सुधारगृह
सोमवार , १२ मार्च, २०१८ सुगंधा चितळे-पांडे

काकांच्या कृपेमुळे काही काळ सुधारगृहाचेही तोंड बघावे लागले. अर्थात घर नावाच्या तुरुंगापेक्षा हे सुधारगृह खूपच चांगले होते. मात्र, काकांनी लग्नाचा घाट घातल्याने हे सुधारगृहही सुटले.

शाळेची प्रिलीम झाली आणि माझ्या लग्नाचा घाट यांनी घातला.बघायला आलेल्या मुलाला मी लगेचच तोंडावर सांगून टाकले की मला लग्नात आणि त्यातूनही तुझ्याशी लग्न करण्यात काहीही रस नाहीये. तो मी थांबायला तयार आहे वगैरे म्हणायला लागला मी त्याला अजून चार शब्द बोलून त्याचे तोंड कायमचे बंद केले. ते श्रीमंत कुटुंब होते पण मुलगा अत्यंत जाडजूड आणि विद्रुप होता. मुळात मोठ्या काकूचा तो नातेवाईक होता म्हणून तर मला त्याच्याशी अजिबात लग्न करायचे नव्हते. नाहीतर तिने मला त्यांच्याकरवी आयुष्यभर छळले असते. मी घरी सांगितले की ज्याने आधी मागणी घातली तो काय वाईट होता मग? त्याच्याशी मी लग्नाला तयार आहे. हे ऐकणारच नाहीयेत हे स्पष्ट दिसायला लागल्यावर अजून काय करणार? त्यांनी त्या आधीच्या स्थळाचा विचार पूर्णपणे सोडला होता. याच मुलाशी लग्न करायचे आणि तेदेखील आमच्या म्हणण्यानुसार, आम्ही ठरवलेल्या मुहूर्तावर असे त्यांनी सांगून टाकले आणि मी कामाला लागले.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात माझी दहावीची परीक्षा होती. यांनी बरोबर त्याआधी तीन दिवसाची तारीख लग्नाचा मुहूर्त म्हणून काढली होती. मी जीव द्यायची धमकी दिली त्यावरून काकांची मला मारहाण करून झाली. तरी मी बधले नाही. माझा नकार मी अत्यंत प्रखरपणे सांगत राहिले पण काकू आणि काका तयार नव्हते. माझी जबाबदारी त्यांना संपवायची होती आणि वडिलोपार्जित संपत्तीमधला माझा हिस्साही त्यांना शून्य करायचा होता. त्यादृष्टीने मी न शिकावे आणि लग्न होऊन परक्या घरी लवकरात लवकर निघून जावे असा त्यांचा प्रयत्न होता आणि माझी तडफड बघण्याचीही ही शेवटची संधी त्यांना सत्कारणी लावायची होती. मी मात्र हे होऊ द्यायचे नाही, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचे असे मी ठरवले. लग्नाच्या दोन दिवस आधी मी सकाळी शाळेत जायचे म्हणून दप्तर घेऊन निघाले ते दप्तरात कपड्यांची एक जोडी घेऊनच. निघताना काकूचे १००० रुपयेही घेतले. किती दिवस कुठे फिरायला लागेल हे अनिश्चित होते म्हणून मी पैसे घ्यायचा निर्णय घेतला आणि सायकल घेऊन सकाळी शाळेसाठी मी बाहेर पडले. शाळेत गेलेच नाही. घरातल्यांसाठी अनोळखी मैत्रिणीला खोटे सांगून की माझ्या घरातले ती  दिवसांसाठी बाहेरगावी गेले आहेत तिच्याकडे मी रहायला गेले. रात्री मी घरी परतलेच नाही. आजोबांकडे मी गेली असेन असे वाटून माझा ते तिथे शोध घेतील हे मला चांगलेच माहीत होते. त्यामुळे मी हा मार्ग पत्करला. रात्रीतून माझा शोध घेऊन त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. दुसऱ्या दिवशी उठून मी आजोबांकडे सायकलवर पोहचले तर त्यांनी लगेच काकांना कळवले. मी चोरी केल्याचे सविस्तर वृत्त त्यांना काकांनी सांगून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे माझ्याबद्दलचे मत वाईट झाले होते. असे का वगैरेही आजोबा विचारायच्या भानगडीत पाडले नाहीत इतके माझ्या बाबतीत ते तुटक झाले होते. मीही काही सांगितले नाही. काहीच वेळात काका पोलिसांना घेऊन आले. पोलिसांनी काल कुठे होतीस वगैरे चौकशी केली त्यांनी मला सांगितले की तुझ्याविरुद्ध तू हरवल्याची, १००० रुपये चोरल्याची आणि सोन्याच्या रिंग चोरल्याची तक्रार आहे. मी म्हटले पण रिंग मी घेतल्याच नाहीयेत पण त्यांनी ते ऐकले नाही. आमच्या काकांचे एक नातेवाईक पोलिसात खूप वरच्या पोस्टवर होते. त्यामुळे पोलीस हे काकांचे खूप ऐकत असत. काकांना पोलीस खूप आदराने वागवत असत. तसेच ते आत्ताही वागवत होते. मी मात्र गुन्हेगार होते. त्यामुळे मला काहीच किंमत नव्हती.माझे कोणी ऐकूनही घ्यायला तयार नव्हते. सोन्याच्या रिंगची खोटी केस माझ्यावरून काढून घ्यावी हे मी त्यांना परोपरीने सांगितले. माझ्या मनाविरुद्धे हे माझे लग्न लावायला बघत होते हेदेखील मी पोलिसांना सांगितले पण पोलिसांनी काकांनी दिलेली तक्रारच गृहीत धरली. मला चोर ठरवून न्यायालयात दाखल केले गेले. त्यानंतर त्यांनी माझा ताबा सुधारगृहाला दयावा असे सांगितले. आजोबांनीही माझ्या दुसऱ्या मुलीचे लग्न अजून व्हायचे आहे म्हणून मी जबाबदारी घेणार नाही असे सांगून टाकले होते. त्यामुळे आमची रवानगी जिथे व्हायची तिथे झाली. अनाथाश्रमानंतर आता सुधारगृहदेखील मला पहायला मिळाले. काकू कायम म्हणायचीच की एकदा तुला रिमांड होमला ठेवली पाहिजे म्हणजे सरळ होशील. आज तिची इच्छा तिने पूर्ण करून घेतली. पोलिसांनी खूप समजावून सांगूनही, काही करून माझा ताबा घ्यायला काकांनी नकार दिला. त्यांना तो विषय एकदाचा संपवायचा होता. म्हणजे ते मोकळे झाले असते. “हिने आमचे नाक कापले आहे. हिला तिथेच सडू दे असे ते सारखे म्हणत होते. मी त्यांच्याबद्दल मनात कधीही काहीही वाईट ठेवले नव्हते तरीही त्यांना माझ्यावर गुन्हेगार म्हणून ठपका ठेवायचा होता. कारण एकच की मी त्यांचे ऐकत नव्हते. त्यांच्या घाणेरड्या राजकारणाला मी सातत्याने विरोध करत होते. त्यांच्या सडक्या विचारातून जन्मलेल्या प्रत्येक गोष्टीचा मी प्रतिवाद केला. त्यांनी मला चोर बनायला भाग पाडले. त्यांनी माझा पदोपदी नाईलाज केला. आजही मी सुधारगृहात म्हणजे एक प्रकारे तुरुंगात जाणार होते ते त्यांच्या वर्चस्ववादी वृत्तीमुळेच. त्यांना याची जाणीवही नव्हती की एका अनाथ मुलीला अनाथाश्रामातून आणून, वाट्टेल तशी गुलामासारखी राबवून घेऊन, तिच्यावर अनन्वित अत्याचार करून नंतर आता तिला गुन्हेगार ठरवून रस्त्यावर आणून सोडले आहे. त्यांच्यात याबाबत काडीचीही अपराधीपणा नव्हता. होता तो फक्त उन्माद.

त्या दिवशी रात्री मला एका लेडी कॉन्स्टेबलच्या घरात ठेवले गेले. त्या बाईला रात्रीच्या ड्यूटीला जायचे होते. तिने मला तिच्या घरात ठेवले आणि निवांतपणे ती कामावर निघून गेली. माझ्या जेवायचीही सोय तिने केली होती. तिचा माझ्यावरचा विश्वास पाहून मी गहिवरले. ती मला माणूस म्हणून वागवू शकते मग माझ्या घरचे का नाही? पोलीस सगळेच वाईट नसतात. लेडीज तर नाहीच नाही असे मला वाटले.

दुसऱ्या दिवशी ती मला सुधारगृहात सोडायला आली. माझा ताबा सुधारगृहाच्या मुख्य बाईंकडे देऊन ती निघून गेली. तिथे अनेक बायका होत्या. बहुतेक सगळ्या परिस्थितीने गुन्ह्यात अडकलेल्या-माझ्यासारख्या. अनैतिक संबंधाचा ठपका ठेवलेल्या सर्वात जास्त होत्या. सलमा नावाची एक मुसलमान मुलगी होती. ती घरकाम करायची. तिथे तिच्या मालकाने तिच्यावर जबरदस्ती केली म्हणून तिने त्याच्या डोक्यात फुलदाणी घातली होती. तिथून पळून ती दुसऱ्या गावाला पोहचते ना पोहचते तोच बस स्टॅण्डवरून तिला पोलिसांनी अटक केली. तिने चोरी केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. एक अत्यंत सुंदर मुलगी तिथे होती. तिला पोलियो होता म्हणून लहानपणीच तिच्या आईवडिलांनी तिला सोडून दिले होते. अनाथाश्रमातून ती इथे आली होती. दोन जीवलग मैत्रिणी होत्या, ज्यांनी नंतर माझी जीवापाड काळजी घेतली. सुवर्णा नावाच्या एकीचे एका मुलावर अत्यंत प्रेम होते पण त्या मुलाशी तिचे लग्न होऊ शकले नाही. त्याच्या मावस भावाशी तिचे लग्न झाले. तो या दोघांच्या पूर्वआयुष्यावरून तिच्यावर प्रचंड संशय घेऊन होता. तिने परोपरीने त्यांना समजावून सांगितले की आता तसे काही नाहीये पण त्याचा कधीच विश्वास बसला नाही. तिची पहिली डिलिव्हरी झाली आणि पाचच दिवसात तिला त्यांनी घरातून कायमचे बाहेर काढले. तिच्या प्रियकराला तिच्यासमोर प्रचंड मारहाण केली. तो मरता मरता वाचला. तिची रवानगी इथे झाली. नावाप्रमाणेच सुवर्णा अत्यंत सुंदर होती ती. एका मुलीला पहिली मुलगी झाली म्हणून तिचा छळ चालू होता. दुसऱ्यांदा ती प्रेग्नंट राहिली. तिला सोनोग्राफीला नेऊन तिच्या घरच्यांनी चेक केले. पोटात दुसरीदेखील मुलगीच होती. तिला जबरदस्त मारहाण केली. इतकी की तिचे पोटातले मूल दगावले आणि कोणताही आधार नसल्याने ती इथे आली. दोन मतीमंद मुलीही इथे होत्या. त्यांना काहीच समजत नसे. त्यांची काळजी बाकीच्या मुली अत्यंत मनापसून घेत. तिथे एक  मुलगी होती ती तिच्या मुलाबरोबरच तिथे राहत होती. ती गतीमंद होती. त्यामुले मूल झाल्यावरही नवऱ्याने तिला सोडून दिले होते आणि दुसरे लग्न केले होते. अनैतिक संबधातून प्रेग्नंट झालेल्या दोन मुली तिथे होत्या. त्यांना मुलेही इथेच झाली आणि सहा महिन्यांची झाल्यावर त्या बाळांना अनाथाश्रमात पाठवण्यात आले आणि या इथेच राहिल्या. अशा एक ना अनेक मुली.

इथले वातावरण अत्यंत चांगले होते. आमच्या घरापेक्षा तर कैकपटीने चांगले. सगळ्या गोष्टींना शिस्त होती. मी इथे खूप शिस्त शिकले. प्रत्येकाचे काम वाटून दिलेले होते. ते ज्याचे त्याने करायचे त्यापेक्षा जास्त काम कोणालाही दिले जात नसे. त्यामुळे वादही होत नसत. प्रत्येक कामाचे वारही ठरलेले होते. कधीतरी मात्र असे होई की सगळी कामे एका दिवशी येत असत. तेव्हा मुली एकमेकींना मदत करत आणि कामे मार्गी लावत. मला अशी खूप मदत इतरांनी केली. ३० मुलींसाठी कणिक भिजवणे, पाणी भरणे, फरशी, वाटण, पोळ्या भाजणे, भांडी घासणे अशी मोजकीच पण प्रचंड आकाराची ही कामे होती. इथे मी पापड लाटायला आणि वाटण बनवायला शिकले. ती कला मला आयुष्यभर उपयोगी पडली. इथे एक मात्र होते.संडास कुणालाच घासावा लागत नसे. त्याला माणसे होती. दुपारी लिज्जत पापडवाल्यांची गाडी यायची प्रत्येकजण पापड लाटायला बसायचे. त्यावेळी खेळीमेळीने गप्पा चालत. थोडीफार थट्टा मस्करीही चाले. हे वातावरण अत्यंत चांगले होते. त्याचे कारण इथल्या मुख्य बाई. त्या अत्यंत चांगल्या होत्या. अतिशय माणुसकीने सगळ्याचा विचार करणाऱ्या, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या. एकदा पोळ्या लाटण्याचा मला खूप कंटाळा आला. त्या स्वतः माझ्या जागी बसल्या आणि त्यांनी पोळ्या लाटायला घेतल्या. मला अक्षरशः ओशाळे वाटले. इथे आल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी एकटी बाजूला जाऊन रडत होते. त्यांनी प्रेमाने मला जवळे घेतले, मी त्यांना म्हटले माझी काहीही चूक नसताना त्यांनी मला या अवस्थेत आणून टाकले. त्यांनी मला समजवून सांगितले की इथे आजूबाजूला पहा किती अवघड आयुष्य जगलेल्या मुली आहेत ह्या सगळ्या. त्यांच्या मानाने आपले दुःख काहीच नाही. असे त्या मला तब्बल दोन तस समजावत होत्या. इतकी ही चांगली बाई. जितके दिवस मी तिथे होते तितके दिवस त्यांनी मला त्यांच्या मुलीसारखे सांभाळले.

इथे महिन्याच्या एक तारखेला ५०१ साबणाची वडी मिळे आणि दंतमंजनही मिळे. मुख्य म्हणजे पाळीमध्ये प्रत्येकीला पॅड मिळे. पहिल्यांदा ते मिळाले तेव्हा मला काकांकडच्या त्या घाणेरड्या फडक्यांची आठवण झाली आणि किळस आली. पॅडसारखा सुटसुटीत प्रकार जगात अस्तित्वात आहे हे मला त्या दिवशी कळले आणि माझा आनंद गगनात मावेना. वापरलेले ते पॅड मात्र बाईंना दाखवावे लागे. कामे टाळण्यासाठी काही मुली खोटे सांगायच्या असे नंतर त्यांचे कारण कळले. ईद आणि गणपतीला गावातून प्रसाद आणि शिरखुर्मा लोक आणून दयायचे. ते सगळे आम्ही मिळून खात असू. इथे अगदी घरातल्यासारखे वाटायचे. त्यामुळे कोणीही घरच्या आठवणीने जास्त रडायचे नाही.

मी एकदा मोठ्या बाईंना विचारले होते की खरेतर इथे तसे म्हटले तर गुन्हेगार कोणीच नाही. मग याला सुधारगृह का म्हणतात? त्या निरुत्तर झाल्या. मनापासून हसल्या आणि आपल्या कामाला लागल्या. त्या मला अत्यंत आवडल्या होत्या. त्यांच्या मुलींना त्या कधीकधी घेऊन यायच्या आणि दाखवायच्या की जबाबदारी घेणारे कुणी नसले की माणसाची कशी अवस्था होते बघा. त्यांच्या मुलींशी त्या आम्हाला खेळूही द्यायच्या.

आमच्या सुधारगृहात टीव्ही होता आणि तो आम्ही मनसोक्त पाहू शकायचो. नेमके छायागीत सुरु झाले की कामे सांगायला इथे आमची काकू नव्हती. सीरीयल, चित्रहार, छायागीत, सिनेमा असे सगळे कार्यक्रम आम्ही इथे पाहायचो. रविवारी पापडाचे पीठ यायचे नाही. तेव्हा बाहेर गवतावर सतरंजी पसरून बाई सगळ्यांना घेऊन गप्पा मारत बसत. पुढे कोण कोण काय काय करणार, याची चर्चा त्या करत. भूतकाळ विसरून जा. नव्याने जागा. जगात चांगली माणसेही आहेत असे सगळे चांगले विचार त्या सांगायच्या. त्याने खूप धीर येई.

नाही म्हणायला एक विचित्र मुलगी तिथे आली होती. अतिशय तंग कपडे घालणारी आणि सतत भिरभिरणारी नजर असलेली ती मुलगी अनेक सुधारगृहातून, तुरुंगातून सतत ट्रान्स्फर होत इथे येऊन पोहोचली होती. पहिल्या काहीच दिवसात तिचे ५-६ मुलींशी भांडण झाले होते. आमच्या सुधारगृहाच्या आजूबाजूला जी वस्ती होती तिथून कधीही आम्हाला त्रास नव्हता. ही मुलगी आल्यावर विचित्र नजरेची माणसे आमच्या सुधारगृहाभोवती घिरट्या घालायला लागली. एक दिवस त्या मुलीने सुवर्णा या अत्यंत चांगल्या स्वभावाच्या मुलीला घाणेरडे बोलून रडवले. मी तिच्या अंगावर चालून गले. तिला दोन सणसणीत ठेवून देऊन मी तिला जाब विचारला तर ती मलाही चोर वगैरे म्हणायला लागली. मी तिला अजून दोन ठेवून दिल्या. तितक्यात बाई तिथे आल्या आणि आमच्या मध्ये पडल्या. मला त्यांनी चार शब्द सुनावले पण त्या मुलीला तिथून कायमचे दुसरीकडे दूर आठवून दिले. असा एखाद दुसराच प्रसंग. बाकी तिथे वाईट शब्दसुद्धा कोणी उच्चारत नसे इतकी शिस्त आणि आपलेपणा होता.

मी तिथे गेल्यापासून नातेवाईकांपैकी कोणाचाही संपर्क नव्हता. सहा महिन्यांनी अचानकपणे आजोबांचा फोन आला की मामा तिकडे येतो आहे. बरोबर एक मुलगा येतोय तुला बघायला. आपल्या नातातल्याच आहे वगैरे.. मी चांगलीच तापले. यांचे अजूनही तेच चालू आहे. लग्न लग्न लग्न. मी अक्षरशः वैतागले. मी त्यांना म्हटले मी मला फोनच का केलात आणि असे कुणालाही पाठवायच्या आधी माझी परवानगी का घेतली नाहीत? यापुढे हे चालणार नाही. यावेळी तुम्ही ठरवलेत म्हणून औपचारिकता म्हणून मी भेटेन त्याला. यापुढे माझ्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्या कुणीही घेतलेले मला चालणार नाहीत. माझ्या आयुष्यावर माझा अधिकार आहे. प्रत्येकाच्या मर्जीनुसार चालायला मी काही कुणाला बांधील नाही वगैरे मी त्यांना खणखणीत बोलले. माझ्यात त्यांनी पेटवलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग आता तरारून आले होते. आपली ससेहोलपट करणारे निर्णय जग घेते आणि नंतर त्याची जबाबदारीही घेत नाही हे मला चांगलेच कळले होते. त्यामुळे यावेळी मी खूपच सावध झाले होते. आजोबा मला इथून बाहेर काढून माझ्या पुढच्या शिक्षणाची सोय करतील असे मला वाटत असताना त्यांनीही लग्नाचीच लाईन धरली हे पाहून मला खूपच वाईट वाटले. दुसऱ्या माणसाची जबाबदारी घेणे ही माणसाला सर्वात जिवावर येते. ती झटकून टाकण्यासाठी तो काहीही निर्णय घेऊ शकतो हे मी नजीकच्या काळात अनेकदा पाहिले होते.

मी आजोबांना सांगितले होते तसे मी त्या माणसासमोर सजून वगैरे काही गेले नाही. गबाळ्याच अवतारात त्याला भेटले. त्याच्याशी मुद्दाम तुसडेपणाने बोलले जेणेकरून त्याने मला नाकारावे पण माझे रुपडे चारचौघींपेक्षा बरे असल्याने ती शक्यता कमीच होती. मी त्याला शिक्षण विचारले, तो इलेक्ट्रीशियन होता. आयटीआय केलेला. मी त्याला म्हटले मी जे विचारेन त्याची खरी खरी उत्तरे दयायची. मी सरबत्ती चालू केली. तोदेखील खरी उत्तरे देत राहिला. त्याचे आधीचे लग्न झालेले होते. बायको मात्र सोडून गेली होती. त्याचे म्हणने की त्याला घरजावई व्हायचे नव्हते म्हणून त्याने तिला सोडले वगैरे. सर्वात शेवटी मी त्याला विचारले की माझ्याबद्दल माझ्या घरच्यांनी तुम्हाला काय सांगितले आहे? त्याची ततपप झाली. मी त्याला सांगितले की इथे येऊन तुम्ही माझी निवड करताय यातच मला काहीतरी काळेबेरे वाटते आहे. कोणीही माणूस गुन्हेगाराशी संबंध वाढवताना दहावेळा विचार करतो. त्यावर तो गप्प राहिला. मी त्याला बजावले की एकसारखे फोन करायचे नाहीत. मला रोमॅण्टिक बोलता येत नाही. माझा फोटो मामाकडून घ्या. माझ्याबाबतचे कुठलेही निर्णय घरचे घेणार नाहीत. जो काही निर्णय घ्यायचा तो मीच घेणार आहे त्यामुळे यापुढे माझ्याशीच बोलायचे. असे सांगून मी तिथून चालती झाले. नंतर मला कळले की सुधारगृहवाल्यांनी माझ्याही आधीच त्याचा इंटरव्ह्यू घेतलेला होता. कोणत्याही मुलीच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला सरकारने नेमलेले हे लोक कित्येकपटीने बुद्धिमान होते. चांगल्या वाईटाची त्यांची नजर इतर कुणाहीपेक्षा तयार होती. मोठ्या बाईंनी मला मुलगा कसा वाटला वगैरे विचारल्यावर मला हे समजले. त्या मुलाबद्दलची आणखी माहिती त्यांनी मला सांगितली. मी त्याचे नावच विचारले नव्हते ते मी बाईंना विचारले तेव्हा त्यांनी मला थोडेसे चिडवले. मला हसावे की रडावे कळेना. कोणत्या परिस्थितीत आपले लग्न होत आहे याच्या जाणिवेने मी हादरून गेले होते पण ते दाखवू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी जेवायला बसल्यावर ताटात लाडू आणि पेढे आले. सगळे विचारायला लागले की आज काय आहे विशेष? बाईंनी जाहीर केले की या मुलीचे म्हणजे माझे लग्न ठरले आहे. सगळ्यांनी एक जल्लोष केला. दरम्यान सुवर्णाचा प्रियकरही बाईंना भेटायला येऊन गेला होता त्यांचेही लग्न बाई लावून देणार होत्या. सगळे खूप खूष झाले. आठ दिवसात सुवर्णाचे लग्नही झाले. मुलाने छोले, पुलाव आणि पुऱ्या बाहेरून आणले होते. त्याबरोबर आईस्क्रीमही होते. अशी छोटीशी पार्टी झाली. ती गेली आणि दुसऱ्याच दिवशी माझे काका मला घ्यायला आले. मला आश्चर्य वाटले.माझे लग्न लावून दयायचे त्यांना मिरवायचे होते आणि तसा प्रचंड दबाव त्यांच्यावर असावा. लग्नाच्या आधीचे आठ दिवस मी पुन्हा त्या घर नावाच्या तुरुंगात राहिले आणि मला त्यांनी फायनली उजवून टाकले. माझे शिक्षण अपुरे ठेवून वयाच्या १७ व्या वर्षी माझे लग्न त्यांनी लावले. कायद्याने तो गुन्हा होता.

(क्रमश:)

(शब्दांकन- शंतनू पांडे)

कर्म(ठ)कथा मालिकेतील मागील भाग वाचा: http://www.bigul.co.in/bigul/2192/sec/11/militancyप्रतिक्रिया द्या5730 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Sultan Awate - मंगळवार, १३ मार्च, २०१८
Is this last part of this article , i am interested to read more from life of writer, it very struggled life

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर