जमीनदाराचा मुलगा.. व्हॅलेंटाइन डे.. शहाणीव
सोमवार , १२ फेब्रुवारी, २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, विनोद आणि मार्मिक विचार असा सकाळच्या दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

टॉलस्टॉयची एक गोष्ट.

एका जमीनदाराचा एक मुलगा लहानपणी घर सोडून पळून गेला होता. जमीनदार खूप व्यथित होता. त्याने त्याचा शोध चालवला होता. अनेक वर्षं तो माणसं पाठवत होता, गुप्तचर नेमत होता, पोलिसांत तक्रारी केल्या होत्या. अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या.

जवळपास वीसेक वर्षांनी त्याला मुलाचं पत्र आलं. मी घरी परत येतोय. अमुक दिवशी अमुक वाजताच्या रेल्वेने येईन. मला घ्यायला स्टेशनवर या.

ट्रेन मध्यरात्रीच्या सुमारास पोहोचत होती. जमीनदार बग्गी जुंपून तिथे पोहोचला. ट्रेनची येण्याची वेळ दोन तासानंतरची होती. स्टेशनात थांबून वाट पाहावी लागणार होती. त्या छोट्याशा स्टेशनचा स्टेशनमास्तर त्याच्या परिचयाचा होता. तो जमीनदाराच्या सेवेत हात बांधून रुजू झाला. त्याला घेऊन वेटिंग रूममध्ये पोहोचला. त्या रूममध्ये भिकाऱ्यासारखी लक्तरं घातलेला, तापाने फणफणलेला, बेशुद्धीच्या सीमेवर पोहोचलेला एक तरुण प्रवासी मुटकुळं करून पडला होता. जमीनदार म्हणाला, त्याला बाहेर काढा.

स्टेशनमास्तराने हमालांच्या साह्याने त्या तरुणाला बाहेर जिन्यापाशी नेऊन ठेवलं. जमीनदारसाहेब स्टेशनमास्तराशी गप्पागोष्टी करत मुलाची वाट पाहात बसले. आपल्या मुलाच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे भरून येत होते, हृदयातून आनंदाची कारंजी उसळत होती. आपल्या मुलाला इतक्या वर्षांनी भेटणार, याची उत्साही उत्सुकता त्यांच्या वर्तनातून दिसत होती.

तिकडे तो तरुण त्या थंड रात्री उघड्यावर कुडकुडत पडला होता. पहाटेपर्यंत त्याच्या कुडीतून प्राण निघून गेले. सकाळच्या वेळी कोणाच्या तरी लक्षात आलं. सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. त्याच्या अंगावरच्या कपड्यांची, पिशव्यांची तपासणी झाली, तेव्हा त्यातून एक चिठ्ठी बाहेर पडली. त्यावरून लक्षात आलं की हा त्या जमीनदाराचा मुलगा होता. दोन तास आधीच्या ट्रेनने लवकर पोहोचला होता. वडिलांची वाट पाहात थांबला होता.

वेटिंग रूममध्ये अधीर मनाने हुक्का पीत असलेल्या वडिलांना ही खबरमिळाली, तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला. ते निष्ठुर नियतीला बोल लावू लागले. थंडीच्या दिवसांत कुडकुडत पडलेला, आजारी माणूस आपलाही कोणी असू शकतो, ही शक्यता आपण कधीच लक्षात घेत नाही, हे तेव्हाही त्यांच्या लक्षात राहिलं नव्हतंच.

................................................

बगाराम विव्हळत होता. शेखचिल्ली त्याच्या पाठीवरच्या वळांवर मलम लावत होता.

शेखचिल्ली म्हणाला, बग्या, लेका तुझा मालक दर दोन दिवसांआड तुला चोपतोय, वाईट-वंगाळ बोलतोय आणि तू लेका तिथंच मरायला जातोस रोजरोज. सोड की नोकरी.

बग्या म्हणाला, शेख्या, लेका तुला माझी स्ट्रॅटेजी कळत नाही. आता चार दिवसांनी बघ तूच मला म्हणशील, लगा बरं केलंस मालकाला सोडला नाहीस.

शेखचिल्लीने विचारलं, कसली स्ट्रॅटेजी रे एवढी?

बग्या म्हणाला, अरे तू विचार कर. साहेब सारखा कामात असतो. त्यांच्या देवाची पूजा करायची असते, मला पूजेला बसवतो. कुठल्या मंदिरात अभिषेक करायचा असला, तर मला पाठवतो. मागे त्याची आई सिक झाली, तर याला वेळ नव्हता; महामृत्युंजय पाठ करायला मला बसवला. याने नवस बोलला की प्रदक्षिणा मारायला मी जातो.

शेख्या म्हणाला, अरे पण यातून तुझा फायदा काय?

बग्या डोळे मिचकावून म्हणाला, सायबाने एक फाकडू पोरगी गटवलीये. आता दोन दिवसांनी व्हॅलेंटाइन डे येणार. पोरगी बागेत नाहीतर घरी भेटायला बोलावणार… साहेबाला वेळ नसणार… मग साहेब तिच्याकडे गिफ्ट घेऊन प्रेम करायला कोणाला पाठवणार? बोल बोल…

................................

ओशो म्हणतो,

पांडित्य म्हणजे अमरवेल.

स्वत:चं असं काही नाही... सगळं परपुष्ट.
जमिनीत मुळं नाहीत, विस्तार नाही.

शहाणीव मात्र जमिनीत रोपासारखी रुजते आणि अनुभवाच्या खतपाण्यावर पोसते.

..................................................

 प्रतिक्रिया द्या1808 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर