राज्यसभेसाठी कुमार केतकरांची उमेदवारी काल जाहीर केली आणि माझं मन का कुणास ठाऊक पण 1989च्या काळात गेलं. पुण्यातून ज्येष्ठ संपादक चंद्रकांत घोरपडे यांना काँग्रेसनं लोकसभेचे उमेदवारी द्यावी अशी तेव्हा अनेक सामाजिक राजकीय संस्थांची, संघटनांची इच्छा होती. विविध धर्मीय नेत्यांनी, पुण्यातील मुख्य गणेशोत्सव मंडळांचा, त्यांना पाठिंबाही दिला होता. पुण्याच्या राजकारणात त्यावेळी गाडगीळ गट आणि टिळक गट जोरात होते. महापालिकेत, विधान मंडळाच्या आणि संसदेच्या पदांच्या वाटपात कायम या गटांचं आळीपाळीनं वर्चस्व आणि रस्सीखेच होत असे. त्यामुळे घोरपडेंच्या उमेदवारीची चर्चा आणि कल्पना त्या दोघा नेत्यांना मान्य व सहन होणे शक्य नव्हते. वास्तविक राजकारण समाजकारणाचा वारसा 1953 आणि 1958 मधे आमदार असलेल्या वडील बाबासाहेब घोरपडेंकडून चंद्रकात घोरपडेंकडे आलेला. आपल्या धारदार लेखणीनं, अत्यंत कुशाग्र बुद्धीनं आणि चतुरस्त्र व्यासंग वृत्तीनं त्यांनी केसरीच्या संपादक पदावरून आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांचे तळपते अग्रलेख जनसामान्यांना आकर्षित करीत आणि राजकारण्यांचे त्यामुळे धाबे दणाणत असे. वसंतदादा पाटलांनी याचवेळी त्यांच्यासाठी राजीव गांधींकडे पुण्याच्या लोकसभा तिकीटाची मागणी लावून धरली होती. पण ऐनवेळी तिकिटं जाहीर होण्याआधी पुण्यातल्या आणि प्रदेश काँग्रेसच्या काही जणांनी पक्षश्रेष्ठीच्या कानात सांगितल्याचं बोललं गेलं, की घोरपडे खरे तर आतून पवार गटाचेच आहेत! झालं! एका रात्रीत पारडं फिरलं आणि घोरपडेंना डावलून गाडगीळांची उमेदवारी जाहीर केली गेली.

आज प्रकर्षानं जाणवतं, की त्या काळात चंद्रकांत घोरपडेंवर काँग्रेसनं आणि त्यापेक्षा नियतीनं खूप अन्याय केला. एका अत्यंत बुद्धीमान, निर्भीड आणि व्यासंगी पत्रकार संपादकाची संसदेत जाण्याची संधी हुकली. नंतर संपादकपदी गेलेल्या,पण केसरीत पूर्वी घोरपडेंचा अनेकदा संपादकीय मार खाल्लेल्या पत्रकारांनी त्यांच्या नावांनी बोटं मोडली, पण खाजगीत कायमच त्यांचं मोठेपण मान्य केलं. माध्यमांचं स्वातंत्र्य आणि खरी आक्रमक पत्रकारिता ते स्वतः कायम जगले आणि सहकारयांना तीच शिकवली. इतर माध्यमांची गर्दी नसलेल्या त्या काळात फक्त तीन वर्ष त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळालेल्या मला ते कायम रोल मॉडेल वाटत. नंतर मागच्या 28 वर्षांत अनेक वाहिन्यांवर काम करताना घोरपडेंची संपादकीय शिकवण कायमच आठवत असे.

नंतरच्या काळात फार लवकर अकाली ते गेले. त्याच काळात विदयाधर गोखले, नारायण आठवले यांच्या सारखे अनेक, नव्हे सर्वात जास्त मराठी पत्रकार संपादक, बाळासाहेब ठाकरेंनी राज्यसभेवर पाठवले. त्यांच्यापैकी कोणी किती व काय योगदान दिले, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. पण घोरपडेंच्या काँग्रेसी विचारात कधी फरक पडला नाही. ते गटातटांच्या पलिकडे होते. त्यांच्या लेखणीने उजव्यांवर व काँग्रेसवर सुदधा आसूड ओढले. पण त्यांच्या कुशाग्र बुदधीमत्तेची, प्रगल्भ अनुभवाची आणि पात्रतेची कदर झाली नाही याची खंत वाटते. एका बुद्धीमान संधी नाकारलेल्या संपादकाला नंतरच्या काळात आपल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात न पाठवणे हा काँग्रेसचा त्या काळातला करंटेपणा ठरला. क्रूर नियतीने त्यांना तशी संधीच दिली नाही. वयाच्या साठीच्या आसपासच ते गेले.

आज केवळ वैधानिक किंवा संसदीय वरिष्ठ सभागृहात जाण्यासाठी फिल्डींग लाऊन कोणत्याहि थरापर्यंत चापलुसी करण्याच्या काळात, घोरपडे किंवा केतकर ठळक अपवाद ठरतात ते त्यांच्या अव्यभिचारी निष्ठा, वादातीत कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम वक्तृत्व, प्रदीर्घ अनुभव, राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय भान, अफाट स्मरणशक्ती आणि व्यासंगामुळेच. अशा बुद्धीवंतांना त्यांच्या अंताआधी संधी मिळणे फार महत्वाचे ! अशा लोकप्रतिनिधींमुळे संसदीय कामकाज समृद्ध होते आणि पर्यायाने आपली लोकशाही सुद्धा! कुमार केतकरांचे अभिनंदन !

- समीरण वाळवेकर

......................

माझा भारतीय बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीचे सोशल डायनॉमिक्स याविषयावरचा लेख कुमार केतकर यांच्या वाचनात आला होता. त्यांना लेख आवडला. त्यापलीकडे जाऊन त्यांनी माझ्यासारख्या नवोदित लेखकाला मेल केला. लेखावर प्रतिक्रिया देऊन त्यांनी भारतीय बी ग्रेड सिनेमावरची त्यांची निरीक्षण मांडली होती. केतकरांचा या विषयाचा अभ्यास बघून धक्काच बसला होता. थोडं अनपेक्षित होतं. केतकर आणि बी ग्रेड सिनेमा हे समीकरण पचनी पडायला अवघडच होत. या माणसाचा व्यासंग चौफेर आहे याची साक्ष देणार. हा माणूस ज्येष्ठता, त्यांचा व्यासंग यांच्या भिंती तरुण पिढीशी संवाद करताना मध्ये येऊ देत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकांवर मतंमतांतरं असू देत पण राज्यसभेत एक व्यासंगी हुशार माणूस गेला आहे याचा प्रत्येकाला आनंद व्हायला हवा. केतकरांचं अभिनंदन.

- अमोल उदगीरकर

......................

आज यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आहे. त्यानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार सोहऴा होता त्या सोहळ्याला उपस्थित राहिलो. हा पुरस्कार केमिकल इंजिनियरींगचे लिव्हिंग लेजंड पद्मविभूषण प्रोफेसर मनमोहन शर्मा यांना शरद पवारसाहेबांच्या हस्ते देण्यात येणार होता. त्यामुळे जाणं भाग होतंच. डॉ अनिल काकोडकरजी सुद्धा उपस्थित होते.

कोकणात नाणार रिफायनरीबद्दल जो वाद चाललाय त्याबद्दल नाव न घेता प्रोफेसर शर्मा ठामपणे म्हटले की 'रिफायनरीमुळे पर्यावरणाचा तोटा होत नाही. जामनगर दुष्काळी भाग होता. आता तिथून आंबे निर्यात होतात.'

पवारसाहेबांचं भाषण नेहमीच ऐकण्यासारखं असतं. थोडक्यात बोलतात. त्यांना हवं तेवढंच बोलतात. स्पून फीडिंग वगैरे प्रकार नसतो. आजपण ते नेमकंच बोलले. बाकी नेत्यांप्रमाणे मी, माझा वगैरे नव्हतं. आज ज्यांची जयंती आहे त्या चव्हाणसाहेबांबद्दल बोलले. प्रोफेसर शर्मांबद्दल बोलले. विषय कट!

मधल्या वेळात चहा प्यायला बाहेर चाललेलो. विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची गाडी आत येत होती. बंदा बिनधास्त है एवढंच!

- अविनाश वीर

......................

आभासी वाघांच्या गोबेल्स डरकाळ्य़ा

शिवाजी महाराजांचा पुतळा गोव्यात पुन्हा सन्मानान् बसवावा.. तो हटविण्याचे साखळी पालिकेचे कृत्य खेदाचे आणि चिंतेचे आहे.. या कृतीमागे नेमका काय हेतू आहे?.. शिवाजी राजांचेच पुतळे कसे काय बेकायदा वाटतात?..साखळी नगरपालिकेकडून अक्षम्य चूक झालेली आहे.. त्यामुळे शिवछत्रपतींचा घोर अपमान झालेला आहे.. गोवा सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी.. भाजपच्या राज्यात असे होतेच कसे?.. गोव्यातले हिंदुत्ववादी काय झोपा काढतात का?.. समाजमाध्यमातील इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांमधील ही काही उदाहरणे. वस्तुस्थिती समजून न घेता केलेला कांगावा. आभासी वाघांच्या सगळ्या गोबेल्स डरकाळ्या. 
गोबेल्स हा हिटलरचा प्रचारमंत्री होता. खोटे बोल पण रेटून बोल अशी त्याची नीती होती. एक खोटी गोष्ट शंभरवेळा सांगितली की कालांतराने लोकांना ती सत्य वाटते. याचे कारण असे आहे की लोकशाही केवळ गुंडगिरीवर चालत नाही. त्यामुळे ही मंडळी समांतर बौद्धिक दंगलीही घडवतात. या सर्कशीसाठी तंत्रज्ञानावर हुकूमत असणारी कुजबूज ब्रिगेड कामाला लावतात. मग ताजमहाल नव्हे तेजोमहाल आहे, यांसारख्या वावड्या फॉरवर्ड होतात. 
गोव्यातील पुतळ्याच्या विषयाचीही समाज माध्यमांवर अशीच जोर लगाके फेकूगिरी सुरु आहे. यामागे हिंदुत्ववादी मानसिकता आहे. ध चा मा करून ही मंडळी गोव्याची बदनामी करत आहेत. अर्थात गोवाच नव्हे तर डोळ्याच्या बदल्यात डोळा.. अशा द्वेषमूलकतेतून देशभरच पुतळाकारण सध्या सुरू आहे. 
महाराष्ट्रात सातारा शहर विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंह राजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनीही गोव्यातल्या पुतळ्याच्या विषयाची खातरजमा न करताच पत्रकबाजी करण्यात धन्यता मानली. मुळात हा विषय वाळपईतील, साखळीतील नव्हे. पण त्यांनी साखळी, साखळी म्हणत आरोळी ठोकली. पुतळा बसविण्यास कोणाचीही हरकत नव्हती आणि नाही. पण वाळपईत जे स्वत:ला शिवप्रेमी समजतात त्यांनी रातोरात, गुपचूप पुतळा का बसवलेला याचा शोध घेतला तर त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण होतात. तसे नसते तर तेथे पोलिसांना 24 तास पहारा का द्यावा लागला? पुतळा बसविण्याची एक प्रक्रिया असते, एक सोहळा केला जातो. यापैकी काहीही का केले नाही? याला प्रशासकीय भाषेत बेकायदा म्हणतात. रयतेच्या राजाला शिवाजी महाराजांना तरी हे मान्य झाले असते का हो? त्यामुळे दंगा होणार नाही याची खबरदारी घेऊन प्रशासनाने तो हटविला. 
गोव्यात सार्वजनिकपेक्षा घरगुती गणशोत्सव धुमधडाक्यात असतो. घरा-घरांत जेवढी गणेशमूर्ती बसवितात त्यापेक्षाही राजांची छोटीशी, नीट दिसणारही नाही अशी इवली-इवलीशी मूर्ती का बसवलेली? या मूर्तीच्या परिसरात झाडे-झुडपे वाढल्यावर ती दिसेनाही. आणि त्याचीही बातमी झाल्याची आमदार राजेंसह समाज माध्यमातील वाघोबांना कल्पना तरी आहे का? यंदा गोव्यात वाळपई, साखळी आणि कोरगाव येथे शिवाजी महाराजांचे अश्वारूढ असे तीन भव्य आणि देखणे पुतळे वाजत-गाजत उभे केलेत. याशिवाय फर्मागुढीत अगोदरचा एक आहेच. याची बुद्धिभेदाच्या डरकाळ्या फोडणाऱ्यांना माहिती आहे का? गोव्यातील सर्वाधिक मुस्लीमबहूल परिसर हातवाडा- वाळपई येथे आहे आणि हीच जागा मूर्तीसाठी का निवडली? यामागे भविष्यातील कोणते राजकीय गोबेल्स नियोजन होते.?

- सुरेश गुदले

......................

I am a surgeon who had his hectic, glorious heyday. Even today I get almost full time work and do earn much much more than will ever be needed.And there are a large number of doctors who sail in my boat today.
सरकारची गेल्या काही वर्षातली धोरणे डिस्टींक्टली अँटी स्मॉल/इंडीव्हीज्यूअल हॉस्पिटल व प्रो लार्ज/कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत. राजीव गांधी/महात्मा फुले योजना, इन्शुरन्स कंपन्या, टीपीए, एनएबीएच वगैरे अॅक्रिडेशन्स वगैरे. या योजना गरिबांना अत्यंत उपयोगी आहेतच, त्यात डॉक्टर्स आणि काही खुळचट मध्यमवर्गी सफर झाले तर काहीच बिघडत नाही.
तर होतं काय की काम खूप असलं, पैसे भरपूर मिळाले तरी, अवघड, ग्लोरीयस, आपल्याला जे छान करता येते (असे वाटते) ते काम सोडून सोपेसोपे काम करत बसावे लागते (ते नकोसे नसते पण हवे हवेसे पण नसते). म्हणजे काही अगदीच मॉडर्न टाइम्स मधला चॅप्लिन होत नाही.सगळे एकएकटे डॉक्टर्स शिताफीने ही भावना लपवत असतात. पण फार वाईट वाटत असते हे नक्की.
तर एका प्लास्टिक सर्जनला एक दुसरा चीनी प्लास्टिक सर्जन एका कॉन्फरन्सला कुठेतरी परदेशात भेटला तर ती डिग्री बर्न अॅन्ड प्लास्टिक सर्जन अशी असते. आता बर्नस् बाय चॉइस करणारे काही डेडीकेटेड लोक असतील पण ते काम इतर जनरल प्लास्टीक सर्जनना अत्यंत नकोसे काम वाटत असते..प्लास्टीक सर्जरीचे क्षेत्र इतके वाढले आहे की सुरुवातीला पैशांसाठी काही दिवस थोडे दिवस बर्नस्चे काम करायचे व लवकरात लवकर जम बसला की या कामाला टाटा करायचा असे धोरण असते.
तो चीनी प्लास्टिक सर्जन म्हणाला, I am dead man.The Chinese Government has ordered me to work in Burns only, for the rest of my life. I have no other option. l have no other future. I am a dead man!
बिचाऱ्याची काय हालत असेल?
The more you regulate, the more dead or near dead men, a nation will produce.
मोदी आण्णांचे सुपर सेंट्रलाइझ्ड् प्लॅनिंग आपल्या देशाला फार महाग पडणार आहे असे मला वाटते. हे प्रयोग रशिया चीनमधे करून झाले आहेत. मनमानी,आरबिटररी (अगदी समजा चार मोठ्या आपल्या उद्योगपतींच्या हिताचे असे अगदी नाही म्हटले तरी) आर्थिक मेडलींग आणि मतांसाठी धार्मिक ध्रूवीकरण हे फेटल काँबिनेशन आहे.

- आशुतोष दिवाण

......................

भेगा महाग पडतात
चिरलेल्या मातीच्या रेघा.. महाग पडतात
कुणाचाही असो झेंडा.. हातात..
त्या हातावर सुकलेले भविष्य
सुरकूतलेले हसू.. फाटलेल्या ओठावरचे
डांबरी रस्त्यावरील अनवाणी पाय..
कपाळात टोचणारे चांभारी खिळे..
फाटक्या सदऱ्यावाला बाप.. उघड्या पाठीचा
तुमच्या दरी येऊन जेव्हा भीक मांगतो
आपल्या पोरांसाठी, वाळक्या ढोरासाठी
पोसणाऱ्या मायेनं, पुन्हा उजवाव म्हणून
पाणी मागतो, आशेचं ,गढूळ का होईना
तेच्यावर तुमचा बिसलेरी, आरओ.. महाग पडतो
गालावर सुकेलेल्या असवाचे थेंब..
नजरेत मेलेले कोंब.. 
तुम्ही कीतीही प्याकेट दिले अन्नाचे तरी..
देणाऱ्या हाती,घेन्याचे दैव..
एकटेपणाची झोम्ब.. भुकेल्या पोटी..लै महाग पडते
महाग पडते ही निवडणूक..मतांची नाही
प्रेतांची.. माणसाच्या हिमतींची..
खांद्यावर वाहलेली..हजारो माढ्यांची जत्रा..
तुमच्या लोकलच्या बाजूने जाणारी ही लोकं
लुगड्याला पडलेली ही भोकं..
रस्त्यावर उतरलेली माही माय..महाग पडते..
खूप महाग पडते...
रस्त्यावर उतरलेली माही बुढी माय..

- सचिन दीक्षित

......................

स्मिता पटवर्धन नावाच्या बाईंचा लेख सकाळने छापला काढला वगैरे वाचलं. म्हणून काय आहे ते पाहिलं. पहिल्या परिच्छेदातच कळली लाईन. सडकं अंड अख्खं खायला लागत नाहीच सडकेपण कळायला. पण नंतर कळलं विरोधी भाऊगर्दी त्यांच्यावर जातबित काढून गलिच्छ बोलू लागली आहेत. काही उच्चविचारसरणीच्या लोकांनी आता यांचं रक्षण स्त्रीवादी का करत नाहीत वगैरे भुरके मारायाला सुरुवात केली.
पण मी काय म्हणते- सडक्या अंड्यांवर सडकी टमाटी बरसली तर ती तरी कशाला चाखायची.
सोडा हो.
शेतकरी लढायला आलाय शहरात.
आणि सरसकट कर्जमाफी नकोच हो वगैरे बोलणारांना न जुुमानता या शेतकऱ्यांना एक नवी सुरुवात द्यायला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
निमोचे पैसे डुबलेले चालतात.
यांचेही डुबू द्या.
हिरे काही खात नाही आपण.
अन्न खातो.
---
आणि ते सडकं काही चाखूच नये.
अन्नच खावं.

- मुग्धा कर्णिक

......................

कुमार केतकरांबद्दल अनेकांनी भरभरून लिहिलंय. त्या सगळ्यांसाठी एक शिफारस – केतकरांनी लिहिलेलं ‘कथा स्वातंत्र्याची’ हे पुस्तक. भारतीय स्वातंत्र्याचा रसाळ, वेगवाही इतिहास - अवश्य वाचावं. हे साडेतीनशे पानी पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने प्रकाशित केलं आहे. १९९७ साली, भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आम्ही मुंबई आकाशवाणीवरून या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं. स्वातंत्र्याच्या पन्नाशीनिमित्त विशेष कार्यक्रमांची आखणी करताना, पूर्वी कधी तरी वाचलेलं हे पुस्तक अचानक आठवलं. पण ते बाजारात उपलब्ध नव्हतं. मग खुद्द केतकरांनीच स्वतःकडची प्रत आम्हाला अभिवाचनासाठी दिली. नंतर या पुस्तकाची नवी आवृत्ती येऊ घातलीये, असं स्वतः केतकरच म्हणाले होते. पण अलिकडे शोधलं, तर सापडली नाही. कुणीतरी लक्ष घालून या पुस्तकाची आवृत्ती काढायला हवीये. आता, त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या निमित्ताने तरी हे काम व्हावं. बाकी, अनेकांनी लिहिल्याप्रमाणेच उमद्या व्यक्तिमत्वाचे, विरोधकांशीही संवाद करणारे, तरूण पिढीशी मैत्र असलेले, जागतिक घडामोडींचा स्थानिक अन्वय लावणारे, स्थानिक घटना जागतिक संदर्भात उलगडून दाखवणारे असे कुमार केतकर. आकाशवाणीवर त्यांचं खास प्रेम. रेडिओ माध्यमात अन्य देशांत काय चाललंय याची तपशिलात माहिती केतकरांना असायची. सतत नवं सुचवत राहायचे. माझ्या कल्पना मी त्यांच्याशी शेअर करत असे आणि ते माझा उत्साह नेहमी वाढवत असत. माझ्या ‘स्थळकाळ आकाशवाणी’ या पुस्तकाला त्यांनी मोठ्या आनंदाने प्रस्तावना लिहिली. कुमार केतकर यांच्या नव्या कामाला खूप शुभेच्छा.

- मेधा कुलकर्णी

......................

 

Iप्रतिक्रिया द्या3097 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर