टोन्या हार्डिंग या स्केटर महिलेची अमेरिकन कहाणी
शनिवार, १० मार्च, २०१८ निळू दामले

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्केटिंग चॅम्पियन झालेल्या टोन्या हार्डिंग या स्त्रीवर आय टोन्या हा चित्रपट बेतलेला आहे. काही त्रुटी असल्या तरी आशयासाठी हा चित्रपट पाहायला हवा. 

२०१८ च्या ऑस्कर स्पर्धेमधे एलिसन जेनी यांना सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या मुलीला फटकावणारी, प्रशिक्षकाला झापणारी, मुलीवर सुरी फेकून मारणारी, चार नवरे करणारी, एक स्वतंत्र हिंसक स्त्री जेनी यांनी उभी केलीय. पुरस्काराला लायक असाच अभिनिय जेनी यांनी केलाय.चित्रपटाचं नाव आहे आय टोन्या. या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री मॅकेना ग्रेस हिचं कामंही छान होतं आणि चित्रपटही थरारक होता.

टोन्या हार्डिंग या स्केटिंग चँपियन स्त्रीवर चित्रपट बेतलेला आहे. १९९४ च्या सुमाराला टोन्या ही एक खरीखुरी स्त्री होती, अमेरिकेत ओरेगनमधे.

आय टोन्या हा चित्रपट पाहण्यासारखा आहे, त्यातल्या चित्रीकरणासाठी. स्केटिंग या खेळाचं चित्रीकरण डोळे विस्फारणारं आहे. स्केटिंग हा खेळ आहे आणि नृत्यही आहे. बर्फाच्या शुभ्र श्वेत पडद्यावर सुंदर रंगीत कपडे घातलेली नृत्यांगना नाच करताना पहाणं बहारदार आहे. स्केटिंग करताना स्केटरनं केलेल्या हालचालीमधे नृत्य आहे, अथलेटिक्स आहे, कोरयोग्राफी आहे. स्केटिंग थांबूच नये असं वाटतं. नृत्य करणाऱ्या टोन्याचं सौंदर्य, तिच्या हालचालीत आणि चेहऱ्यावर दिसणारा जग जिंकणारा आत्मविश्नास कॅमेऱ्यानं छान टिपलाय.

आय टोन्या हा चित्रपट पहाण्यासारखा आहे त्यातल्या आशयासाठी.

टोन्या गरीब घरात जन्मते, तिच्या आईवडिलांचं पटत नाही, आई हिंसक आहे. टोन्या उपजत स्केटर आहे. वयाच्या चौथ्या वर्षी तिचं स्केटिंग कसब पाहून स्केटिंग प्रशिक्षक चकित होते. टोन्याची     आई अंगमेहनतीची कमी वेतनाची कामं करून मिळणारे पैसे टोन्याच्या स्केटिंगवर खर्च करते. स्केटिंगमधे तिनं करियर करावं यासाठी तिला शाळेतूनही काढून टाकते. आई इतकी एकांतिक असते की टोन्याला सतत मारझोड करत स्केटिंग एके स्केटिंग करायला लावते. एकदा स्केटिंग करताना, बर्फावर, बराच काळ स्केटिंग केल्यानं टोन्याला लघवी दाटलेली असते. लघवीला जाण्यात वेळ वाया जाईल म्हणून आई तिला लघवीही करू देत नाही, शेवटी टोन्याला तिच्या कपड्यातच, बर्फावर, सर्वांसमक्ष लघवी होते.

टोन्या अत्युच्च दर्जाची स्केटर होते. हवेत तीनदा गिरकी घेणं हे कौशल्य जगात फक्त तिला एकटीलाच जमलेलं असतं. त्या जोरावर ती ऑलिंपिकमधे पोचते. पण ऑलिंपिक स्पर्धेच्या आधीच तिचं करियर संपतं.

टोन्याची आई लवोनाचं तत्त्वज्ञान असतं, खेळात प्रतिस्पर्ध्याला शत्रू मानायचं. हे तत्त्वज्ञान टोन्याचा नवरा प्रत्यक्षात अमलात आणतो. केरिंग्टन या प्रतिस्पर्धी मुलीच्या पायावर काठीनं आघात करून तिला जखमी करतो, जेणेकरून टोन्या जिंकावी. हे सरळपणे घडत नाही. नवऱ्याच्या डोक्यात असतं की तिला धमक्या देणारी पत्रं पाठवून खेळात भाग न घेण्यास भाग पाडावं. त्यासाठी तो एका बिनडोक गुन्हेगाराला सुपारी देतो. तो बिनडोक माणूस पत्रं पाठवण्याऐवजी गुडघ्याला दणके देतो.

प्रकरण गाजतं. टोन्यावर ठपका येतो. तिला दंड, तुरुंगवास, स्केटिंगमधून बाद होण्याची शिक्षा दिली जाते. स्केटिंग हेच जीवन असणारी टोन्या काय करणार? दंडाची रक्कमही भरायची असते. शेवटी ती बॉक्सिंगमधे उतरते आणि उरलेलं आयुष्य व्यतित करते.

टोन्या अद्वितीय स्केटर असली तरी ती दररोज लाकडं तोडणाऱ्या मुलीसारखी दिसायची. तिचे कपडे अगदीच सर्वसाधारण दिसायचे. तुलनेत केरिंग्टन सुखवस्तू घरातली, छान दिसणारी, छान वागणारी होती. केरिंग्टनला घर होतं, आई वडील भावंडं होती, सर्व घर कसं आनंदात होतं, केरिंग्टनवर प्रेम करणारं होतं. इकडं टोन्याच्या वडिलांचा पत्ता नाही. आई कामगार आणि हिंसक. नंतर नंतर नवराही तिला सतत मारझोड करणारा. तेव्हा यशाच्या हिशोबात स्पर्धेतले परीक्षक टोन्याला प्रवेश देत नसत.

टोन्याचा अगदीच सामान्य वकुबाच्या नवऱ्याला टोन्याचं यश आणि कीर्ती सहन होत नसे. कित्येक वेळा टोन्या त्याला सोडून निघूनही गेली. पण वर्तमानपत्रं, समाज आणि परीक्षक म्हणत की स्त्री कशी कुटुंबवत्सल, विवाहित असली पाहिजे, टोन्या आणि नवऱ्याचं पटत नाही, ते वेगळे रहातात. स्पर्धेचं हे अंग लक्षात घेऊन टोन्या नाईलाजानं नवऱ्याला काडीमोड न देता त्याचा मार खात रहाते.

पैसे मिळवण्यासाठी टोन्या बॉक्सर होते. ती म्हणते- मी केरिंग्टनच्या गुडघ्यावर आघात करायला सांगितलं कां? लोक म्हणतात सत्य सांग. सत्य काय सांगू, सत्य म्हणजे एक बुलशिट असतं. प्रत्येक माणसाचं सत्य वेगळं असतं… मी अमेरिकेत बिल क्लिंटननंतर दोन नंबरची लोकप्रिय व्यक्ती आहे..अमेरिकन लोकाना प्रेम करण्यासाठी एक पात्र लागतं, तसंच त्याना द्वेष करण्यासाठीही एक पात्रं लागतं. (मी त्यांना सापडलेय)… हे आहे सत्य.

स्त्रीवर घरात अत्याचार, मारझोड होणं ही अमेरिकन समाजातली एक प्रथाच म्हणायला हवी अशी परिस्थिती आहे. आय टोन्यातून ते वास्तव आपल्याला कळतं.

टोन्या नावाची एक स्त्री असते. ती तिचं जीवन स्वतंत्रपणे जगत असते. तिला अडचणी असतात, त्यातून वाट काढून ती तिचं ध्येय साध्य करण्याच्या खटपटीत असते. तिला स्केटिंग करायचं असतं, स्केटिंगमधे तिला ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळवायचं असतं.

पण समाजाच्या दृष्टीत टोन्या ही एक आकर्षक स्केटिंग करणारी स्त्री असते. तिनं आकर्षक असणं, सतत रेकॉर्ड करत रहाणं यात लोकांना रस असतो. व्यक्ती म्हणून ती काय आहे आणि कोण आहे यात समाजाला रस नसतो. नंचर टोन्या हरते, तिचं पदक जातं, स्पर्धेतून तिला बाद केलं जातं, तिच्यावर गुन्हेगारीचे आरोप होतात. आता समाजाच्या मनातली टोन्या वेगळी होते. ती भद्रलोकातली नाही, ती समाजमान्य नाही, ती बऱ्या घरची नाही, थोडक्यात ती आता द्वेषपात्र आहे असं समाजाला वाटतं.

अमेरिकन समाजाचा हा पैलू अमेरिकन साहित्य, नाटक, सिनेमा यातून अनेक वेळा दिसला आहे. अशीच एक अना निकोल स्मिथ नावाची एक स्त्री, जवळपास टोन्याच्या काळात होती. ती प्रसिद्ध झाली ती तिच्या मोठ्या स्तनांसाठी. अगदी मेरीलीन मन्रोसारखे मोठे आणि मादक स्तन. अमेरिकेतली दृष्टीभोगी जनता अनाला तिच्या स्तनांसाठी ओळखे, मनातल्या मनात, केवळ दृष्टीनं माणसं तिच्या स्तनाला स्पर्श करत. अना स्वतःचं असं एक जीवन जगत होती. बारमधे वेट्रेसचं काम करत होती. अना अगदीच सामान्य, गरीब कष्टकरी होती. मेरीलीन मन्रोला अमेरिकन प्रेसिडेंटाची संगत मिळाली, समाजात मान्यता मिळाली, चित्रपट मिळाले. अनाच्या वाटेला अवहेलना आली.

या चित्रपटात आय टोन्याच्या मांडणीत एक गोष्ट राहून गेली. आई आणि नवरा सतत मारझोड करत असताना, घरातलं वातावरण हिंसक असतांना, समाजाकडून सतत अवहेलना होत असताना या साऱ्यावर मात करून टोन्यानं तीन गिरक्या घेण्याचं अद्भुत कौशल्य कसं प्राप्त केलं? अवघड समाजात समाजाच्या नाकावर टिच्चून आपलं व्यक्तिमत्व राखणं आणि विकसित करणं म्हणजे फार भारी काम. ते तिनं कसं केलं, त्यासाठी  तिनं केलेली ती मेहनत चित्रपटात दिसत नाही.

चित्रपटामधे ब्रेकिंग फोर्थ वॉल हे तंत्र वापरलंय. म्हणजे असं की चित्रपटातली पात्रं – अभिनेते नव्हे – फिल्ममधे येतात, मुलाखती देतात. पात्र आणि चित्रपट यातली भिंत दूर केली जाते. चित्रपटाची सुरवातच प्रथम खोकला ऐकू येतो आणि नंतर प्रत्यक्ष टोन्या हार्डिंग सिगरेटचे झुरके देत स्वतःबद्दल बोलू लागते. नंतर टोन्याचा खराखुरा नवरा पडद्यावर येतो. मुलाखत सुरु करताना तो कॅमेरामनला माईक थोडा दूर न्यायला सांगतो. नंतर येते लवोना हार्डिंग, टोन्याची आई. कोचावर बसून ती आपली आणि टोन्याची कहाणी सांगते. तिच्या खांद्यावर बसलेला पक्षी तिला अधून मधून टोचत रहातो. आपले चार नवरे झाले त्यापैकी चवथ्या नवऱ्याची टोन्या ही मुलगी असं सांगून ती बोलायला सुरवात करते.

नंतर अभिनेत्यांनी कामं केलेला चित्रपट सुरू होतो. टोन्याच्या जागी मॅकेना ग्रेस ही अभिनेत्री दिसू लागते, आई लवोनाच्या जागी जेनी एलिसन दिसू लागते आणि नवऱ्याच्या जागी सेबॅस्टियन सॅन दिसू लागतो. चित्रपटाच्या शेवटी पुन्हा खरा नवरा येतो आणि आपण टोन्याचं करियर बरबाद केलं याची कबुली देतो, टोन्या येते आणि आपण जे काही केलं त्यात आपल्याला मजा आली असं सांगते.

चित्रपट चित्रपट असतो. अभिनेते कॅमेऱ्यासमोर अभिनय करत असतात. कॅमेरामन, त्याचे सहकारी, लाईटवाले, साऊंडवाले, दिग्दर्शक व त्याचे सहकारी अशी पाच पन्नास मंडळी समोर असताना जणू ती समोर नाहीतच, आपले आपणच आहोत अशा आविर्भावात अभिनेते भूमिका वठवत असतात. सारं काही घडवून आणलेलं, भ्रामक. पण त्यातूनही प्रेक्षकाला काही तरी कळतं, काही तरी माहीत होतं. त्याला अमेरिकन समाजाची कल्पना येते, तिथं स्त्रीला कशाकशातून जावं लागतं याची कल्पना येते.

ज्यानं त्यानं आपापल्या समजुतीनुसार जे जे हवं ते घ्यावं, जसं कसं जमेल तसं जग समजून घ्यावं.प्रतिक्रिया द्या5293 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर