शेतीची दुर्गती... इथली आणि तिथलीही!
सोमवार , १२ मार्च, २०१८ संजीव चांदोरकर

भारतातील शेतीवरील संकटाचा संबंध नक्कीच केंद्र व राज्य सरकारांच्या शेतकऱ्यांप्रतीच्या असंवेदनशीलतेशी आहे. तरीही या संकटाची मुळे देशाच्या सीमा ओलांडून शोधावी लागतील.

अमेरिकेला जर जागतिकीकरणापासून स्वसंरक्षणाची गरज लागणार असेल तर भारताला तर नक्कीच लागेल आणि भारतीय शेतीक्षेत्राला तर सर्वात जास्त! २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने कसे सहभागी व्हावे हा मोठा विषय अजेंड्यावर आणला गेला पाहिजे.

सर्वप्रथम भारतीय किसान सभेच्या लाल झेंड्याखाली मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेल्या "लाँग मार्च"चे एक मुंबईकर म्हणून स्वागत!

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चच्या सर्व मागण्यांना पाठिंबा!

या लाँग मार्चमधील व याच्याही आधी झालेल्या शेतकरी आंदोलनातील मागण्या या प्रायः भारताचे केंद्र सरकार व त्या त्या राज्याचे राज्य सरकार यांना उद्देशून केलेल्या आहेत. त्यात काहीही गैर नाही. शेतकऱ्यांना ताबडतोबीचा दिलासा हवा आहे, कर्जबाजारीपणासारख्या जोखडातून मान सोडवून हवी आहे, हमीभाव बांधून हवे आहेत. या सगळ्या मागण्या न्याय्यच आहेत. याबद्दल दुमत असायचे कारण नाही.

भारतातील शेती क्षेत्रातील आरिष्टाचा संबंध नक्कीच भारतातील केंद्र व राज्य सरकारांच्या शेतकऱ्यांप्रतीच्या असंवेदनशीलतेशी आहे. भारतातील उद्योगांना झुकते माप देण्याशी व शेतकऱ्यांना दुय्यम नागरिक म्हणून वागणूक देण्याशी आहे पण जागतिकीकरणाच्या युगात देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रश्नांची मुळे देशाच्या सीमारेषांच्या बाहेर दूरवर शोधावी लागतील.

भारतातील केंद्र सरकार तांत्रिक दृष्ट्या स्वतःचे निर्णय स्वतः घेते. मान्य. पण आपल्याला हेदेखील माहीत आहे की भारताची अर्थव्यवस्था वेगाने जागतिक अर्थव्यवस्थेशी एकजीव (integrate ) होत आहे.
केंद्र सरकारच्या आर्थिक निर्णय घेण्याचा स्वातंत्र्याच्या संदर्भात याचे अर्थ लावावे लागतील. वस्तू-माल, सेवा व भांडवल यांची आयात व निर्यात भविष्यकाळात वाढत जाणार एव्हढाच त्याचा मर्यादित अर्थ नाही. तर भारतातील केंद्र सरकारला महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी सध्या असणारे स्वातंत्र्य अधिकाधिक प्रमाणात संकुचित होत जाणार असा त्याचा अर्थ आहे.

जागतिकीकरणाच्या गेली काही दशके सुरूच असणाऱ्या प्रक्रियेमागील ढकलशक्ती व लाभार्थी बहुराष्ट्रीय कंपन्या राहिल्या आहेत. त्या एव्हढ्या ताकदवान आहेत की जागतिक पातळीवर वरकरणी निष्पक्ष आहोत असे दाखवणाऱ्या जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ ) यांच्या धोरणांवर प्रभाव टाकत असतात. त्या भारतासारख्या देशातील शासन यंत्रणेला आपल्या तालावर नाचायला भाग पाडू शकतात.

म्हणून भारतासारख्या गरीब देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी बहुराष्ट्रीय कंपन्याचा कसा संबध येऊन पोचतो ते समजून घ्यायची गरज आहे. (या लेखात फक्त सूतोवाच केले आहे)

शेती संबंधातील दोन प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्या समोर येतात (१) जागतिक धान्य बाजारातील (World Grain Market) बहुराष्ट्रीय कंपन्या व (२) बियाणे, जंतुनाशके बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या ! या दोन्ही क्षेत्रातील समान गुणवैशिष्ट्य म्हणजे दोन्ही क्षेत्रात मूठभर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व. याला इंग्रजी मध्ये ऑलिगोपोली (मूठभर कंपन्यांची अधिकारशाही) म्हणतात.

धान्य बाजारातील ऑलिगोपोली :

एडीएम, बंज, कॅरगिल आणि ड्रेफस या फक्त चार बहुराष्ट्रीय कंपन्याची जागतिक धान्य बाजारावर जवळपास मक्तेदारी आहे. त्यांच्या इंग्रजी अद्याक्षरावरून त्यांना ABCD Group असेच म्हणतात. चार कंपन्या मिळून गहू, साखर, सोया, डाळी, खाद्यतेल यांचा ७० टक्के ते ९० टक्के जागतिक व्यापार नियंत्रित करतात. धान्याच्या बाजारात या कंपन्यांचे एवढे स्टेक लागलेले असतील तर ते डब्ल्यूटीओच्या कारभारात त्यांनी नाक खुपसले नाही तर नवल. या कंपन्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रभाव अन्न धान्यांशी संबंधित सर्व जागतिक फोरम्सवर असतोच असतो.

अचानक बातमी येते की भारताने इतके लाख गहू युक्रेन व ऑस्ट्रेलियामधून आयात केला. कोण घेते हे निर्णय? २०१६-१७ या वर्षात भारताने पूर्वी कधीही केला नसेल एवढा गहू आयात केला.

गहूच नाही तर तेलबिया, डाळी असे कितीतरी धान्यपदार्थ आहेत. या निर्णयातून नक्की कोणाचे भले होते ? मुद्दा फक्त कोणी कोणाला लाच दिली यापुरता सीमित ठेवला तर ते चुकीचे होईल.जागतिक अर्थव्यवस्था नक्की कशी चालते हे समजून घेतले पाहिजे.

बियाणे, जंतुनाशके बाजारातील ऑलिगोपोली :

अगदी अलीकडे या क्षेत्रातील दोन मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, बेयर व मोन्सॅन्टो यांनी एकमेकात विलीन व्हायचे ठरवले आहे. कापसाच्या जीएम बियाण्यांमुळे मोन्सॅन्टोचे नाव महाराष्ट्रातील कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांना तोंडपाठ आहे. तीच मोन्सॅन्टो. या विलीनीकरणाचा निर्णय येत्या काही महिन्यात लागेल. तो झाला तर बियाणे व जंतुनाशकाच्या जागतिक बाजारपेठेत फक्त तीन महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांचे साम्राज्य असेल.

(१) केम चायना आणि सिंजेंटा  (२) डो आणि ड्यु पॉण्ट (३) बेयर आणि मोन्सॅण्टो या तीन कंपन्या मिळून या बाजारपेठेतील दोन तृतीयांश मार्केट हातात ठेवू शकतात.

एकाधिकारशाही (मोनोपॉली ) व ऑलिगोपोलीचे अनेक तोटे ग्राहकांना (इथे शेतकऱ्यांना) सहन करावे लागतात. उदा. स्पर्धेच्या अभावामुळे किमती चढ्या राहू शकतात, भविष्यकाळात या क्षेत्रात संशोधन कोणत्या दिशेने न्यायचे किंवा संशोधनावर खर्च मुळात करायचा की नाही याचा निर्णय मूठभरांच्या हातात राहतो, कोट्यवधी शेतकरी ग्राहकांचा डाटा (बिग डाटा ) त्यांच्या कब्जात जाणार असतो व जगातील अन्न धान्याच्या, नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर या कंपन्या अतिशय सूक्ष्म पातळीवर पण निर्णायक प्रभाव पाडू शकतात

शेतकऱ्यांच्या आंदोलनातील विविध मागण्या मांडताना या जागतिकीकरणाच्या कॅनव्हासचा विसर पडता कामा नये.

भारत सरकारने जागतिक व्यापार संस्थेच्या (डब्लूटीओ) चव्यासपीठावर काय भूमिका घ्यावी, बहुराष्ट्रीय कंपन्यांवर Competition Commission of India ने कसे लक्ष ठेवावे, धान्याच्या आयातीवर किती आयात कर लावावा याच्या चर्चा शेतकऱ्याच्या व्यासपीठांवर झाल्या पाहिजेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिकीकरणाचे तत्त्वज्ञान अंशतः झिडकारले. का? तर त्यातून अमेरिकेचे नुकसान झाले असे त्यांचे म्हणणे आहे. निवडून आल्यावरचा हा जावईशोध नाही. तर त्यांनी प्रचारात तशी मांडणी केल्याने ती अनेक नागरिकांना अपील झाली. म्हणून त्यांनी ट्रम्पना निवडून दिले. आता ट्रम्प यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थे भोवती संरक्षणात्मक भिंती उभारायला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम पोलाद व अल्युमिनियम वर मोठे आयात कर लावण्याची घोषणा करून.

अमेरिकेला जर जागतिकीकरणापासून स्वसंरक्षणाची गरज लागणार असेल तर भारताला तर नक्कीच लागेल. संरक्षणाची सर्वात जास्त गरज आहे भारतातील छोट्या व मध्यम शेतकरी वर्गाला.

ट्रम्प "सर्वप्रथम अमेरिका" (America First ) ही घोषणा देत असेल तर भारताने उगाच तत्त्वज्ञाचा आव आणून जगाची काळजी करू नये.

२०१९च्या लोकसभेच्या निवडणुकात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने कोणत्या अटींवर सहभागी व्हावे हा मोठा विषय अजेंड्यावर आणला गेला पाहिजे.

 प्रतिक्रिया द्या2304 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Shripad Kulkarni - सोमवार , १२ मार्च, २०१८
शेतीच्या दुरवस्थेस जबाबदार असलेल्या विविध कारणांमध्ये आयात निर्यात धोरण हेही एक प्रमुख, महत्त्वाचे कारण आहे. केंद्रीय सचिवालयात अधिकारी, राजकारणी, व्यापारी यांची मोठी लॉबी अन्नधान्य व्यापारात कार्यरत असल्याचं सांगितलं जातं. विविध देशांबरोबर करार करून देशांतर्गत कृषी क्षेत्राला हवे तसे वाकविले जाते. आयात शुल्कवाढ, निर्यात प्रोत्साहन अनुदान असे विषय समोर आले, की करारांचे दाखले देऊन निर्णय उधळला जातात. माझ्या माहितीप्रमाणे; गेल्या आठ-दहा महिन्यांपासून या लॉबीला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन, खाद्यतेल आयातशुल्क वाढ, कांदा निर्यात, हरभरा आयात शुल्कवाढ हे निर्णय गेल्या काही महिन्यात घेतलेले निर्णय बाजारात भाव स्थिर ठेवण्यास साह्यभूत ठरतील. शेतीतून मिळणारे उत्पन्न दीडपट करण्यासाठी शेतमाल प्रक्रिया, प्रभावी विपणन करावे लागणार. त्यात राजकीय नव्हे तर प्रशासकीय अडथळे जास्त आहेत.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर