कुमार केतकर... राज्यसभेवर!
सोमवार , १२ मार्च, २०१८ टीम बिगुल

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल सोशल मीडियावर दाखल झाल्यानंतर अनेकविध पोस्टींमधील काही निवडक बिगुलच्या वाचकांसाठी.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्याची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर दाखल झाल्यानंतर असंख्य पोस्टींमधील काही निवडक 'बिगुल'च्या वाचकांसाठी.

.......

कुमार केतकर यांना राज्यसभा (थोडी उशीराच) मिळाली हे वाचून आनंद वाटला. काँग्रेसला माणसांची पारख थोडी उशिरानेच होते! 
कुमारशी हजार मतभेद असले तरी त्याच्याशी संवाद होऊ शकतो. मराठीतील इतर पत्रकार, संपादक हे सार्वजनिक मुतारीत जरी गेले तरी आपण काही तरी विशेष असून विशेष कार्यासाठी इथे आलो आहोत अशाच अविर्भावात वावरतात! कुमारशी मात्र संपादक असतानाही सार्वजनिक ठिकाणीसुद्धा समान पातळीवर बोलता यायचे. त्यांच्या केबिनमध्ये ही मुक्त प्रवेश असे. (गोविंदराव संपादक असतांना मटाची संपादकांची केबीन म्हणजे अलिबाबाची गुहा होती!) 
तो मटाचा संपादक झाल्यावर 'मटा'चा 'सोटा' ( सोनिया टाईम्स) झाला, असे नितीन शहाणे म्हणत असे पण त्यावरही कुमार चिडत नसे! लोहियावादी हे त्यांचे आवडते लक्ष्य असल्याने त्याच्यासमोर मी स्वत:ला आवर्जून लोहियावादी म्हणवत असे. वाद होत पण कटुता नसे.
त्याला चीड होती व आहे ती संकुचित, विभाजनवादी वृत्तीची. त्यावर मात्र तो तुटून पडतो. त्याच्या याच गुणांची आज देशाला गरज आहे. एक लढवय्या, अभ्यासू व अॅक्टिव्हिस्ट माणूस काँग्रेसने राज्यसभेवर पाठवला हे काँग्रेस हळुहळू सुधारते आहे याचे लक्षण मानावे का? 
कुमार व काँग्रेस दोहोंचे अभिनंदन व शुभेच्छा!

अरुण ठाकूर

........................

३५ वर्षांपूर्वीची गोष्ट. रूईया महाविद्यालयाने आयोजित केलेल्या नियोजित वक्तृत्व आणि उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धेत कुमार केतकरांची प्रथम भेट झाली. ते स्पर्धेचे परीक्षक होते नी मी स्पर्धक. मला प्रथम क्रमांकाचा करंडक मिळाला होता.

पुरस्कार वितरण समारंभानंतर दादर रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही दोघेही पायी चालत बोलत, गप्पा मारत गेलो होतो. त्यावेळचा त्यांचा आपुलकीचा, सहजपणाचा आत्मीय स्वर आज ३५ वर्षांनी सुद्धा तसाच ओला आणि आत्मिय आहे.

त्यांना मटा, लोकसत्ता अशा अनेक मोठ्या वर्तमानपत्रांच्या संपादकाच्या खुर्चीत बसलेले असतानाही अतिशय साधेपणानं वागताना बघितलंय.

झरा आहे मुळचाच खरा.

अफाट व्यासंग, आक्रमक वक्तृत्व, व्यापक आणि विशाल सहिष्णु वृत्ती, सर्वांशीच वागताना असलेला ओलावा हे त्यांचे दुर्मिळ गुण. पक्की वैचारिक निष्ठा असलेला आणि भूमिका घेणारा विचारवंत.

आपल्या मतांशी मात्र कायम ठाम. वैचारिक आवडी-निवडी टोकदार.
एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत होतो. वादाचा मुद्दा निघाला नी आमचे दोघांचे आवाज तापले. आणिबाणी, मंडल आयोग, ओबीसी राजकारण हे आमच्यातले मतभेदाचे मुद्दे. एकमताच्या, सहमतीच्या जागा मात्र शेकडो. दोघांचाही चढा सूर लागला. दोघेही अतिशय तावातावने बोलत होतो. आपापले मुद्दे घट्ट धरून होतो.

मॅनेजरला वाटले आमचे कडाक्याचे भांडण चाललेय. तो आम्हाला समजवायला लागला. जाऊ द्या सर. भांडण नका करू.

आम्ही दोघेही हसू लागलो आणि एकाच आवाजात म्हणालो, तुम्ही चिंता करू नका. आम्ही एकत्र जेवण करून मग एकत्रच बाहेर जाणार आहोत.

त्याला समजेनाच की आमचे काय चाललेय ते. आम्ही आपापल्या मुद्दयांवर ठाम होतो पण आमच्यातली दोस्ती पण घट्ट होती.

नागपूरला एका शिबिरात मी त्यांच्यावर कडक टीका केली. तर संयोजकांनी मला चिठ्ठी दिली, ते आपले पाहुणे आहेत, जास्त टीका करू नका. मी ती चिठ्ठी जाहीरपणे वाचून दाखवली तर केतकर उभे राहिले नि म्हणाले, आयोजकांनी काळजी करू नये, त्यांना खर्पूस टीका करू द्या, मी त्यांना तेव्हढेच तिखट उत्तर देईन. तुम्ही आमच्यात पडू नका. आम्ही जीवलग मित्र आहोत पण भरपूर भांडत असतो. असे शेकडो अनुभव.

प्रमिती "तू माझा सांगाती" मध्ये काम करीत होती तेव्हा ते आवर्जून आणि नियमितपणे ती मालिका बघायचे आणि तिचे काम का आवडते यावर तिला सविस्तर सांगायचे.

देश वैचारिक असहिष्णुतेच्या अंधारातून जात असताना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात केतकर नक्कीच त्याविरुद्ध जोरदार आवाज उठवतील. हा बुलंद आणि समाजशील आवाज संसदेत घुमेल याचा मनस्वी आनंद वाटतो.

प्रा. हरी नरके

........................

ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांना नव्या राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा.
महाराष्ट्रातून राज्यसभेत गेलेले केतकर हे (बहुदा) चौथे पत्रकार. पहिले संजय निरुपम, दुसरे भारतकुमार राऊत, तिसरे संजय राऊत आणि आता केतकर.
दोन पत्रकार निवडणुकीतून जिंकून लोकसभेत गेले. विद्याधर गोखले आणि नारायण आठवले.
महाराष्ट्रातील संसदीय राजकारणात पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे.
तो वारसा अखंड चालत राहो!!

दिनेश गुणे

........................

ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार केतकर यांना राज्यसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच ते काँग्रेसचे भक्त कसे आहेत वगैरे वगैरे टीका भाजपा भक्तांकडून सुरू झाली आहे. मी त्यांना इतकेच म्हणतो की किमान काँग्रेस त्यांच्या वर्षानुवर्षे असणाऱ्या एकनिष्ठांना उमेदवारी देतो आहे पण कालपर्यंत ज्यांना भाजपने भ्रष्टाचारी, देशद्रोही ठरवले अशा अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी समाजवादी कम्युनिस्टांना भाजपने तात्काळ पदे दिली आहेत. आणि सतरंज्या उचलणाऱ्या भक्तांनी निमूटपणे हा बलात्कार सहन केला आहे! नारायण! नारायण!

अजय पाटील

........................

कुमार केतकर यांचे 'लोकसत्ता'मधले अग्रलेख वाचतानाच अक्कलदाढ उगवायला लागली होती. त्यांच्या काही भूमिका नाही पटल्या. पण डावे-उजवे करीत बसण्याऐवजी मध्यममार्गी व विकासाचा विचार ते सातत्याने मांडत आले. @INCMaharashtra @INCIndia यांनी त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी दिल्याने आनंद वाटला

सचिन चोभे

........................

१२ वर्षांपूर्वी मुंबईत कुठलीही ओळख देख नसताना माझ्यासारखीला इंडियन एक्स्प्रेसच्या पुण्यातील उण्यापुऱ्या दोन वर्षांच्या पत्रकारितेच्या अनुभवावर लोकसत्तामध्ये लिहिण्याची संधी दिली ती कुमार केतकर सरांनी! 
लोकसत्तासाठी पहिला वहिला लेख मी लिहिला तेव्हा त्यांनी केलेल्या कौतुकाने मुंबईतही आपण तग धरू असा आत्मविश्वास वाटला होता. नव्या पत्रकारांना ते पूर्ण स्वातंत्र्य देत. पुढे युनियन कार्बाइड व्हिक्टिम्स, आर्थिक उदारीकरण नीती संबंधी काही संदर्भ जेव्हा माझ्या लेखात आले तेव्हा तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावर टीकेचा सूर लेखात होता. केतकर उघड काँग्रेसची बाजू घेत असा त्यांच्याविषयी म्हटले जाते आणि ते बव्हंशी खरेच आहे. पण तरीही केतकरांनी लेख मी जसा लिहिला होता तसाच छापला.
मी पुण्यातील एका उजव्या विचारसरणीच्या नियतकालिकातदेखील दोनेक वर्ष लिहिले. गांधी हा शब्द सुद्धा लेखात नको अशी सक्त ताकीद संपादक मंडळाने दिली होती. पण गांधीजींच्या एका कोटने सुरुवात असलेला गाडगेबाबा स्वच्छता अभियानावरचा माझा पहिलाच लेख मी या संपादकांपुढे ठेवला तेव्हा त्यांनी कोट काढून टाक असे सुचवले पण तो कोट तिथे असणं हे कसं योग्य आहे हे मी त्यांना पटवून दिल्यावर माझा लेख त्यांनी जसाच्या तसा छापला. डावे, उजवे, मधले यांपैकी कोणीही असोत, यातली काही माणसं संपादक म्हणून ग्रेटच आहेत. 
आपापल्या विचारधारांशी प्रामाणिक असण्यात काहीच गैर नाही. 
पत्रकारांनी तटस्थ वगैरे असावं ही अपेक्षाच चूक आहे किंवा वास्तविकतेला धरून नाही. 
'समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ है, समय लिखेगा उनके भी अपराध'
हे 'दिनकर' या महान कवी ने उगाच नाही म्हंटलं. 
पत्रकारदेखील माणसेच आहेत आणि त्यांना आपापली मते बाळगण्याचा हक्क नाकारून चालणार नाही. फक्त विचारधारेशी निष्ठा व्यक्त करताना कोणा एका व्यक्तीची किंवा व्यक्तिसमूहाची भलामण सतत करत राहणे हे पत्रकारांकडून अपेक्षित नाही.
आज रत्नाकर महाजन आणि कुमार केतकर या दोन नावांपैकी काँग्रेसने राज्यसभेसाठी केतकर सरांची निवड केली असे कळले. दोन्हीही नावे योग्यच होती. 
राज्यसभेसाठी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर हुकूमत असलेल्या व्यासंगी आणि विद्वान पत्रकार केतकर 
सरांची निवड झाल्याचे ऐकून मनःपूर्वक आनंद झाला. सरांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! 
त्याचबरोबर महाजनांसारख्या स्थिरचित्त आणि अभ्यासू प्रवक्त्याची उपेक्षा काँग्रेस पक्ष करणार नाही आणि त्यांच्यावर दुसरी कुठली तरी महत्त्वपूर्ण जबाबदारी देईल असे वाटते. 
राज्यसभेत कोणत्या विद्वानाला पाठवायचे हा प्रश्न या पक्षाला पडला यातच सारे आले. इथे अशा लोकांचा दुष्काळ नाही ही खूप सकारात्मक बाब आहे.

शर्वरी जोशी

........................

केवळ धनदांडग्यांनाच राज्यसभा देण्याचा प्रघात या निमित्तानं मोडलेला आहे. राज्यसभा हे ज्येष्ठांचं, विचारवंतांचं सभागृह आहे, यापुढे सगळेच पक्ष धनदांडग्यांना टाळून केतकर सरांसारख्या मंडळींना तिथं बसू देतील तर देशाचं भलं होईल.

विश्वंभर चौधरी

........................

कुमार केतकर विद्वान आहेत. त्यांची वैचारिक सहानुभूती डाव्या विचारसरणीला असली तरीही या देशाचे नेतृत्व करू शकणारा जो त्यातल्या त्यात बरा आणि मोठा पक्ष आहे त्याला त्यांची सहानुभूती आहे यात काहीही गैर नाही. नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तींना ते मानतात यात त्यांची राजकारणातील साकल्याची समज आहे. ती वेगळी असेल जरूर पण त्यामुळे त्याचे फळ त्यांना मिळाले असे उड्या मारत म्हणणाऱ्या अर्धवटराव आणि आवडाबाय लोकांना विद्वत्ता म्हणजे काय त्याचा अदमासच नसतो.
गायी सोडून सर्वत्र खाटक्या असलेल्या पक्षाला सहानुभूती देणाऱ्या सर्वांपेक्षा ते आम्हाला प्रियच आहेत.
त्यांना खूप शुभेच्छा.
काँग्रेस पक्षाला थेट पाठिंबा देणाऱ्या विद्वानांची, संवेदनाशील व्यक्तींची संख्या वाढायला हवी ही आजची गरज आहे.
नाही तर आहेच खाटकीस्तान की जय...

मुग्धा कर्णिक

....................................

भाजप आणी काँग्रेसने त्यांच्या वैचारिक आणी बौद्धिक योग्यतेप्रमाणे राज्यसभेचे उमेदवार निवडले.

भाजप- नारायण राणे
काँग्रेस- कुमार केतकर

चंदू सिंधू

........................

दोन-तीन वर्षापूर्वी कुमार केतकर राज्यसभेवर काँग्रेसतर्फे खासदार झाले असते तर त्यांची आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार चकमक झाली असती. पण आता संजय राऊत आणि शिवसेनेचाच सूर काँग्रेसच्या बाजूने मजबूत होत आहे. त्यामुळे केतकरांना शिवसेनेवर हल्ला करण्याची संधी मिळणे कठीण. मात्र, आता राऊत आणि केतकर भाजपवर तुफानी हल्ले चढवतील. भाजपची पळता भुई थोडी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावतील हे दोन्ही मराठी दिग्गज. त्यात काँग्रेसचा फायदा थोडा अधिक. कारण त्यांना केतकरांसोबत खासदार संजय राऊत आणि शिवसेनेची आयती ताकद मिळणार आहे.

श्रीकांत सराफ

........................

जशी ठाकरी भाषा आहे तशी एक सनसनाटी केतकरी वैचारिक वीण आहे, जी त्यांच्या व्यासंगातून जगभरातील भलभलत्या गोष्टी बौद्धिक नाट्यपूर्ण पद्धतीने जोडत जाते. ज्यात 'सरसकटीकरण' होतच असते पण ते बहुतांशी रास्त असते. अर्थात त्यांचा रोख पक्का /नेमका असतो.

चित्पावन संमेलनात जायचे आमंत्रण त्यांना 'मी जातीयवादी उपक्रमांना साथ देत नाही' म्हणून नाकारता आले असते पण केतकर हे संधी मिळेल तिथे कानउघाडणीचे काम करतच रहातात. टीका /रोष ओढवून घेण्याची त्यांची खुमखुमी विरळा आहे. त्यांचा तोल सहसा जात नाही. त्यांच्या घरावर हल्ला होऊनही त्यानी धोरणात फरक केला नाही .

केतकरांचे म्हणणे अनेकांना न पटण्यासारखेच असते. आणि विरोधक - तेही सुशिक्षित मध्यमवर्गी - हमरीतुमरी / अरेतुरे वर उतरणे हे केतकरांच्या तपाला आलेले सुरस फळ असते.

केतकरांची मांडणी ही पटो वा न पटो पण ती अभ्यासण्याजोगी नक्कीच असते.

सतीश तांबे

........................

कुमार केतकरांची राज्यसभेसाठीची निवड ही आनंदाची गोष्ट आहे. अजित जोशीने याबद्दल अत्यंत मुद्देसूद आणि सविस्तर लिहिलेय. त्याच्या सगळ्या विश्लेषणाला पाठिंबा देत फक्त माझे तीन मुद्दे यात वाढवतो.

पहिला मुद्दा आहे केतकर आणि काँग्रेसच्या संबंधाचा. केतकर कॉम्रेड डांगेवादी कम्युनिस्ट आहेत. डांगे साहेबांनी काँग्रेस संबंधात एक विशिष्ट भूमिका घेतली होती. डाव्यांची या देशातली लढाई काँग्रेसच्या सोबतीने कशी लढली जाऊ शकते याबद्दलची ती भूमिका होती. त्या अर्थाने केतकर काँग्रेसच्या जवळ आहेत. नेहरू, बोस आणि इतर या काँग्रेसमधल्या डाव्यांचा आणि काँग्रेस बाहेरच्या डाव्यांचा जो 'वैचारिक सहप्रवासी' म्हणून संबंध असतो तोच केतकर आणि काँग्रेस यांचा आहे. आज ते काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत जात असले तरीही.

समजा केतकरांना राज्यसभा मिळाली नसती तरीही त्यांनी हाच झेंडा खांद्यावर घेतला असता. याही आधी ते घेत होते. राज्यसभेची टर्म संपल्यावरही घेत राहतील. कारण त्यांची कमिटमेंट ही शक्तिशाली भारताचं स्वप्न जे स्वातंत्र्य मिळवताना देशाने बघितलं होतं आणि त्याला मूर्त रूप देण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जे कष्ट घेतले होते त्या स्वप्नाशी आहे. ग्लोबलायझेशनचे खंदे पुरस्कर्ते केतकर हे भाजप हे ज्या अर्थाने राष्ट्रवाद/राष्ट्रवादी हा शब्द घेतो त्या अर्थाने नाही तर नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या अर्थाने आक्रमक राष्ट्रवादी आहेत. बहुसांस्कृतिक भारताच्या समर्थनासाठी ते धर्मांध आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी आहेत. काँग्रेसने त्यांना राज्यसभा देऊन या अर्थाने देशातल्या मुख्य वैचारिक प्रवाहाचा एक सहप्रवासी शिलेदार आताच्या या तीव्र लढाईच्या काळात निवडलाय ही समाधानाची गोष्ट आहे. हा दुसरा मुद्दा.

तिसरा मुद्दा या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या विचारार्थ आहे. समाजात अत्यंत प्रतिगामी मूल्ये आणू पाहणाऱ्या शक्ती आज सत्तेवर आहेत. शेण विकून पैसे कमवा, सूर्य हा जगाचा आत्मा आहे, गणपतीचे मुख ही पहिली प्लास्टिक सर्जरी होती, मनुस्मृती देशात आणली पाहिजे, मंत्र म्हणून देशाच्या सीमांचे रक्षण होईल वगैरे वगैरे गोष्टी सर्रास बोलणारे आणि त्यांवर ठाम विश्वास असणारे हे लोक हैदोस घालत आहेत. अश्यावेळी ज्यांना हे मंजूर नाही, ज्यांना आपल्या मुलांनी उत्तम नोक-या कराव्यात, देशाने आधुनिक शोध लावावेत आणि ह्या असल्या जुनाट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावं असं वाटतं त्या सगळ्यांनाच आता राजकीय भूमिका घेऊन ह्या बुरसटलेल्या लोकांचा निर्णायक (म्हणजे राजकीय सोबतच, सांस्कृतिक, वैचारिकसुद्धा) पराभव करण्याची वेळ आली आहे. अश्या काळात केतकरांनी आणि अनेकांनी थेट काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. काहींना ते मान्य नसेल. पण, अशास्त्रीय गोष्टींना खतपाणी घालणा-या लोकांना पराभूत करण्यासाठी एक राजकीय चळवळ तर नक्कीच उभी करावी लागेल. आणि तिला इतर समविचारी लोकांशी जोडून घ्यावं लागेल. या 'जोडून घेण्या'च्या प्रक्रियेला इथल्या समजुतदार, संवेदनशील मनाने सुरुवात करायला नको काय?

अमेय तिरोडकर

......................................

कुमार केतकर यांना काँग्रेसने राज्यसभेचे सदस्यत्व देऊ केल्यावर उठलेल्या विरोधातल्या व टोकाच्या प्रतिक्रिया त्यांच्या कुवतीची साक्ष देणाऱ्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्र टाईम्सचे कुमारनंतरचे संपादक भारतकुमार राऊत यांना शिवसेनेने राज्यसभेत खासदार केले होते पण त्यावर अशा आवेशपूर्ण प्रतिक्रिया आल्या नव्हत्या. स्वपन दासगुप्ता वा चंदन बसू यांना भाजपाने आणि काँग्रेसने राजीव शुक्ला वा समाजवादी पक्षाने शाहिद सिद्दीकी यांना खासदार केले होते. पण त्यावर अशा प्रतिक्रिया उमटलेल्या नव्हत्या. मग कुमारवरच इतका रोष कशाला? त्यांची संघ भाजपा विरोधातील कडवी मांडणी वा नेहरू खानदानाविषयीची आस्था, हा त्यांचा व्यक्तिगत मामला आहे. त्याच्यापलिकडे कुमार खूप अभ्यासू व व्यासंगी पत्रकार आहे. त्याच व्यासंगावर मनापासून भाळलेल्यांना मग कुमारच्या एकांगी वाटणाऱ्या काँग्रेसप्रेम वा संघद्वेषाचे वैषम्य वाटते. त्यातून अशा खवळलेल्या प्रतिक्रिया उमटत असतात पण अन्य कुठल्याही कॉग्रेस नेता प्रवक्त्यापेक्षा कुमारच काँग्रेसची कितीही चुकीची भूमिका समर्थपणे मांडू शकतात, ही अशा प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व टीकाटिप्पणी मागची खरी वेदना आहे. पण त्यातून त्या व्यक्तीवर किंवा त्याच्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणली जाते, याचे भान कुणी ठेवायचे? त्यांच्या भूमिका वा विचारांवर जरूर हल्ला व्हावा. पण व्यक्तीगत आक्षेप निंदनीय आहेत. वरकरणी ते शिव्याशाप भासत असले तरी कुमारच्या बुद्धीमत्तेवरील निरागस प्रेमाचीच साक्ष म्हणावी लागेल.

भाऊ तोरसेकर

........................

काल संध्याकाळी सातच्या सुमारास केतकर सरांना राज्यसभा घोषित झाल्याची बातमी मिळाली आणि आश्चर्याचा झणझणीत धक्का बसला... म्हणजे, गोड वगैरे ठीकाय, पण झणझणीत जास्त होता. कारण ती एक संधी केतकर सरांच्या आयुष्यातून कायमची गेली म्हणून उसासे सोडणाऱ्या आणि त्याबद्दल काँग्रेसला दूषणं देणाऱ्या काही केतकर-काँग्रेस-प्रेमींपैकी मी आहे, हे सांगायला मला काहीच संकोच नाही. त्यात आता एकच उमेदवार पाठवता येणार आहे, हा अजून एक नाजूक विषय. त्यात त्यांचं नाव येईल, हे ध्यानीमनीस्वप्नी वगैरेसुद्धा नव्हतं. मात्र त्यांच्या निवडीतून कायकाय संदेश जातायत, हे समजून घेणं गरजेचं आहे... आणि हा संदेश समजायचा तर कुमार केतकर आणि त्यांची राजकीय बैठक समजून घेणं, हेही तेव्हढंच महत्त्वाचं आहे.

सरांच्या राजकीय बैठकीचा पाया हा निःसंशय मार्क्सवादी आहे. यात मार्क्स कधीच चुकू शकत नाही, आणि त्याच्या वर्गसंघर्षाच्याच लढ्याला अजूनही लढत राहिला पाहिजे, हा भाबडा राजकीय साम्यवाद नाही. मार्क्सने सामजिक-राजकीय घटनांच्या विश्लेषणासाठी जो ‘दृष्टीकोन’ दिला, तो महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आहे आणि नव्या नव्या संदर्भात तो ताडून पाहीला पाहिजे, हा त्यांच्या मार्क्सवादाचा अर्थ आहे आणि त्याबद्दल ते (नेहमीप्रमाणे) कट्टर आहेत! दुसरा पदर हा भारतीय राजकारणाच्या (त्यांच्याच बाषेत) महत्तम सामायिक विभाजाका’चा आहे. ‘एव्हढ्या मोठ्या, अफाट लोकसंख्येच्या, अचाट वैविध्यपूर्ण देशात सतत आणि वादातीत ‘न्याय’ करणं अशक्य आहे, किंबहुना तो प्रयत्न उलट अधिक अन्यायाला जन्म देऊ शकतो. तेव्हा सतत जास्तीत जास्त लोकांचं भलं करून त्यांना संधी उपलब्ध करून देत राहायला हवं, या प्रक्रियेत सत्ताधार्याकडून अन्याय हा होणारच आणि तो अपरिहार्य आहे, पण तरच दीर्घकालात आपण अधिक चांगल्या समाजाकडे जाऊ शकतो.’ हा त्यांचा दुसरा विश्वास आहे. याबरोबरच त्यांच्या विचारधारेतली, फारशी ज्ञात नसलेली तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा ‘तंत्रज्ञान’वाद. उत्तमोत्तम तंत्रज्ञान हे त्यांना निव्वळ वापरण्यासाठी नाही तर एक मानवी प्रतिभेचं अद्भुत कर्तृत्व म्हणून त्यांना ‘Fascinating’ वाटतं आणि ते आपल्यापर्यंत घेऊन येणारे शास्त्रद्न्य त्यांना खूपच आदराचे धनी वाटतात. तंत्रज्ञान, डावी विचारसरणी आणि कल्याणकारी धोरणांची लवचिकता, हा त्यांच्या राजकीय मांडणीचा सारांश आहे आणि काँग्रेसने त्यांच्या रुपात ही मांडणी मान्य केलेली आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवं.

एखाद्या कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या अढळ निष्ठेने त्यांनी ही राजकीय विचारसरणी गेली अनेक दशकं बाळगलेलीच नव्हे तर त्यासाठी अविरत प्रयत्न केलेले आहेत. या मांडणीच्या इतर अनेक पक्ष जवळपासही जाऊ शकत नाहीत. काँग्रेसमध्ये अनेक दोष असतील पण सातत्याने या मांडणीच्या बाजूने असलेला एकमेव पक्ष काँग्रेस आहे, त्यामुळे इच्छा असो वा नसो, त्या पक्षाला पाठींबा देणं ही राजकीय गरज आहे, ही त्यांची भूमिका असत आलेली आहे. दुर्दैवाने आकलनाची झेप मर्यादित असलेले अनेक जण याला ‘काँग्रेसचं/गांधी घराण्याचं लांगुलचालन’ समजतात. केतकर एकदा टिळकांवर बोलताना म्हणाले तसं, ‘टिळक हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे, काँग्रेस/गांधी घराणं नव्हे! ती माझी राजकीय भूमिका आहे’. पण हे बहुतेकांना समजत नाही. त्यांनी वेळोवेळी केलेलं कॉंग्रेसचं आक्रमक समर्थन, हेही त्याला कारणीभूत आहेच, पण ते त्यांना ठावूक आहे आणि बरीच व्यक्तिगत किंमत देऊनही त्याची त्यांना फिकीर नाही. किंबहुना खाजगीतच नव्हे तर काँग्रेसच्या अंतर्गत व्यासपीठावर जाहीररीत्या त्यांनी कॉंग्रेसच्या अनाकलनीय सुस्तपणाचे वाभाडे काढलेले आहेत आणि खासदारकीची ही संधी त्यांना एक दशकापूर्वी न मिळायला हीच गोष्ट कारण होती, अशीही चर्चा होते.

कॉंग्रेसने केलेली त्यांची निवड याच पार्श्वभूमीवर फारच महत्त्वाची आहे. सत्ता नसताना, आर्थिक आणि राजकीय स्थिती खूपच नाजूक असताना, एखादा उद्योगपती अथवा काहीशे कोटी फेकू शकणारा मातब्बर ‘सरदार’ राज्यसभेवर पाठवणं हा पक्षाला एक सोपा पर्याय होता, किंबहुना याच्या बरोब्बर विरुद्ध परिस्थिती असून भाजपा विधानपरिषदेवरसुद्धा कोणाला संधी देते ते दिसतंच आहे. कॉंग्रेसणे हे न करून कदाचित डावपेचात्मक चूक केलेली आहे, असंच कोणी म्हणेल. पण त्यात काँग्रेसने काही संदेश दिलेले आहेत. एक म्हणजे अधिवेशनं गदारोळात फुकट जात असली, तरी काँग्रेसला आपली भूमिका उत्तमपणे मांडू शकणारा वक्ता मोलाचा वाटतो आहे. दुसरं म्हणजे केतकरसरांची पित्रोदांशी जवळीक लक्षात घेता आपल्या या दूरदेशीच्या ‘गुरू’चा प्रभाव राहुल गांधीवर स्पष्टपाने आहे. तिसरा मुद्दा हा की ठोक लांगुलचालनाच्या पलीकडे जाऊन विद्वत्तेला स्वीकारायची तयारी पक्ष दाखवत आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण यामुळे आपली स्वीकारार्हता वाढवणं पक्षाला शक्य होईल. चौथं म्हणजे एकूणच पक्षाची जी पुनर्मांडणी नव्या नेतृत्त्वाखाली होते आहे, त्याचा केतकर सरांची निवड हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण वयाने मोठे असले तरी काँग्रेसच्या तरुण आणि आधुनिक समर्थकांत त्यांचं जाळ फार घट्ट आहे!

काँग्रेस आणि केतकर, या दोघांसाठी ही निवड एका नव्या काळाचा उदय आहेत. खुलेआम काँग्रेसच्या झेंड्याखाली जाऊन केतकर सर तो झेंडा आता कुठवर नेतात, ते पाहाणं फारच महत्त्वाचं असेल....!

अजित अनुशशी

........................प्रतिक्रिया द्या1813 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर