संकटमोचन
शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८ सुगंधा चितळे-पांडे

वैद्यकीय शास्त्र प्रगत असूनही मुलांसाठी कुणीतरी वैद्य किंवा देशी उपचार करणाऱ्यांना सनातनी लोकांनी कायम प्राधान्य दिले. अंधश्रद्धा, नवस वगैरे तर्कशास्त्रापुढे न टिकणाऱ्या गोष्टी ते करत राहिले.

माझ्या लहान काकांच्या मोठ्या मुलीला जन्मतःच छिद्र होते. तसे तर त्यांच्या सगळ्याच मुलांना काही ना काही प्रोब्लेम्स होते. मधली मुलगी कान फुटलेली होती म्हणजे तिच्या कानातून सदैव पू वाहत असे. कानात कापसाचे बोळे घालूनच तिला सदैव वावरावे लागे. तर त्याच्या सर्वात लहान मुलाला अगदी लहानपणापासून प्रचंड नंबरचा चष्मा होता. शिवाय हे तिघेही अगदी मोठे म्हणजे वयाच्या २२-२३ वर्षापर्यंत रात्री झोपेत लघवी करत असत. त्यांच्या गाद्यांवर कायम झोपताना प्लास्टिक पसरलेले असे. आमच्या काकांच्या दारूच्या धंद्याची ही शिक्षा आहे असे सगळेजण म्हणत पण माझ्या मते त्या तिघांनाही कधीच चांगला डॉक्टर मिळाला नाही. कायम काहीतरी जुजबी उपचार हा वैद्य, तो आयुर्वेदिक डॉक्टर असे काकाचे चालू राही. मोठ्या मुलीला छातीच्या छिद्रामुळे प्रचंड दम लागत असे. तरीही तिने एका चांगल्या होतकरू माणसाला आपल्या प्रेमात उल्लू बनवले आणि घरी ही बातमी दिली. तिच्या वडिलांना तर सरकारी नोकरीवाला जावई हवा होता. त्या मानाने हा म्हणजे कमी पैसेवाला, कमी शिकलेला आणि त्यांच्या मानाने रंगाने काळा पण त्यांच्याच जातीतला होता त्यामुळे ते तयार झाले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलीत असलेल्या वैगुण्यामुळे त्यांचा हुंड्याचा होणारा अमाप खर्च यामुळे वाचणार होता. त्यांनी लग्न ठरवतानाच तिच्या सासरच्यांना तिच्या प्रकृतीची कल्पना दिली होती. ती माणसे अत्यंत चांगली होती. 'हा प्रॉब्लेम लग्नानंतर उद्भवला असता तर?' असे म्हणून मोठ्या मनाने त्यांनी तिला स्वीकारले. काकांनी ती जाण ठेवून दणक्यात लग्नाचा बार उडवून दिला. ती आता शहरात राहायला गेली तेव्हा तिच्या सासरच्यांनी लगेचच तिला चांगल्या डॉक्टरकडे नेऊन ऑपरेशनबद्दल अंदाज घ्यायला सुरुवात केली पण एका मुलाचा चान्स घेऊन नंतर एका वर्षाने हे ऑपरेशन करावे असे ठरले. त्याप्रमाणे चान्स घेऊन मुलगी झाली आणि एक वर्षही सरले.

तिच्या ऑपरेशनचा दिवस उगवला. आमचे दोन्ही काका काकू शहरात गेले आणि घरी आम्ही थांबलो. ऑपरेशनच्या दिवशी सकाळपासून घरात लगबग सुरू झाली. घरातल्या देवांची साग्रसंगीत पूजा झाली. आणि काकांचा फोन आला- तिला आता आत नेले आहे. गणपती पाण्यात ठेवा. झाले घरातले वातावरण गंभीर झाले. ताम्हणात गणपतीला ठेवले गेले आणि वरून जलाभिषेक सुरु झाला. अव्याहत एकेकाने आळीपाळीने गणपतीवर पाणी घालणे, तोंडाने अथर्वशीर्ष, संकटमोचन स्तोत्र असे पठण सुरू झाले. त्यांनी मला त्यांच्यात ओढायचा प्रयत्न केला तो मी कारणे शोधून हाणून पाडला. त्या दिवशी घरात स्वैपाक केला गेला नाही. साधे मी चहाचे नाव काढले तर सगळ्यांनी एकावेळी माझ्याकडे डोळे वटारून पाहिले. मी लक्ष न देता चहा करून घेऊन त्यांची गंमत बघत बघत पीत बसले. “तिकडे ऑपरेशन चालू आहे तू इथे चहा पितीयेस?” या त्यांच्या कांगावखोर प्रश्नावर मी त्यांना आठवण करून दिली की माझे बाबा गेले होते तेव्हा सगळ्यांनी चांगले एन्जॉय करत नाश्ता-पाणी केले होते मग त्यांना आणायला सगळे निघाले होते. मी त्यांना निक्षून सांगितले की त्यांच्यासारख्या ढोंगी माणसांबद्दल मला काहीही वाटत नाही. शिवाय मी माझ्या चुलत बहिणीने जलाभिषेक करण्याबद्दल तिला सुनावले. एरव्ही पाळी येऊ लागलेल्या कोणाही मुलीने देवांना शिवू नये, तुळस तोडू नये असले नियम त्यांचा धर्मसिंधु परायण बाप आमच्यावर लादत होता. आज गणपतीला अभिषेक करून तिने धर्म बुडवला असल्याचे मी जाहीर करून टाकले. त्याने तर तिथे काही काळ हलकल्लोळ माजला. मी त्यांना तिथे तसेच थेरं करायला सोडून माझ्या क्लासला निघून गेले.

मी परत आले तेव्हा ४.४५ वाजले होते. तेव्हा नेमका काकांचा फोन आला. “ताईला बाहेर आणले आहे. ती सुखरूप आहे.” झाले त्या सगळ्यांनी अभिषेक थांबवला. मोठ्या भक्तिभावाने त्यांनी गणपतीला कोमट पाण्याने नंतर, दुध आणि मधाने न्हाऊ माखू घातले आणि पुन्हा त्याची रवानगी देव्हाऱ्यात केली. मी म्हटले त्याला एव्हाना सर्दी झालेली असणार आहे. मी आवरायला आत गेले.येऊन पाहते तो काय तो माझी तीन भावंडे एकमेकांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडत होती. मी विचारले- काय झाले? ताई गेली का? ते स्तब्ध झाले आणि माझा रोख पाहून ते म्हटले की “हे आनंदाश्रू आहेत”. मी म्हटले “मग ठीक आहे.” त्या रात्री काकांचा फोन आला. परत आलो की आपण गणपतीला १०१ मोदकांचा नैवेद्य दाखवूयात. मी धोका ओळखला. कामे काढणार आहेत हे आल्याबरोबर. मी मनाची तयारी ठेवली.

काका आल्यावर मिटिंग बसली ती माझ्या वागण्याबद्दलची. मी त्यांना पूजेला नाही का म्हटले? तर मी सांगितले की त्याने काही होईल असे मला वाटले नाही. जे काही करणार ते डॉक्टर करणार होते. काकांना मी धर्मसिंधु परायण का म्हटले? तेव्हा मी सांगिलते की मुलींनी अभिषेक केलेला चालणार असेल तर त्यांच्या पाळीचे कारण पुढे करून त्यांना तुळस तोडायला का रोखले जाते हे तुम्ही धर्मसिंधुतून सांगू शकणार नाहीत म्हणून मी कुत्सितपणे तसे बोलले आणि सर्वात शेवटी ते म्हटले ताई गेली असे तू का म्हटलीस? मी सांगितले की मी काही तिचे मरण चिंतत नाही पण मला ह्यांच्यासारखा शो करणेही जमत नाही. त्या दिवशी सकाळी देवाला हात जोडताना मी त्याला हे म्हटलेले की कशी का असेना पण माझी बहीण ही कुणाचीतरी आई आहे. तिला या संकटातून वाचव. ते गप्प झाले.

माझ्या सडेतोड उत्तरांनी त्यांनी मला मारायचा बेत रद्द केला आणि माझ्या भावंडांची निराशा झाली पण मी त्याचवेळी त्या सर्वांना निक्षून सांगितले की मी यापुढे तुमच्या या असल्या जात पंचायतीत येऊन गुन्हेगार म्हणून उभी राहणार नाही. ही शेवटची वेळ आणि तुमच्या १०१ मोदकांच्या संकल्पाशी मला घेणे देणे नाही. मी ते करणार नाही.

त्यांना ते सगळे मान्य करणे भाग होते कारण माझ्या विचारांना आलेली धार त्यांच्या पुराणमतवादाला कराकरा कापू लागली होती. त्यांना माझा प्रतिवाद करणे आता निव्वळ अशक्य होऊ लागले होते.त्यांच्या एकही शब्दाला मी खाली पडू देत नव्हते आणि इथेच ते हबकून गेले होते. त्यांच्या तुटपुंज्या लॉजिकच्या चिरफळ्या मी सहज उडवू लागले होते हे त्यांचे सर्वात मोठे दुखणे होऊन बसले होते. आणि नंतर मी या माझ्या लॉजिकचा शस्त्र म्हणून वापर करू लागले तेव्हा तर त्यांची अवस्था बिकट, आणखी बिकट होत गेली.

(क्रमश:)

शब्दांकन- शंतनू पांडे

कर्म(ठ)कथा मालिकेतील मागील भाग वाचा: http://www.bigul.co.in/bigul/2142/sec/11/superstitions%201प्रतिक्रिया द्या2137 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर