फेबुगिरी
शनिवार, १० मार्च, २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी..

हाँटिंग
-----
गाढ झोपेतून 
खडबडून जाग आल्यासारखे
आपण समोरासमोर
तेव्हा आपल्याला दिसला
दिव्याखालचा अंधार

मी शिखरावरून
मारली होती उडी
पण तरी मला
तुझ्यात मी आणि माझ्यात तू
करता आलं नाही
काहीतरी काचत होतं
चड्डीच्या कडेसारखं

म्हणून मग अंग मोडेस्तोवर
आपण सगळे कागद फाडले
डोळ्या-नाकात धूर जाईस्तोवर
ते जाळले
रक्त येईस्तोवर नखं वाढवली
आणि देहांची नुसतीच झोंबाझोंबी केली

तुझे कल्लोळ
आणि गच्चीवरून उडी मारण्याचे आक्रोश
माझ्या स्वप्नांवर डागले गेले ते गेलेच

अजूनही रात्रीअपरात्री
जेव्हा मला जाग येते
तेव्हा माझ्यामागून
पुढे येतो 
तुझा आक्रसलेला चेहरा
आणि 
मुद्दाम ताठर होऊन
निपचित पडलेला देह

मी हे सगळं
बांधून ठेवलंय माझ्या
मच्छरदाणीच्या कडेला

मी तुला म्हणालो होतोच की,
तसे काही वाया जाणार नाही आपण
कुठेतरी तरी नक्कीच पोचू
आणि जिथे पोचू
तिथून आपण एकमेकांना असे
हाँट करत राहू
--
प्रणव सखदेव

(दीपावली दिवाळी अंक)

आजकालची ही जी नवीन मॉडर्न पुणे बेंगलोरची तरुण लहानपणी रिलेटिव्हली वेल टू डू झालेली आयटी इंजीनीयर पिढी आहे तिचे मराठी साहित्यात एकतर रिप्रेझेंटेशनच नाही किंवा जे आहे ते एकतर हे अगदि उथळ चैनखोर आणि खास म्हणजे अगदी कॅज्युअल लैंगिक लोक आहेत असे दाखवणारे आहे. हे एकतर म्हाताऱ्या, अनुभव नसलेल्या किंवा तरुण उथळ लोकांनी केले आहे. वरवर भासणारे वास्तव हे आभासी आहे आणि त्यांचे अंतरंग वेगळेच खूप त्रासदायक आणि व्यामिश्र आहे (अशी माझी खात्री आहे.) थोडीफार दृष्य मोकळीढाकळी शारीरीकता व इमॅजिन्ड स्वैर लैंगिकता; यांना घट्ट जमिनीला ताणून बांधणारे भारतीय संस्कृतीचे आणि त्याहूनही खूप जास्त म्हणजे प्राणीजतेचे (नैसर्गिक ) बंध न दिसणारे साहित्य हा निव्वळ कचरा आहे. (असा एखादा तरुण उनाड डॉक्टर एखाद्या कॉन्फरन्समधे सणसणीत शास्त्रीय फ्लॉलेस रिझनेबल भाषण ठोकतो तेव्हा “अजूनी फुले फुलतात ना “या ओळीचा अर्थ मला नव्याने कळतो). असो.

तर या जनरेशनच्या एका रिलेशनच्या अंताची ही एक जीवघेणी कविता आहे. पहिल्याच कडव्यात अत्यंत सूचकतेने ते आपल्या लक्षात एक वास्तव आणून देतात. रिलेशन थोडं पुढे गेल्याशिवाय इनकॉम्पॅटिबिलिटी लक्षात येत नाही. सुदैवाने पूर्वीसारखे, लळतलोंबत, शिव्याशापत एकत्र रखडणे टाळता येत असल्याने त्या निर्णयांचे दोन्ही जिवांवर होणारे हिंसक परिणाम ते पुढे चित्रीत करतात.
मला सगळ्यात भणाणून नेले ते "मुद्दाम ताठर होऊन निपचीत पडलेला देह"ने.

नरमादीच्या नात्यात गुदमरून टाकणारा टोकाचा ताण आला की शारिरीक जवळकीच्या स्टिम्युलायनी स्त्रीचे लैंगीक उद्दिपन करणे, ज्याच्या अंतात हा ताण बराचसा ओसरतो व आपला कावा साध्य होतो, कमीत कमी बरीच ब्रीदिंग स्पेस तरी मिळते हा नरांचा एक निर्मम हातखंडा असतो. ते सगळे हवेहवेसे असून देखील प्राणपणाने टाळणारी ही मुलगी आहे.

याला दुसरा देखील एक अर्थ आहे. अशा प्रचंड मानसिक ताणाच्या क्षणी या मुली हिस्टेरियाच्या अॅटॅक मधे जातात. त्याचे हे वर्णन आहे.

हा बिचारा पण काही सुटलेला नाही. तिच्या गच्चीवरून उडी मारण्याचे आक्रोश याच्या स्वप्नांवर कायमचे डागले जातात. म्हणजे पूर्वीचा करून गेलेला स्मग मुलगा इथे नाही.
पुढे तो म्हणतो, हे सगळं मी माझ्या मच्छरदाणीच्या कडेला बांधून ठेवलंय. हे सगळं किती नवीन आहे. काहीच आयुष्यातलं डिलीट करायचं नाही पण त्याचा उगाच बाउ करायचा नाही. ते पुढच्या संभोगावेळी कायम लक्षातच असणार आहे, मच्छरदाणीच्या कडेला!

हा आशय नवीन आहे.कोणालाच तो मराठीत आजतरी इमीट करता येणार नाही कारण त्या अनुभवाचा कोणाला अंदाजपण नाही.प्रतीभा हे काही इमॅजीनेशनचे अॅप नाही आहे. आणखीन दोनतीन ग्रेट गोष्टी आहेत पण सगळचं काय लिहायचं.
अंतत:
प्रणव सखदेव हे एक गूढच आहे. इतर थोर मराठी लेखक लोक कण्हत कुंथत मेटाकुटीने साहित्याची एडेड प्रसूती करत असतात आणि हा माणूस पटापट नव्या आशयाच्या गोष्टी कविता लिहीत असतो, कल्पित बिल्पीत आणि कायतरी. मागे मी म्हटल्याप्रमाणे तो पायोनियर आहे. आशय त्याच्यामागे लागलाय मला घे म्हणून, जसा तो व्यंकटेश माडगुळकरांमागे लागला होता. शहरी निबीड वनांचा तो माडगुळकर आहे.
आणि तो परिस्थितीशरण बाजारुपणा करताना पण दिसत नाही. म्हणजे एखादे बऱ्या आशयाचे नाटक तीन नटांना माकडउड्या मारायला विकून टाकायचे तर सोडाच पण आजच्या प्रस्थापित (म्हाताऱ्या) वाचकांचे तो लांगुलचालनही करत नाही. दिसते तसे लिहितो.

मराठीत कोणी काही चांगल्या कवितांवर लक्ष ठेवतोय का नाही? कसल्या कसल्या भंपक हिंदी कवींचे उत्सव सुरू असतात फेसबुकवर! परवा एका प्रसिद्ध आदरणीय समिक्षकांनी केलेल्या एका मोठ्या परभाषिक सेलेब्रेटेड कविच्या पुस्तकाच्या भाषांतराचे पुस्तक विकत घेतले. दीड कविता कशीबशी बरी वाटली! हे साले लोक असाहित्यिक मार्गाने मोठे होत असतात की काय?

- आशुतोष दिवाण

...................

सावरकरांबाबत प्रथमच आणि शेवटचे. आपल्याकडे एखाद्या माणसाची एखादी भूमिका (राजकीय, सामाजिक वगैरे....) अमान्य झाली, याच अर्थ ती व्यक्ती गरळ ओकण्याइतपत खालच्या पातळीवर आणली जाते. 
एकाबाजूने, सर्वसमावेशकता मान्य करायची आणि दुसऱ्या बाजून विरोध करायचा!! दुटप्पी भूमिका. सावरकर हे कवी होते, लेखक होते, नाटककार होते इकडे नेहमीच दुर्लक्ष करायचे किंवा नाकारायचे. नामदेव ढसाळांनी, सावरकर आवडते कवी म्हटल्याचे स्पष्ट आठवत आहे. अर्थात कुणाही व्यक्तीचे मत हे कायमस्वरूपी प्रमाणपत्र नव्हे तरीही कवी म्हणून त्यांच्यात काहीतरी गुण नक्कीच होते. 
सावरकरांनी काही मूलभूत विधाने केली (गाय ही देव नसून पशू आहे, वगैरे) तर त्या विधानांना "उपयुक्तवाद" म्हणून निकालात काढायचे!! असे असेल तर सगळीच विधाने उपयुक्तता वादावर नाकारता येतील. 
दुसरे असे, त्यांच्यावर गांधीहत्येच्या सहभागाचा डाग लावला जातो. आता जर का सुप्रीम कोर्टाने निर्दोषित्व मान्य केले आहे (Aquitted हाच शब्द वापरला आहे) तरीही कुणीतरी काही लिहीलेले आहे, या जोरावर वाद घालायचा!! वेगळ्या भाषेत, सुप्रीम कोर्ट चुकले!! आता कमाल झाली. भारतात अजुनही सुप्रीम कोर्ट, हेच अखेरचा शब्द, हे मानले जात असताना, याबाबत सुप्रीम कोर्ट चुकले, म्हणण्यात काय हशील आहे. एक तर सुप्रीम कोर्टाचा अधिकार मान्य करा अन्यथा सुप्रीम कोर्ट रद्द करा!! दुसरा मुद्दा, अजुनही आंतरराष्ट्रीय कोर्ट अस्तित्वात आहे. सावरकर गुन्हेगार आहेत, हे मरणोत्तर खटला चालवून सिद्ध करा पण निदान सुप्रीम कोर्टाची पायमल्ली करू नका.
आणखी बरेच मुद्दे आहेत पण..........
मला कल्पना आहे, माझ्यावर "सावरकरवादी" असा आळ घेतला जाईल...... त्याला इलाज नाही.

- अनिल गोविलकर

...................

हेंच्यातलेंच्यातल्यानी तेंच्यातलेंच्यातल्यांचे पुतळे पाडले म्हणे, मग
तेंच्यातलेंच्यातल्यांनी हेंच्यातलेंच्यातल्यांच्या पुतळ्याला काळ फासलं म्हणे..

अहाहा.. अबब.. अगागाया ...काय ते अगाधीगाध दैदीप्यमान शौर्य.. काय तो महापराक्रम. हा थबडथक्क करणारा भीमपराक्रम पाहून अजि माझे डोळे तर अक्षरशः दिपूनच गेले आणि आगडअचंबित होऊन मी घनघोरपणे गहिवरुन गेलो. हे उदात्त कार्य यच्चयावत पार पाडणे हे काय येरागबाल्याचे काम न्हाय. उस्के लिये निधड्या छातीवाले आणि ढाण्या वाघाच्या काळीजवाले वीरपुरुषच लगते. मग, कुणाचाबी काम नही है रे वो, उस्के लिये ..जिगर हुनाय !

- गणेश पावसकर

...................

नुकतंच एक पुण्याचं काम करून आलोय, दहावीची परीक्षा सुरूये. गावखेड्यातून बरेच पोरं पोरी गावापासून नऊ दहा किलोमीटर अंतरावर बाहेरगावी परीक्षेसाठी जातात. 
पोरांचं एकवेळ ठीक ते सायकलवर डबलसीट किंवा या गाडीला त्या गाडीला किंवा ऐनवेळी रिक्षा गच्च भरलेला असला तरी लटकून का होत नाही शाळा गाठतात पण पोरींच्या बाबतीत असं होत नाही. परीक्षा असली म्हणुन काय झालं गोरगरिबांच्या पोरींना घरकामात थोडाफार हातभार लावावाच लागतो. त्यात एखादीला उशीर झाला म्हणजे ऐनवेळी परिक्षा हॉल गाठता येत नाही.
आज असाच दोघीजणींना उशीर झालेला आणि रस्त्याने त्या कावऱ्या बावऱ्या धांदल उडाल्यासारख्या घाईघाईत झपझप पावलांनी निघालेल्या. मी काय झालं ग पोरींनो, विचारायचा अवकाश की एकीच्या डोळ्यातून झरझर धारा बरसायला लागल्या,त्यात दुसरी घाबऱ्या घुबऱ्या आवाजात म्हणाली, जितुदादा आमचा आज दहावीचा हिंदीचा पेपर आहे आणि अर्धाच तास बाकी आहे, गावात बसस्टँटवर एक रिक्षा आहे पण तीनशे रुपये म्हणतायेत. आमच्याकडे द्यायला तेवढे पैसे नाही. म्हटलं त्यात काय घाबरायचं मंग? तुमचा ह्यो जितुदादा कशाला हे? गाडी काढली अन बसा म्हंटलं पोरींना.
मी काय त्यांना फुकट नेलं नाही. त्या बदल्यात घरून लवकर निघायचं, एखादं काम राहिलं तरी चालेल पण हॉलटिकीट, पेन, एखादी पाणी बॉटल, जवळ किमान भाड्यापुरते पैसे ठेवायचे असं प्रबोधन करत गेलो आणि एखाद्या वेळेस उशीर झालाच तर डायरेक्ट घरी यायचं. मी नाहीतर तात्या कोणीही तुम्हाला शाळेत पोहचवल हे ही सांगितलं. या गप्पा गप्पात किनगाव राजाचं नूतन विद्यालय कधी आलं कळालंही नाही. तोपर्यंत पोरींच्या डोक्यावरचं दडपणही बऱ्यापैकी कमी झालेलं. शाळेत गेल्यावर त्यांचे रोल नं. आणि असलेला खोली क्रमांक पाहुन त्यांना गेटमधून पाठवून दिलं, जाताना तरी एकीच्या डोळ्यात माझ्यासाठी कृतज्ञतापूर्वक ओझरतं पाणी होतंच. 'लै मायाळू असती लेकींची जात' नाही का?
मी असं काही म्हणणार नाही की हा मेसेज दहा जणांना पाठवा अन पुण्य कमवा. पण शाळेतल्या पोरापोरींना शिक्षणाच्या बाबतीत आपली तोडकी मोडकी मदत मात्र नक्की करा, कारण बोर्डाचा एक पेपर म्हणजे विद्यार्थ्यांचं पुढील एक वर्ष. एवढं मोठं काम केलं त्यावर एक पोस्ट बनत होतीच नाही का? बरं ह्यातून मिळणारा आनंदही लै मोठा असतो शिवाय आनंद वाटल्याने वाढतो म्हणतात एवढाच काय तो या पोस्टचा प्रपंच!! 'कोई बी काम छोटा नही होता और मदत से बडा कोई धर्म नही होता!!'
आता मी अन आमचा मोत्या सावली पाहुन दिवसभर वावरात इथे तिथे लोळलाळ करायला मोकळे,अय्य मोत्या य्य्य्य्यू!!!.

- जितेंद्र भांबर्गे

...................

लेनीन झिंदाबाद!
लेनीन हा सर्वहारांची आशा होता. भांडवलशाहीला कल्याणकारी राज्याचे वळण (वरकरणी तरी) घेणे भाग पडले ते या क्रांतीच्या रेट्यानेच. यामुळेच तिसऱ्या जगातील राष्ट्रांना लवकर स्वातंत्र्य मिळाले. हिटलर हुकूमशहा होता, लेनीनही हुकूमशहा होता म्हणून दोघे सारखेच अशी कमेंट वाचली. हे म्हणजे टेबलाला चार पाय असतात, गायीलाही चार पाय असतात म्हणजे टेबल हे गाय आहे असे म्हणण्यासारखे. त्यांची तुलना होऊच शकत नाही इतका त्यांच्यात गुणात्मक फरक आहे. पण ते बैलबुद्धी लोकांना समजणे अशक्यच आहे. 
लेनीन लोकशाहीवादी असो की नसो लेनीनचा पुतळा पाडणे हे नक्कीच लोकशाही विरोधी कृत्य आहे. गांधींचे पुतळे पाडायला मात्र माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यासाठी कुणी जेसीबी आणणार असेल तर मी पाच रुपये वर्गणी द्यायला तयार आहे!

- अरुण ठाकूर

...................

Annoying - या ईंग्रजी शब्दाचा अचूक मराठी अर्थ कोणी सांगेल का?

हे निरगुडकर annoying झालेत. लेनिनना अरे तुरे तर करत आहेतच पण ते सोडा. ते अजित अभ्यंकरांना प्रश्न विचारत आहेत की जर जगभर लेनिनचे पुतळे तोडले जात आहेत तर इथे तोडले तर काय बिघडलं?

मी कसा प्रतिवाद केला असता ते सांगतो -

जर जगभर असे पुतळे तोडले जात आहेत तर मोदी शहा या घटनेची कडी निंदा का करत आहेत भाऊ?

जगभर जर ही लाट आली असेलच तर निवडणुका जिंकल्याच्या तिसऱ्याच दिवशीचा मुहुर्त भाजपाच्या गुंडांना का सापडला? आधी का नाही बरं तोडले? याचं कारण म्हणजे या मुर्खांना लेनिन कोण? त्याचा कार्यकाल कोणता? हे पण ठाऊक नाही. त्यांना आदेश आला, त्यांनी ते दोन पुतळे तोडले.

मुद्दा नंबर तीन - परदेशातली उदाहरणं कसली देताय हो? परदेशी चॅनलवर अभ्यासू संपादक ठेवतात. इथे तुमच्या सारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या विद्वानाला का ठेवतात ते आम्ही विचारतो का?

बाकी पांडव वगैरे लोक माझ्या खिजगणतीत पण नाहीत. हा मूर्ख पूर्वी फालतू विनोद करून हसवत तरी असे.

मी analyst आहे. माझं analysis असं आहे की पांडवने अभ्यंकरांना काय प्रश्न विचारायचे हे त्याने कुणाकडून तरी advance मधे लिहून आणले होते.

पांडवने अभ्यंकरांची, मधु लिमयांची जात काढली. आता मलाही नाईलाजाने जात काढावी लागतेय.

हा सनातनी पांडव ब्राह्मण, सनातनी भाजपाचे समर्थन करणारे निरगुडकर पण ब्राह्मण, ते दवे पण ब्राह्मण आणि अजित अभ्यंकर पण ब्राह्मण.

प्रामाणिकपणे सांगा, धर्माला फाट्यावर मारणारे अभ्यंकर तेजस्वी ब्राह्मण वाटतात? की हे बाकीचे लोक? 
पांडव, जात नाही काढायची कोणाची, ज्या कुणा सनातन्याकडून लिहून आणलेली ही पोपटपंची करतो आहेस ना, त्यामुळ बहुसंख्य चांगल्या ब्राह्मणांची लाज जाते. मूर्ख माणूस कुठला.

लेनिनना वंदनच.

- अरविंद विनायक

...................

TDP ने NDA सोडली!
शिवसेना अजून मर्द राजीनामे खिशातच चिकटवून फिरतेय!
तेलुगू नि मराठी मध्ये हाच फरक आहे!
म्हणून मराठीत सुपरस्टार नाही!
तेलुगूत आहे! 💐

- राजू परुळेकर

...................

कुठंही ब्रह्मेंचा पुतळा * नाहीय. गरजूंनी नोंद घ्यावी.
(* - हा पुतळा लूनारूढ अथवा सुंदर स्त्रियांच्या घोळक्यात किंवा मिशीला पीळ देत बंगालच्या उपसागराकडं नजर देतानाचा नाही.)

- ज्युनियर ब्रह्मे

..........................................

संजय राऊत बिडी पिताना
काढायाचे नुसता धूर
म्हणायचे अन मनाशीच की
अब नहीं है दिल्ली दूर

- गजू तायडे

...................

आताच रेडिओवर आवाहन ऐकलं.
"तुमचे रिटर्न्स लवकर फाईल करा."

आवो पण ते बँका बुडवून उडून गेलेल्या तेनास्नी कवा रिटर्न आणणार हाय तुमी?
का तेंनी काढलेलं खड्डं बी आमीच मुजवायचं?

#भारी_हाय_ब्वाॅ

- पृथ्वीराज नलवडे

...................प्रतिक्रिया द्या1489 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
विनू ऊर्फ अजय कारुळकर... - शनिवार, १० मार्च, २०१८
मस्त वाटलं...

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर