फेबुगिरी
शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी..

एकाएकी माइंदळ आभाळ दाटून आलंय आणि त्या चाहुलीनं उंबराच्या झाडावरची मुंगळयांची रांग लगबगीने खाली उतरलीत. बुंध्याशी साठलेला पालापाचोळा विस्कटत तेलमुंगळे बेगीने कोरड्या ठाक पडलेल्या मातीत शिरू लागलेत. काळ्या मुंग्यांनी शिस्तबद्ध रांगा मोडल्यात आणि पाण्याच्या लाटा याव्यात तशा मुंग्यांच्या लाटा निघाल्यात. रामप्रहरी दाणापाणी आणायला गेलेली पाखरं अर्ध्यातनंच परतीच्या वाटेवर निघालीत. लख्ख उजेड नजरंआड गेलाय, शिरवळ पडतीय. वर्गाबाहेर पायाचे अंगठे धरून उभ्या केलेल्या विद्यार्थ्यागत ढगाचा एखादा तुकडा सकाळी दिसत होता तर आता मात्र बऱ्यापैकी सावळे मेघ गोळा झालेत. अंगणातलं सारवण उकरून काढणारे सोनकिडे पुन्हा खपल्याखाली गेलेत. गोठ्यातलं वासरू उगाच कावरंबावरं होऊन कान ताठ करून दक्ष उभं राहिलंय. बांधावर दिसणारं लवलवतं मृगजळ गायब झालंय, वाऱ्याच्या झुळकात एकाएकी गारवा आलाय. बांधाच्या खालच्या अंगाला असलेल्या वडाच्या पारंब्या उगाच घट्ट बिलगल्यागत वाटू लागल्यात. कडब्याच्या गंजीत लपलेल्या पाकोळ्या एकापाठोपाठ एक उडून जाताहेत. चिंचेच्या झाडाखाली सावलीस आलेली उनाड कुत्री आळसावून गेलीत, अंग आखडून हातपाय दुमडून बसलीत. फिकट आभाळातले त्रिकोणी थवे संथ लयीत मागेपुढे करत आभाळाचा कानोसा घेताहेत, जिथवर नजर जाईल तिथवरचं आभाळ मातीत मान खुपसून बसलंय. जुंधळयांच्या ताटावरची पाखरं सुबाल्या करून पसार झालीत. गावतल्या देवळाचा कळस धुरकट होत चाललाय. दुरून कुठून तरी येणारं चिपाड जाळलेल्या धुराचं विमान जड हवेत विस्कटत चाललंय. कोरड्या पाटातल्या दगडाआडचे रातकिडे दिवसा ढवळ्या जागे झालेत. दावणीला बांधलेल्या बैलांनी रवंथ थांबवून डोळ्यात एकटक विमनस्कता धारण केलीय. पायवाटेवरच्या विजनवासातल्या मोडकळीस आलेल्या देवळाच्या चिऱ्यात जाग आलीय. डोक्यावर भाकरीची उतळी घेऊन रानाची पाऊलवाट चालणाऱ्या कारभारणींची पावले आकारण जड झालीत. झाडं सगळी गदगदित होऊन गेलीत अन वारा संथ होत चाललाय. 
उगाच बिनमौसमी आभाळ काय दाटून आलंय अन सारं शिवार ढवळून निघालंय. इतकं सारं व्हावं आणि तिची सय डोळ्यात दाटून येत नाही असं होईल काय?

- समीर गायकवाड

..............................

गेल्या आठवडयात माहिमला माझ्या घराच्या जवळच मनसेतर्फे मिसळ महोत्सव आयोजित केला गेला, त्याची व्यवस्था, तिथल्या दहा बारा प्रकारच्या मिसळी, स्वच्छता वगैरे मनसेच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे उत्तम नव्हे तर उत्कृष्ठ होती, खूप लोकांनी तिथे येऊन खाण्याचा आनंद लुटला. ते सगळं बहुतेक ठिकाणी होतंच. त्या दोन तीन दिवसात आमच्या गल्लीमध्ये थोडीशी गर्दी, माणसांची आणि वाहनांचीही होणं अपरिहार्य होतं.
मात्र त्या नंतर दुसऱ्याच दिवशी मनसेचा एक कार्यकर्ता एक पत्रक घेऊन आला. त्यात पक्षातर्फे गर्दीमुळे जी काय थोडी बहुत अडचण झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली गेली होती. इतरही बऱ्याच पक्षांचे कार्यक्रम आमच्या इथे होतात. इथल्या काही व्यक्तींनी पटापट पक्ष बदलल्यामुळे आणि त्याची बातमी जनतेपर्यंत पोचवण्यासाठी अधीर झाल्याने ते थोडे जास्तच होता, फटाक्यांचे अवशेष आणि हारातल्या तुटून पडलेल्या फुलांच्या कचऱ्याने आम्हाला ते दुसऱ्या दिवशी आम्हाला ते समजतं हा भाग अलाहिदा!

दिलगिरी व्यक्त करणे हा प्रकार मी तरी प्रथमच अनुभवला.त्याबद्दल संबंधित पक्षाचे आणि संयोजकांचे आभार.

(वरील मताशी लेखक सहमत आहे. मात्र त्या नंतर जर काही मत किंवा विचार आठवा परीशिलनात्मक भावना नोंदवल्या गेल्या तर त्यावर उत्तर देण्यास बांधील नाही.)

- संजय मोने

...............................

मी डॉक्टरेट केलेली असली तरी एक आत मधली गोष्ट सांगू काय? मला फार थोड्या गोष्टी माहीत असतात. जेव्हा कोणी सर, गीर गाय घेऊ काय? दूध किती देते? मध्य प्रदेशात पर्यावरण शास्त्राच कॉलेज कुठे आहे? असे प्रश्न विचारतात तेव्हा माझ्या मेंदूत लाईट लागत नाही. (जास्तीत जास्त मी वाव गिर गाय! मस्त! किंवा भोपाल में ट्राय करो असे सल्ले देतो) त्या ही पुढे जाऊन, गीर गाईच्या खांद्यावर सूर्याची किरणे पडल्याने दुधात सुवर्णभस्माचा अर्क खरच उतरतो काय? असे प्रश्न विचारले की स्वतः ची डिग्री जाळून त्याचे भस्म सर्वांगाला फासून हिमालयात जायची इच्छा होते.

- निलेश हेडा

..............................

एखाद्या गावचे उत्पादन हे ब्रँडमध्ये कसे रूपांतरित होते हे खूप मजेदार असते. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुलबर्गा आणि बिदर जिल्ह्यातील उडीद आणि तूर मोठ्या प्रमाणात येते. कर्नाटकातील माल बिडिंगमध्ये पहिल्या नंबरने खपतो हेही उघड आहे पण जेव्हा हीच आणि उमरगा, लोहरा,निलंगा आणि उदगीर परिसरातील तूर जेव्हा नागरी भागात "लातूरची तूरडाळ" म्हणून जाते तेव्हा तिला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. तर बाजारात यावर्षी "लातूर तुरडाळी"चे दुर्भिक्ष्य होण्याची चिन्ह आहेत.

- अशोक पवार

............................................................

प्रशांत - हर्षदा फॉर्म भरताना शांत बस (आराध्यच्या नवीन शाळेतल्या अॅडमिशनचा फॉर्म भरताना. त्यात टिचरने खाडाखोड करू नका असं सांगून आधीच घाबरवलं होत) 
मी - (फॉर्म भरत नसल्याने आणि प्रशांत चूक होऊ नये म्हणून भलताच टेन्शनमध्ये असल्याने) कसं बसू शांत 
प्रशांत - फेसबुक उघडून बस....
मी एका जागी शांत बसावं म्हणून मला फेसबुक हातात दिलं जातं. 
लहान मुलांना नाही का टीव्ही, मोबाईल देतात त्यांनी मस्ती करू नये म्हणून. 
(ही पोस्ट तेव्हाच लिहिलीय. आता फॉर्ममध्ये जास्त खाडाखोड नको म्हणून लाईक्स कमेंटची वाट बघत बसलेय  ;)

#LaughForLife #LaughingMoment

- हर्षदा परब

..............................

आमची भज्यांवरून थट्टा करणाऱ्यांची भजी आम्ही आखंड हिंदुराष्ट्रात उकळत्या तेलाच्या कढईत तळू...

-प. पू. भ. जी. तळे, दैनिक टणाटण

#भजीप्रधान अर्थव्यवस्था, #भजीप्रधान आर्थिक महासत्ता

ता. क. - प्रामाणिकपणाने कष्ट करून जगणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल (मग तो भजी तळणारा माणूस असो, वा तो चपराशी असो वा सफाई कामगार, भंगी असो वा अगदी तो मोठा साहेब असो) माझ्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे कृपया मजेत घ्यावे आणि भक्तांनी मुद्दा उगीचच भरकटवू नये.

- गणेश पावसकर

..............................


प्रिय नीलेश साबळे ,
सा. न. वि. वि.
सुरवातीला निखळ मनोरंजन प्रेमळ विनोदाचा प्रवास करता करता तुम्ही जग प्रवासाला कधी कसे गेला हे कळलेच नाही बुवा.. 
निखळ हास्याचे फवारे उडवत सगळया घराघरातून विनोदी हवानिर्मिती करत तुम्हे अटकेपार झेंडे रोवले खर पण वर्ल्ड टूरचे आपले कार्यक्रम पाहता आता ते अटकेपार गाडलेले झेंडे आता परत काढून आणायची वेळ आता आलीय असच वाटतंय, बंद करा आता हे पोरचाळे कारण आपले हे जगाच्या पटलावर चाललेले पोरखेळ पाहून आपल्या मातीतून जगप्रवास करावयाची इच्छा असलेली मंडळी जगप्रवासच काय तर शेजारच्या गावाला पण जाणार नाहीत आणि भारतभ्रमण कारवया येणारी मंडळी पण इकडे फिरकणार पण नाहीत , तेव्हा या लवकर नाहीतर आम्ही आता सुषमा स्वराज् यांच्याकडे आपल्या टीमला असाल तसे परत आणावयाचे निवेदन करावयाचे योजत आहोत कारण आपल्या पेक्षा आमच्या कंदील लहान लहान बालके पण शाळेच्या स्नेहसंभेलनात सुंदर अभिनय करून निखळ आनंद निर्मिती करतात एवढं नक्की आपल्या आपल्या सहकाऱ्यांच्या विकृत अभिनयाने सर्वत्र हस व्हावयाची वेळ मात्र आलीय.
निखळ विनोद सोडून पैसा आणि टीआरपी प्रसिद्धीसाठी चालू असलेली वाटचाल पाहता आता आपला 'कपिल शर्मा' होण्याची वेळ जवळ आली आहे असेच भासते आहे, 
बोलायचं तर खूप काही आहे पण काही सुचतच नाही , 
कळावे,
आपलाच एक चाहता

- निनाद सिद्धये

..............................

पूर्वीच्या आणि आत्ताच्या बायकांच्या समस्या किती वेगवेगळ्या आहेत, नाही?

'पद्मावत'मध्ये राजा रतनसिंह आपल्या राणीसाठीच मोती आणायला दौऱ्यावर जातो आणि दुसरी बायकोच घेऊन घरी येतो.

आणि हल्लीच्या बायका, 'येताना कोबी घेऊन या' म्हणून सांगितल्यावर कोबीच्या ऐवजी फ्लॉवर घेऊन आलो, तरी वैतागतात!

- अभिजीत पेंढारकर

..............................प्रतिक्रिया द्या2113 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
विलास फुटाणे - शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
वाचनीय किस्से ,स्तुत्य उपक्रम

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर