निरुत्तर
सोमवार , १२ फेब्रुवारी, २०१८ सुगंधा चितळे-पांडे

लोकांना नियमात अडकवून सत्ता गाजवत राहायचे ही सनातन्यांची ठरलेली पद्धत असते. त्यांच्या नियमांना कुणी प्रश्न केले की तथाकथित संस्कारांच्या भिंती धडाधड कोसळू लागतात.

अंनिसने मंदिराच्या पुजाराच्या घरातील भानामतीला आव्हान दिल्यापासून मला स्फुरण चढले होते. वास्तविक या पुजारी दादाशी आमच्या काकांचे जागेवरून वाद होते. त्याला नामोहरम करण्यासाठी आमच्या दोन्ही काकांनी उठवले होते की त्याच्या घरात भानामती आहे. त्याच्या भिंतीतून तरंगत डबे आरपार जातात. अंगावर अचानक बिब्ब्याच्या फुल्या पडतात. इत्यादी. आमच्या पुजारीदादाने अनिसवाल्यांना बोलावून सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला. आठ दिवस अनिसवाले त्याच्या घरात तळ ठोकून होते. काहीही घडले नाही. पुन्हा कधी अशी अफवाही कुणी उठवली नाही.

मला नुकतेच या सगळ्याचा अर्थ उमगू लागला होता. काकांना नामोहरम करण्यसाठी मी नेमके प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते मात्र कधीच माझ्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. बहुतेक वेळा ते निरुत्तरच होत किंवा त्यांची हबेलबंडी उडत असे. त्यावेळी मला खूप आनंद होई. एरव्ही सतत धर्मसिंधु किंवा मनुस्मृतीचा आधार घेणारे आमचे काका मला गप्प राहण्यास सांगत, आम्ही आमच्या मोठ्यांना असले काही विचारले नाही असे तरी म्हणत किंवा या विषयावर या घरात चर्चा नकोय असे म्हणत तिथून निघून जात किंवा पळ काढत किंवा चारचौघात कधी मी त्यांची विकेट काढली तर ते ते दुसरे कारण शोधून त्याची शिक्षा मला क्रूर मारहाणीने देत पण त्यावेळेला उत्तर देणे त्यांना आयुष्यात कधीही साधले नाही. विद्वत्तेचा जो आव आपण आणतो त्याचा डोलारा क्षणाक्षणाला कोसळताना पाहून त्यांच्या पोटात गोळा येत असावा. ते गोरेमोरे होत. त्यांची कानशिले तापत आणि डोळे गरागरा फिरू लागत. माझ्या साध्या प्रश्नांचेही त्यांना संकट का वाटावे याचा उलगडा मला कधीच झाला नाही.

उदाहरणार्थ ते म्हणायचे संध्याकाळी कचरा बाहेर टाकायचा नाही. मी विचारायचे का? उंबऱ्यावर बसायचे नाही. मी म्हणायचे का? ते रागवायचे. कधीकधी काहीच बोलायचे नाहीत. पण बरेचदा घुसमटून आपले पालुपद वाजवायचे की मोठ्यांना असले नाही ते प्रश्न विचारण्याची आमची पद्धत नाही वगैरे.

एकदा असेच आम्ही बसलेलो होतो. मी म्हटले काका मला एक प्रश्न आहे. ते ताठ झाले. सगळ्यांचे कान टवकारले. मी म्हटले- पत्रिका पाहून ज्योतिषाला सगळे आधीच कळत असते मग त्याला हे का कळत नाही की पुढे या दोघांचे एकमेकांशी पटणार नाहीये किंवा एखाद्या माणसाला व्यसन आहे हे त्याच्या पत्रिकेत दिसत असेलच ना. मग तो भटजी समोरच्यांना सांगत का नाही की बाबा या माणसाला बेवडा मारायला आवडतो. तुमच्या पोरीची हा वाट लावणार आहे. पत्रिकेतले सगळे खरे होते तर मग पुढे जाऊन जिला जाळले जाणार आहे अशा मुलीला ज्योतिषी बुवा सावध का करत नाहीत? सगळे गप्प झाले. दोन्ही काका सुन्न झाले. दोघेही उठून आत गेले आम्ही भावंडे मात्र जाम खिदळलो.

त्यांचे अनेक नियम होते जसे शनिवारी तेल विकत आणायचे नाही किंवा अगदी घरातला तेलाचा डबासुद्धा शनिवारी फोडायचा नाही. शनिवारी नखं काढायची नाहीत, कटिंग दाढी काही करायचे नाही, कर म्हणजे संक्रांत किंवा पाडव्याचा दुसरा दिवस या दिवशी प्रवासाला जायचे नाही किंवा नवी खरेदी करायची नाही. गुरूचरित्राची पोथी वाचताना जिची पाळी चालू आहे तिने मध्ये काहीसुद्धा बोलायचे नाही. विंचरलेले केस नुसते टाकायचे नाहीत तर कचऱ्यात टाकताना त्यावर थुंकायचे आणि मग टाकायचे का तर म्हणे आपले वाईट चिंतणारा माणूस ते केस घेऊन ते काळ्या बाहुलीला गुंडाळून आपला परस्पर गळा घोटू शकतो. थुंकल्याने त्याला ते केस वापरता येत नाहीत. असे एकाहून एक तर्क त्यांच्याकडे असत. संध्याकाळी कढी करायची नाही, शिजवलेलं अन्न न खाता ठेवायचे नाही त्याचा एखादा तरी घास खाऊन ठेवायचा. नवरात्राचे नऊ दिवस न्हायचे नाही. त्या काळात आडात (घराच्या आत) नारळ फोडायचा नाही. असे काहीबाही चालूच असायचे. लोकांना नियमात अडकवून सत्ता गाजवत राहण्याचा उत्तम मार्ग आहे हा हे माझ्या लक्षात येऊ लागले होते. तरी मी विचारतच राहायचे की कोणी गेले की आपण १० दिवस सुतक पाळतो मग कुणी जन्माला आल्यावर सोयर का पाळायचे? सोयर म्हणजे कुणी नवे जन्माला आले की आपली सगळी महत्त्वाची कामे बंद करायची. का असे? तो तर आनंदाचा क्षण असतो नं? तुम्ही म्हणता संध्याकाळी काही खायचे नाही मग संध्याकाळी काढून आणलेल्या निरस्या दुधाचा चहा प्यायलेला का चालतो? एरव्ही कधीही आम्ही मुलांनी पत्ते खेळायचे म्हटले की ते व्यसन असते मग गणपतीच्या पाच दिवसात रात्रंदिवस मोठ्यांची पैसे लावून रमी चालू असते त्याला व्यसन म्हणायचे की कसे? की गणपती विघ्नविनाशक असल्याने या रमीमधला वाईट भाग निवारण करून टाकतो? असे अनेक अतरंगी प्रश्न विचारून मी त्यांना भंडावून टाकत असे.

त्यांच्या मते काळे कपडे आणि वाजणारे पैंजण घालायचे नाहीत किंवा घ्यायचेच नाहीत. घुंगरू असलेले रुणुझुणु वाजणारे पैंजण मला खूप आवडायचे पण काका कायम मुके पैंजणच घ्यायचे. कारण मुलीच्या जातीला ते शोभत नाहीत. संध्याकाळी आरशात बघायचे नाही आणि टिकली वापरायची नाही हे दोन सर्वात महत्त्वाचे नियम होते. धंदेवाल्या बायका टिकल्या वापरतात आणि संध्याकाळी आरशात बघत नटतात असे काका सांगत. अगदी माझ्या ड्रेसचा गळा किती असावा हे देखील तेच ठरवत अगदी शिंप्याला दमात घेऊन गळाबंद ड्रेस ते शिवून घेत. नाहीतर अतिशय घाण बोलणाऱ्या आमच्या काकूचे सडके शब्द ऐकावे लागत की “नाही ते घालाल आणि याल कुठून तरी पोट फुगवून.” पोट फुगवणेचा अर्थ त्यावेळी मला समजत नसे. पण ती काहीतरी घाणेरडे बोलते आहे हे मात्र जाणवे. प्रश्नाला उत्तरं देणे टाळण्यासाठी घाणेरडे बोलून समोरच्याची बोलती बंद करायची हे खास सनातनी वैशिष्ट्य आमच्या नातेवाईकांकडे आहे. मला येता जाता ती पांढऱ्या पायाची म्हणत असे कारण माझे आई बाप मीच मारले असा तिचा होरा होता. मी आणि माझी लहान बहीण दोघीही तिच्या दृष्टीने पांढऱ्या पायाच्या होतो. तिच्या या सततच्या टोमण्यांनी मी एक दिवस चांगलीच पिसाटले होते. राममंदिर प्रकरणाचे ते दिवस होते. घरात सतत त्याच मंदिराच्या चर्चा चालत. त्या संध्याकाळी सगळे एकत्र बसलेले असताना मी मुद्दा उपस्थित केला की राम हा जर देवाचा अवतार होता तर सीता आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्याला वनवास भोगावा लागणार आहे हे रामाला आधी का समजले नाही आणि तसे झाल्यावर तोही सीतेला पांढऱ्या पायाची म्हणून हिणवत होता का?

“देवाबद्दल असले काही बोलायचे नाही” वगैरे दटावणी झाली तरी मी सुटलेच होते. मी म्हटले तुमच्या मते रामापासून बुद्धापर्यंत सगळे विष्णूचे अवतार होते मग गौतम बुद्ध आपल्याला वर्ज्य का? आणि सगळे बुद्धिस्त आपले शत्रू कसे? त्यांना आपण आपले का मानत नाही? त्यांची घरे आपल्यापासून लांब का? ते आपल्या घरी का येऊ शकत नाहीत?

माझ्या शंका या अशा काकांच्या अंगावर शेकू लागल्या होत्या. आणि निरुत्तर होण्यापलीकडे त्यांना दुसरा उपायही नव्हता. त्या सुधारित शंकांनी त्यांच्या तथाकथित संस्कारांच्या भिंती धडाधड कोसळू लागल्या होत्या. माझ्या वाईटावर त्यांनी टपायला कारणीभूत झाल्या त्या माझ्या शंका!! ज्याला त्यांच्यालेखी काडीची किंमत नव्हती असे ते दाखवत असले तरी त्यांना बिथरवायला त्या पुरेश्या होत्या. निर्बुद्ध रेडा हलवायचा तर त्याच्यासमोर लाल कापड हलवावे लागते. ते काम शंका करतात हे नंतर कायम माझ्या प्रत्ययास येत गेले. अशी माणसे आपले पराभव समोरच्याचे रक्त सांडून साजरे करतात कारण प्रश्नांना उत्तर देण्याचे धैर्य आणि जबाबदारी त्यांच्यात नसते हेही मी वारंवार पाहिले आणि अनुभवले.

(क्रमश:)

शब्दांकन- शंतनू पांडे

कर्म(ठ)कथा मालिकेतील मागील भाग वाचा: http://www.bigul.co.in/bigul/2149/sec/11/trouble%20shooterप्रतिक्रिया द्या5512 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर