माझी श्रीदेवी : चालबाज, लम्हे, बीअर, सिटी बज गई
शनिवार, १० मार्च, २०१८ धनेश जोशी

बीयर पिणाऱ्या, कोणालाही न जुमानणाऱ्या मुलीची श्रीदेवीने साकारलेली भूमिका हा त्याकाळी प्रेक्षकांसाठी धक्का होता. असे धक्के पचवण्याची क्षमता प्रेक्षकांमध्ये आली ती 'चालबाज'मुळे.

किल्लारी, लातुरचा भूकंप नुकताच झाला होता. पुण्यात बहुदा १९६७च्या पुरानंतर एवढी भीती होती. त्यातुन मोठ्या भूकंपानंतर जाणवणारे छोटे धक्के चर्चेचा विषय झाले होते. मी १० वर्षाचा होतो. किंवा ११. धक्के बसले की सगळ्यांनी वर्गाबाहेर यायचे अश्या सुचना शाळेत वारंवार दिल्या जात होत्या. धक्के बसून वर्गाबाहेर पडावं आणि दुपारची पुणेरी दुनिया न्याहाळवी अशी आसक्ती मुलांना न वाटावी तर नवलच! केबलचा जमाना नुकताच सुरू झाला होता. तरीही दर शनिवारी दुपारचा हिंदी पिक्चर (चित्रपट असा सोज्वळ शब्द मराठी माध्यमाच्या शाळेत वापरला जात नसे) आणि रविवारचा मराठी चित्रपट हे आकर्षण आम्हा मुलांना होतंच. रविवारच्या ब्लॅक अँड व्हाईट (कृष्णधवल हा शब्द बातम्यांपुरताच मर्यादित होता) पिक्चरमधल्या लावण्यांनी तर मराठी छोट्या मुलांना मोठे व्हायला खूपच हातभार लावला आहे यात तर शंकाच नाही.

अशाच एका दुपारी भूकंप झाला आणि वर्गातली सगळी मुलं एकसाथ आनंदाने बाहेर पळत आली. शुक्रवार असावा. "शनिवारी चालबाज लागणार आहे टीव्हीवर", अशी चर्चा होतीच. मनात कुतूहल होते. मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात चालबाज नावाच्या चित्रपटाविषयी चर्चा होणे तर दूरच, पण अशा नावाचा चित्रपट आहे हे सुध्दा माहिती नसणार. त्यामुळेच त्याचे आकर्षण वाटत होतंच. तर.... भूकंप झाला आणि आम्ही सर्वजण बाहेर पळत आलो. दुपारची वेळ. सदाशिव पेठ. रेलिंगला हातात धरून आनंदाने बेभान झालेली मुले. असं दृश्य.

तेवढ्यात एक जण (वर्षानुवर्षे एकाच इयत्तेत शिकणारा, त्यावेळच्या पुण्याच्या बाहेर असलेल्या धायरी गावात राहणारा): देवा...(खिदळत) चालबाज पाहूदे आनी मंगच मरुदेत...ख्या ख्यां.....

मी: (अर्थात साळसूदपणे) : खुप भारी पिक्चर आहे का?

कोणी उत्तर द्यायच्या भानगडीत सुद्धा पडलं नाही.

अजुन एक जण: (सिंहगड रस्ता परिसरात वास्तव्य असलेला) आय.... मस्त थंडगार बीयर पित पिक्चर बघायचा...

मी: बीयर? म्हणजे सुयशमधे मिळते ती? (अर्थात हे मनात, उत्तराची अपेक्षा नसल्यामुळे म्हणा किंवा बीयरविषयी मला माहिती आहे हे भीतीमुळे उघड करायचे नसल्यामुळे म्हणा) (सुयश: थंडगार बीयर, अशी पाटी असलेले एकमेव हॉटेल. विठ्ठल मंदिराच्या समोर, नवी पेठेत. सध्या तिकडे सुग्रास थाळी मिळते. नाव वेगळं आहे त्या जागेचे आता).

काही वेळात बाईंनी आत पिटाळल्यामुळे दंगा अर्धवट राहिला पण चालबाज बघायचाच हे मनाने पक्के हेरले! दुसऱ्या दिवशी चालबाज बघताना... शी.. काहीही दाखवतात...अशा तमाम पालकीय भावना दुर्लक्षित करून संकल्प सिद्धीस नेला. बिनधास्त बीयर पिणारी मंजु आणि दमदार चाली खेळून तिच्या जुळ्या बहिणीला अंजुला न्याय देणारी हिरोईन!! तो सनी आणि रजनी कोणाच्या लक्षात राहणार? गडबड हो गयी, सिटी बज गयी ह्या गाण्यात लक्षात राहिलेल्या रोहिणी हट्टंगडी. सुशिक्षित, सभ्यपणाचा बुरखा झुगारून असलं तद्दन व्यावसायिक गाणं छातीठोकपणे करायलासुद्धा एक धैर्य लागतं. विशेषकरून कस्तुरबा गांधींची भूमिका केल्यानंतर! ती कला आहे की दुसरं काही, अशा प्रश्नांना इथे मग काहीही अर्थ राहत नाही. तुमचं नट असणं तुम्ही अधोरेखित करता आणि हेच त्रिकालाबाधित सत्य पडद्यावर दिसत राहतं.

श्रीदेवीच्या बाबतीतसुद्धा तेच. ८०च्या दशकातल्या हिंदी सिनेसृष्टीत स्त्री व्यक्तिरेखा या एकतर पुरुषी व्यवस्थेत अडकून पडलेल्या, पुरुषांच्या नजरेला घायाळ करणाऱ्या बोल्ड अंदाज असलेल्या! मादक! मदनिका! अशा पार्श्वभूमीवर बिनधास्त बीयर पिणारी, कुठल्याही पुरुषाला न जुमानता टकाटक वावरणारी एक स्त्री!! किसी के हाथ ना आयेगी ये लडकी! अशी भूमिका त्या काळात तद्दन व्यावसायिक चित्रपटात करायला धैर्य लागत होतं! असे धक्के पचवायची क्षमता आज जर सामान्य प्रेक्षकांमध्ये असेल तर बहुतांशी चालबाज त्याला कारणीभूत आहे. (चित्रपटाचे नायकप्रधान भंपक शेवट असे विचार मारून टाकतात हे हिंदी सिनेमांचं वैशिष्टय स्वीकारूनसुद्धा!) त्या काळी चालबाजचा प्रेक्षक तास निमशहरी आणि दबकत शहरात स्थिरस्थावर होऊ बघणारा. खुल्या अर्थव्यवस्थेतील असुरक्षिततेमुळे नैतिकतेच्या चौकटी तयार होण्याच्या आधीचा काळ. जसा चालबाज हा त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो तसाच श्रीदेवीचा लम्हे हा शहरी, मध्यमवर्गीय, परदेशाची स्वप्न बघणाऱ्या उच्चमध्यमवर्गाचे! श्रीदेवी हा त्या दोन्ही चित्रपटातला सामान धागा असावा हेही नवलच! एकीकडे पुरुषांना न जुमानणारी, वस्तीमध्ये राहणारी बिनधास्त स्त्री आणि दुसरीकडे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या पुरुषावर प्रेम करणारी मुलगी! पण निमशहरी वर्गाने मंजु स्वीकारली (तिचं दुसरे रूप अंजुही होती हे फारसं कोणाच्या लक्षातही नसावं) आणि त्यांनीच पुजा नाकारली! शहरी उच्चमध्यमवर्गीय लोकाना जे बोल्ड वाटले तेच हिंदी सिनेमाचा मोठा प्रेक्षकवर्ग असलेल्या निमशहरी वर्गाला कंटाळवाणं वाटलं. मंजुचा अर्थ प्लेझंट असा होतो आणि पुजाचा वरशिप.

 प्रतिक्रिया द्या3191 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर