राणे साहेबांचे केतकर साहेब!
सोमवार , १२ मार्च, २०१८ मुकेश माचकर

ज्यांना राणेसाहेब म्हणून ओळखलं जातं त्या नारायण राणे यांच्यासाठी कुमार केतकर म्हणजे 'केतकर साहेब'. अजब योगायोग म्हणजे दोघेही राज्यसभेवर जात आहेत ते एकमेकांचे विरोधक म्हणून.

महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे भारतीय जनता पक्षाकडून आणि ज्येष्ठ पत्रकार, विद्वान संपादक कुमार केतकर हे काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार घोषित झाले आणि नियतीच्या या अजब खेळाने एक वेगळा योगायोग जुळून आला...

...महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना दादा आणि राणेसाहेब या नावांनी ओळखलं जातं. राजकारणातल्या बोलण्याच्या पद्धतीप्रमाणे राणेही अनेकांना ‘साहेब’ म्हणत असतात. पण, ज्यांना ते मनापासून ‘साहेब’ मानत असतील, अशा मोजक्या साहेबांमधले एक म्हणजे कुमार केतकर... हे राणेंचे ‘केतकर साहेब’!

राणेंसाठी आल्हाद गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रहार’ची उभारणी करायची संधी मिळाली, तेव्हा राणेंचा केतकरांबद्दलचा गुरूभाव जवळून पाहण्याची संधी मिळाली. ‘प्रहार’च्या शुभारंभाला विजय कुवळेकर आणि कुमार केतकर हे दोन ज्येष्ठ पत्रकार हजर होते. त्यातले केतकर हे तेव्हा ‘लोकसत्ते’चे संपादक होते. प्रतिस्पर्धी वर्तमानपत्राच्या संपादकाचं नाव छापायची वेळ आलीच तर ते शक्यतो ‘ज्येष्ठ पत्रकार’ या सरधोपट बिरुदाखाली छापणाऱ्या पत्रकारांच्या कूपमंडुकी जगात राणेंनी असं काही करणं हे आश्चर्यकारक होतं. एका वर्तमानपत्राच्या संपादकाच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या वर्तमानपत्राचा शुभारंभ, हा भूकंपच होता. पण, राणेंनी त्यांच्या धडाकेबाज शैलीत तो घडवून आणला होता. त्यानंतर केतकर पुढच्याही वर्धापनदिनाला हजर होते. एकदा तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, नुकतेच दिवंगत झालेले काँग्रेसचे दिलखुलास नेते पतंगराव कदम आणि कुमार केतकर हे सगळे व्यासपीठावर होते. (अवांतर : दिल्लीत कोणीही नेते असले तरी नारायणराव, महाराष्ट्रात आपले नेते एकच, ते म्हणजे शरद पवार, असं पतंगरावांनी त्या सोहळ्यात खुल्लमखुल्ला सांगून टाकलं होतं.)

केतकरांना राणेंबद्दल जिव्हाळा आहे आणि राणे केतकरांचा अनेक गोष्टींवर सल्ला घेतात, हे त्यांच्या बोलण्यातूनच समजायचं. ‘प्रहार’ही केतकरांच्या नेतृत्वाखाली निघावा, अशीच राणेंची इच्छा असणार. पण, केतकरांनी ‘प्रहार’ला बाहेरूनच मार्गदर्शन करण्याचं ठरवलं होतं. ‘प्रहार’च्या सुरुवातीच्या वाटचालीमध्ये केतकरांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचा मोठा वाटा होता. केतकरांना ‘प्रहार’चं रंगरूप आवडतंय, म्हणजे ते राणेंनाही आवडणार, अशी आम्हाला खात्री होती. ती कधी फारशी खोटी ठरली नाही. केतकरांनी ‘प्रहार’ची धुरा सांभाळावी अशी राणेंची तीव्र इच्छा होती आणि केतकर तयार झाले तर त्यांच्यासाठी आपण ते सांगतील ते करू, अशी त्यांची त्या काळातली एक स्टँडिंग ऑफर होती. पहिले संपादक आल्हाद गोडबोले निवृत्त झाल्यानंतर या दृष्टीने चाचपणी करण्यात आली होती. मात्र, केतकरांनी ‘प्रहार’बद्दलचा जिव्हाळा आणि अंतर दोन्ही कायम ठेवण्याचा निर्णय केला आणि त्यावर ते ठाम राहिले.

केतकरांचं संपादक म्हणून जे उदारमतवादी धोरण ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये अनुभवलं होतं, त्याचंच प्रत्यंतर ‘प्रहार’च्या कामकाजातही आलं. आपल्याला राणेंनी अधिकार दिलाय आणि जबाबदारी कसलीच घ्यायची नाहीये, तर रोजच्या कामकाजात दखल देऊन, उगाच अडचणीच्या सूचना करून, वर्तमानपत्रातल्या फुटकळ चुकांचं भांडवल करून ‘प्रहार’च्या संपादकीय टीमच्याही डोक्यावरचे रिमोट कंट्रोल आपण आहोत, अशा प्रकारचा आविर्भाव आणणं त्यांना सहज शक्य होतं. मात्र, त्यांनी ‘प्रहार’ची दिशा आणि मांडणी योग्य आहे, हे पाहिल्यानंतर कधीच कसल्याही सूचना केल्या नाहीत. उलट ‘प्रहार’च्या कै. अभिजीत देसाईंनी आकार दिलेल्या पुरवण्यांवर ते खूष होते. ती सकारात्मक प्रतिक्रियाच त्यांनी राणेंपर्यंत कायम पोहोचवली. वर्तमानपत्राच्या कामकाजाचा कसलाही अनुभव नसलेल्या राणेंसारख्या फायरब्रँड नेत्याला आपण निवडलेली टीम उत्तम काम करते आहे, अशी भावना करून देण्यात केतकरांचा मोठा वाटा होता. केतकर इंडियाबुल्सच्याच इमारतीत असलेल्या एनडीटीव्हीच्या स्टुडिओमध्ये पॅनेलिस्ट म्हणून यायचे, तेव्हा काही वेळा ते ‘प्रहार’च्या ऑफिसातही आले आणि सगळ्या पत्रकारांबरोबर त्यांनी जिव्हाळ्याच्या गप्पांचा फड रंगवला होता. ‘प्रहार’शी कोणत्याही प्रकाराने संबंधित नसतानाही केतकर आपल्या पाठिशी आहेत, ही भावना त्या वर्तमानपत्राच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना कायम असायची. नवीन वर्तमानपत्राच्या शैशवावस्थेत असा विश्वासाचा आधार फार गरजेचा असतो.

संपादक आल्हाद गोडबोले यांच्या निवृत्तीनंतर वर्तमानपत्राची दिशा काय असावी, धोरण काय ठरवावं, पुढचे संपादक कोण असावेत, अशा सगळ्या गोष्टींची चाचपणी करण्यासाठी राणे आणि केतकरांची एक बैठक एका पंचतारांकित हॉटेलात झाली. ‘प्रहार’ची धुरा सांभाळणारा सहयोगी संपादक म्हणून मीही त्या बैठकीला हजर होतो. एका खोलीतल्या, तीनच माणसांच्या या बैठकीनंतर राणेंचा सगळा ताफा निघून गेला. केतकरांना एनडीटीव्हीला जाण्यासाठी इंडियाबुल्सलाच  जायचं होतं. येताना केतकर वेगळ्या ठिकाणाहून वेगळ्या कारने आले होते. त्यांची कार सर्व्हिसिंगला गेली होती. एनडीटीव्हीला जाण्यासाठी त्यांच्याकडे वाहनव्यवस्था नव्हती. मी म्हणालो, ‘अहो, राणेंना सांगितलं असतं तर त्यांनी तुम्हाला वाहन दिलं असतं.’

ते हसले, म्हणाले, ‘टॅक्सी मिळेल ना आपल्याला.’

१५-२० मिनिटांची पायपीट केल्यानंतर आणि येणाऱ्या प्रत्येक टॅक्सीला हात दाखवल्यानंतर आम्हाला एकदाची एक टॅक्सी मिळाली आणि आम्ही इंडियाबुल्सला पोहोचलो...

राणे आज काँग्रेसमध्ये असते, तर केतकरांना राज्यसभेवर घेतलं जावं, यासाठी त्यांनी निश्चितच प्रयत्न केले असते. राणे यांची कार्यशैली आणि धडाकेबाजपणा काँग्रेसने समजून घ्यावा, यासाठी केतकरांनीही निश्चित प्रयत्न केले आहेत. आता राणे साहेबांचे केतकर साहेब राज्यसभेत चालले आहेत आणि त्याच वेळी राणेही राज्यसभेत चालले आहेत, मात्र वेगवेगळ्या पक्षांतून, एकमेकांचे विरोधक म्हणून, हा एक अजब योगायोग आहे नियतीचा. या दोघांच्या सदनातल्या भूमिका काहीही असल्या तरी राणेंना केतकर साहेब सोबत असल्याचा मोठा आनंद झाला असणार, आधार वाटला असणार आणि सदनाबाहेर त्यांच्यातला व्यक्तिगत जिव्हाळा आणि राणेंचा आदरभाव यांत काहीही फरक पडणार नाही, यात शंका नाही.प्रतिक्रिया द्या1793 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर