जज रोजमेरी- चाकोरीबाहेरची न्यायदात्री
सोमवार , १२ फेब्रुवारी, २०१८ महावीर पाटील

न्यायाधीशाने कसे वागावे याबद्दल स्पष्ट संकेत आहेत. मात्र, नॅस्सर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश रोझमेरी यांनी ते संकेत मोडले. कारण, सामाजिक जाणीव त्यांना अधिक महत्त्वाची वाटली.

"न्यायालयात जज रोजमेरी (Rosemarie Aquilina) यांनी आरोपी लॅरी नॅस्सर याचे पत्र वाचून उडवून दिले". माझ्या CNN च्या अॅपमध्ये नोटिफिकेशन आली. बातमीच्या बाजूला चित्रा ऐवजी छोटी जिफ फाईल क्लिप झळकत होती - जज रोजमेरी काहीशा अविर्भावात एक पत्र उडवून देत होत्या. मग त्या संदर्भातला  व्हिडीओ पूर्ण बघितला- पत्रातला मजकूर वाचून झाल्यावर जज रोजमेरीने लॅरीकडे पाहत त्याचे पत्र उडवून दिले, तुझे हे पत्र माझ्या लेखी या लायकीचे आहे असा तो अविर्भाव होता. अर्थात त्याची बातमी झाली. आधीच लॅरी नॅस्सर हे प्रकरण इतकं लक्षवेधी ठरलं होतं अमेरिकेत, ते होतंच तितकं मोठं आणि वाईट पण जज रोजमेरी अशा काही पद्धतीने प्रकट होत होत्या की हे थोडं वेगळंच वाटत होतं. मीडियाला कोर्ट प्रोसिडिंग कव्हर करण्याची मुभा होती त्यामुळे लोकांना सगळं लाइव्ह आणि नंतर न्यूज चॅनेल किंवा यूट्युब वर पाहता येत होते. या आधीच्या काही व्हिडीओ मी पहिल्या होत्या जेव्हा जज रोजमेरी यांनी नॅस्सरला वाईट झापलं होतं पण हा पेपर उडवून देण्याचा प्रकार पाहून पाहताक्षणी मला वाटलं की जजने आरोपीला अशी अपमानास्पद आणि काहीशी तुच्छतेची वागणूक देणं हे त्यांच्या पदाला अनुसरून वाटत नाही पण काही मिनिटे विचार केल्यावर जज रोजमेरी जशा प्रकट होत होत्या (त्यांच्या पदाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन) ते योग्यच होतं आणि गरजेचं होतं असं वाटलं. त्या फक्त न्यायदानच नव्हे, तर अशा गुन्ह्यांच्या बाबतीत सामाजिक वातावरण अधिक संवेदनशील बनवत होत्या. तसं वेळोवेळी प्रकट झाल्याने त्यांचा आदरच वाटला, मला आणि इथल्या बऱ्याच लोकांना. कोणी एका जजने म्हणे असे करणे त्यांच्या पदाच्या परंपरेच्या अनुरूप नाही वगैरे असे काही विधान केले पण तसे म्हणणारे नगण्य आहेत (तरी तसे काही असतील समाजात आज आणि पुढेही, आपल्याकडे कसे रात्री न्यायालय उघडायला भाग पाडले होते).

लॅरी नॅस्सर, अमेरिकेच्या ऑलम्पिक जिम्नॅस्टिक टीमचा माजी डॉक्टर. एक दोन नव्हे, दीडशेंहून अधिक मुलींचा याने विनयभंग केला. यात अमेरिकेसाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या मुलीही आहेत. हा १९९२ पासून २०१५ पर्यंत असे प्रकार करत आला.

कित्येक त्रस्त मुली आणि महिलांनी पोलिसांपुढे आणि कोर्टात जाऊन साक्ष दिली. काहींनी कोर्टातच (जेव्हा हे सगळं वाहिन्यांवर प्रसारित होत होतं आणि रेकॉर्ड केलं जात होतं) लॅरीच्या डोळ्यात पाहून त्याला दूषणे दिली. काही धाय मोकलून रडल्या, काहींच्या आया-बाप रडले, ओरडले. एका मुलीच्या बापाने जजकडे मागणी केली मला या माणसाबरोबर पाच मिनिटे एकटे सोडा, पाच नाही तर एक मिनिट सोडा. ते ही नाही म्हटल्यावर तो सरळ लॅरीवर धावून गेला, कोर्टातच. गहिवरून येत होतं हे सगळं पाहताना, ऐकताना. विदारक होतं सगळं. बऱ्याचशा मुली मानसिकरित्या दुबळ्या झाल्या, त्यांना नैराश्य आलं, काहींना मानसिक उपचारांची गरज पडली.

लॅरी नॅस्सरने मीडियाचं कव्हरेज नसावा अशी विनंती केली ती जज रोजमेरी यांनी सरळ नाकारली पण त्याच वेळी त्यांनी केसची सुनावणी पूर्ण होईपर्यंत एकही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली नाही किंवा त्या संदर्भातल्या बातम्या पहिल्या नाहीत. या केस च्या आकलनावर आणि निकालावर मीडिया आणि सामाजिक आक्रोश यांचा परिणाम होऊ नये याबद्दलची खबरदारी होती ती. न्यायालयात त्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्या त्यांच्या समोर कायद्याने झालेल्या जबाबांवरून. अशा रीतीने एका बाजूला योग्य ती खबरदारी घेतली पण जिथे त्यांना योग्य वाटले तिथे त्यांनी समाजात संदेशही पाठवला, प्रखर.

लॅरी नॅस्सरला वेगवेगळ्या केसेसमध्ये शेकडो वर्षांची शिक्षा होते आहे. अजून चालूच आहेत केसेस. रोजमेरी यांनी त्यांच्या न्यायालयातील केस मध्ये त्याला शिक्षा सुनावताना (जी १७५ वर्षे तुरुंगवासाची होती) त्याला म्हणाल्या 'मी आताच तुझ्या मृत्यू च्या आदेशावर सही केलीय'. कारण तो परत बाहेर फिरू शकणार नव्हता. जज रोजमेरी यांनी प्रत्येक पीडित स्त्रीला (किंवा तिच्या कुटुंबीयांना) यांना बोलण्याची संधी दिली आणि बहुतेक प्रत्येकीला सहानुभूती दर्शवली, समोर येऊन बोलल्याबद्दल प्रशंसा केली आणि न्याय मिळेल याचे काहीसे आश्वासन दिले. वेळोवेळी लॅरी नॅस्सरला त्याने केलेल्या कृत्याचं नीचपण जाणवून दिलं. जज रोजमेरी यांनी जाहीरपणे त्याला दिलेल्या प्रत्येक दुषणाने पीडित आणि पीडितांशी सहानुभूती असलेल्या प्रत्येकाला थोडं जखमेवर मलम लावल्यासारखं होत असावं. जखम भरणार नाही. त्याला मृत्यूदंड दिला तरी त्याने केलेल्या दुष्कृत्यांची फेड होणार नाही. काही व्यक्ती लोकांना जन्मभराची दुखणी देऊन जातात. याने तर शेकडो जीवांना जन्मभराची दुखणी दिली. कशी होणार परत फेड. नाहीच होणार. पण त्याला दूषणे तर देऊ शकतो, लायकी दाखवू शकतो. तू आमच्या मध्ये राहण्याच्या लायकीचा नाही आहेस हे जगभर सगळ्यांना ऐकू जाईल, समजेल अशा ठिकाणी प्रकट होऊ शकतो. तेच केलं जज रोजमेरी यांनी.

हे होतं जज रोजमेरी यांच्याबद्दल. पण बोचणारी गोष्ट लिहिल्याशिवाय लेख संपवावंसं वाटत नाही. या माणसाने जेव्हा या मुलींच्या बरोबर दुष्कृत्यं केली तेव्हा काही अजून वयातही आल्या नसाव्यात. बऱ्याच मुलींनी कोर्टात बोलून दाखवलं की त्यांना ही दुष्कृत्यं घडत होती तेव्हा हे काय चाललंय, कसं बोलून दाखवायचं, आपली काही चूक आहे का, घरचे आणि इतर लोक आपल्यालाच तर काही बोलणार नाहीत ना.... यातलं काही कळत, सुधरत नव्हतं. काय वय ते आणि काय ही गोष्ट, कसं कळणार मुलीला? काहींनी खरंच घरी बोलून दाखवल्यावर घरच्यांनी विश्वास ठेवला नाही.

अमेरिकेतही, आणि म्हणून वाटतं मुली जगभर सगळीकडेच या बाबतीत असहाय्यतेचा अनुभव करतात. एक बाप, आई म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. आपल्या मुलीला कोणतीही गोष्ट आपल्याला सांगताना संकोच वाटू नये, याउलट सांगायची गरज वाटावी आणि हवी ती सहाय्यता मिळेल याची खात्री वाटावी असं आपल्याला नक्की करावे लागेल. मी वेगळं किती आणि काय बोलणार. आपण सगळे सुज्ञ आहात.

तळटीप: लॅरी नॅस्सरच्या केसचे बरेच व्हिडिओ यूट्युब किंवा इंटरनेटवर इतरत्र पाहायला मिळतील. जज रोजमेरी यांच्या न्यायालयातील व्हिडिओही आहेत. काहीं मध्ये जबाब देताना मुलींनी बरेच बोलून दाखवले आहे. मुलं आसपास असतील, तर जर सावधगिरीने बघा.

 

 

 



प्रतिक्रिया द्या



1623 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर