फेबुगिरी
सोमवार , १२ फेब्रुवारी, २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी..

मूल झालं तरच स्त्रीच्या स्त्रीत्वाला पूर्णत्व मिळतं!

झी मराठीवरच्या एका मालिकेतला हा संवाद...
नक्की काय साध्य अणि सिद्ध करायचं आहे यांना यातून??
म्हणजे मातृत्व ही खरंच चांगली, वेगळी आणि जगणं बदलणारी भावना आहे, सर्वांना मान्यही आहे की ते.
पण एखादी स्त्री समजा नाही बनली आई किंवा तिने जाणीवपूर्वक निर्णय घेतला मूल जन्माला न घालण्याचा तर काय होईल?
स्त्री म्हणून ती अयशस्वी ठरते का?
कोणत्या युगात आणि काय मनोवृत्ती घेऊन जगतात हे लोक???
झीसारख्या आघाडीच्या आणि फक्त देशभर नव्हे तर जगभरात प्रेक्षकवर्ग असणाऱ्या वाहिनीने एकतर या असल्या भैताड (हो त्यांच्याच मालिकेतला शब्दप्रयोग आहे ) मालिका बंद कराव्यात आणि ते जमत नसेल तर at least हे असे मूर्खासारखे संदेश देणं तरी बंद करा म्हणो!
याच झीने (अल्फा होती तेव्हा) एकेकाळी प्रपंच, 405 आनंदवन सारख्या दर्जेदार मालिका दिल्या होत्या हे आता कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही !

- मीनाक्षी कुलकर्णी मांडे

...............................

लांsssssssssssssssssssssssब पल्ल्याची गाडी पकडल्यावर
साधारणपणे सतराव्या 's' पर्यंत पोचल्यावर
जेव्हा लक्षात येतं की आपण चुकीची गाडी पकडलीय 
तेव्हा पोटात पडतो एक असा खड्डा 
जो भरून काढायला आख्खं जग, आख्खं आयुष्य अपुरं पडतं
आजवरच्या अनुभवांची गाठोडी कित्येक पट जड होतात
बिनकामाची असली तरी फेकूनही देता येत नाहीत 
ती उचलून पुढल्या स्टेशनवर उतरायचं त्राण नसतं
कारण 
आपल्याला हवी ती गाडी पुढल्या स्टेशनवर येणार नसते 
कधीच.
दिशाच वेगळी असते तिची
उतरायलाच हवंय.
जिथे देह ठेवेन तीच माझी मक्का
असं म्हणणारा फकीर होणं 
इतकी माझी कुवत नाही. 
पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात 
पहिल्या स्टेशनापर्यंत 
पुन्हा नव्या प्रवासाची तयारी
प्रवास संपत आलाय हे माहित असूनसुद्धा .
तसंही वर्तुळाचा न्याय कुणालाच जिंकू देत नाही.
आणि इथे तर वर्तुळंच वर्तुळं.
वर्तुळातही. 
पण तरीही 
मी उतरलोय.

- सदानंद बेंद्रे

...............................

आपले शेतकऱ्यांबद्दल अनेक गैरसमज असतात. जसे की शेतकरी अशिक्षित अडाणी असतो. तो पारंपरिक असतो. त्याला बाजारपेठेचे ज्ञान नसते. या सर्व समज अपसमजांमधून एक केवीलवाणे चित्र समोर उभे राहिलेले असते.

त्यातून शेतकऱ्यांबद्दल साधारण दोन प्रतिक्रिया उमटतात. एक म्हणजे दयाभाव.. कणव. 
आणि दुसरी तिरस्कार ..

दुसरीमुळे शेतकरी भेकड, भ्याड आहे, फुकट्या आहे, पॅकेजेस वर जगणारा भिकारी आहे, लफडेबाज आहे, कांगावखोर आहे अशी मते बनतात व व्यक्त होतात.

ती मते गिरीश कुबेरांपासून खडसे, गडकरी ते केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन यांच्यापर्यन्त सर्वांनी प्रतिनिधिक म्हणून वेळोवेळी व्यक्तही केली आहेत.

पहिल्या कणवेतून मानभावी सल्ले मिळतात. आधुनिकतेची कास धरा, बाजारपेठेचा अभ्यास करा, उत्पादन वाढवा किंवा सदभावना म्हणून भिक स्वरूप सामाजिक मदतीचे तुकडे (खटकेल पण वास्तव आहे) असे प्रकार होतात. नामचा प्रयोग त्यातलाच. किंवा 10 हजारानी 25 कोटींची मदत त्यातलीच.

शेतीविषयक वास्तव समजून घेतले तर या विधानांमागचे कारण लक्षात येईल.

शेतकरी आता जुन्या ग्रामीण कादंबऱ्यात असतो तसा राहलेला नाही. तो अत्याधुनिक बी बियाणे वापरतो. आधुनिक पद्धतीने सिंचन करतो. ड्रीप तुषार सिंचन आणि त्यातलेही लेटेस्ट प्रयोग. खते आणि औषधे यांचे अचूक परीक्षण करून त्यातले लेटेस्ट आणि परिणामकारक ते तो वापरतो. इतकी आधुनिकता.

उत्पादन वाढीची कमाल मर्यादा त्याने गाठलेली आहे केव्हाच. अन्नधान्याबाबतची स्वयंपूर्णता याचेच द्योतक आहे. तो वेगवेगळे प्रयोग करतो. सर्व प्रकारच्या पिकांचे नाविन्यपूर्ण प्रयोग सुरु असतात.

तो सकाळी सातला शेतात चक्कर मारतो. रोगराई किडीचे निरीक्षण करून सकाळी आठ वाजता योग्य औषधाचे नियोजन करून त्याची फवारणी सुरु असते. इतकी तत्परता.

बाजारपेठेचा मागच्या अनेक वर्षांचा ठोकताळा अंदाज त्याच्याकडे असतो. शेतकरी आता सुशिक्षित असतात. ते नेट वापरतात. विविध app वापरतात. पण हे सगळे अंदाज चुकत नसतात तर मुद्दाम चुकवले जातात.

आणि अजून नेहमीचा फंडा असतो की अमुक एकाने बघा जरबेरा लावून अस उत्पन्न घेतले. तमक्याने शेवगा लावून फलाना केले. बिस्तान्याने गुलाब लावून लाखो कमवले.

लाखातील एखाद्या दुर्मिळ उदाहरणाचे जनरलायझेशन होऊ शकत नाही.
पेट्रोल पंपावर काम करणारा प्रत्येकजण धीरुभाई बनू शकत नाही.
प्रत्येक वर्कशॉपवाला जमशेदजी बनू शकत नाही.
प्रत्येक गवंडी अडाणी अंबानी बनू शकत नाही.
प्रत्येक व्यंगचित्रकार डिस्ने बनू शकत नाही.

आम्ही माळे फुलवली...हत्तीच्या पाठीचे दगड फोडून त्यांची माती केली.. निबिड काटेरी वांझ भूमी पिकवली तिची कूस भरली ..निसर्ग ..पांढरपेशे शेतीअवलंबी घटक ...अडते दलाल..सरकार अश्या सर्व अस्मानी सुलतानी शत्रूंना टक्कर देत आम्ही संघर्षमय जीवन जगतो. शेतकरी भ्याड नसतो तर आल्या दिवशी या सर्वांशी झुंजणारा तो एक योद्धा असतो.

आम्ही ताऱ्यांचे गुज ऐकले, नक्षत्रांचे देणे घेणे समजून घेतले, पशु पक्षी आमच्या कानात बोलतात, माती आमच्याशी हितगुज करते..हजारो वर्षे अश्या ठोकताळ्यातून आम्ही शेती पिकवतो. आता तर आम्ही आधुनिकतेची कास धरली आहे. प्रत्येक शेतकरी हा एक सृजनशील शास्त्रज्ञ असतो. तो किमयागार आहे. शेती कशी करावी हे त्याला शिकवण्याची गरज नाही.

शेतकरी हा शोषित आहे. व्यवस्था सर्व अंगाने त्याचे शोषण करत आहे. तो आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेतील शुद्र आहे.

त्याला पोकळ आणि दांभिक मदतीची नाही तर समान धोरणाची गरज आहे. लांब पल्ल्याच्या उपाययोजनांची गरज आहे. जो त्याचा न्याय्य हक्क आहे. जो न्याय, सवलती आणि सरंक्षण उद्योग क्षेत्राला मिळते तो न्याय शेतीला लागू झाला पाहिजे. शेतीच्या क्षेत्रात ग्रामीण भागात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले पाहिजे. रस्ते, फोनलाईन्स, विजेचे जाळे, ब्रॉडबॅंड , दळणवळण व सर्व प्रकारच्या सुविधा. त्याला उद्योगक्षेत्राप्रमाणेच मोठमोठी कर्जे मिळाली पाहिजेत. त्याला संपूर्ण संरंक्षण मिळाले पाहिजे. अडते दलाल यांची या क्षेत्रातून कठोरपणे हकालपट्टी करून एक पूर्णपणे नवीन विक्री व्यवस्था उभी राहिली पाहिजे. हे सगळे सहज शक्य आहे. गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची आणि दांभिक नव्हे तर खऱ्याखुऱ्या सदभावनेची!!!

- सुहास भुसे

...............................

रामदास आठवले यांचे राजकारण आवडत नाही पण तरी रामदास आठवले त्यांच्या प्रांजळपणामुळे कधी कधी आवडतात. त्याचा एक किस्सा . मी तेव्हा नुकतीच कार्यकर्तेगिरी चालू केली होती २००३/४ चा सुमार असेल. आठवले सायेब सरकारी गेस्ट हाउसला मुक्कामी होते आणि आठवले सायबांचा कार्यकर्ता परंतु आमचा मात्र नेता ही इमेज असलेला असा ग्लोबल लोकल, सायबांचा राईट-लेफ्ट हॅण्ड इसम, आम्हा तीस पस्तीस लोकांना चारपाच सहा सीटर करून आठवले सायबांना भेटायला घेऊन गेला.

मी म्हटलो का दादा लई उशीर झालाय, आरं रातरचा एक वाजलाय, सकाळ भेटू की? तर तो बोललेला चुप्प! सायेब आपल्याला अर्ध्या रातीपण भेटत असत्यात. बस गपचीप. तू एम ए केल्याने तुला कायच कळत नाय. सरक पलिकडं. 
मी पलीकडे सरकून सायबाला भेटायला गेलो. रात्रीचा एक वाजलेला. पोचलो तवा दीड!

मग रीतसर आमचा कनिष्ठ नेता गेस्ट हाउस मध्ये झोपलेल्या आमच्या वरिष्ठ नेत्याला म्हणजे आठवले सायबांना उठवायला गेला.. आठवले सायेब उठले आणि तीस पस्तीस लोक आलेत, बाहेर थांबलेत म्हटल्यावर त्यांना भेटायला बाहेर आले.

तर आमच्या लोकल नेत्याने छोटा कर्णा काढला आणि तेवढ्या रात्री आठवले सायबांच्या पुढी धरला आणि प्रचंड प्रेमळ आर्जवी आवाजात विनंती करू लागला सायेब कायतर मार्गदर्शन करा.. सायेब मार्गदर्शन करा.. सायेब मार्गदर्शन करा..... आता हा आमचा लोकल नेता जी दारू पिऊन गेला होता ती काय चांगल्या क्वालिटीची न्हवती सबब त्याचा घमघमाट रात्री दीड वाजता आठवले सायबांनी अनुभवला .

ते बोलले, अरे पोपट.. जा रे राजा, लय उशीर झाला, उद्या बोलतो.. लय उशीर झाला. तर आमचा कार्यकर्ता एकच टुमणं लावून बसला.. सायेब कायतर मार्गदर्शन करा.. कायतर मार्गदर्शन करा... हे बोलत असताना तो सतत आठवले सायबांच्या हातात माईक देऊ लागला आणि कर्णा सांभाळू लागला. शेवटी आठवले सायेब त्याला प्रसन्न झाले आणि ते माईक हातात घेऊन बोलले.. सगळ्या गर्दीने कानात प्राण गोळा केले आणि गर्दीच्या कानात आठवले सायबांचे हे शब्द पडले.."पोपट, भाडखाऊ दारू जास्त झाल्यावर मला भेटायला येत जाऊ नकोस, लोकांना त्रास देत जाऊ नकोस." माईक दुसऱ्याच्या हाती देत आठवले सायेब बोलले.. ए आता झोपते रे मी.. पोपटला सकाळी बोलवा. भाडखाऊला उद्या बोलतो.. गर्दी झाली हक्का बक्का आणि आम्ही दोघे तिघे ख्या ख्या ख्या..

आमचा पोपट नावाचा त्यावेळचा लोकल नेता आजही माझ्यासमोर चरकतो.. मी फक्त त्याच्याकडे अर्थपूर्ण बघत हसत असतो.. आठवले सायबांची कृपा दुसरं काय?

२००३ नंतर परत आठवले साहेबांना भेटायचा योग आला डायरेक्ट २०१० मध्ये. माझी पुणे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालनालय, एससी एसटी आयोग या ठिकाणी केस चालू होती. विद्यापीठातील काही अधिकारी लोक दाद देत न्हवते, तेव्हा आंदोलन करायचे ठरवले, आम्ही थेट कुठल्या पक्षाशी संबंधित नसल्याने आणि अधिकारी जाणत्या राजाच्या पक्षाशी सबंधित असल्याने कुणाकडे जावे हा प्रश्न पडला.

तेवढ्यात कळले आठवले साहेब लोणावळ्यात आहेत. मी आणि एक प्राध्यापक मित्र आम्ही लोकल पकडून संध्याकाळी सातला पोचलो. यावेळी पोपट सोबत न घेता एक चांगला कार्यकर्ता गडी घेतला. आठवले सायबांसमोर आम्ही उभे होतो. सोबत घेतलेल्या चांगल्या कार्यकर्त्याने भयंकर खतरनाक अशी आमची ओळख करून दिली. सामाजिक कार्य काय, लेखक, कवी काय, वार्डात कार्यकर्ता काय आणि शेवटाला अभ्यासू प्राध्यापक अशी. आम्ही खुश झालो. चांगला कार्यकर्ता अजून पुढे बोलत असताना आठवले साहेब म्हणाले, “ए बस्स झालं रे बाळो, काय काम करायचेय याचं?” मग याने सांगितले. सायेब ते ह्यांना विद्यापीठात आंदोलन करायचेय तुम्ही लेटरहेडवर पत्र द्या..

तर आठवले साहेबांनी आमच्याकडून पूर्ण केस ऐकून घेतली आणि बाळूला म्हणाले, “आंदोलन कशाला करताय रे? ह्यांच्या बरोबर पंधरा वीस कार्यकर्ते घेऊन जावा आणि अधिकाऱ्याला घेराव घाला.. दोन चार लाथा बुक्क्या हाणा. पोलिसांनी उचलून न्हेल्यावर मला फोन करा.” बाळू म्हटला, “सायेब हे प्राध्यापक लोकं हायेत आणि” त्याला मध्येच तोडत आठवले साहेब म्हटले, “प्राध्यापक म्हणजे एकदम भिकारचोट जमात चळवळीसाठी पयसा देत नाय आणि रस्त्यावरपण उतरत नाय.” मग आमच्याकडे बघत त्यांच्या चिरपरिचित विशिष्ट स्टाईलमध्ये म्हटले, “म्हणजे हे मी तुम्हाला बोलत नाहीये, तुम्ही लोक चांगले प्राध्यापक आहात बाळूने आताच सांगितलंय. हे मी दुसऱ्या प्राध्यापकांविषयी बोलतोय..” आणि हसत सुटले. मग तिथल्या एका कार्यकर्त्याला आवाज देऊन त्यांनी त्याच्याकडून दोनचार लेटरहेड घेऊन त्यावर सह्या ठोकल्या आणि ते कोरे लेटरहेड आमच्याकडे दिले. मी म्हटले पाच मिनिटात यावर पत्र लिहितो, तर ते म्हटले, “जावा आता तुमी. कायपन लिव्हा तिकडं.” मग बाळू आणि आम्ही निघून आलो.

- सतीश वाघमारे

...............................

पंतप्रधान मोदी हे थापा मारल्याशिवाय राहूच शकत नाहीत. संसदेमध्ये भाषण करताना २०१३-१४मध्ये बँकांचे एनपीए ८२ टक्के होते असं बिनदिक्कतपणे सांगितलं, प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेच्या डाटानुसार हे प्रमाण ३.८ टक्के इतकं होतं. देशासमोरील प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी प्रचारकी थाटाचं भाषण करणाऱ्या मोदींकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? पण संसदेत खोटं बोलणाऱ्या या पंतप्रधानाला लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांनी तंबी द्यायलाच हवी.

- निमा पाटील

...............................

"माओडया, दारावर ही कसली पाटी ठोकतोयस?"
"नावाची पाटी आहे बाबा."
"अं बघू. हे काय?"
"ज्युनियर ब्रह्मे, एमए, पीएचडी,एसडीएस, बीए, एफआरसीएस..."
"गधड्या! माझी बदनामी करतोस? इतका शिकलेलो बघून लोक काय म्हणतील मला? आणि काय रे, एमए कधी झालो मी?"
"अहो बाबा, एमए म्हणजे मास्टर इन आचरटपणा."
"अच्छा. मग बीए म्हणजे बावळटपणा इन आचरटपणा?"
"नाही हो, बॅचलर फॉर आर्टस्. मला अचानक कलामावशीची आठवण आली म्हणून लिहिलं."
"आणि पीएचडी?"
"म्हणजे पेपरवेट हाणण्यात डॉक्टरेट. आणि एसडीएस म्हणजे स्त्रीदाक्षिण्य स्पेशालिस्ट."
"मग हे एफआरसीएस काय आहे?"
"हे उगाच लोकांना घाबरवायला लिहिलंय."
(शेजाऱ्यांनी 'ब्रह्मे इथं राहात नाहीत' अशा पाट्या का लावल्यात याचं कारण.)

- ज्युनियर ब्रह्मे

...............................

संसदेतील रेणुका चौधरींची वर्तणूक सभ्यतेला धरून नव्हती हे मान्य करूया!

पण मोदीजींच्या संसदेतील एकून वर्तणुकीशी तुलना करता रेणुका चौधरींची वर्तणूक तुलनेने सभ्यच म्हणावी लागेल.

टिप- दोघांचेही वर्तन असभ्य होते, हे वास्तव आहे.

टिप- याचा अर्थ चौधरींच्या वर्तणुकीचे समर्थन करतो असे नव्हे तर मोदीजीं वर्तणुकीच्या तुलनेत, त्यांची वर्तणूक सभ्य वाटते असा त्याचा अर्थ आहे.

- राज कुलकर्णी

...............................

...रेणुका चौधरींचा संसदेत सर्वासमक्ष अपमान करणारा तो प्रधानसेवक आणि त्याचे चेले यांचा मी एक स्त्री आणि देशाची नागरिक म्हणून निषेध करते. विरोधात असणा-या, बोलणा-या आणि हसणा-याही स्त्रियांचा काळवेळ ठिकाण न बघता अपमान करण्याची ही 'संस्कृती' फोफावत चाललीय. सुक्ष्मपणे वर्तनाचा भाग म्हणून झिरपत चाललीय. त्यांच्या स्त्रियाही हा निर्लज्जपणा करण्यात आघाडीवर आहेत. समोरचा चुकला तरी आपण सज्जन म्हणून गप्प बसणं आता घातक ठरेल. अपमान केल्यावर तिथल्या तिथे सालं काढायला हवीत आता. वेळप्रसंगी चप्पल काढायची तयारी हवी. पण या बाबतीत सहिष्णूता पाळणं आता आत्महत्या ठरेल...!

#IsupportRenukaChowdhary

- प्राजक्ता गांधी

...............................

मला रेणुका चौधरी यांचे वर्तन विचारांती पटले. काय सॉलीड अपमान केलाय तिने फेकू फकिराचा.. त्यानंतर फकिराने मारलेल्या शेलक्या विनोदावर फकिर समर्थक खदाखदा हसले कारण अपमान सर्वांचाच झालेला व फकिराने विनोदबुद्धीने लाज राखली म्हणून सर्वांनाच हायसे वाटले व हसले.
विरोधी पक्ष सभात्याग करतात. सभागृहात अनेकदा सत्ताधारीही आरडाओरडा करतात.फेकाफेकी,फाडाफाडी,प्रसंगी गुद्दागुद्दीवर येतात.पण या सर्वांपेक्षा कालचा प्रकार सत्ताधारींना घायाळ करून गेला.नायडू व फकिराचा तोल गेला. सभागृह अवाक झाले व निषेधाचा एक नवा मार्ग सर्वांनाच कळला.
यापुढे निषेधाचा हा नवा मार्ग अनेकजण चलाखीने वापरतील असे मला वाटते.
रेणुका चौधरी यांनी साहस करून सभागृहा खोटेपणा करणाऱ्या फकिराला फटकारले याबद्दल त्यांचे अभिनंदन!
या प्रकारावर मीडिया व चॅनल्सवाल्यांनी रेणुकावर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना भंडावून सोडले पण एकाही चॅनलवाल्याची फकिराला जाऊन प्रश्न विचारण्याची हिम्मत झाली नाही. हा फकीर गेली चार वर्ष संसदेत काँग्रेस पक्षाची बदनामी करत नाही तर धमकावतोय. हो, हो, धमकावतोय. तुम्ही संसदेतील फकिराची भाषणं नीट ऐका. कळेल की तोधमकावतोय.
अशा या बेताल, बेमुर्वतखोर फेकाड्याच्या विधांनांवर हसणं हे असभ्य वर्तन कसं?
सभागृहात खोटे बोलणारा फकीर खरा गुन्हेगार आहे. त्याची लायकी रेणुका चौधरीं यांनी योग्य कृतीने दाखवून दिली.

- राजू तुलालवार

...............................

पगार मिळाला म्हणुन दुखी: कशाला व्हायचं, तो तर दर महिन्याला मिळतोच की. पगार घेऊन दुख: होत असेल तर सरळ म्हणायच बॉसला नको तुमचा पगार, तुम्हालाच लखलाभ असो. बघा, बॉसलापण तुम्हाला बघून छान वाटेल. तो मुळातच छान माणूस असतो रे, आपणच कमी पडतो त्याला ओळखायला, पगार घेणं बंद करा बघा तो कसा छान वागू लागेल तुमच्याशी. मुळात सगळं छानच असतं, गुलाब छान आहे ,जास्वंदीपण छान आहे आणि बासुंदीपण छानच आहे की.

तुम्ही दर महिन्याला पगार घेता आणि मग महिनाअखेरीस पगार संपला म्हणून दुखी: होता.

एखादा कविता ऐकवतो म्हणून त्याचा राग कशाला करायचा, तो नितीन कवी आहे पण तितकाच छान माणूस आहे, दरवेळेस कसे सुंदर सुंदर फोटो टाकतो ते आपण पाहिलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, छान असतं प्रोत्साहन. ती मोनालिसापण गोड आहे आणि तुमच्याआमच्या घरातल्या डब्यातली साखरही गोड आहे. नितीनला मी छान म्हणालो आणि मोनालिसाला गोड म्हणालो याच कारण म्हणजे माझ्यापाशी असलेल स्त्रीदाक्षिण्य.

मला एकदिवस जितुच्या दुकानात जाऊन दहा रुपयाचं रिचार्ज करायचंय वोडाफोनचं, कसल सुंदर वाटेल नं तो दहाचा टॉकटाईम संपवायला, जग सुंदर आहे रे, वोडाफोनचं कुत्रपण छान आहे आणि दहाचा टॉकटाईम मला तीन महिने पुरतो बरंका, कारण जियोवरून कॉलिंग फ्री आहे, सगळं शक्य असतं रे प्रयत्न केले पाहिजेत आपण. छान वाटतं प्रयत्न करूनही. सापाला गुदगुली करून पाहिलं पाहिजे, सिंहांची दाढी ओढून पाहिली पाहिजे, मच्छराला प्रेमाने गोंजारता आलं पाहिजे, जग इतकं छान आहे नं की आपल्या दारात बांधलेल्या शेळीला बघूनदेखील चोर घाबरून पळून जातील .

हा अजितपण छान आहे, देवेंद्रपण छान काम करतोय, उद्धवपण छान आहे आणि राजतर छानच आहे आणि डान्स इंडिया डान्समधली लहान मुलंही छान आहेत. आपण सर्वांना मत देऊन प्रोत्साहन दिलं पाहिजे. 

लक्षात ठेवा तुम्ही सगळे छान आहात, मीदेखिल छान आहे, जग सुंदर आहे,  छान.... छानच आहे रे, हो किनई.....!!

---  छाना  वाटेकर

- रवींद्र पाटोळे

...............................

पार्लमेंटात कोणी, किती मोठ्ठ्याने हसलं यावर चर्चा सुरू आहे. म्हणून ही रिपोस्ट

इंग्लडचा पहिला राजा जेम्स याच्या कारकीर्दीत रोमन कॅथॉलिकांना वाळीत टाकण्यात आलं होतं. त्यांच्या गार्‍हाण्यांची दाद पार्लमेंट घेत नव्हती. म्हणून पार्लमेंट उडवून टाकण्याचा कट गाय फॉक्स या आयरिश क्रांतीकारकाने रचला. परंतु ऐनवेळी तो कट उघडकीस आला आणि गाय फॉक्सला फाशी देण्यात आलं.

त्याच्या स्तुतीपर भाषणात शॉ म्हणाला....
गेली ३६ वर्षं हा देश सुधारावा म्हणून मी भाषणं देतो आहे. परंतु ती सर्व निष्फळ ठरली आहेत. ब्रिटीश पार्लमेंट म्हणजे कोणतीही सूचना अंमलात येऊ नये म्हणून वायफळ बडबड करून वेळ घालवणारी एक मध्यवर्ती संस्था आहे. त्यामुळे सार्वजनिक भाषण करणे हा गुुन्हा मानला जावा या निर्णयाप्रत मी आलो आहे. भाषणे करणे आणि ऐकणे हे एक व्यसन होऊन बसले आहे. 
पार्लमेंट ही एक निरुपयोगी व केवळ वेळखाऊ संस्था आहे हे गाय फॉक्स याने बरोबर ओळखले होते, त्यामुळे त्याचा स्मृतिदिन आपण साजरा केला पाहीजे.

- सुनील तांबे

...............................

आमच्या दोघांच पटतं, कारण........ माझी चूक असली की मूग गिळून बसतो.. कारण हॉलला लागून स्वयंपाकघर जे असतं.. अन हिची चूक झालीच की परत आठवत असतं.... हॉलला लागून स्वयंपाकघर....कारण तिथंच ती लपून बसलेली असते अन वारंवार आपलं डोकं काढत असते पण दुधाचं पातेलं उचलायला क्वचितच उपयोगाला येत असते। मी आणि ही न विसरता आठवड्यातून दोनदा, जवळच्या खानावळीत जातो गिळायला कधी कधी तर कँडल लाईट डिनरला...... पण एकच फरक असतो, ही शनवार आणि मी रविवार... नो कॉम्प्रेमाईज यार।.........ढ। नाही नाही, दोघही एकत्र जातो ना,,,, पण थेटरात, तिथं हिचं फक्त तोंड चालतं ते मध्यंतरात।। आणि हो आठवतंय, चित्रपट पण चेटकिणीचाच होता. मला अजिबात भीती नव्हती वाटली बाजूला ही जी होती बसली.... धीर द्यायला । मॉलमध्ये पण आम्ही मनमोकळे आणि हौसेने फिरतो, फरक एवढाच, ही तिच्या वाटेने वस्तू बघत आणि मी माझ्या वाटेनं व्यक्ती बघत....... **गाडी मधे मात्र ही मूग गिळून बसते, कारण माझ्या चालवण्यावर हिचा विश्वासच असतो तेवढा. दुचाकीवर तर तो ही प्रश्न नसतो, कारण माझी घरातली सुप्त इच्छा इथं जी पूर्ण होत असते...तोंडावर पट्टी जी बांधलेली असते।।।।।।

- सागर ढवळे

...............................

आपले राजकारणी म्हणजे निव्वळ उडवाउडवी! आता हेच बघा ना ...

संजय राऊत भुवया उडवतात

उदयनराजे कॉलर उडवतात

गिरीष महाजन गाड्या उडवतात

खडसे साहेब रेवड्या उडवतात

राणे साहेब थुंकी उडवतात

फडणवीस साहेब पतंग उडवतात

भुजबळ साहेब कमीशन उडवतात

राज साहेब लोकांच्या टोप्या उडवतात

उद्धवराव स्वबळाच्या अफवा उडवतात

पृथ्वीबाबा केसाचा तुरा उडवतात

अशोकराव सैनिकांचा हक्क उडवतात

कविराज आठवले स्वतःच उडत असतात

अण्णा गांधीगिरीवरचा विश्वास उडवतात

तावडे शिक्षकांच्या नोकऱ्या उडवतात

गडकरी स्वतःचीच चरबी उडवतात

धाकटे पवार दुष्काळातही धार उडवतात

थोरले पवार सगळ्यांची झोप उडवतात

म्हणून म्हणतो, आपले राजकारणी म्हणजे निव्वळ उडवाउडवी!!

- सॅबी परेरा

...............................

दुवा

कॉलेजरोडवर एक तृतीयपंथी भेटला. साधारण तिशीतला असेन. दे, मालक. 'दुवा लागेल तुला' म्हणून विनवू लागला. मला जरा वेगळंच चित्र पाहायला मिळत होते. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता अतिशय विनम्रपणे केवळ कप्पाळाला हात लावून पैसे मागत होता. अर्थात ती भीकच. मला त्याला पैसे देवू वाटेना, सो कॉल्ड 'हिजडा' म्हटलं की डोळ्यासमोर येणारं त्यांची विक्षिप्त वागणूकही दिसत नव्हती, त्यामुळे घाबरून जाण्याचा प्रश्नच नव्हता. माणसासारखी त्याची वागणूक पाहून मलाही हायसे वाटले. आपली बटबटीत प्रतिमा बदलण्याचा तृतीयपंथी लोक, समाज प्रयत्न करत राहील तर एकदिवस स्त्री,पुरुष, तृतीयपंथी ह्यांच्यातली सामाजिक दरीच राहणार नाही. टाळी वाजवली नाही, ना नाच केला. याचमुळे मग मी त्याला पैसे द्यायला तयार झालो. तसे माझ्याकडे फार काही पैसे नसतात, मला कार्ड वापरायला जास्त आवडते. पण तरीही म्हटलं, देऊया. जेवेल तरी हा 'माणूस'. पण, नुसतेच पैसे दिले असे नाही, त्याचीही शाळा घेतली. 'पैसे देतो रे, तू पैसे मागत का फिरतोस ? शिक्षण तुमच्यासाठी खुले झाले आहे, का भीक मागत राहतोस'. यावर त्याने मला 'अभी कहा पढाई होगी' असे म्हणत निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला. तरी मी 'पढाई को कोई उम्र लगती क्या, हमारी दिशा पिंकी शेख ताई देख, पढाई करके लोगो को भी पढाती है' त्यावरही त्याने स्वतःचा हेका सोडलाच नाही. 'ठीक है बोले, पैसे दे, पैसे दे' असे म्हणून मग माझ्याकडून पैसे घेऊन गेलाच... [😢] असो, मी माझा एक प्रयत्न करून पाहिला, तुम्हीही करा. शिक्षण सगळ्यांना मिळायलाच हवे, तो 'माणूस' म्हणून जगणाऱ्यांचा अधिकार आहे.

- विशाल लोणारी

...............................

 प्रतिक्रिया द्या7861 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर