फेबुगिरी
मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी..

आमची पिढी सर्वात भाग्यवान.... आम्ही तारुण्यात पदार्पण करायचा आणि इंटरनेट नावाचा प्रकार सायबर कॅफे/कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून सुरू होण्याचा काळ एकच होता... माझ्या वयाच्या तरुणाईला एक नवीन विश्व सापडले होते... आणि विशेष म्हणजे त्या विश्वात ज्येष्ठ माणसांना इंटरेस्ट नव्हता आणि लहान पोरांना त्याची अक्कल नव्हती! एखाद्याला कॉम्प्युटर चालवता येतो ही अप्रुपाची गोष्ट असायची. आणि त्याला इंटरनेट सर्फिंग करता येते हे म्हणजे त्या अप्रुपाचा कळसच! ते नेटचे डायल-अप कनेक्शन, ते वायर्सचे जंजाळ, तो नेट कनेक्ट होतानाचा विशिष्ट स्वर्गीय दिव्य आवाज.... अजूनही कानात तो आवाज गुंजारव करतो.... त्यावेळी फक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि त्याचे इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राऊजर... बस्स! त्यावेळच्या 56 kbps च्या स्पीड बाबत काय बोलावे? असो! तर मुद्दा असा की, आजच्या फेसबुक जमान्यात फेक अकौंटसचा जो सुळसुळाट झाला आहे तो आमच्यासाठी नवीन नाही. आमच्या काळात ऑर्कुटच्याही आधी याहू मेसेंजर नावाचा एक ग्रेट प्रकार होता.... त्यात कुठल्याही ईमोजी, स्मायली, फोटो, इत्यादी बाबी नसायच्या... फक्त प्लेन टेक्स्ट! आणि चॅटिंग ची सुरुवात व्हायची ASL please या प्रश्नाने... म्हणजे Age, Sex, Location. मग इकडची अथवा तिकडची व्यक्ती वाट्टेल ते asl ठोकून द्यायची आणि वाट्टेल ती चॅटिंग चालायची. माझ्यासारखा एखादा गावरान पांडू सुद्धा 'Hi, This is Anup, 17 from America' असे सांगून इम्प्रेशन पाडायचा किंवा एखादा दांडगा पुरुष टोण्या 'Pooja,16, Pune' असे बिनधास्त फेकून समोरच्याला गुदगुल्या करायचा.... फार मजेशीर दिवस होते ते... नंतर ऑर्कुटने सोशल मीडियामध्ये वेगळी क्रांती आणली आणि आता त्याचा वारसा फेसबुक चालवत आहे. उद्या दुसरे कुठले माध्यम येईल... पण एखाद्या गोष्टीचे नावीन्य त्याच्या आगमनासोबतच संपते हे ही तितकेच खरे.

- अनुप कुलकर्णी

.........................

क्राऊडफंडिंग!

तेही हजार कोटींच्या वरील थकलेली कार्पोरेट कर्जे फेडायला  😎

काय तर म्हणे दिवाळ्यात कंपनी नेली तर बँकांचा फायदा होईल, त्यांनाच पैसे मिळतील! म्हणजे काय? बँकांना पैसे मिळू नयेत का?? बँका एलियन आहेत???

ज्यांनी प्रायव्हेट कंपनी आणि पार्टनरशिप फर्म्समध्ये डिपॉझिट ठेवली आहेत अशी 'सामान्य माणसं' पैसे बुडायच्याच लायकीची आहेत. सेबी बोंबलून सांगत असते, शहाणे लोक्स सांगत असतात- पब्लिक कम्पनी नसेल तर पैसे ठेवू नयेत, पण नाही, ऐकतो कोण ! म्हणजे अधिकृत कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे "फारच रिस्की ब्वा!" म्हणणारी 'सामान्य माणसं' प्रायव्हेट फर्म्सना डिपॉझिट देतात... तेही 'विश्वासा'च्या जोरावर! जा म्हणावं आता विश्वासला शोधायला पानपतावर!!!

कार्पोरेट कर्ज हे कायदेशीर आहे ते रिकव्हर व्हायलाच हवे... फालतू इमोशनल गप्पा मारून काय होणार?

वर म्हणे "मी मल्ल्यासारखा पळून जाऊ शकलो असतो!" ... काय उपकार लावले का? एक गुन्हेगार खून करून सुटला म्हणून "मी खून करू शकलो असतो" म्हणून मोठेपणा मिरवायचा का?

धंद्यात तोटा होणे हा काही अपराध नाही (फसवेगिरी हा आहे, पण तो विषय वेगळा आहे!!)... कम्पनी कर्जे आहेत - कायदेशीर प्रक्रिया आहे दिवाळखोरीची !(Insolvency and Bankruptcy Code, वगैरे) कम्पनी दिवाळ्यात गेली म्हणून फासावर टांगत नाहीत, एवढं नक्की...

क्राऊडफंडिंग हे एखादं अभ्यासपूर्ण युट्यूब चॅनेल चालावं, एखादं मोफत सॉफ्टवेअर सर्वांसाठी मोफत राहावं म्हणून असतं... Patreon सारख्या साईट्स त्यासाठी फेमस आहेत. पण हजारो कोटीची कार्पोरेट कर्जे फेडण्यासाठी क्राऊड फंडिंग ??

'क्राऊड गंडिंग' म्हणायचं नाहीये ना?  😎 😎

-  🖊मकरंद देसाई

टीप: DSK चा फुल फॉर्म दाऊद सुलेमान काझी किंवा दौलत शंकऱ्या कांबळे किंवा डेव्हीड सोलोमन कॅटीच असता तरी मी हेच लिहिलं असतं, याची क्रूपया णोंद घेने  😎 😎 😎

.........................

काल युरोस्टार रेल्वेनी लंडनला आलो.. अँटवर्प हुन ब्रुसेल्सला पोचलो तेव्हा दुपारचे ४ वाजून १२ मिनिटे झाली होती. ही गाडी वेळेत आली होती.. पुढची ब्रुसेल्स - लंडन ४ वाजून ५६ मिनिटांनी सुटणार होती म्हणजे मध्ये बरोब्बर ४४ मिनिटांचा वेळ होता. तेव्हड्यात चेक इन करायचे, विमानतळासारखा सीक्युरिटी चेक करायचा, बेल्जियम देशातून बाहेर पाडण्यासाठी इमिग्रेशन करायचं आणि लगेच तिथेच ब्रिटिश भूमीवर पाय ठेवण्यासाठी ते इमिग्रेशन करायचं एव्हड्या गोष्टी पार पडायच्या होत्या.. गाडीतून उतरताना एक आजीबाई त्यांचं सामान सावकाश उतरवत होत्या.. इथे लोक शांतपणे वाट पाहतात.. आजीबाईंच्या डोक्यावरून उड्या मारत नाहीत.. त्यात चार मिनिटे गेली.. धावत बॅगा घेऊन बाहेर पडलो.. ब्रुसेल्सच्या स्टेशनवर कुठल्याही पाट्या नाहीत.. अंदाजाने विचारात विचारत ५ मिनिटात युरोस्टारच्या टर्मिनलला पोचलो.. गर्दी होती, पण सगळी लोकं मशीन सारखं काम करत होती.. १५ मिनिटात सिक्युरिटी चेक झाला.. पुढच्या ५ मिनिटात दोन्ही देशांचं इमिग्रेशन झालं.. समोर बघतो तर गाडीला प्रचंड गर्दी.. सावकाश कासवाच्या गतीने पुढे सरकतेय.. पुढे प्लॅटफॉर्मवर जायला एकच अरुंद एस्केलेटर.. गाडी सुटायला ५ मिनिटे उरलेली.. पण कुठेही ढकलाढकली नाही, आरडा ओरडा नाही, पुढे घुसायची गडबड नाही.. गाडीला १२ डबे.. प्रत्येक डब्यात १०० प्रवासी.. गाडी फुल होती.. म्हणजे जवळ जवळ फक्त १ तासात १२०० प्रवाश्यांचे सगळे सोपस्कार उरकून ४ वाजून ५५ मिनिटांनी सगळे प्रवासी गाडीत चढले होते..४: ५६ ला ट्रेन मॅनेजरने शिट्टी मारली आणि गाडी ठरलेल्या सेकंदाला सुटली.. तीन गोष्टी असल्या तर हे होऊ शकत... - १. एक सुनिश्चित व्यवस्था पाहिजे. २. ती व्यवस्था राबवणारे लोक प्रामाणिकपणे काम करणारे पाहिजेत आणि ३. ह्या व्यवस्थेवर, जे ती व्यवस्था वापरणार आहेत त्या ग्राहकांचा पूर्ण विश्वास पाहिजे.. काही ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी असतात.. काही ठिकाणी एकही नसते.. बाकी युरो स्टार बद्दल सांगायचे म्हणजे खाडीच्या ७५ मीटर खालून ५० किलोमीटर बोगद्याने लंडन हे शहर पॅरिस आणि ब्रुसेल्सला जोडले आहे.. हि रेल्वे तीन देशातून जाते.. बेल्जीयम, फ्रांस आणि इंग्लंड.. सुरवातीच्या ड्रायव्हरच्या सगळ्या घोषणा प्रथम बेल्जीयन मग फ़्रेंच आणि शेवटी इंग्लिश अश्या होत्या.. गाडी लिल येथे फ्रांस मध्ये शिरली तेव्हा त्याच घोषणा फ्रेंच, इंग्लिश आणि बेल्जियन ह्या क्रमाने सुरु झाल्या आणि शेवटी इंग्लंडात शिरल्यावर प्रथम इंग्लिश आणि मग अन्य भाषेत झाल्या.. इतक्या बारीक गोष्टीचा विचार आणि SOP कोणीतरी केला आहे...

- संजय दाबके

.........................

‘आधारचा शोध लालकृष्ण अडवाणी यांनी लावला..!’ हे मा. मोदीजींचे वाक्यच इतके विनोदी आहे की, कोणाच्याही तोंडून सातमजली हास्य बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. या वाक्यावर संपूर्ण भारत हसला. रेणुका चौधरी संसदेत असल्यामुळे त्यांचे हास्य मा. मोदीजींना ऐकू आले एवढेच. असले भारी ज्योक मारता, अन वर हसायला बंदी करता! अन्याव... अन्याव!!

- सूर्यकांत पळसकर

.........................

E म्हणलं की mc2 म्हणणारी,
निएन्डथाल भारी का होमो इरेक्टस भारी वाद घालणारी,
कॉसमॉस ची गोष्ट सांगणारी,
अँड्रमेडा गॅलॅक्सीबद्दल विचारणारी
अल्मा-5 ला माणसाची भिकार हावरी वृत्ती म्हणणारी
265 लै पाणी खातंय आपण 86032 ला बी ड्रीप करणारी माणसं म्हणांरी,
मोटर उलटी फिराली का सरळ समजणारी 
कुठल्या मोटरला कितीचे किती कॅपशीटर लावायचे अंदाज लावणारी
ईट्टल पंढरपूर वाल्याला नामदेवाकडं बाहेरनंच निरोप ठेवणारी
बर्थ ऑफ नेशन-1915 पसनं नोलन स्पिलबर्ग ईस्टवूड टेरांटीनो पर्यंत ची आवर्तनं पूर्ण करणारी 
तुझ्या रोलिंग पेक्षा टोल्किन भारीय म्हणणारी भेटली खरी लगीन जमल्यावर..

खरं शिस्तीत विचारायचं र्हायलेलं, उगं पुन्हा किरकिर नको म्हणून जाहीर विचारावं म्हणलं.

तर प्रिय पिरे,
प्रपोज डे हून गेला. वाढदिवसाला दिल्यालं तुझ्यासारखंच नाजूक ( उसाशप्पथ सांगतो, नाजुक हे विशेषण घाबरून लावलंय असं वाटू दिऊ नका, हे खरंच आतून आलंय, खोटं वाटत असलं तरीबी ) घड्याळ समोर ठीऊन गायब असलेल्या सेकंद काट्याईतकी तडपेने माझी आठवण यायली का न्हाय सांग? (तुला आईनस्टाईन ची शपथ न्हाई म्हणली बिनली तर.)

आपण 'फ्यानशे' होतो, अवघड शब्दातनं 'बेटर हाफ' या सोप्या शब्दापर्यंत उत्क्रांत व्हावं असं मी म्हणतोय. व्हय म्हंली तर नातवंडास्नि म्हातारपणी लव्ह मॅरेज केलं म्हणून सांगू शकशील.

होशील का या जेम्स ची लिली..
हॅरी ची जिनी..
ऍरागॉर्नची अरविन..

.....

टीप : न्हाई म्हणलीस तर 2035 चा नोबेल माझी मी एकटा घिन आणि लग्नात काय लवकर आवरणार न्हाई आणि तुझ्या सोबत एकपण हिंदी पिच्चर बघणार न्हाई, तसबी 40 वर्षाचे 4 बघून झालेत आणि रोज 265 ला नांव ठिवणार आणि तसेबी तुम्हाला बडबडायची लाखभर रुपये पगार मिळतीय त्यामुळं कष्टकऱ्यांच्या भावना कशा समजणार.

तरी शेवट या इथे आमच्या पिढीचा आदर्श असलेल्या महेश उर्फ मुन्ना देशमुख च्या गाण्याने करतो. प्रेम-राहुल असल्या बॉलिवूडछाप भंपक नावांपासून लांब असणाऱ्या तडीपारी आणि चाकूला ग्लॅमर मिळवून दिलेल्या मुन्ना देशमुख या अस्सल मराठमोळ्या लव्हगुरुने तब्बल दोन पिढ्यांना "नासिक हो या बंबई.. लडकीयां लडकीयां होती हैं, पटाने का तरीका आना चाहीये..." म्हणत प्रेम करायचं शिकीवलं.

तरी या इथे मुन्ना देशमुख ला स्मरून दोन ओळींतून भावना व्यक्त करून चार शब्द संपवतो, "धिना धिन धा .. चुकलं वाटतं :प

"केह दो के तुम हो मेरी वरना, जिना नही मुझे हैं मरना... ( हे अगदी आतून मातीसारखं शाश्वत न उसासारखं निर्मळ ) ... "

..........

तरी कळावे,

तुझा होणारा पती परमेश्वर.

- आकाश चटके

.........................

आजच्या 'मंथन'मध्ये राम जगताप यांनी 'डिजिटल रडकथा' नावानं शीर्षक लेख लिहला आहे. यात मराठी साहित्य व लेखनासंबधी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. लेखन साहित्य व पुस्तकं प्रचारित करण्यामागे प्रकाशक व साहित्यिकांची उदासिनता लेखात अधोरेखित करण्यात आली आहे. या निमित्तानं एक मला इथं नोंद कराविशी वाटते. लेखन पुनर्प्रकाशित (री-प्रिंट) करण्यासाठी लेखक कुटुंब व प्रकाशक फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे अनेक दुर्मिळ पुस्तकं अभ्यासकापर्यंत पोहचत नाहीत. अशी दुर्मिळ पुस्तकं निवडक अभ्यासक विचारवंताकडे आहेत, (दिलं तर) त्याच्या झेरॉक्सवर भागवावं लागतं. मराठीत सध्या संदर्भ ग्रंथाचा मोठा वानवा आहे.

पुण्यात फर्ग्युसन, गोखले, जयकर आणि डेक्कन ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत. पण तेही वाचायला सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. अनेक इंग्रजीचे मराठी अनुवाद ग्रंथालयात उपलब्ध आहेत, पण ते वाचकांपर्यंत पोहचत नाहीत. मराठी साहित्य व संस्कृती मंडळाची अनेक दुर्मिळ पुस्तकं आज बाजारातून अदृष्य आहेत. परिणामी वाचक व अभ्यासक या मोलाच्या मजकूरापासून बराच लांब आहे. यामुळे अलिकडे दुय्यम संदर्भावरील लिखाण वाचकांच्या माथी मारलं जात आहे. लिखाण सकस व दर्जेदार होण्यासाठी अशी पुस्तकं वाचक, अभ्यासकापर्यंत येणं महत्वाचं आहे.

- कलीम अझीम

....................................................

सुदाम राठोड या अजून एका 'ऊसप्रेमी (!)' फेसबुक्याने ऊस उद्योगावर जळजळीत पोस्टी टाकण्याचा सपाटा सुरू केलाय..
त्यातला पक्षीय भाग व त्यांचा संदर्भीय राग सोडून देतो.
आज त्यांनी एक मुद्दा मांडला की ऊसतोडणी कामगारांसोबत बागायतदारांची वागणूक अरेरावीची व तुच्छतेची असते ..

त्यांनी इतर जे पिळवणूकीचे मुद्दे मांडले त्याच्याशी सहमत आहे. फक्त ऊस बागायतदारांच्या भागाबद्दल बोलू.

माझा स्वतःचा दरवर्षी 8-10 एकर ऊस असतो त्यामुळे हे उंटावरून शिकवलेले शहाणपण नाही हे आधीच स्पष्ट करतो.

आमच्या मनात ऊस तोडणी कामगारांबद्दल नेहमी आदराचीच भावना असते. ही लोकं पहाटे 2-3 लाच फडात पोहोच होतात. सकाळी उजडायला बैलगाडी भरून तयार असते. ट्रॅक्टर ट्रकचे टोळीवाले तर दिवसातून 2-2 खेपांचा ऊस तोडतात. एवढे अपार कष्ट उपसणाऱ्या ऊस तोड कामगारांबद्दल आम्हाला कौतुक मिश्रित औत्सुक्य असते. आम्ही फडात दोन वेळा प्रेमाने किटल्या भरून चहा पोहोच करतो. फड फोडताना पूजा करून यथाशक्ती भरघोस दक्षिणा ठेवतो. टोळ्यांना स्वयंपाकासाठी, खोपी उभारण्यासाठी लाकूडफाटा देतो. वाहन फडातून बाहेर निघेपर्यंत सगळी आवश्यक यंत्रणा राबवून त्यांची काळजी घेतो. बरेचदा शेतकरी व तोडणीवाल्यांत फार जिव्हाळ्याचे संबंध बनतात. माझा शेजारी तोडणी कामगारात एवढा रमलाय की मागच्या 10 वर्षात 10-12 वेळा बीडला जाऊन आलाय. लग्न वगैरे कार्यक्रमांसाठी, ती लोकही एवढ्या लांबून याच्या कारणाला येत जात असतात. अशी खंडोगणती उदाहरणे आहेत.

वाड्याच्या वाटणीचा मुद्दा असा आहे की 16 महिने काळीज काट्याने ऊस सांभाळणारा शेतकरी पिकाचा मालक की एक दिवस तोडणारा तोडणी कामगार ? 
फार पूर्वी तोडणी कामगारांना बैलापुरते वाडे मिळे. मग कारखान्याने तिसऱ्या हिश्श्याचा नियम केला. तिसरा हिस्सा तोडणीवाल्याना. मग निम्मे निम्मे हिस्से होऊ लागले. सध्या 2 भाग तोडणी कामगार व 1 भाग शेतकरी असं वाटप असतं. तेही ज्याला गुर ढोर आहेत तोच शेतकरी वाडे घेतो. इतर त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत.

बाकी तोडणी वाहतुकीचा परतावा कमी मिळणे जास्त मिळणे या बाबी शेतकऱ्याच्या अखत्यारीतल्या नाहीत. आम्हाला दर कमी मिळतो म्हणून आम्ही तोडणी कामगारांना शिव्या देत नाही.

तर सांगायचा मुद्दा तोडणी कामगार व बागायतदार यांच्यात अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध असतात. काही अपवाद असू शकतात. तसे अपवाद तोडणी कामगारांच्या बाजूनेही असतात. कारखाना बंद होताना, किंवा ऊस जास्त असल्याच्या काळात शेतकऱ्यांची कशी पिळवणूक केली जाते याची दोन्ही बाजूंना कल्पना आहे. 
पण असे अपवाद सोडले तर बाकी सगळं ऑलवेल असतं.

पण असं गोड गोड व छान लिहिलं तर कॉन्ट्रोव्हर्सी कशी होणार? दुःखाची, शोषणाची कहाणी रंगवून रंगवून व विव्हळत सांगायला विचारवंतांना आवडते. पण आपल्या या उंटावरून केलेल्या द्वेषपूर्ण लेखनाचा दोन परस्परावलंबी व सौहादर्याने नांदणाऱ्या समुदायांवर विपरीत परिणाम होणार नाही याची उंटावरील विचारवंतांनी काळजी घ्यायला हवी..

- सुहास भुसे

.........................

मागेसुद्धा लिहिलेलं, परत एकदा लिहितो. सेनेनी स्वबळावर लोकसभा निवडणुका लढवल्यामुळे सेनेचं जे काही नुकसान व्हायचं ते होऊ दे, पण भाजपचं मात्र अपरिमित नुकसान होईल. NDA च्या म्हणून मिळालेल्या जवळपास वीस एक जागा कमी होतील, परत सेनेच्या अगदी काही 7-8 निवडून आल्या तरी भाजपला बसलेला एकत्रित फटका 28-30 पर्यंत जाईल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक विधानसभेत जर भाजपचा पराभव झाला तर लोकसभेला भाजप काही निर्विवाद बहुमत मिळवत नाही. अगदी 15 जागा कमी पडतीलच. बहुमतासाठी पाठिंबा हवा असल्यास मोदी पंतप्रधान नसतील तर पाठिंबा देऊ, अशी अट सेना वा तत्सम पक्ष टाकू शकतात. आणि मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भाजपचं काही खरं नाही. त्यामुळे सेनेनी निवडणूक स्वतंत्र लढवली तर साऱ्या भारतातील भाजपची अवस्था केविलवाणी होऊ शकते.
- हे इक्वेशन मूर्ख भक्तांना जरी समजत नसले तरी शाह-मोदींना नक्कीच समजतं. याचाच अर्थ सेनेने युती तोडू नये यासाठी भाजप नेते अगदी गुडघ्यावर बसलेले बघायला मिळतील येत्या काही महिन्यांत...

- सुनील अकेरकर

.........................

वयात आलेली पोरगी जेव्हा आपली फाटलेली चड्डी उसवलेल्या पायजम्याच्च्या खाली दोरीवर वाळत घालते...
तेव्हा तिळ तिळ तुटतंय काळीज दादा....
आपल्या पोरांस्नी आपण कापडं पण... घेऊ शकत नाही....
आणि हे गेल्या तीन चार वर्षांत झालंय दादा....
उसाची बिलं ब्यांकात येऊन पडल्यात.... पण हे आयझवाडे बिलं सोडना झाल्यात....
पंचविशस्सै क्का तीन हजार एफ आर पी चा घोळ घालायल्यात.....
अक्षरशः दादा.....
हे सगळे मंत्री संत्री आणि शेतकरकयांचै भिक्क्रारचोट्ट नेते यांच्या आयच्या गांडीत पाय घालून...
तो आतल्या आत गोल गोल फिरवून बाहेर काडावासा वाटतोय दादा....

दादा निशब्द....

आताच आलेला गावच्या शेतकरी मित्राचा फोन....
सामान्य माणसाच्या या भावना आहेत या सरकारबद्दल आणि तथाकथित शेतकरी नेत्यांबद्दल....

- माणिक कुरणे

.......................................................................

भारतीय लष्कराशिवाय,  केवळ तीनच दिवसात सुसज्ज लष्कर तयार करणे एखाद्या संघटनेस शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा शस्त्रास्त्रांचा मोठा साठा एखाद्या संघटनेकडे असेल.

 

भारत सरकारने फ्रान्सबरोबर केलेले राफेल विमानाचे डील हे भारतीय लष्कारासाठी केले आहे की, तीन दिवसात लष्कर उभारण्याची क्षमता असणाऱ्या संघटनेसाठी केले आहे हे समजायला मार्ग नाही.

 

कदाचित यामुळेच संरंक्षण मंत्र्यांनी या डीलबाबत माहिती देण्यास इन्कार केला असावा. मालेगाव बॉम्बस्फोटातील सन्माननीय आरोपी श्री. पुरोहित यांच्यावर कांही वर्षांपूवी लष्करातील शस्त्रास्त्र साठ्याबाबत हेराफेरी केल्याचा आरोप झाला होता, त्याबाबतची चौकशी न्यायालयीन निर्णयाधीन आहे. त्यातून ते बाहेर पडेल ते कितपत गंभीर वा आनंददायक असेल ते काळच ठरवेल!

 

परंतु एखाद्या संघटनेने  जी सामरीक तयारी भारतीय लष्कराला करण्यास अनेक दिवस लागतात ती तयारी केवळ तीन दिवसात करू शकतो म्हणणे, म्हटलं तर गंभीर आहे आणि म्हटलं तर देश आतूनही (?) प्रखर, प्रबळ, सुसज्ज राष्ट्र बनला असल्यामुळे म्हटलं आनंदी होण्यासारखेही आहे, नव्हे का?

 

बरं असं स्टेटमेंट एखाद्या संघटनेतर्फे सन 2014च्या पूर्वी आले नव्हते तर ते 2014 नंतर चार वर्षांनी आले आहे. लष्करातील शस्त्रास्त्रसाठा देशाभरातील ठिकाणाहून गोळा करायला नेमका किती कालावधी लागतो, याचे गणित मला माहीत नाही!

 

शिवाय तुम्हांला ज्या बाबीस सहा सात महिने लागतात त्या आम्ही तीन चार दिवसांत करतो, हा इशारा देशाच्या शत्रुला आहे की, प्रत्यक्ष लष्कराला आहे? या वाक्याने धडकी तर भारतीय लष्करालाच भरली असेल अशी शक्यता वाटते.

 

- राज कुलकर्णी

.........................

सौ. दिपाली दिलीप कोल्हटकर वय ६५. आजाराने ग्रासलेले सत्तर वर्षीय विख्यात नाटककार पती आणि वृद्धत्वाने जर्जर झालेल्या आईच्या सेवासुश्रुषेत तीन वर्षापासून मनोभावे अविरत व्यस्त.

किसन मुंडे वय १९. राहणार भूम जिल्हा उस्मानाबाद. दुष्काळी गावात जन्मलेल्या वाढलेल्या किसनच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य. पुण्यातील एका महाविद्यालयात बीएचा विद्यार्थी. राहण्याचा, जेवणाचा आणि शिक्षणाचा भार परवडत नसल्याने केअर टेकरची नोकरी .

किसन आणि त्याचा आणखी एक सहकारी बारा तासाची ड्युटी कोल्हटकर यांच्या घरी बजावत असे. काम करून भूक लागल्यावर कधी कधी ते या वृद्ध स्त्रीला खाण्याच्या जिनसा मागत. त्यांना कदाचित ते परवडत नसेल वा त्यांच्या अटीशर्तीत याचा उल्लेख नसेल. त्यामुळे दिपाली कोल्हटकर कधी खायला देत तर कधी देत नसत. 
गुरुवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दिवसभर उपाशी असलेल्या किसनने दीपालींकडे खायला मागितले. नंतर चहा मागितला. आधीच कातावून गेलेल्या दिपालींनी त्याला नकार दिला. भुकेने कासावीस झालेल्या किसनने आपले संतुलन गमावले. त्याचा विवेक नष्ट झाला आणि संतापाच्या भरात त्याने दिपाली कोल्हटकरांना गळा आवळून डोक्यात अवजड वस्तूने प्रहार केला. वृद्ध दिपाली हा हल्ला सहन करू शकल्या नाहीत. घाबरलेल्या किसनने त्यांना जाळून टाकले.
आपल्याला नोकरी देऊन आपल्या उदरनिर्वाहास हातभार लावणाऱ्या निष्पाप जीवाची क्रूर हत्या करणाऱ्या किसनचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही वा त्याला सहानुभूती देता येत नाही. त्याला कायद्याने कठोर शिक्षा होणं अपेक्षित आहे.

बकाल महानगराच्या दिशेने अजस्त्र वेगाने धावत सुटलेल्या पुण्यात अंथरुणाला खिळून असलेल्या एका प्रतिभाशाली नाटककाराच्या पत्नीला एक वेळच्या अन्नापायी, चहापायी ठार मारले जाते.
विद्येच्या माहेरघराची देदीप्यमान झळाळी उडून व्यावसायिक आणि बाजारू शिक्षणाची चकाकती कल्हई जडलेल्या पुण्यात एका दुष्काळी गावातून गरीब घरचा विद्यार्थी येतो. त्याला खर्च भागवता येत नाही आणि या भुकेल्या जिवाकडून एका निरपराध आणि सात्विक जीवाची हत्या होते. 
महाराष्ट्राच्या पुण्यभूमीचा ठसा पुसला जाऊन सार्वजनिक बेबंदशाहीची धग झेलणाऱ्या पुण्यात एका घरात दोन आजारी माणसं बिछान्याला खिळून असतात, तिथं त्यांचं एक जीवाभावाचं माणूस मारलं जातं आणि निर्जीव शहर आपल्याच तालात जगत राहतं. 
दिपाली कोल्हटकर खून प्रकरणात आज हाती आलेली ही माहिती अंतर्बाह्य हादरवून टाकणारी आणि सुन्न करणारी आहे.

वरवर हा एक व्यक्तिगत गुन्हा आहे पण बारकाईने पाहिले तर हा एक सामाजिक मर्डरही आहे ज्याचा दोष केवळ व्यवस्थेवर ढकलून चालणार नाही. हवं ते दिलं नाही तर बेभान होणाऱ्या तरुणाईचा आणि असंवेदनशील, कोरड्या ठाक स्वभावाच्या सर्व माणसांचा, अत्यंत टोकाचा प्रॅक्टिकल दृष्टीकोन बाळगणाऱ्या लोकमानसाचा या मर्डरमध्ये थोडाफार वाटा आहे जो कुठेच दिसून येत नाही पण प्रत्यक्षात खोलवर लपून आहे !

दिपाली कोल्हटकर स्वयंपाकघरात जळत होत्या तेव्हा देवघरातली निरांजने खाली पडली होती... आजच्या काळात बहुतांश माणसांनी सर्व आचार विचार गुंडाळून ठेवलेत. पण रोज देवपूजा केल्याशिवाय अन्नग्रहण न करणाऱ्या दिपाली जळत होत्या तेव्हा देव्हाऱ्यातील देवही कळवळले का हे कळायला मार्ग नाही. अंथरुणाला खिळलेल्या दिलीप कोल्ह्टकर आणि आशा सहस्त्रबुद्धे या दोन जीवांनी काय गमावले आहे हे सांगायला बृहस्पतीकडचे शब्दभांडार थिटे पडावे..

या घटनेचे आणि किसनच्या हतबल परिस्थितीचे एकीकडे दुःख वाटले तर त्याच्या अविवेकी आणि कृतघ्न मनस्थितीचा संताप वाटला. मी ही याचा काही अंशी दोषी आहे का याचे आत्मचिंतन मी केलं पाहिजे...

- समीर गायकवाड

(या पोस्टचे भांडवल करून ब्राह्मण - बहुजन, शेतकरी - नोकरदार, सरकार - विरोधक, ग्रामीण - शहरी असे वाद उत्पन्न करण्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण झाली तर आपण विकृत आहोत याची त्यांनी पक्की खुणगाठ बांधून घ्यावी)

.........................

 प्रतिक्रिया द्या3144 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर