निव्वळ वायू.. सांप्रदायिक.. नन्याची चपराक..
मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, मार्मिक विचार आणि विनोद असा सकाळच्या दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

सु शी किंवा सु डोंगपो हा अकराव्या शतकातला बुद्धविचारांचा अभ्यासक होता. तो झेन साधक होता. फोयिन नावाच्या झेन महंताचा तो मित्र होता. एका नदीच्या दोन तीरांवर ते राहात होते. सु डोंगपोला झेन विचारांच्या आकलनात काही अडचण आली की तो फोयिनचा सल्ला घ्यायचा.

एकदा डोंगपोला एक कविता सुचली.

मी वंदन करतो स्वर्गांतरीच्या स्वर्गाला

विश्वप्रकाशी सूक्ष्म किरणांना

आठ वारेही हलवू शकत नाहीत

जांभळ्या स्वर्णिम कमलारुढ मला

असा साधारण त्या कवितेचा आशय होता. त्यात कवीला हलवू न शकणारे आठ वारे होते स्तुती, निंदा, मान, अवमान, लाभ, हानी, सुख आणि दु:ख. भौतिक जगातल्या या घटकांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही, आपण अशा उच्चपदावर पोहोचलो आहोत, असा दावा ही कविता करत होती.

इतकी सुंदर कविता आपल्या हातून लिहून झाली, याने आनंदलेल्या डोंगपोने ती तात्काळ एका शिष्याकरवी फोयिनकडे पाठवली. तो या कवितेचं किती कौतुककरील, याची कल्पना तो करत असताना फोयिनने ती वाचल्यानंतर त्याहस्तलिखितावर 'पाद' असं लिहून ते सू डोंगपोकडे परत पाठवून दिलं.

डोंगपोने ते वाचलं आणि त्याचं मस्तकच फिरलं. आपण इतकं सुंदर आध्यात्मिक कवन लिहिलं आणि इतक्या कौतुकाने फोयिनकडे पाठवलं. त्याला कौतुक करता येत नसेल, तर त्याने ही कविता म्हणजे निव्वळ 
पोटातला वारा सरणं आहे, असं म्हणून तिचा अवमान तरी करायला नको होता. तो क्रोधायमान होऊन फोयिनकडे याचा जाब विचारायला निघाला.

नदीकिनारी पोहोचल्यावर त्याने नावाड्याला हाक दिली. ताबडतोब पलीकडच्या किनाऱ्यावर गेला आणि पाय आपटत फोयिनच्या कुटीकडे निघाला. त्याची गचांडी धरून त्याला माफी मागायला लावण्याचा त्याचा इरादा होता. फोयिनच्या कुटीजवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की फोयिन घरी नव्हता. त्याने दारावर डोंगपोसाठी चिठ्ठी लिहिली होती.

तिच्यात दोनच ओळी होत्या…

आठ वारे हलवू शकत नाहीत मला
एका पादाने मात्र लावले नदी ओलांडायला

डोंगपो जागीच स्तब्ध झाला.

त्याचा सगळा क्रोध निचरा होऊन गेला.

तो विचार करू लागला, आपण अष्टभावांपासून मुक्तता झाल्याचा दावा करतो आहोत कवितेत आणि इतक्या क्षुल्लक गोष्टीने इतके भडकू कसे शकलो? आपलं चित्त कसं क्षुब्ध होऊ शकलं? मग आपली कविता अर्थहीन शब्दांची माळच नाही का? ती निव्वळ पोटातून सरणारा वायूच नाही का?

...................................

ओशोच्या एका मित्राने त्याला सांगितलं, माझी आई अतिशय धार्मिक आहे.

ओशो म्हणाले, अरे वा, ही फारच चांगली गोष्ट आहे. धार्मिक माणूस अतिशय दुर्मीळ असतो. अशी व्यक्ती पाहायला मलाही आवडेल.

त्या मित्राघरच्या मुक्कामात आईने ओशोंना विचारलं, तू काय वाचतोयस?

ओशो एका परधर्माच्या धर्मग्रंथाचं वाचन करत होते. ते नाव ऐकताच आईचा चेहरा क्रुद्ध झाला आणि ती म्हणाली, तुला आपल्या धर्मातली पुस्तकं नाही मिळाली का वाचायला?

ओशोंनी त्याच्या मित्राला सांगितलं, मित्रा, तुझी आई अतीव सांप्रदायिक आहे, ती धार्मिक नाही आणि हेच विचार राहिले, तर ती कधी धार्मिक बनू शकेल, असं मला वाटत नाही.

............................

जगद्‌गुरू श्री श्री श्री श्री सोकवेंद्राचार्य महाराज काही भक्तभाटांसह समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्तदर्शनाला गेले, तेव्हा छोटा नन्या तिथे वाळूत आपलं नाव लिहित होता.

जगद्‌गुरूंना जिथे तिथे ग्यान देत फिरण्याचा छंद असतोच.

त्यांनी ही संधीही दवडली नाही. ते नन्याला म्हणाले, बेटा, अरे वाळूत नाव लिहून काय होणार? हवेच्या एका थपडेने ही वाळू विखरून जाणार. तुझं नाव पुसलं जाणार. मेहनत वाया जाणार. नावच लिहायचं तर ते कणखर शिळेवर कोरून ठेव, फत्तरावर कोरून ठेव. काळ्या दगडावरची रेघ बनव.

भक्तभाटांनी ब्रह्मज्ञान झाल्याच्या आविर्भावात कृतकृत्य होत्साते एकमेकांकडे पाहिलं.

ही नको नकोशी पचपच ऐकून पकलेला नन्या अतिशय विनम्रतेने स्वघोषित जगद्‌गुरूंना म्हणाला, काका, तुमच्या शाळेत सायन्स वगैरे नव्हतं का? ही वाळूही आधी कणखर काळा दगडच होती आणि या किनाऱ्यावरच्या कोणत्याही काळ्या दगडाची पुढे वाळूच होणार आहे.

................................................................प्रतिक्रिया द्या1070 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर