फेबुगिरी
सोमवार , १२ मार्च, २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी..

डाव्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी शेतकरी विरुध्द शेतमजूर, लहान शेतकरी विरुध्द मोठा शेतकरी, शेतकरी विरुध्द गरीब-कामगार, श्रीमंत शेतकरी विरुध्द गरीब शेतकरी अशा वर्गीय चष्म्यातून शेतकरी प्रश्नाकडे पाहिले. त्यामुळेच शरद जोशींसह अनेकांनी त्यांची शेतकरीविरोधी अशी संभावना केली. पण आता डाव्यांचे शेतकरी प्रश्नांविषयीचे आकलन सुधारले असेल, भूमिका बदलल्या असतील किंवा किमान त्यांनी डावपेच बदलले असतील तर व्यापक हित समोर ठेवून त्याचे स्वागतच करायला हवे.

शेतकरी संपाची सुरुवात उत्स्फूर्त होती. प्रस्थापित शेतकरी संघटनांना बाजूला ठेवून गावोगावचे तरुण शेतकरी मैदानात उतरले होते. परंतु मराठा मोर्चाच्या धर्तीवर 'एक नेता नको', 'नेताच नको' या दुराग्रहामुळे जयाजीसारख्या प्रवृत्तींचे फावले आणि ते आंदोलन भरकटले. त्या वेळी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, डॉ. अशोक ढवळे यांनी ठोस आणि प्रामाणिक भूमिका घेतल्याने त्यांना एक नैतिक वजन प्राप्त झाले. दरम्यानच्या काळात एकंदर रागरंग बघून राजू शेट्टी, रघुनाथ पाटील आणि इतर प्रमुख शेतकरी नेते सुकाणू समितीत सामील झाले. शेट्टी आणि रघुनाथदादा दोघांनीही समंजस आणि प्रगल्भ भूमिका घेतली होती. पण हे सामंजस्य अल्पकाळच टिकले. हातातून निसटलेल्या शेतकरी आंदोलनावर पुन्हा एकदा मांड बसल्यावर शेतकरी संघटनांतील जुने हेवेदावे आणि कुरघोडीच्या राजकारणाला उत आला. शिवाय सरकारला अनुकूल भूमिका छुपेपणाने घेणारे घटकही सुकाणू समितीत होतेच. शेवटी या सुकाणू समितीचे तीन-तेरा वाजले. कागदावर सुकाणू समितीचे अस्तित्व अजूनही आहे; परंतु प्रत्येकाने सवतासुभा मांडून स्वतंत्र आंदोलनं जाहीर केली आहेत.

परस्परातील मतभेद स्वीकारून काही मुद्दयांवर सहमती निर्माण करून सर्व शेतकरी संघटना आणि डाव्यांनी मिळून हा लाँग मार्च काढला असता तर त्याने मोठा परिणाम साधला असता. डाव्यांची ताकद आणि प्रभावक्षेत्र मर्यादित आहे. लाँगमार्चसाठी नाशिक ते मुंबई हाच मार्ग निवडला यावरूनही ते स्पष्ट होते. आदिवासी शेतकरी डाव्यांच्या पाठीशी आहे. इतर शेतकरी वर्गामध्ये त्यांची फारशी ताकद नाही. लॉंग मार्च काढताना शेतकरी कर्जमाफीसकट इतर अनेक मागण्या केलेल्या असल्या तरी प्रमुख मागणी ही वनहक्क कायद्याची अंमलबजावणी हीच आहे. पण बिगर आदिवासी शेतकऱ्यांसाठीही आम्ही लढत आहोत, किंबहुना राज्यातील शेतकऱ्यांसाठी लढा देणारे आता आम्हीच आहोत, असे प्रोजेक्शन डाव्यांना या मार्चच्या माध्यमातून करता आलं. त्यातून त्यांच्या राजकीय प्रभावक्षेत्रात त्यांचा खुंटा हलवून बळकट होईल. डाव्यांची ही लाईन असताना शेतकरी संघटना दिशाहीन झालेल्या आहेत. मधल्या काळात सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमधील अंसतोष संघटित करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने हल्लाबोल सारखे उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधली धग विखुरली गेली आणि या सगळ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर निर्णायक दबाव आणण्याची गाडी हुकलीच, हे मान्य करावे लागेल.

एकेकाळी 'शेतकरीविरोधी' म्हणून हिणवले गेलेले डावे आज शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करू पाहत असतील तर ते प्रस्थापित शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष यांचं अपयश आहे. शेतकऱ्यांना बटाट्याचे पोते म्हणणाऱ्या मार्क्सचे अनुयायी आज शरद जोशींच्या मार्गाने निघाले आहेत, याचा शेतकरी संघटनांनी आनंद मानावा (मानून घ्यावा) की आपल्या नाकर्तेपणामुळे डाव्यांना आपण ती स्पेस आंदण दिली याचा विषाद बाळगावा असा प्रश्न पडतो.

- रमेश जाधव

.....................

प्रिय ओवी,

आज 'लोगन' पाहिला. एका अनपेक्षित क्षणी लोगनला एका मुलीचे 'क्लॉउज' बघायला मिळतात. आपल्यासारखीच हातातून निघणारी धारधार पाती. हीच आपली मुलगी असल्याचेही नंतर समजते आणि आपल्या प्रमाणेच तिच्या आयुष्याचा प्रवास देखील वेगळा नसणार या भीतीने त्याची काळजी वाढते.

बाप आपले म्हणणे ऐकत नाही म्हणून त्याच्या चेहऱ्यावर मुक्का मारणारी, गुरगुरणारी 'लौरा' पाहिली अन शून्य सेकंदात तुझी आठवण आली. 'एक्स-मॅन'मधले म्यूटंट हे नेहमीच्या सुपरहिरोजपेक्षा वेगळे असतात. लोगन त्याला अपवाद नाही. त्याला मिळालेली देणगी त्याच्यासाठी शाप च जास्त ठरली. त्याच्या हाताची पाती मला नेहमी ओळखीची वाटत आलीये. काहींची उघड दिसतात, तर काहींना दाखवता येत नाही इतकच. त्यामुळेच मानवी मर्यादा अन गुणावगुणांनी वेढलेला 'वुलवरीन' मला बाकी सुपरहिरोज पेक्षा जवळचा वाटत आला आहे. 'मिस्टर इंडिया'तल्या आम आदमी अरुण वर्मा पेक्षा जवळचा!

तुझं वय वाढत आहे तशी दिवसागणिक तू जास्त हट्टी होत चाललीये. खरं सांगायचं तर रानटी. तुझी आई म्हणते तशी आपण तुला वळण लावायला कमी पडतोय का? मला नाही वाटत. वळण तर तूच आम्हाला लावतेय. आम्ही तुला घडवतोय हा फुसका अभिमान वेळोवेळी मोडण्याचं वळण. तरी काही बेसिक इंस्टिंक्ट असतात अशा ज्या आम्ही न देताही वारसाने तुझ्याकडे चालत आलाय. त्याचं कौतुक नाही असं कसं म्हणणार? मी जसे दात खातो तसेच तूदेखील इतरांवर गुरगुरते. कुणी बोर केलं की समोरच्या डोक्याला जोरात डोकं आदळते. म तो समोरचा मी का असेना. घरचे म्हणतात वयानुसार होईल तुझा हट्टीपणा कमी. होईल कमी? मला नाही वाटत. साध्या साध्या सहजभावना पूर्वी पासून दाबून ठेवायची सवय असल्याने खरा मी कोण हे घरच्यांना कधीच समजायचं नाही. सगळ्यांसाठी वेगवेगळे मुखवटे तयार. मुलगा मेल्यानंतर 'हजार चौरासी कि माँ' मध्ये ब्राती चॅटर्जीची आई आपला मुलगा खरा कसा होता याचा शोध घेते. 'मेमरीज इन मार्च' मध्ये पण मुलगा गेल्यानंतर त्याची खरी पहचान कळाल्यावर आई उध्वस्त होते. तसं मी गेल्यानंतर तरी सगळे पुस्तकं चाळून काही सापडतंय का माझ्याविषयी अशी खटाटोप करेल का कुणी? साले सिनेमे कुठल्या मार्गानी येऊन आयुष्याला वेढून बसतील याचा काही नेम नाही. तुझ्यासाठी मागे काय काय क्लुज ठेऊन जावे याचा विचार करायचो मी पूर्वी. पण तूच मला माझं रूप स्वतःत दाखवून असे काही धक्के देते कि ते क्लुज मागे ठेवायची गरजच पडणार नाही. अगदी तसाच धक्का जसा 'लोगन' ला बसतो - सपासप पाती चालवणाऱ्या सळसळत्या 'लौरा' ला पाहिल्यावर.

मी दिसायला मातृमुखी आहे असे सगळे म्हणतात, म्हणजे चेहरा आईवर गेलाए असे. मात्र कुणी जेव्हा म्हणतं कि तुझा स्वभाव तुझ्या पप्पांसारखा आहे, तेव्हा मला मनापासून बरं वाटतं. सगळ्यांनी मला तसच ओळखावं असं हि वाटतं. मी खुर्चीवर बसलो असता मागून कुणी पप्पा बसले असतील असं समजून मला हाक मारतात तेव्हाचा आनंद खरं तर सांगता न येण्यासारखा आहे. एखाद्यावर जास्त विश्वास टाकून फसवणूक करून घेतो तेव्हा, 'तुझ्या बापावरच गेला आहे' असं जेव्हा कुणी म्हणतं तेव्हा फसवणूक झाल्याचा पस्तावा येतच नाही! वडिलांच्या वारसाने जसे काही गुण मिळाले तसे काही अवगुण सुद्धा. आणि इथेच खरी गोम आहे. मला लाभलेले 'क्लॉउज' जशी तुला लाभलीए तशीच त्या धारधार पात्यांमुळे मिळालेली न दिसणारी जखम सुद्धा. तुझा संघर्ष माझ्याहून वेगळा असू शकतो, किंबहुना तो असावाच. पण त्यात येणारे थांबे वेगळे नसतील. तुही घेशील चुकीचे निर्णय, त्यांचा परिणाम माहित असून सुद्धा. एखाद्या तात्पुरत्या हुक्कीसाठी लावशील आयुष्य पणाला. झालीच उध्वस्त तरी नसेल ग़मपस्तावा.

त्यादिवशी 'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स शांतपणे पाहिला. तुझ्या डोळ्यात तेव्हा आलेलं पाणी पिक्चर मुळेच होतं हे मला पक्के माहितीये. तू वयाला न शोभेल अशा हट्टीपणे वागते तेव्हा घरच्यांना आश्चर्य वाटते, तू अशी का वागते ते. मला मात्र जाम टेन्शन येतं. मी जे लपवायला पाहतो तेच तू माझ्यासमोर उघडं करून ठेवते. त्या वेळी मी जेव्हा नजर चोरायला बघतो तेव्हा ज्या बेधडकपणे माझ्याकडे पाहते ते मला सहन होत नाही. कौतुक वाटतं पण नाही सहन होत. कसला हरामी बाप ए मी! तुझे 'क्लाउज' जप. बडी ताकत - बडी जिम्मेदारी वैगरे काही नाही, सालं हे सांभाळायला गांड लागते. असो. अजून थोडीशी मोठी हो. एडल्ट व्हायच्या आता आपण 'लोगन' सोबत पाहू.

तुझा
जितु

- जितेंद्र घाटगे

.....................

सध्या मुंबईत यशस्वीपणे धडकलेल्या लाँग मार्चचा खरा कर्ताकरविता आदिवासी आमदार जीवा पांडू गावित आहे आणि त्याचे न्युजचॅनेलवर सध्या दुसरेच चमको, फमको आणि ठमको स्रेय लाटत आहेत!

यालाच म्हणतात, 'मुर्गा करे मेहनत और अंडा खाये फकीर!' 
जीवा पांडू गावीत यांच्या मेहनतीवर मोठे होऊ पाहणाऱ्या या साऱ्यांच चमको, फमको आणि ठमकोंचा एक संवेदनशील लेखक म्हणून मी जाहीर निषेध नोंदवितो!!

- सुभाष सोनकांबळे

.....................

आमचे येथे खास लाकडी घाण्यावरचे तेल..

बुक्कीने फोडलेला कांदा..

पाटा वरवंट्यावर वाटलेली चटणी..

खलबत्त्यात कुटलेले शेंगदाणे..

उखळात सडलेले तांदूळ..

जात्यावर दळलेली पिठे..

चिनी मातीच्या बरणीत मुरवलेले कैरी लोणचे (आंबा नव्हे)..

लाकडी पोळपाटावर लाटलेले पापड...

पेशवेकालीन तलवारीच्या पात्यापासून बनवलेल्या विळीवर

खोवलेले ओले खोबरे...

आमच्या खास खिलारी जोडीच्या बैलगाडीतून घरपोच

मिळतील...

टीप : बुक्कीने फोडणे, वाटणे, कुटणे, सडणे, दळणे, लाटणे, खोवणे या क्रिया तसेच घाणा, जाते, पाटा-वरवंटा, खलबत्ता, पोळपाट, उखळ, विळी, बरणी या वस्तू पाहून खात्री करण्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतील..

- अनंत अच्युत

.....................

गुलाबजाम पाहिला. खूप छान वेगळीशी गोष्ट आहे. ग्लोबल होऊ पाहणारे मराठी पदार्थ पडद्यावर पाहायला फार मजा आली. साहजिकच सिनेमाभर Jayanti Kathale यांची आठवण येतच राहिली.

कॅफे गुलाबजाम, डायल अ शेफ, पदार्थांशी गप्पा मारणं अशा मस्त चमकदार कल्पना आवडल्या. काही क्लोजप्स, अँगल्सदेखील एकदम शॉल्लेट...
सिद्धार्थ चांदेकर अतोनात आवडलेलाय! लंडनमधल्या फ्लॅशबॅकमधल्या आणि वर्तमानातल्या दृश्यांमध्ये, राधाला चिडवताना आणि तिच्यासाठी रडताना.... लयच बोलका चेहरा आहे याचा... एकुणात त्याला जितके संवाद दिलेत तितकेच बिनसंवादी प्रसंगही दिलेत. आणि त्याने ते क्लास उचललेत. Total surprise!

कथेतलं अपिल - 
आदित्य आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं नातं...  👌 👌 👌 👌
विशेषतः शेवटच्या संवादाला शंभर मार्क. दोघातल्या एकाचं मॅच्युअर होत जाणं, दुसऱ्याचं मिडिऑकरच राहणं.. त्याचा नात्यावर होणारा परिणाम, छंद आणि ध्यास यातला फरक.. या एवढ्या एकाच प्रसंगात त्या मुलीचं, त्यांच्या नात्याचं अख्खं कॅरेक्टर उभं झालं.

राधाची तर गोष्टच अफलातून. झोपणं या बाबीशी असलेलं तिचं नातं, तिच्या तिने शोधलेल्या पळवाटा, तिचं विरोधाभासी आयुष्य... ताईने जिथे ओढत आणून टाकलं त्या घरात स्वतःचं विश्व उभं करणारी, आयुष्याने सगळंच नाकारलेलं असूनही केविलवाणी न होणारी राधा खूप खूप आवडली.

काय खटकलं - 
कंटिन्युइटीच्या, लॉजिकच्या चुका! भातामधले खडे..! तेवढे नीट वेचायला हवे होते. 
नको तसा लांबलेला शेवट.. क्लायमॅक्स आवरता घ्यायला हवा होता. गोष्ट राधाचीय, आदित्यचीय, की हरवल्यासापडलेल्या स्वप्नांचीय.. ते ठरलं नसल्याचा फील आला शेवटी.

जेवण या विषयावर या आधी चिनी कम आवडला होता. त्यात आता या मराठी सिनेमाची नक्कीच भर पडली.. पंगत एकुण मस्त जमलीय!

- योगिनी नेने

.....................

पुरोगामी म्हणजे पुढे जाणारे. बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका स्वीकारत मागोमाग घेतलेल्या बुद्धीहीन भूमिकांचा त्याग करून पुढे जाणं. पुरोगामीपणा म्हणजे progression.

राज्यघटनेच्या परिप्रेक्षात आपण पुरोगामी असणं अनेक अंगांनी अभिप्रेत आहे. धार्मिक, जातीय अंगानं तर ते आहेच, असायलाच पाहिजे पण ते आर्थिक अंगानं सुद्धा आहे का?

म्हणजे उदाहरणार्थ जमीनदारांची सामान्य प्रजेवरील दहशत शिवाजी महाराजांनी मोडीत काढली. सामान्य शेतकर्याला संरक्षण देणं हा शिवाजी महाराजांचा पुरोगामीपणा होता. हे आर्थिक पुरोगामीपण.

राज्यघटना आर्थिक न्यायाचं बोलते. आदिवासींसारख्या दुर्बल घटकांना विशेष संरक्षण म्हणून आपण घटनेबरहुकूम आदिवासी जमीनींच्या विक्रीवर विशेष देखरेख ठेवली आहे. राज्यघटनेनं दिलेलं हे संरक्षण धुडकावून त्या जमिनी गिळंकृत करणारे सर्वपक्षीय तमाम राजकारणी हे पुरोगामी आहेत असं म्हणायचं का? म्हणजे समजा ते धार्मिक कट्टरता मानणार्या पक्षाचे नेते असतील तर ते धार्मिक आणि आर्थिक या दोन्ही बाबतीत प्रतिगामी ठरतील. आणि समजा ते पुरोगामी, धर्मनिरपेक्षता मानणार्या पक्षाचे असतील तर धार्मिकदृष्ट्या पुरोगामी पण आर्थिकदृष्ट्या प्रतिगामी ठरतील का?

लोकशाही हा पुरोगामीपणा आहे. सरंजामशाही हा प्रतिगामीपणा आहे. तर मग सरंजामशाही अंगात असलेले सगळ्याच पक्षांचे नेते पुरोगामी ठरतात की प्रतिगामी?

थोडक्यात, धार्मिक आणि जातीय निरपेक्षता हे दोनच निकष कोण पुरोगामी हे ठरवतात का घटनेत जे progression सांगितलं आहे, विशेषतः आर्थिक न्यायाच्या बाबतीत, तो ही निकष पुरोगामीपणाचा आवश्यक निकष आहे?

- विश्वंभर चौधरी

.....................

पाण्याची बाटली 20 रु आणि शेतकऱ्यांच्या दुधाची खरेदी सुद्धा 22 ते 24 रु असते. हा कुठला न्याय आहे दुधाचा उत्पादन खर्च पाण्या एवढा आहे का?
मोर्चाला लाल बावटे वैगेरे हिणवून बुद्धी भेद करणाऱ्यांनो तुम्ही कधी ह्यावर मत मांडलंय का?

भारतात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कशात होत असेल तर तो अन्न धान्य खरेदीत. 130 करोडचा लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाची अन्न धान्य खरेदीची बाजारपेठ अब्जो वधीची आहे आणि त्यात दलाल प्रशासन संगनमताने घोटाळे करून करोडोची मलाई खातात.
शेतात माल पिकल्यावर कुत्रीमरित्या भाव पाडले जातात आणि नन्तर भाव वाढवून परत सामान्य लोकांना लुटलं जात.
थेट खरेदी विक्री हा ह्यावर उपाय असला तरी त्याला खूप मर्यादा आहेत. जो पर्यंत आयात निर्यातीचे धोरण बदलत नाही तो पर्यंत शेतीची परिस्थिती सुधारणार नाही.

मला वाटत मोर्चाची लाल उजवी डावी अशी राजकीय मांडणी न करता कुठ तरी आपण खऱ्या कृषी समस्येवर राजकारणाच्या पलीकडं जाऊन फक्त एक माणूस म्हणून काम करायला सुरू केलं पाहिजे.

#kisanlonarch
#आक्रोश_बळीराजाचा

- निरंजन माने

.....................

डोंबिवली बकाल आहे. याला नागरिकच जवाबदार आहेत. नितीन गडकरी अगदी खरं म्हणाले.

जाणून घ्या या बकाल डोंबिवलीबद्दलच्या आणखी काही बकाल गोष्टी.......

स्टेशनला उतरल्यावर बाहेर पडतांना सरळ पाच मीटर चालणे निव्वळ अशक्य आहे. रिक्षावाले - फेरीवाले आपले स्वागत करतात.

पाच लाख लोकसंख्या आणि सुमारे 10 हजार ( ?? ) वाहनांची संख्या असलेल्या या शहरांत एकही सुरू असलेला वाहतूक सिग्नल नाही.

या सुसंस्कृत शहरातील वाहन चालक एवढे बेशिस्त आहेत की वाहतूक कोंडी नेहमीची आहे.

मूलभूत सुविधा -गरज म्हणून

प्रत्येक वॉर्डात किमान एक ( ??) मोठे गार्डन / पार्क आवश्यक आहे जे अजिबात नाहीये.

देशांत बदल होत असतांना चांगली सांडपाणी व्यवस्था, भूमिगत वीज वाहिन्या, दुतर्फा झाडे, चांगले फुटपाथ, क्लस्टर development वगैरे अशा गोष्टींची इथे औषधाला चर्चासुद्धा होत नाही.

सांस्कृतिक नगरी असलेल्या हा बकाल शहरांत कार्यक्रमांची रेलचेल असते, मात्र नागरी मूलभूत सुविधा - मूलभूत हक्क यांवर चर्चेचा दुष्काळ असतो.

सुसंस्कृत शहरांत नागरीकांचा दबाव गट ज्याची दखल घेल्याशिवाय प्रशासन - लोकप्रिनिधी यांना पूढे जाता येणार नाही असा अजून अस्तित्वात नाही.

सर्वाधिक वर्दळीचे (तिकीट-पास विक्रीचे) रेल्वे स्टेशनम्हणून डोंबिवलीची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे. मात्र तुलनेत लोकल सेवा कितीतरी कमी आहेत. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

पालिकेच्या दोन निवडणुका झाल्या तरी रेल्वे मार्गावर एका साध्या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होत नाही.

डोंबिवलीकरांचे आयुष्य हे पूर्णपणे लोकल ट्रेनवर अवलंबून आहे. मुंबई /ठाणे ला जोडणा-या रस्ते / पर्यायी मार्गांची नुसती चर्चा सुरू आहे.

शेवटचं......त्याच त्याच राजकीय पक्षांना सत्ता देणाऱ्या किंवा राजकीय पर्याय उभा करण्यात अपयशी ठरलेल्या डोंबिवलीच्या नागरिकांना जवाबदार धरणं काही चुकीचे नाही.

- अमित जोशी

.....................

पाशा पटेल हा चळवळीतला माणूस. मात्र चळवळीतला एकही संस्कार यावर राहिलेला नाही. एका चर्चेत भाजपाचे नसलेले गुणगान गाताना अरे, आज तुझ्याच सारखे अनेक चळवळे गेल्या पाच दिवसापासून नाशिकहून उन्हातान्हात पायी पायांना फोड आणत आपल्या बायाबापड्यांसह आपले गाऱ्हाणे घेऊन येताहेत, तेव्हा ते सरकारही जाऊ द्या, भाजपाही जाऊ द्या, एक माणूस म्हणून त्यांची साधी विचारपूसही करायला तुम्हाला काही वाटत नाही? तेव्हा तुम्ही चळवळे म्हणून तुम्हाला आमच्या सारख्यांनी जसे वागवले व तुम्हाला आज चूकीच्या का होईना ठिकाणावर पोहचवले याची किमान जाण ठेवली असती!! त्या शरद जोशींनी आपले व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची आहुती या चळवळीत घातली त्यांना स्वर्गातून आपण किती चूका केल्या हे पाहून निश्चितच खेद होत असेल. याहीपेक्षा कठोर शब्दात निर्भत्सना होऊ शकेल परंतु आमच्यावर तसे संस्कार झाले नसल्याने एवढ्याने काही झाले तर बरे.

- गिरधर पाटील

.....................

या नावाचं गारुड एवढं की 'पद्मश्री'नं या नावाच्या वलयाला वाढवलं नाही. 'पद्मश्री'चं वाढलं असेल कदाचित. 
आता राज्यसभा सदस्य, खासदार या पदांना प्रतिष्ठा मिळेलही. 
पण, काळच असा आहे की, 
पदाच्या प्रतिष्ठेपेक्षाही, आज मुद्दा लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे.
सो सर, मुद्दा जगण्या- मरण्याचा आहे. 
अशावेळी, तुम्ही तिथं असणं हीच खास आशा आहे या 'नीरव' शांततेतली. 
तुम्ही ती अभिव्यक्ती आहात, बदलाची! 
***
मी आयुष्यात एकाच माणसाला 'साहेब' म्हणत आलो. 
"केतकर साहेब...!"

बॉस, 
रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत पहाटेची.
***
तुम्ही कदाचित तुमची लाडकी किशोरी (आमोणकर) ऐकत प्रसन्न हसत ही कमेंट वाचाल आणि म्हणाल, पहाट जवळ आलीय!

- संजय आवटे

.....................

कवी, लेखक पूर्ण आयुष्यात दोन प्रश्न कमावतो
"काही जेवलास का?" आणि "काही लिहिलंस का?"

पहिला प्रश्न जास्त वेळा कमावलेला लेखक जास्त यशस्वी असतो!

- #तनवीर सिद्दिकी

.....................

लाल तुझ्या रक्ताने माखुन 
महानगर हे गेले
टॉवर आणि मॉल इथे रे 
कायम गजबजलेले ||
कामगारही मेले आणि 
शेतकरीही मेले 
तुमच्या मुडद्यांवरचे लोणी 
सगळे खाऊन गेले ||
पुतनेचा पुळका आलेला 
आधीच्याना आता 
आताचेही खुर्च्यांवरचे 
हबकुन रे गेलेले ....||

- महेश केळुसकर

.....................

मुंबईतून कम्युनिस्टांना आणि गिरणी कामगारांना भावनेच्या भरात वहावत नेणाऱ्या आणि स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या पक्षासाठी तेव्हा कायमचं संपवलं नसतंत (आपले मॉल नि टॉवर उभे करण्यासाठी) त्यांना देशोधडीला लावलं नसतंत तर आज शेतकऱ्यांना खंदी साथ द्यायला मुंबईचा मराठी कामगार भिंत बनून उभा राहिलेला दिसला असता रे!
#बळीराजाअक्रोश

- राजू परुळेकर

.....................प्रतिक्रिया द्या1807 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर