सोट्याने मोजणी.. वेड्यांतला शहाणा.. अस्वस्थ रिंझाई
सोमवार , १२ मार्च, २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, फर्मास विनोद आणि मार्मिक विचार हा सकाळच्या दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

दहा मित्र जंगलात फिरायला गेले. वाट चुकले आणि भरकटले. जंगलातच राहायला लागतं की काय म्हणून घाबरले. दिवस कलण्याच्या आत जंगलाबाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. खूप भटकल्यानंतर त्यांना डोंगराच्या पलीकडच्या बाजूने धुराची अस्पष्ट रेषा आकाशात जाताना दिसली. इथे वस्ती असणार, हे लक्षात घेऊन त्यांनी ती दिशा पकडली. ती बरोबर निघाली. संध्याकाळी सूर्य क्षितिजरेषेवर टेकण्याच्या बेताला असताना ते एका गावाजवळ पोहोचले. पण एक पंचाईत होती. वाटेत एक नदी होती. तिच्यात खांद्यांइतकं पाणी होतं. पूल-होडी काही नव्हतं. गावकऱ्यांना हाका मारण्याचा प्रयत्न वाया गेला होता. अखेर त्यांनी हातात हात धरून प्रवाह पार करण्याचा निर्णय केला.

'अरे, पण, आपल्यापैकी एखादा माणूस वाहून गेला तर? पलीकडच्या तीरावर गेल्यावर कसं कळणार आपल्याला?' एकाने शंका काढली.

'सोपं आहे. तिकडे गेल्यावर आपण संख्या मोजूयात आपली.'

सगळे एक ओळ करून नदीत उतरले, पलीकडच्या तीरावर पोहोचले. एकाने सगळ्यांना मोजण्याची जबाबदारी घेतली. त्याने स्वत:ला सोडून दुसऱ्यापासून मोजायला सुरुवात केली, त्यामुळे आकडा नऊ 
आला. सगळे घाबरले.

दुसरा म्हणाला, 'तुझं गणित पहिल्यापासून कच्चं आहे. मी मोजतो नीट.'

त्यानेही तसंच मोजलं, तेच उत्तर आलं. हळुहळू सगळ्यांनीच मोजकाम करून झालं. संख्या नऊच येत असल्यामुळे सगळे चिंताक्रांत झाले.

हा प्रकार दुरून पाहात असलेला मुल्ला नसरुद्दीन तिथे आला आणि म्हणाला, 'बंधुंनो, काही मदत हवीये का तुम्हाला?'

सगळ्यांनी झाला प्रकार सांगितला. आपला एक मित्र वाहून गेला असावा, अशी शंका व्यक्त केली. मुल्ला म्हणाला, 'चिंता करू नका, गाव आमचं आहे, नदी आमची आहे. तुमचा मित्र तो माझा मित्र. मी त्याला हजर करतो. पण, मला काय द्याल?'

सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढून हजार रुपये मुल्लाला द्यायचं ठरलं.

मुल्ला म्हणाला, 'हरवलेली माणसं शोधण्याची विशिष्ट पद्धत असते. मी प्रत्येकाच्या डोक्यात हा सोटा हाणणार, त्याने आकडा उच्चारायचा. एकाने एक म्हटलं की दुसऱ्याने दोन म्हणायचं, नंतरच्याने तीन… असं.'

ठणाठण् सगळ्यांच्या टाळक्यात सोटे हाणत मुल्लाने दहाव्या मित्राकडून दहा वदवले, तेव्हा बाकीच्या मित्रांनी जल्लोषही केला आणि 'दहा'व्या मित्राला प्रेमभराने झोडपूनही काढला, 'गाढवा, कुठे गेला होतास, तुझ्यामुळे सगळ्यांना टोले खावे लागले,' असं म्हणत. तो बिचारा, 'मी कुठे गेलो होतो, इथेच होतो की मघापासून' वगैरे क्षीणपणे म्हणत होता. पण, आपण सगळे दहाही मित्र शाबूत आहोत, याचा त्यालाही आनंद झाला. सगळ्यांनी मुल्लाला हजार रुपये दिले आणि टेंगळांवरून कौतुकाने हात फिरवत सगळेगावाकडे निघाले.

............................................

एका शहाण्यासुर्त्या मानल्या जाणाऱ्या माणसाच्या डोक्यावर अचानक काहीतरी परिणाम झाला. तो वेड्यासारखं वागू लागला. त्या भरात काहीही करू लागला. एकदा त्याच्या हातून त्या भरात काही गुन्हा घडला. न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. मात्र, त्याची मानसिक अवस्था लक्षात घेऊन त्याला मनोरुग्णालयात कैदेत ठेवावं आणि त्याच्यावर उपचारही करावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले.

त्याचे दोन महिने मनोरुग्णालयात व्यवस्थित गेले. तोही मनोरुग्ण होता, आसपास सगळे मनोरुग्ण होते. त्यामुळे, एक समाजव्यवस्था, संस्कृती, परंपरा वगैरे तयार झाली होती. एकदा त्याने फिनाईलची अख्खी बाटली ढोसली आणि त्याचं पोट भयंकर प्रमाणावर खळखळू लागलं. आतड्या पिळवटून निघाल्या. तो अत्यवस्थ झाला. महिनाभराच्या त्या आजाराचा तडाखा असा जबरदस्त होता की त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम त्यातून आपोआपच दुरुस्त झाला आणि तो नॉर्मल बनला.

त्याचं दुष्टचक्र तिथे सुरू झालं.
तो आता शहाणा झाला होता.
आसपास मात्र सगळे वेडे होते.

तो डॉक्टरांना कळवळून सांगत होता की मी वेडा नाहीये.

डॉक्टर म्हणायचे, सगळे वेडे असंच म्हणतात.

तो रोज प्रार्थना करायचा, देवा, मला उरलेल्या तीन महिन्यांसाठी वेडा कर… प्लीज मला वेडा बनव… प्लीज…

................................

रिंझाई तरुण असताना आपल्या गुरूंपाशी गेला आणि म्हणाला, मला सांगा ज्ञान कसं मिळेल, मोक्ष कसा मिळेल, परमात्म्याचं दर्शन कसं घडेल, मनाची शांती कशी मिळेल?

गुरू म्हणाले, इथे बस. काहीही न करता बस. सगळं मिळालेलंच आहे.

रिंझाई विचारात पडला. काहीही न करता कसं बसायचं? काही नाही केलं तरी मन इकडेतिकडे धावणार, विचार करणार…शिवाय सगळं मिळालेलं आहे म्हणजे काय? हा गुरू धडका आहे की...

गुरू हसून म्हणाले, तू तर विचार करू लागलास… मग अवघड आहे…

.....................................प्रतिक्रिया द्या2768 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर