संघाला हवाय देशसुरक्षेचा ठेका
मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८ प्रियदर्शन

संसदीय लोकशाहीनुसार सेना उभारणे, मग उद्देश काही का असेना, थेट देशद्रोह आहे. तरीही सरसंघचालक तीन दिवसाच्या आत सैन्य उभे करू शकतो अशी दर्पोक्ती करत आहेत. 

आपण तीन दिवसांच्या आत सैन्य उभे करू शकतो, असा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. जे सैन्य तयार करायला भारतीय सैन्यदलाला सहा महिने लागतात, ते आम्ही तीन दिवसांत करू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

मोहन भागवत यांच्या या विधामध्ये काही छुपे प्रश्न आहेत का? सरसंघचालकांचा भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास नाही का? भारतीय सीमेवर कधीतरी अशी परिस्थिती येईल, की त्यावेळी सैन्याला संघ परिवाराची आवश्यकता भासेल, असे तर त्यांना वाटत नाही ना?

हे खरं आहे की युद्धाच्यावेळी नागरिकांच्या सेना उपयोगी पडतात. १९६२ आणि १९६५ च्या युद्धाच्यावेळी सैन्यभरतीची मोहीम चालवली होती आणि तरुणाना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले होते. पण त्या गोष्टीला आता पन्नास-पंचावन्न वर्षे झाली. त्यानंतर आतापर्यंत भारतीय सैन्यानं एक मोठा पल्ला गाठलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यात तशी कधी वेळ आली तर त्यासंदर्भातला निर्णय सैन्यदलच घेऊ शकते. दुस-या कुठल्या एजन्सीला त्याचा ठेका नाही दिला जाऊ शकत.

परंतु संघ परिवाराला आता देशाच्या सुरक्षेचा ठेका हवा आहे –  जणूकाही त्यासाठी सैन्य पुरेसे ठरत नाही. तसं नसेल तर मग मोहन भागवत यांनी हे विधान का केले ? ते सैन्याचं मनोधैर्य वाढवू इच्छितात? भारतीय सैन्याला खरोखर मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांच्याकडून प्रोत्साहनाची गरज आहे? ते म्हणतात की आरएसएसचे कार्यकर्ते भारतीय सैन्याप्रमाणेच शिस्तबद्ध आहेत.

मोहन भागवत यांच्या विधानावरून गदारोळ उठल्यावर आरएसएसकडून खुलासा आला –  मोहन भागवत यांचे म्हणणे नीटपणे समजून घेतले नाही. सैन्य आणि स्वयंसेवकांमध्ये तुलना करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता, तर इतर समाज आणि स्वयंसेवकांमधला फरक ते समजावून सांगत होते.

ही त्याहून धोकादायक गोष्ट आहे. बारकाईनं विचार केला तर इथून मोहन भागवत यांचा मूळ उद्देश लक्षात येतो. ते देश आणि सैन्याला मदत करू इच्छित नाहीत, तर जनतेला संदेश देऊ इच्छितात की, संघाच्या अदृश्य शिस्तबद्ध सैनिकांची भीती बाळगा. संघ परिवार सैन्यदल नाही, पण तीन दिवसांत त्याला सैन्यदलात परिवर्तित करता येऊ शकते. स्वतःचे सैन्यदल तयार करण्याची आपली क्षमता आहे, अशी देशाच्या नावावर का असेना, घोषणा करायला देशातल्या अन्य कोणत्या संघटनेला परवानगी दिली जाऊ शकते का ?

देशाला खासगी सेना नव्या नाहीत. जमीन,  प्रतिष्ठा आणि जातीच्या नावावर हत्या-रक्तपात करण्याचा त्यांचा इतिहास आहे. एकेकाळी अशा खासगी सेनांनी बिहारमध्ये मोठे जाळे तयार केले होते. भूक आणि गरिबीच्या विरोधात लढणाऱ्या आणि समानतेच्या गप्पा मारणाऱ्या नक्षली आंदोलनांना या देशाने कधी स्वीकारले नाही, कारण ते शस्त्रं हाती घेतात, खासगी सेना उभारतात. संसदीय लोकशाहीमध्ये विरोधासाठी हिंसेव्यतिरिक्त सर्व मार्ग न्याय्य मानले जातात. आणि सेना उभारणे तर थेट देशद्रोहच आहे – मग त्याचा उद्देश काहीही असूदे.

इथं एक गोष्ट विचारावीशी वाटते की, संघपरिवार तीन दिवसांत सैन्य उभे करण्याचा दावा कोणत्या आधारावर करतोय? यापूर्वी कधी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या शिस्तीचा पडताळा घेतलाय? यापूर्वी अनेकदा अचानक एखाद्या मुद्दयावर हिंसेचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला त्यामागे संघपरिवाराची ताकद तर नव्हती? मग ती गोध्रानंतर गुजरात हिंसाचारावेळी दिसलेली क्रिया विरुद्ध प्रतिक्रिया असेल किंवा त्याआधी दहा वर्षांपूर्वी बाबरी मशीद पाडण्याचं सुनियोजित षड्यंत्र किंवा त्याच्याही आधी आठ वर्षांपूर्वी झालेला शीखविरोधी हिंसाचार? कारण १९८४ला काँग्रेसला गुन्हेगार मानूनसुद्धा हे विसरता येत नाही की,  फक्त राजीव गांधींनीच झाड कोसळल्यानंतर जमीन हादरण्याचा दाखला दिला नव्हता. संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनीही त्यावेळी लोकांचा संताप योग्य असल्याचे म्हटले होते. आणि त्याच काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी निवडलेल्या गांधीवादी समाजवादाला झिडकारून संघाने गुप्तपणे काँग्रेसचे समर्थन केले होते आणि त्याचमुळे भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या.

आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे दुसऱ्या कुठल्या शीख, मुस्लिम किंवा ख्रिश्चन संघटनेला अशी शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची सेना तयार करण्याची परवानगी दिली जाऊ शकते? 

परंतु हा प्रश्न फक्त संघपरिवाराच्या विशेषाधिकाराचा नाही. मोहन भागवत ज्याकडे निर्देश करतात, त्या समाजाच्या सैनिकीकरणाचाही आहे. हे सैनिकीकरण संसदीय लोकशाहीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. अशा सैनिकीकरणाच्या मार्गानेच सरकारे लोकशाही मूल्यांचा गळा घोटतात. आणि त्यासाठी शिस्तबद्ध सैन्याला शस्त्र हातात घेण्याचीच नव्हे, इतरांमध्ये भीती निर्माण करण्याची, त्यांना धमकावण्याची आणि त्यांच्यामध्ये सावत्रपणाची भावना निर्माण करण्याची गरज असते. आणि सांगण्याची गरज नाही की, आजच्या काळात अनेक संघटना हे काम उत्तम रितीने करीत आहेत.

(प्रियदर्शन हे एनडीटीव्ही इंडियामध्ये सीनिअर एडिटर आहेत.)प्रतिक्रिया द्या2647 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Bhuvan - शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८
सेना उभारणे देशद्रोह आहे ? मग भीम आर्मी कशी चालते हो तुम्हाला ? आणि त्या गुंड चंद्रशेखरला सोडायचे मागणी का करत आहात काही लोक ?
Kolsat - बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८
No where in his speech did Mr. Mohan Bhagawat say that the RSS shold trained as an alternative to Indian Army. He merely wanted to point ot the training and discipline of the Sanghis. Many commentators inclding Rahl Gandhi have decided that Bhagawat has inslted the Indian Army. Every Army recrit is not trained before he/she enrols whereas Sanghis trained daily and hence they can be ready sooner than a recrit. Now any one can take any speech nd find deeper meanings in it. Opponents of BJP are doing exactly that. The RSS has a history of not going against the government. therefore my advice to all is to chill ot.
समीर गायकवाड - मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८
परखड आणि मर्मभेदी ...

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर