कॅन्सरला समजून घेताना..
सोमवार , १२ फेब्रुवारी, २०१८ सायली राजाध्यक्ष

कॅन्सर झालेले आणि त्यातून पूर्ण बरे झालेलेही अनेक असले तरी हा विकार हलवून टाकतो. लोकप्रिय ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांना अलीकडे याबाबत आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत..

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. काल माझी प्राथमिक ट्रीटमेंट पूर्ण झाली. सुदैवानं माझा कॅन्सर लोकल असल्यानं आणि लवकर कळल्यानं मला किमोथेरपी घ्यावी लागली नाही. मला फक्त रेडिएशन घ्यावं लागलं. या दोन महिन्यांच्या काळात मी वेगवेगळ्या मानसिक अवस्थांमधून गेले. सुरुवातीचा धक्का, त्यानंतरचा हताशपणा, नंतरचा सुन्नपणा आणि भीती, हळूहळू आजाराचा अर्थबोध, ट्रीटमेंट घेतानाचे अनुभव हे सगळं माझ्या एरवीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारं होतं. कॅन्सर हा शब्दच तुम्हाला हादरवून टाकतो. या आजाराची अनिश्चितता भेदरवणारी असते. आपल्या रोजच्या आयुष्याकडे, नातेसंबंधांकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतो. काही नात्यांचं महत्त्व तर उमगतंच पण काही नात्यांमधला फोलपणाही तितक्याच तीव्रतेनं जाणवतो.

या दोन महिन्यांच्या काळात मी काही टिपणं केली. ही टिपणं अर्थातच माझ्या त्या-त्या वेळच्या अनुभवांवर आणि मनात चाललेल्या गोंधळावर आधारित आहेत. ती मी शेअर करणार आहे. आजाराच्या स्टेजेस, त्यावरचे उपचार यापेक्षाही माणसाचं म्हणजे अर्थातच माझं आणि या आजाराला सामोऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचं मन कशातून जातं हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे.

आयुष्य हे अनिश्चित आहे हे मला माहीतच आहे. पुढे काय होणार आहे ते मला माहीत नाही तितकंच माझ्या डॉक्टरांनाही माहीत नाही. पण आज मी धडधाकट आहे हे नक्की.

१.
इंग्रजीत एक म्हण आहे – जेव्हा तुम्ही बेसावध असता तेव्हा जे घडतं ते म्हणजे आयुष्य. याचा प्रत्यय प्रत्येकाला कधी ना कधी येतच असतो. माझ्याही बाबतीत तसंच झालं. 
नोव्हेंबर संपत आला होता. नुकतंच साड्यांचं मोठं प्रदर्शन झालं होतं. दिवाळी अंकही प्रकाशित झाला होता. त्या गडबडीतून मोकळी झाले होते. आता काही दिवस काहीच करायचं नाही, फक्त आराम करायचा असं मनोमन ठरवलं होतं. नोव्हेंबरच्या शेवटी औरंगाबादला जाणार होते. कलापिनीचं गाणं होतंच शिवाय दोन दिवस आईबाबांबरोबर वेळ घालवावा असंही वाटत होतं. डिसेंबरच्या १५ तारखेला निरंजनला गोव्यात एक पुरस्कार मिळणार होता. त्यानिमित्तानं आम्ही दोघे ४ दिवस गोव्यात राहाणार होतो. तिकिटं काढलेली होती. १५ ते २१ जानेवारी काही मैत्रिणींबरोबर आसाम आणि मेघालयला जायचं ठरलं होतं. फ्लाइट तिकिटंही बुक करून झाली होती. एकूण फक्त आरामाचा मूड होता.

२४ तारखेला औरंगाबादला जाणार होते. २३ तारखेला डाव्या ब्रेस्टमध्ये एक लहानशी गाठ लागली. गाठ म्हणावी की नाही इतकी लहान. दोघी मुलींना दाखवली, त्यांना काही ती लागली नाही. आपल्याच मनाचे खेळ आहेत असं म्हणून औरंगाबादला जाऊन आले. आल्यावर ते काही मनातून जात नव्हतं. इतर तपासण्याही करायच्या होत्या म्हणून गायनाकॉलॉजिस्टकडे गेले. त्यांनाही ती लागली नाही. घरी आल्यावर निरंजन आणि मुली म्हणाल्या की गायनाकॉलॉजिस्टनंही सांगितलं ना की काही नाही, मग आता मनातून काढून टाक.

मी मनातून तो विचार झटकून काढायचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण मनावर विचित्र असं मळभ आलं होतं. कशातच आनंद वाटत नव्हता. हे नॉर्मल नाहीये असं मन परत परत सांगत होतं. शेवटी एक दिवस न राहवून माझ्या सासुबाईंची ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांना मेसेज केला. त्यांनी संध्याकाळी भेटायला यायला सांगितलं. संध्याकाळी त्यांच्याकडे गेले, ते म्हणाले की तुझ्या मनाचे खेळ नाहीयेत, लहानसं काहीतरी आहे, तपासणी तर करायलाच हवी.

दुसऱ्या दिवशी डिसेंबरच्या अवकाळी धो-धो पावसात मॅमोग्राफी करायला गेलो. त्या डॉक्टरबाईंनी व्यवस्थित मॅमो केलीच शिवाय सोनोग्राफीही केली. त्या मला म्हणाल्या की अगदी लहान गाठ आहे पण ती बरी नाहीये. यू आर लकी! ताबडतोब काढून टाका. मी त्यांना विचारलं की मॅलिग्नंट आहे का? त्या हो म्हणाल्या.

त्यांनी जे सांगितलं त्याचा अर्थबोध व्हायला काही वेळ जावा लागला. त्या नेमकं काय म्हणाल्या ते क्षणभर आठवेचना. कॅन्सर झालेला असं कळतं? मी, निरंजन आणि माझी बहीण भक्ती असे तिघे गेलो होतो. काहीही न बोलता घरी परत आलो. कसंतरी जेवले.

संध्याकाळी परत डॉक्टरांकडे गेले. रिपोर्ट बघून ते म्हणाले की सर्जरी करावीच लागेलच. जो रिपोर्ट आहे त्यानुसार अशा गाठींमधल्या १० पैकी नऊ गाठी कॅन्सरच्याच असतात. त्यांना मी म्हटलं की कधी करूया सर्जरी? ते म्हणाले की घाई नाहीये, आठवड्यानं केली तरी चालेल. मी त्यांना म्हटलं की, मला अजिबात थांबायचं नाहीये. तुम्ही उद्या म्हणालात तर मला उद्या चालणार आहे. शेवटी ऑपरेशनच्या आधीच्या टेस्ट्स करण्यासाठी आणि इन्शुरन्सच्या कामासाठी दोन दिवस जातील हे गृहीत धरून दोन दिवसांनंतर सर्जरी करायची ठरली. तशी शुक्रवारी सर्जरी झाली. शनिवारी मी घरीही आले.

काल माझ्या सर्जरीला एक महिना झाला. बायॉप्सी रिपोर्टप्रमाणे मला फक्त रेडिएशन घ्यायचं आहे. सर्जरीच्या चौथ्या दिवसापासून मी खाली उतरायला लागले. आठव्या दिवसापासून वॉक घ्यायला लागले. आता मी रोज ५-६ किलोमीटर चालते. व्यवस्थित खाते. बाहेर जाते. घरातली सगळी कामं करते. पुढे काय होईल ते आज मला माहीत नाहीये. किंबहुना ते कुणालाच माहीत नसतं.

मी हे का लिहितेय? माझा धाडसीपणा सांगण्यासाठी? लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी? तर नाही. हे लिहिण्यामागे माझा एकमेव उद्देश हा आहे की कॅन्सर कुणालाही होऊ शकतो. जी गोष्ट झाली आहे ती आपण बदलू शकत नाही. पण त्याला कसं सामोरं जाता येईल याचा विचार तर आपण नक्कीच करू शकतो. मी इथे धैर्यानं सामोरं जा असं म्हणणार नाहीये. कारण हे धैर्य गोळा करणं फार कठीण आहे. पण मी असं नक्की सांगेन खुल्या मनानं सामोरं जा. त्याच्या उच्चाटनासाठी जे काही करणं शक्य आहे ते करा. या आजारात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो उपचारांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन.

 प्रतिक्रिया द्या7690 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर