‘त्या’ वस्तीत फिरताना...
शनिवार, १० मार्च, २०१८ नम्रता देसाई

बुधवार पेठेत एका कामासाठी फिरताना समजलं की, आयुष्य बाईचं असो की बाप्याचं, दैना सगळ्यांचीच होते. हे वास्तव बघितल्यानंतर कुठलाच दिवस साजरा करावासा वाटला नाही.

बाई बायका आणि महिला माझ्या आयुष्यात कमीच.. मीपण नाही जात कुचाळक्या गप्पा मारायला. शाळा, कॉलेज, शहर असो की गाव माझ्याबद्दल माझ्याशी बोलणाऱ्या, बोलणारे अनेक होते. पण माझ्याशी गप्पा मारायला येणाऱ्या मैत्रिणी क्वचितच. अगदी आजही जाईन तिथे मित्र जोडणं जितकं सहज घडतं तितकंच डिफिकल्ट मुलींशी बोलणं.

काय आहे माहीत नाही ब्वा. पण आहे ते असं आहे. तरी दोन चार मैत्रिणी आहेत. त्यांना भेटणं अलीकडे दुरापास्त झालंय. बोलतो कधीमधी अचानक पण भेट मात्र क्वचितच.

मागे एका प्रकल्पासाठी काम करताना आख्खी बुधवार पेठ निवांत फिरले. हो गार्डनमध्ये फिरावी तशी. अनेक चेहरे. अनेक रूप. अनेक भावना. पण ठामपणे जगणारेसुद्धा तिथे आहेत.

कोणीच त्या दीड महिन्यात मला चुकीच्या भाषेत बोललं नाही. अनेक मावशा, अक्का आणि भिडू होते. समोर घडत असलेले अंगावर शहारे आणणारे प्रसंग. कित्येकदा एखादीची भेट घेण्यासाठी खोलीबाहेर चिंताक्रांत उभी मी आणि कपडे सारखे करत ओरबाडून खाल्लेली ती मग उसने अवसान आणून बोलत रहायची पुढचा बाप्या येईपर्यंत.

एकीचे केस तिला कापायचे होते. कारण लोक प्रचंड त्रास देतात. ओढलेल्या केसांमुळे तिच्या डोक्यावर झालेल्या जखमा बघून मी खरंच घाबरले. विचारलं तर म्हणाली आता चोवीसची हाय म्या. देवदासी होते. सातव्या वर्षी घराबाहेर. केसांनी घात केला. एकाचा हात धरून पळाले. जगले दिवस रात्र जागरण करत. खूप झुलवलं त्याने. धंद्यात आणून किस केला माझ्या अंगाचा.

साडेतीन तास होते तिच्या जवळ. मी तेव्हा बावीस वर्षांची होते. तिच्या अंगातून ओघळणारे रक्त पुसून मलमपट्टी केल्यावर म्हणाली, एक सांगू गं? 
मी हो म्हणेन याची वाट न पाहता म्हणाली.. माझ्या सात मुली इथून बाहेर काढशील? 
मी बघतच राहिले. सात मुली? आईपण सात वेळा की अजून काही असेल? शोध घेतला तर तीन सापडल्या. 
माझ्या कमाईतून जमेल तितके साठवत एक वर्षात दोघींना बाहेर काढले. आता खूप चांगला प्रवास सुरू आहे त्यांचा. दीप्ती आणि पारखी. आईने दिलेल्या नावांनी त्या ताठ मानेने जगत आहेत. छोटुकलं आयुष्य मिळालं आहे दोघींना.

एक आता तीन वर्षांची आहे एक चार वर्षांची. दोघींना दोन मित्रांनी दत्तक घेतले आहे. एक जण आहे, वडील बनू शकत नाही म्हणून बाईने टाकलेला. त्याने पारखीला स्वीकारलं. खूप छान शेणामातीचं आदिवासी पाड्यावर घर आहे त्याचं. त्याच्या समाजाने जितक्या आपलेपणाने तिला स्वीकारले ते पाहून सुखावणारे तेच मन कधीकधी तिच्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या घटनांविषयी दुःखी होतं. का तिला असा बा आधी भेटला नाही. अवघ्या सहा महिन्यात तिच्यावर दोघांनी अघोरी बलात्कार केले होते. आई गिऱ्हाईकासोबत असताना. तरी आई खमकी होती. पोरीला वाचवलं. परवा अक्कीचा फोन आला. तीच ती माऊली. नाव तर काय मायना. किती वेगळं नाव, तिचं तिने निवडलेलं. तिने घरीच केस भादरले आणि वेडी होऊन वाड्यात वाकुल्या दाखवून हसत नाचली म्हणे.

अक्की म्हणाली हिला घेऊन जा. टकली झाली आता, कोणी घेणार नाही हिला. ती सुटेल. आनंद झाला. मागे एकदा मायनाने माझ्याकडून केस धुवून घेतलेले. खूश होती ती. आनंदाने मला फोनवर म्हणाली, आता कोणच येत नाही माझ्याकडे. आक्की म्हणते पळ इथून. तशी बाकीच्यांसारखी नाही आ ही अक्की..

त्याच मित्राने, पारखीच्या बा ने लग्न करायचं म्हणून सांगितलं आहे. करेल. आज ती बाहेर पडू शकेल का माहीत नाही. पण आशा आहे. होईल तिचंही चांगलं.

आशावाद असला तरी सगळं खरं होत नाही. मागे अशाच एकीला बाहेर काढू वगैरे तयारी झाली. गाडीत बसताना ओकारी आली आणि गेली. हिच्याबाबत काय होईल माहीत नाही. उघडलेल्या खिडकीतून ती बाहेर यायची वाट बघत असेल. येईल ती बाहेर.

अजून एक भेटलेला. सुरमा भरलेला. पुरुष वेश्या. तायं.. काहून म्या हय? मरायचंय गो.. सांच्याला मलतोच.

मरतो म्हणतो की तंबाखू मळतो कळायचं नाही. त्यानीच त्या पोरींना बाहेर काढलेलं. काय जीव असेल माहीत नाही. आता मी जात नाही तिकडे. पण गणपती चौकात गेले की दिसतो. खेळ्या आहे तो. वस्तीतल्या मुलींना ट्रेन करतो म्हणे. सदानकदा पानाचा तोबरा. तंबाखूमुळे तोतरेपणा आलेला. तो काय बोलतो ते बाकीच्या पोरी बायका सांगायच्या. हा त्यांचं मनोरंजन करायचा त्या बदल्यात. 
एकदा फाटक्या बादलीत पाय घालून नाचून दाखवत होता. निमित्त लहानसं पण त्याच्या जिवावर बेतलेलं. एड्सचा रुग्ण होता. त्यातून डायबेटिस. झरझर आयुष्य कमी झालं. गेला एकदाचा. 
सांच्यालाच.

आयुष्य बाईचं असो की बाप्याचं दैना सगळ्यांच्याच आयुष्याची होते. त्यामुळे कुठलाही दिवस साजरा करणं सोडलं मी.

देव माणसाच्या वेदनेनंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याच्या मलुल लकेरीत आहे. मी कोणालाही दुखावून बोलू शकत नाही. पण या वस्तीतल्या आयुष्याच्या कहाण्या खूप वेगळ्या धाटणीचे विचार देतात. जगायचं भान देणाऱ्या आयुष्यात बाई म्हणून हक्क गाजवताना एकच वाटतं आदर मिळवावा लागत नाही. आपण जगतो तेव्हा कोण थोड्यावेळासाठी मनमुराद हसावं यासाठी काही प्रयत्न आपल्या लेवलला आपण केले तरी जगण्याची समृद्धी अनुभवता येते.

सुखी आयुष्य बघण्यापेक्षा दुःख बघायला शिकलं तर मन अधिक वेळ सकारात्मक राहण्याचा विचार करतं.

 प्रतिक्रिया द्या4048 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
अर्चना ज. माने - शनिवार, १० मार्च, २०१८
स्त्रीत्वाची केवढी ही बीभत्स विटंबना..!? ...काल जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या...घेतल्या. त्याला खरंच काही अर्थ होता का वाटू लागलंय. ...सुन्न करणारा लेख.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर