शेती आणि शेतकऱ्याचं पुढे काय होणार?
सोमवार , १२ मार्च, २०१८ चंदू सिंधू

हमीभाव, शेतकऱ्यांची आंदोलने, श्रमाचे मूल्य यांवर चर्चा जोरात असली, तरी रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात शेतकरी व शेतमजूर यांना स्थान तरी उरणार आहे का?

येत्या काळात शेती करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल आणि तंत्रज्ञान लागेल. त्या भांडवल/तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या कार्यक्षमतेमुळे, शेतीमालाचे भाव बाकीच्या वस्तू आणि सेवा यांच्या तुलनेने कमी होतील, तरीही एकरी उत्पादन खूप वाढल्याने भांडवली शेती करणाऱ्यांना खूप फायदा होईल. शेतकरी आणि शेतमजूर याला शेतीमध्ये जागा नाही किंवा खूप कमी जागा आहे.

शेतीचा प्रश्न गंभीर नक्कीच आहे पण त्याला जी सोपी उत्तरं काही उजवे/डावे विद्वान देत आहेत, त्यांना मॅक्रो लेवलवर वस्तुस्थिती आणी वैज्ञानिक प्रगतीची कल्पना नाही असंच म्हणावं लागेल.

भारतीय डाव्यांच्या लॉजिकचा फोलपणा-

१) जमिनीचं शेतीसाठी फेरवाटप करण्याची मागणी अजूनही जे करतात ते केवळ दारिद्र्याचा पुरस्कार करणारे आहेत. भारतातील एकूण ८० टक्के शेतकर्‍यांची जमीनधारणा एक हेक्टरपेक्षा कमी आहे. या शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर ते बाजारपेठेसाठी उत्पादन करू शकत नाहीत, म्हणजे त्यांना ते परवडणारं नाही. परिणामी ते फक्त पोटापुरतं उत्पादन करतात किंवा आपली शेती खंडाने दुसऱ्याला देतात.

२) शेतीमालाला हमी
हमीभाव द्या ही मागणी वरवर न्यायाची वाटत असली तरी असं म्हणण्यासारखा वेडेपणा कुठला नाही. भारतात कुठलंही सरकार आलं तरी ते इकॉनॉमिकली शक्य नाही.
एक वर्षी कांद्याला किंवा उसाला भाव जास्त मिळाला तर पुढच्या वर्षी त्याचं इतकं जास्त उत्पादन होतं की भाव खूप पडतात. पिकांना हमीभाव दिले तर बजेटची वाटच लागेल. त्यापेक्षा सरळ चांगल्या सोशल सिक्युरिटीची मागणी सर्व नागरिकांसाठी करणं जास्त शहाणपणाचं आहे. असो

उजव्यांच्या लॉजिकचा फोलपणा-

१) शेतकऱ्यांनी एकरी जास्त उत्पादन घेतलं तर त्यांचे प्रश्न सुटतील. हो सुटतील. काही शेतकऱ्यांचे सुटतील सर्व शेतकऱ्यांनी तसं केलं तर होणारं उत्पादन जमिनीत गाडावं लागेल .

२) शेती पूर्ण मार्केटवर सोडून द्यावी सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये- 
सरकारचा हस्तक्षेप किती टक्के आहे? तो सर्व पिकांना आहे का? हस्तक्षेपाचं संपूर्ण शेतीच्या उत्पादनात weighted average किती आहे? 
या प्रश्नांची कोणी उत्तरं देत नाही. याची उत्तरं शोधली तर सरकारचा हस्तक्षेप अंदाजे २५ टक्क्यांच्या पुढे येणार नाही.

उजव्यांनी सांगितलेले उपाय 
individual cleverness collective foolishness या इकॉनॉमिक्सच्या संकल्पनेत परफेक्ट बसतात.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असणाऱ्या आपल्या देशाची परिस्थिती आणी प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. इस्राएलचं उदाहरण देणं बौद्धिक दिवाळखोरी आहे.

उजव्यांच्या लॉजिकमध्ये शेतीचा प्रश्न सुटेल आणी शेतकरी पूर्ण उद्‌ध्वस्त होईल त्याचं ही कारण आहे शेतीमध्ये वाढत जाणारी उत्पादकता.

शेती मधील होणारं बियाणं खतं आणि कीटकनाशक यावरील संशोधनाने शेतीची उत्पादकता वाढवली आहे आणि इथून पुढे ती अजून खूप वाढणार आहे.

केळीचं उदाहरण देतो. पूर्वी कंद लावून केळी उत्पादन केलं जायचं. एकरी उत्पादन १५ टनांच्या वर गेलं नाही. टिश्यू कल्चरची रोपं आली आणी उत्पादन ४० टनांवर गेलं. अकलूजचे कितीतरी शेतकरी एकरी ६५ टन उत्पादन काढतात. इंडोनेशियाच्या शेतकऱ्यांनी नवीन तंत्र विकसित केलंय त्यात ते एकरी शंभर टन उत्पादन काढतात.

हायड्रोपोनिक्सने जपानमध्ये टोमॅटोचं उत्पादन एकरी 300 टन काढलंय. अशी खूप नवीन तंत्रं डेव्हलप होत आहेत.

याहीपेक्षा मोठी प्रगती रोबोटिक्स आणि सौरवीज स्वस्त झाल्याने होईल. शेतीवर शेतकरी आणि शेतमजूर राबनं परवडणार नाही. रोबो २४ तास काम करतील. डिजिटल इमेजिंग २४ तास प्रत्येक रोपावरील कीड स्कॅन करेल आणी रोबो त्या काढून टाकतील. कदाचित कीटकनाशकं लागणार नाहीत किंवा खूप कमी लागतील.

काही शेती/ रोबोटिक्स तज्ञांनुसार शेतीची उत्पादकता पुढच्या ४० वर्षात सहापट वाढेल

उजव्याच्या लॉजिकने शेती भांडवली होईल आणी खूप भांडवल असणाऱ्यांना परवडेल. तुलनेने उत्पादन वाढल्याने महागाई दरापेक्षा आणि इतर वस्तू आणि सेवा यांच्या भावापेक्षा शेतीमालाचे भाव तुलनेने कमी वाढतील. भांडवल आणी तंत्रज्ञान नसलेले शेतकरीमोठ्या प्रमाणावर शेतीतून बाहेर फेकले जातील.

या वेळेस रोबोटिक्स + आर्टिफिशिअल इंटेलिजन्स + स्वस्त वीज आणी स्वस्त व्याजदर यामुळे उद्‌ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला नोकऱ्या/रोजगार नसतील.

एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जी चूक डावे करतात तीच उजवे करताहेत.

भारताची लोकसंख्या १६० कोटीच्या आसपास स्थिरावेल. जागतिक लोकसंख्यापण जवळपास त्याच वेळी स्थिरावेल.

भारतीयांचं अन्याधान्यचं सेवन हे युरोपपेक्षा कमी आहे असं म्हणतात. उष्ण कटिबंधात युरोपचं अॅव्हरेज लागू करणं चुकीचं आहे पण आपण गृहीत धरू की ते योग्य आहे. म्हणजे टोटल मार्केट दुपटीने किंवा तिपटीने जरी वाढलं तरी शेतीतील उत्पादनवाढ ही जास्त गतीने होईल. तेवढच नाही भारतासारख्या देशात शेतीयोग्य जमिनीच्या ५० टक्के जमिनीवर शेती होत असेल.

झालेल्या उत्पादनवाढीला गिऱ्हाईक कोण आहे? इतके प्रॉब्लेम्स असून आजच शेतीमालाचं उत्पादन भरपूर आहे..

रोकडा प्रश्न राहतो जगातील ९० टक्के शारीरिक आणि बौद्धिक कामं जर रोबो आणि AI मार्फत करण्याकडे वाटचाल चालू आहे आणि ते योग्यही आहे...

सर्व श्रमांविषयी आदर बाळगून मला असं वाटतं की माणसाचा मेंदू आणी श्रम गटार साफ करण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी नाही. उत्क्रांती आणी माणसाच्या संस्कृतीच्या प्रगतीसाठी ते गरजेचं होतं. काळ असा येतोय की त्याची गरज राहणार नाही.

तर माणसांनी या कॅपिटलीझममध्ये जगायचं कसं? खासगी मालमत्ता आणि निर्माण होणाऱ्या संपत्तीबद्दल नव्याने विचार करून, पुढील पिढ्या अंतराळ संशोधनासाठी तयार कराव्या लागतील.
पृथ्वी सोडून कधी ना कधी जावंच लागेल... मग उशीर कशाला?

(फोटोसौजन्य: https://unsplash.com

फोटो: झ्युग्र)

 प्रतिक्रिया द्या2690 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर