शांतीचा मंत्र.. झंप्याची 'व्यथा'.. जादू..
मंगळवार, १३ मार्च, २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, फर्मास विनोद आणि मार्मिक विचार हा सकाळच्या दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

बुद्ध आणि आनंद एका ओढ्याजवळ थांबले. बुद्धांना तहान लागली होती. आनंद त्या ओढ्यावरून पाणी आणण्यासाठी गेला. नेमका तो तिथे पोहोचत असताना ओढ्यातून काही बैलगाड्या आणि 
घोडेस्वार गेले. पाणी ढवळलं गेलं. गदळलं. सगळी माती वर येऊन गढूळलं.

आनंदने मनोमन विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. तो त्या पाण्यात उतरला आणि हळुवार हाताने माती खाली बसवू लागला. आपल्या पायांच्या हालचालींनीच ती वर येत आहे, हे त्याच्या 
लक्षात येत नव्हतं. अखेर त्याने संतापून तो नाद सोडला आणि तो बुद्धापाशी येऊन म्हणाला, बैलगाड्यांनी, घोड्यांनी पाणी गढूळ केलंय, मी प्रयत्न करूनही ते शांत झालेलं नाही. तुम्ही 
तहानलेले आहात. माझी फार चिडचिड होतेय.

बुद्ध म्हणाले, त्या ओढ्यापाशी जा आणि नुसता बस. फक्त बस. काही करू नकोस. सगळ्या गोष्टी काही केल्यानेच होतात असं नाही. काही गोष्टी काही न केल्यानेही होतात.

आनंद मनाशी म्हणाला, ही काय उफराटी शिकवण. काही न करता काही कसं होऊ शकेल?

पण, बुद्धांच्या सांगण्यानुसार तो ओढ्याच्या काठाशी जाऊन बसला. काही न करता बसणं फार कठीण होतं. तरीही त्याने तसा प्रयत्न केला. काही वेळाने जाऊन पाहिलं. खरोखरच ओढ्याचं पाणी 
आपल्या मूळ लयीला आलं होतं. शांत झालं होतं.

पाणी भरून तो बुद्धापाशी आला, तोवर त्याच्या लक्षात आलं होतं की ओढ्याच्या निमित्ताने बुद्धांनी मनाच्याच शांतीचा मंत्र दिला होता.

...............................

मित्राच्या लग्नाच्या पंगतीत बगूनाना आणि झंप्या दामले यांच्यात जिलब्या खाण्याची पैज लागली. बगूनानांनी एकशे सदतिसाव्या जिलबीला हार मानली, झंप्याने मात्र मठ्ठ्याच्या साथीने दीडशे 
जिलब्यांचा फन्ना उडवून दमदार वाटचाल चालवली होती. मात्र, घास घशातून उतरायला जागा उरली नाही, तेव्हा त्याला थांबावं लागलं. पोट टम्म फुगलं होतं. श्वास वरचा वर राहात होता, 
अंगांगातून घामाच्या धारा वाहात होत्या. बोलणं कठीण झालं होतं. सगळा मौजेचा माहोल बदलला आणि धावतपळत कोणीतरी डॉक्टरला घेऊन आलं.

मांडवात एका ठिकाणी तक्क्यांच्या चवडीला टेकून बसवण्यात आलेल्या झंप्याला तीन चार लोक वारा घालत होते. त्याचे डोळे आता ऊर्ध्व लागले होते. डॉक्टरने तपासून सांगितलं, घाबरण्याचं 
काही कारण नाही. थोड्या वेळात येतील नॉर्मलला. ही गोळी मात्र ताबडतोब घ्यायला हवी…

झंप्या त्याही स्थितीत म्हणाला, खुळे की काय तुम्ही डॉक्टर? अहो, एक गोळी अर्धा ग्लास पाण्याबरोबर जाण्याइतकी जागा असती पोटात, तर एक जिलबी नसती का खाल्ली… डब्बल 
सेंच्युरीला एकच तर कमी होती!!!!

.......................................

जगात प्रत्येक माणसात
काही ना काही जादू
असतेच...

आणि आपल्यात जादू आहे
हे त्याला कळेपर्यंत
ती टिकतेही!

.............................प्रतिक्रिया द्या1485 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर