'नेक'ची मेख.. कपाचं वय.. नामी मार्ग..
शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, विनोद आणि मार्मिक विचार असा सकाळच्या दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

एका अतिशय श्रीमंत माणसाला एक विचित्र आजार जडला. दिवसाच्या वेळी ऑफिसात गेल्यावर किंवा प्रवासात असताना त्याला डोळे बाहेर येत असल्यासारखं वाटायचं, डोकं गरगरायचं, मेंदूला मुंग्या आल्यासारखं व्हायचं, त्या अस्वस्थतेमुळे त्याला सतत भीती वाटायची. त्यातून त्याची अन्नावरची वासनाही उडू लागली होती.

माणूस श्रीमंत होता.
सर्व प्रकारच्या स्पेशलिस्टांकडे गेला.
डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेला, त्याने सांगितलं, आधी तुमचे सगळे चष्मे बदलावे लागतील. ते बदलून फरक पडला नाही, तर म्हणाला, लेन्स करेक्शन ऑपरेशन करूयात. त्यानेही फरक पडला नाही, तेव्हा त्याने 
परदेशातून मागवायचे महागडे ड्रॉप्स दिले. त्यानेही फरक पडला नाही, तेव्हा त्याने आपल्या परिचयाच्या डेंटिस्टकडे जायला सांगितलं.

डेंटिस्टने आधी सगळ्या दातांची सफेदी करवली. नंतर किडके दात पाडून रूट कॅनाल केलं. मग सगळे दात पाडून कवळी बसवली. त्याने फरक पडला नाही, तेव्हा त्याने आपल्या ओळखीच्या कार्डिऑलॉजिस्टकडे पाठवलं.

त्याने तीनचार स्टेंट बसवून टाकले. मग कोणी टॉन्सिल काढले, कोणी अॅपेंडिक्स. शेवटी धनिक महोदय एका सरकारी हॉस्पिटलमधल्या प्रख्यात सेवाभावी डॉक्टरकडे गेले. त्यांनी सांगितलं, मुळात तुमच्या 
आजाराचं काही डायग्नोसिसच झालेलं नाही, तर त्यावर उपचार कायहोणार? सगळे उपचार व्यर्थ आहेत. फक्त एक गोष्ट स्पष्ट आहे. तुम्ही कितीही उपचार करा. कसलीही ट्रीटमेंट घ्या आणि आता शिल्लक 
राहिलेला कोणताही अवयव काढून टाका. सहा महिन्यांच्या वर तुम्ही जगत नाही.

अनेक वर्षं या विचित्र आजाराबरोबर झुंजल्यानंतर हा माणूस इतका गांजला होता की आपण आता मरणार, या बातमीने त्याला बरं वाटलं. आता सुटका होणार, असं वाटलं. त्याने ठरवलं, उरलेलं आयुष्य सुखासमाधानात घालवायचं. त्याने एक महाल खरेदी केला. आवडीच्या सगळ्या गाड्या मागवल्या. जगभ्रमंतीचीही योजना आखली. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला तो रोज नवे कपडे परिधान करण्याचा. १८० सूट शिवण्याची ऑर्डर जगातल्या सर्वोत्तम शिंप्याकडे दिली.

त्याच्याकडे ते मापं द्यायला गेले. शिंपी मापं घेताना सहाय्यकाला म्हणाला, हा लिही, नेक १६.

धनिक म्हणाला, १६? पण, आजतागायत मी सगळे कपडे १५च्या नेकचेच घातलेले आहेत.

शिंपी म्हणाला, तुमची इच्छा असेल, तर मी १४चाही नेक बनवून देतो. पण, मग मला बोल लावू नका. तुम्ही १५ किंवा त्याच्या आतल्या नेकचे कपडे घातलेत तर तुम्हाला त्रास होणार. डोळे बाहेर येतायत, डोकं गरगरतंय, मेंदूला मुंग्या येतायत असं वाटणार. बोला, कितीचा ठेवू नेक?


धनिकाने पुढे आयुष्यभर १६च्या नेकचे कपडे वापरले आणि ते आयुष्य सहा महिन्यांनी संपलं नाही, हे सांगायला नकोच.

...........................

ईक्यू हा झेन गुरूंमधला मुल्ला नसरुद्दीनचाच भाऊ. अतिशय वात्रट.

एकदा मठात त्याच्या हातून चहाचा एक पुरातन आणि नाजुक कप फुटला. तो कचरा भरून ठेवत असतानाच मठाधिपती आले. ईक्यूने साळसूदपणे विचारलं, गुरुदेव, माणसं का मरतात?

गुरुदेव म्हणाले, मरण तर नैसर्गिक आहे. वय झालं की माणूस मरतो.

ईक्यूने लगेच कपाच्या तुकड्यांकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, तुमच्या या लाडक्या कपाचंही खूप वय झालं होतं बहुतेक. आत्ताच मरण पावला तो.

.................................

एखाद्याला
त्याच्या विखारासकट 
स्वीकारणे
यापेक्षा
त्याला नामोहरम करण्याचा
दुसरा नामी मार्ग नाही!

........................प्रतिक्रिया द्या2922 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर