खरे रसिक.. लोका सांगे.. मनुष्यप्राणी..
शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, फर्मास विनोद आणि मार्मिक विचार असा दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

एक शास्त्रीय गायक अतिशय गुणी पण विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होते. कोणत्याही मैफलीत त्यांच्या अतिशय विचित्र मागण्या असत. त्या पूर्ण न झाल्यास ते गायलाच बसत नसत किंवा गाणं मध्येच थांबवून निघून जात.

एका राजाने त्यांची मैफल ठरवली.

त्यांनी अट घातली, मैफलीत कोणीही मान डोलावता कामा नये. मान डोलली की मी उठून निघून जाणार.

राजा म्हणाला, असा रसभंग करू नका. मी सगळ्यांना तंबी देऊनच बोलावतो. कोणी मान डोलावली, तर त्याचा शिरच्छेदच केला जाईल, अशी दवंडी पिटवतो.

दवंडी पिटली गेली.

चांगलं गाणं ऐकताना मान डोलल्याशिवाय राहात नाही, हे ज्यांना माहिती होतं, त्यांनी मैफलीत न जाण्याचाच मार्ग पत्करला. ज्यांना चांगलं गाणं ऐकणं प्राणापलीकडे प्रिय वाटत होतं, त्यांनी हा धोका पत्करून जायचं ठरवलं.

मैफल सुरू झाली. अफाट रंगली. तरीही शिक्षेच्या भयाने जवळपास तीन तास एकही मान डोलली नाही. त्यानंतर मात्र एकेक मान डोलू लागली. हजारोंच्या समुदायात तीसेक लोक मान डोलावणं रोखू शकले नव्हते. राजाच्या शिपायांनी त्यांना हेरून ठेवलं होतं. मैफल संपल्यावर सगळ्यांना पकडून राजासमोर आणलं गेलं.

राजाने विचारलं, तुम्ही दवंडी ऐकली होती. तीन तास मान डोलावली नव्हती. नंतर कशी डोलावलीत?

पकडलेले श्रोते म्हणाले, आम्ही सावध चित्ताने मैफल ऐकत होतो. पण, गाणं इतकं स्वर्गीय होतं की हळुहळू का होईना आमचं देहभान हरपलं. आमच्या माना डोलल्या असतील, पण, ते आम्हाला माहितीही नाही. कारण, तेव्हा आम्ही शुद्धीत नव्हतो, स्वरतंद्रीत होतो.

राजा गायकाला म्हणाला, बोला आता. यांचा शिरच्छेद करून टाकू ना?

गायक म्हणाला, नाही. आता उद्या मी माझ्यातर्फे पुन्हा एकदा गायला बसणार. पण, ती मैफल फक्त या तीस लोकांसाठी असणार. गाण्याचा आनंद घेण्याची योग्यता फक्त याच तीस जणांची आहे. आणि महाराज, त्या मैफलीत तुम्हालाही प्रवेश नाही. तुमची मान डोलली नव्हती.

.............................

बेशिस्त वाहनचालकांमुळे
तुंबलेल्या रस्त्याकडे पाहात
फुटपाथवरच लालभडक पिचकारी टाकून
तो म्हणाला, 'फटके मारले पाहिजेत साल्यांना, फटके.'

.......................................

डायोजिनीज आणि अॅरिस्टॉटल समकालीन होते. दोघांमध्ये स्पर्धाशील मैत्री होती. अॅरिस्टॉटलचा जनमानसावर मोठा प्रभाव होता. डायोजिनीज हा कोणत्याही प्रभावापासून मुक्त असा मस्तमौला कलंदर फकीर होता. अॅरिस्टॉटलने माणूस म्हणजे दोन पायांवर चालणारा, पिसं नसलेला प्राणी आहे, अशी व्याख्या केली होती.

डायोजिनीजने एक मोर पकडला. त्याची सगळी पिसं उतरवली आणि तो अॅरिस्टॉटलकडे भेट म्हणून पाठवला, त्याच्या व्याख्येत फिट बसणारा मनुष्यप्राणी म्हणून.

.....................................................प्रतिक्रिया द्या6255 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर