फेबुगिरी
शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी..

डाय सोडला आन् पांढऱ्याधोक मिशा ठिवल्या. सारक्या वारक्यात मंग लैच एजेड दिसू लागलो. पन नंतरच्याला यक गोष्टपोष्ट घडली.

यकदिशी पांढऱ्या काळ्याचा हिशेब मांडीत व्हतो तं आचानक काळ्या केसांचा यक पुंजका दिसला. पांढऱ्या मिशांमंदून आतल्या साईडनं त्यांची दाटीवाटी झाली व्हती आन् परस्परांच्या आंगावर ढांगा टाकीत ते पुढं वाटचाल करीत व्हते. च्यामारी, म्हंजे काळे केस हायेत आजूक? त्यान्ला आपन उगाच अंडरइस्टीमेट करीत व्हतो म्हनायचं!

आर्टीफिशीयल काळ्याचे फटकारे सोसत आपलं काळेपन टिकवून ठिवनं म्हंजे डबल कसरत आस्ती. त्यांनी ती निभावली व्हती. इनकेस, म्या पांढरे केस ठिवन्याचा डिसीजन घेतला नसता तं ह्या चिवट काळ्यांचा संघर्ष कंदीच माझ्या ध्यानात आला नस्ता. मंग आसंच कवातरी पांढरे व्हवून ते गळूनबी गेले आस्ते. म्हंजे त्यांच्या तगून -हान्याची यकबी नोंद माझ्याकडं -हायली नस्ती.

च्यायला, आपल्यातलं पिव्वर बगायला मान्साला सोतालाबी ओरिजनल रहावं लागतंय फुकनीचं। त्याच्याबगर आपल्यातल्यांची इमानदारी नजरेत भरत न्हाई म्हनायची!

तं ही गोष्ट म्या दोस्ताला सांगितली तं दोस्त लै जो-यानं हास्ला. म्हन्ला, बब-या गोष्ट तं जबरा हाये; पन काळ्या पांढ-याच्या मधी आजूक शेड आस्तेत, त्या बगितल्यास का कंदी? त्यांचा रंग उठून दिसत नस्तो; पन म्हनून त्यांना ग्रहीत धरत नस्तेत. मान्साला गंजा करन्याची ताकद त्यांच्यातच आस्ती.

- बब्रुवान रुद्रकंठवार

................................

येकदा ते अमिताबच्चन शूटिंग वरनं लै थकून घरला येतंय.

दारात येऊन, चप्पल गिप्पल काढून, काय कराली म्हणून जयडीला ईचारतंय..

तेवढ्यात जयडी तिकुंडच जोरात तेच्यावर ओरडतंय, "फरशी पुसाली दिसत न्है का, भैरच काढ ते चपला अन थांब तिकडंच.."

अमिताबच्चन चपला काढून तिथंच ताठकाळत हूभारतंय, मोबाईल बघता बघता "अब्या कुटं कुत्री मारालंय" म्हणून इचारतंय..

जयडी आणिकच वैतागतंय आणि म्हणतंय, "कुत्री मारणार नैतर काय करणार, तेलाबी द्या की जरा पिच्चर गिच्चर.."

मग अमिताबच्चनबी वैतागतंय, "अगं किती दिलाव त्याला, काय माज्याच नावाचं वाट्टोळं करुन ठेवलंय बघ, लगीन करून दिलाव, सुधरल म्हटलं तर त्येबी नाई.. त्या ऐशलाबी घरी बशिवलय बघ.. ते कबड्डीची टीमबी घिऊन दिलाव.. आता काय किराणा मालाचं दुकान टाकून द्याव की काय.. त्या कडूला"

जयडी फडकं पिळत पिळत म्हणतंय, "ऱ्हाऊ द्या, ते हात लांबवून जरा फॅन लावा तीनवर, फरशी वाळाली जरा, मग या आत.."

अमिताबच्चन फॅन टाकतंय, वाडुळ वाट बघून फरशी वाळल्यावर आत येतंय, सोफ्यावर अंग टाकतंय अन लॅपकिननं तोंड पुसत पुसत ईचारतंय, "भाजी काय टाकाली, भूक लागलीये.."

जयडी आतनंच खेकसतंय, "मसूर टाकाले, जरा तांदूळ निवडाला घ्या, कुकर पण लावाले.."

अमिताबच्चन ईस्कटतंय अन मनात म्हणतंय "शूटिंगला जालतो तेच बरं होतं लका, शेनशाची काय दशा दशा कराली ही तर.."

तेवढ्यात टेरी उडवत अब्या येतंय अन बापाला बघून थबकतंय. बळंच ईचारायचं म्हणून ईचारतंय, "कधी आलाव आबा, काय फोन न्हाई, पत्ता न्हाई, काय इशेष आज?"

अमिताबच्चन त्याची खेचाला जातंय, "इशेष काय नाही बे, मसूरची भाजीये आज, चालेल नव्हं?"

अब्या तोंड वाकडं करत म्हणतंय, "पिझ्झा गिज्जा सांगा की ओ आबा, काय मसूर खाताव.. करू का सांगा फोनं"

अमिताबच्चन चिडतंय अन म्हणतंय, "व्हय, तुझा बाप करालाव काम, आणालाव पैसे, तू खा फुकट कडू.."

अब्या नरमतंय, हळूच आवाजात बोलतंय, "एवढं काय चिडालाव? दोन वर्षापूर्वी केलताव की हाऊसफुल.. आता पाचवा धूम पण येईल की.."

बच्चन आणि सटकतंय अन म्हणतंय, "हा.. हाऊसफुल केलाव, धूम करालाव.. मला सांगालालाव तू.."

अब्या रडकुंडीला येत म्हणतंय, "आई बघ न आबा परत ओरडालेत.. तीच कैशेट टाकालेत"

अब्या हळूच अमिताबच्चनच्या कानाजवळ जातंय अन म्हणतंय, "ते ऱ्हाऊ द्या, सिलसिला शेव करून ठेवलाव तुम्ही मोबाईलमध्ये माहितीये, उठ सूट त्या रेखामावशीला बघताव, सांगू का आईला.. मग ती सिलसिलाचा खुळखुळा करते बघा.."

अमिताबच्चन घाबरतंय अन म्हणतंय, "बर बर असू दे, मी बोलताव अद्या चोप्राशी, धूमचं काय तेबी बघ म्हणताव.. अन पिज्जाची ऑर्डर पण देताव.. मला कुठली हौस आलीय मसूर खायची... तू कडूगत वागू नको"

अमिताबच्चन मग किचनकडं तोंड करून दिवारची पोज घेत म्हणतंय, "उफ तुम्हारे मसूर, तुम्हारे गिले फर्श.."

जयडी भायेर येऊन ईचारतंय, "काय म्हणलाव काय..?"

अमिताबच्चन म्हणतंय, "कुटं काय, पिज्जा सांगालतो, तुला पण सांगू का म्हटलं.."

एवढं म्हणून अमिताबच्चन आणि अब्या दात काढत बसत्येत..

- राज जाधव

................................

पिंट्या , पिंकी ( उर्फ पप्या , गुड्डी ) यांच्यासाठी महत्त्वाचं सांगणं ...

माझ्या फेसबुक फ्रेन्ड लिस्टमध्ये एका विशिष्ट जनरेशनचे लोक्स आहेत... विशिष्ट जनरेशन म्हणजे काय? हे लोक माझे भाऊजी, मामा, काका आणि हाका मारण्यापुरते मोठे भाऊ वगैरे असे लोकं... हे लोक्स माझे पाहुणे आहेत; तर काही कधी काळचे शेजारी... ही लोकं माझ्या वडिलांपेक्षा लहान आणि माझ्या मोठ्या भावापेक्षा वयाने मोठी आहेत.. ह्यांची मुलं ८वी ,९वी १०वी , १२वी, डिप्लोमा किंवा डिग्रीच्या पहिल्या वर्षाला आहेत... आर्थिक परिस्थिती म्हणावी तर जास्तीत जास्त मध्यमवर्गीय ....

ह्या लोकांनी आपल्याआधी स्वतःच्या पोरांना स्मार्ट फोने घेऊन दिले आहेत; आणि आपण लै भारी पप्पा आहोत हे सिद्ध केलं आहे... कालांतराने मागच्या दोन-एक वर्षात ह्या पप्पा लोकांकडे स्मार्ट फोन आलेत.. पिंट्या, पिंकी, पप्या, गुडडी, दीदीच्या मदतीने ह्या पप्पा लोकांचे फेसबुकवर अकाउंट आहे आणि व्हाट्सअपसुद्धा... दिसेल त्याच्यावर संस्कार करायची खोड ह्यांच्याकडे असल्याने ते फेसबुकवर सकाळी - सकाळी शुभ-सकाळच्या रांगोळ्या काढतात आणि एक फिलॉसॉफीचा डोस समस्त फेसबुक समाजाला पाजतात... त्यांच्यासारखेच बाकीचे पप्पा लोक्स त्यांना प्रतिसाद सुद्धा देतात... इथपर्यंत ठीक आहे...

फेसबुक खरंतर खूप जपून वापरलं पाहिजे... जपून म्हणजे नेमकं कसं हे त्यांच्या डोक्यात घालणं फार गरजेचं आहे... आता एक उदाहरण बघा...

फेसबुकवर बऱ्याच प्रकारच्या कम्युनिटी (पेजेस) असतात.. बरेच चित्र-विचित्र प्रकारचं पोस्टिंग आणि शेअरिंग चालू असतं... एखादा अंधूक (ब्लर्ड) फोटो असतो.. शक्यतो तो फोटो नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेतला एखाद्या मॉडेलचा असतो.... फोटो काही नीट दिसत नाही फक्त अंदाज येतो... फोटोच्यावर लिहिलेले असते "कंमेंट मे ४ लिखो और जादू देखो " आणि इथेच आमच्या ह्या पप्पा लोकांचा घात होतो... हे बिनधास्त कंमेंटमध्ये ४ ठोकून देतात... आणि मग... पप्पांच्या फ्रेन्ड लिस्ट मधल्या सगळ्या लोकांना पप्पांची ही कंमेट दिसते... आणि मग काय .. "अहो दाजीबा , गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं!!! " हा प्रकार पप्पांच्या नकळत होतो... त्यांना काय जादू दिसत नाही ... पप्पा आपले स्क्रोल, लाईक आणि शेअर करण्यात दंग असतात... पप्पाच्या फ्रेन्ड लिस्टमध्ये त्यांचाच पप्या... पिंकी असते... आणि मग जास्त घोळ होतो...

तर माझं समस्त अशा प्रकारच्या पिंट्या, पिंकीला कळकळीचे सांगणे आहे, आपल्या पप्पांना फेसबुक साक्षर करा... कुठे कमेंट करा.. कुठे लाईक करा... काय शेअर करा... ह्याचं बेसिक ट्रेनिंग द्या... आणि त्यांना सांगा रात्री टाकल्यावर, मग सकाळी उठल्यावर घरात जी देवपूजा करता; तेवढ्यात भरपूर भक्ती आणि संस्कार होतात... फेसबुकवर शेअर झालेल्या फोटोखाली "ओम नम: शिवाय", "जय बजरंगबली", "जय माता दी", "जय गणेश", "श्री स्वामी समर्थ", "आमीन" वगैरे लिहून काही होत नाही... कसली प्राप्ती सोडाच, झालाच तर फेसबुकवरच्या देव भक्तीने तोटाच जास्त होईल म्हणावं...

असो... आमच्या आजच्या काड्या सारून झाल्या.... जे काय सांगितलंय ते गरजेचं आहे... बहुतेक माझी सांगायची पद्धत चुकीची आहे असा वाटत असेल तर वाटू देत ( हा हा हा हा... मी अतिशय अ-संस्कारी, असंस्कृत वगैरे वगैरे.. ) .. समस्त पप्पांना नमस्कार आणि पिंट्या, पिंकी, पप्या, गुड्डी ह्यांना काय नाय :)

कळावे, 
- मनस्वी राजन 

- राजेंद्र झगडे

................................

आदरणीय प्रधानसेवक,

आपण पकोडे म्हणजे भजी बघतो ती वडापावच्या गाडीवर किंवा, एखाद्या छोट्या हॉटेलात जिथं चहाबरोबर खायचा तो एक पदार्थ असतो. याशिवाय, बाहेर दणदणीत पाऊस असताना चहा किंवा मद्याबरोबर, त्या त्या द्रवांची खुमारी वाढवायला भजी आवर्जून बनतात. हल्ली लग्नसमारंभात स्नॅक म्हणूनही वेगवेगळी भजी, ब्युफेचा भाग म्हणून समोर येतात.

भज्यांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. कांदा- बटाट्यासारखी नेहेमीची, मुगाची, डाळीची, ओव्याच्या पानांची, मिरचीची, लसणाची, अशी अनेकविध भजी आपल्या रसनेला तृप्त करतात.

पण एक मिनिट थांबूया!!

भजी असतात ती मुख्य अन्नपदार्थाबरोबर साईड-डिश म्हणून! एक चटकदार पदार्थ जो रोजच्या अन्नात नसतो व म्हणून समारंभाच्या जेवणात असतो. आणि त्याउप्पर त्याला फार महत्त्व देणेही योग्य नसते.

रोजच्या जेवणाला पोळी / भाकरी, भाजी, भात, आमटी, एखादी कोशिंबीर असे समतोल अन्न गरजेचे असते आणि त्यावर मनुष्याचे आरोग्य अवलंबून असते. यात ३६५ दिवसही भजी न खाल्ल्यास काहीही परिणाम होत नाही आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

संतुलित अन्न, अनुरुप व्यायाम आणि निरोगी विचार या गोष्टींनी आयुष्य सुरळीत चालते! मात्र, आपण रोज भजी खाऊ लागलो तर काय समस्या निर्माण होतील हे वेगळे सांगणे न लगे!!

तर महाराज, देशाचं सुद्धा असंच आहे!

रोजचं आयुष्य धड चालावं म्हणून -

भाकरी, आमटी, भात हवा म्हणजे शेतकरी धड जगायला हवा;

भाजी हवी म्हणजे पाणी पुरवठा धड हवा;

दूध-दुभतं, फळं हवीत, म्हणून ते टिकवणारे कारखाने हवेत;

कारखाने हवेत म्हणून वीज हवी;

वीजेवर यंत्र चालवणारे तंत्रज्ञ हवेत;

नवीन आणि अधिक सुलभ तंत्रज्ञान आणणारे अभियंते आणि शास्त्रज्ञ हवेत;

या सर्वांना सोप्या आणि उपयुक्त भाषेत शिकवणारी देशव्यापी व्यवस्था हवी;

या सर्व गोष्टी चालवण्यासाठी उत्तम दर्जाचे प्रशासक आणि तज्ज्ञ हवेत आणि पर्यायाने त्यांना उत्तम शिक्षणव्यवस्था आणि रोजगाराच्या सोप्या संधी हव्यात!!

महाराज, भजी बनवण्यात आणि विकण्यात स्वकष्टार्जित कमाईचा आनंद नक्कीच असला तरी एकूण व्यवस्थेतली ती किती कमी गरजेची गोष्ट आहे हे कदाचित वरील विवेचनावरून लक्षात येईल.

महाराज, तुम्हाला ही विनंती आहे की, माझा मुलगा जेव्हा देशाच्या प्रमुखाला बोलताना ऐकेल, तेव्हा तोंडून कलाम, साहा, भाभा, नारळीकर, कर्वे, जगदीशचंद्र बोस यांच्यासारख्यांच्या कामाचे कौतुक येऊ द्याल का? कदाचित झाली तर प्रगतीच होईल!

आपण स्वतंत्र झाल्यापासून खूप गोष्टी झाल्यात आपल्या देशात, पण बऱ्याच बाकीही आहेत!

आपण कोणते आदर्श तरुण आणि मुलांसमोर ठेवावे याचे तारतम्य तुम्हाला असावे अशी आशा बाळगून एवढेच म्हणेन -

Not a failure but a low aim is a crime!!

धन्यवाद.

- कौस्तुभ खांडेकर

................................

ऊस हे पीक नसून जात आहे .

- सतीश वाघमारे

................................

सूर नवा ध्यास नवा हा गाण्यांचा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर सोमवार ते बुधवार रात्री ९:३०ला असतो.

प्रथमच एक गोष्ट म्हणजे हा नव्या गायक-गायिकांना संधी देणारा टॅलेंट हंट कार्यक्रम नाही. ह्यातील स्पर्धक आहेत काही प्रमाणात तरी प्रस्थापित झालेले गायक. ह्यात शरयू दातेसारखी गायिका आहे जिने ह्याआधी काही स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, अगदी हिंदीतील कार्यक्रमातही भाग घेऊन नाव मिळवलेले आहे. तसेच वैशाली माडेसारखी चित्रपटांसाठी नियमित गाणारी यशस्वी गायिकाही आहे. तसेच जितेंद्र तुपे, मधुरा कुंभार असेही गायक आहेत.

हे लोक ह्या स्पर्धेत का भाग घेतात असा प्रश्न काहीजणांना पडतो.
अर्थातच मानधन हे एक कारण, त्याशिवाय लोकांसमोर येणे, स्वत:चा कस आजमावणे, स्वत:ला तपासणे, नवीन शिकणे अशी काही कारणे असू शकतात.

वैशाली माडेसारखी प्रस्थापित गायिका ह्यात भाग घेते याचीही अशी कारणे असू शकतात. कार्यक्रमातील परिक्षक तिच्या गाण्यावर बोलणार, गूण देणार हे तिने मान्य केलेले आहे. ह्याकडे एक रोल प्ले म्हणूनही ती बघत असेल.
तेव्हा हे गायक का भाग घेतात हा काही मुद्दाच नाही.

नव्या गायकांऐवजी ह्या प्रस्थापितांना घेऊन वाहिनी कार्यक्रम का करते, ह्याचे उत्तर असे की हे दोन वेगळे फॉर्मॅट आहेत. नव्या गायकांना घेऊन कार्यक्रम करण्याआधी सुरवात - तयारी (प्रीकर्सर) म्हणून कधी हे कार्यक्रम दाखवले जातात, कधी इतर वाहिन्यांवरच्या कार्यक्रमांना स्पर्धा म्हणून केले जातात.

ह्या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, महेश काळे आणि शाल्मली खोलगडे हे तिघे परिक्षक आहेत.

अवधूत गुप्ते, महेश काळे यांच्याबद्दल फारशी तक्रार दिसत नाही. पण शाल्मलीवर काही लोक तरी खूप टीका करताना दिसतात.

एकतर ती कोण आहे असे आधी विचारतात आणि माहिती दिल्यावर ही कोण नवीन पोरगी, किती लहान आहे, ती वैशालीला काय जज करणार असे प्रश्न असतात.

दुसरी टीका असते, तिची वेशभूषा, केशरचना, मोकळे वागणे आणि इंग्लिश बोलणे…

इंग्लिश बोलण्याबाबत महेश काळे काय बोलतात ते ऐकले तरी एकाच कॉमेंटमध्ये ते अनेक इंग्लिश शब्द वापरतात, उदा: मिनिमिलीस्ट, डिस्क्रिपटीव्ह, पेंटींग, स्केचेस..

महेश काळे किंवा शाल्मली किंवा इतर कोणी इंग्लिश शब्द वापरतात याचे कारण अनेक क्षेत्रात (सेक्टरमध्ये) त्यात वापरले जाणारे तांत्रिक शब्द – संज्ञा - आपण विकसित केलेल्या नाहीत किंवा वापरात आणलेल्या नाहीत, रुढ केलेल्या नाहीत.

गंगाधर गाडगीळांनी लिहिलेले आहे, ते एकदा नाटकाची तालिम बघायला गेले तर त्यांना आढळले नट मंडळी सर्रास मोठ्या प्रमाणात इंग्लिश शब्द वापरत आहेत.

शाल्मलीच्या कपड्यांच्याबाबत ती काही वन पीस घालून येत नाही की मिनी स्कर्ट. हिंदीतील अशा कार्यक्रमात नीती मोहन, नेहा कक्कर, सुनिधी (ह्या सगळ्या चांगल्या गायिका आहेत!) काय ड्रेसेस वापरतात ते बघितले तर आपले लोक काय म्हणतील? की तिकडे चालेल?

ह्या सर्वापेक्षाही शाल्मली एक उत्तम गायिका आहे, तिचा आवाज वेगळा आहे, चांगले ज्ञान तिच्याकडे आहे. तिची गाणी तर ऐका आधी मग टीका करा.

ती कोणी कसे गायले आहे ह्याचे चांगले विश्लेषण करते. सुरेश वाडकर, ह्रदयनाथ पाहुणे म्हणून आले होते तेव्हा त्यांनीही ह्या तिघांची तारीफ केलेली आहे.

थोडसं वेगळं असणं इतकं का खटकतं?

- उदय कुलकर्णी

................................

अजून एक

संधीच्या आणि साधनांच्या अभावी काही लोकांनी भजी वडे इडल्या डोसे विकायला सुरुवात केली. त्यांच्याकडून वेळोवेळी पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी, भाई/दादा/नेते यांच्या बगल बच्चानी हफ्ते घेतले, होता होईल तो त्रासच दिला. काही जण त्यातूनही यशस्वी झाले आणि कष्ट करून मानाने जगू पाहणाऱ्या लोकांसाठी रोल मॉडेल ठरले. त्यांचं कौतुक आहेच. प्रश्नच नाही.
पण तुम्ही नोटा बंद केल्या, सटर फटर टॅक्सेस लावले, गुंतवणूक येणार म्हणून टांझानिया पासून ते झांझिबार पर्यंतचे दौरे केले आणि चार वर्ष झाल्यावर कुठे आहेत रोजगार म्हणून विचारल्यावर तुम्ही या लोकांकडे बोट दाखवणार. चिदंबरम वेग्रेला मध्ये नका आणू. तो सात मूर्ख आहे. आता तुमचं बोला.
उद्या स्वतःच्या जीवावर सुपरस्टार झालेला शारुक, 44व्या वर्षीही अफाट सेक्सी दिसणारी मलायका अरोरा, विराटने मारलेली सेंच्युरी कशाचंही क्रेडिट घ्याल!!
येडा समझा है क्या?

- बिपीन कुलकर्णी

................................

'कोल्ड शोल्डर' उर्फ बिनखांद्यांचे कपडे! 
गेल्या वर्षभरात, बॉस्टनपासून बंगलोरपर्यंत, जगात सगळीकडे दिसलेली बायकांच्या कपड्यांची फॅशन म्हणजे, 'उघड्या खांद्याचे' ड्रेसेस! बऱ्यापैकी अंगभर असलेला ड्रेस, त्याला हाफ किंवा फुल बाहीही जोडलेली, पण खांद्यावर तेवढं फाटलेलं (किंवा न शिवलेलं).

जगातली प्रत्येक नवी फॅशन पुढे नेण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर असल्याचा आविर्भाव घेऊन अनेक जणींनी आपल्या कपड्यांचा खांदेपालट केलेला दिसला या वर्षात!

म्हणजे, कोणीही कसलेही कपडे घालावेत, त्याला हरकत घ्यायची धुरा स्वयंघोषित संस्कृती रक्षकांच्या खांद्यावर असते, आपल्या नाही, पण तरीही काही प्रश्न पडतातच...

उदाहरणार्थ, 
एखादीच्या खांद्यावर डोकं ठेवून तिचा प्रेमिक निवांत बसत असेल तर खांद्याच्या टोकाची हाडं डायरेक्ट टोचत असतील का?

किंवा उदाहरणार्थ, 
एखाद्या घळाघळा रडणाऱ्या मित्र किंवा मैत्रिणीला बिनखांद्याच्या कपडेवालीनं डोकं टेकवून रडण्यासाठी आपला खांदा ऑफर केला तर त्या अश्रूंचा खांद्यावर डायरेक्ट अभिषेक होत असेल का?

किंवा उदाहरणार्थ, 
कडाक्याच्या थंडीत असे कपडे घातल्यावर फक्त खांद्याला जास्त थंडी वाजत असेल का?

किंवा उदाहरणार्थ
चेहऱ्यासारखाच खांदाही गोरा दिसावा म्हणून काही फेअरनेस क्रीम्स मिळायला लागली आहेत का?

जाऊंद्या, आपल्याला काय करायचंय, कारण फॅशनची खंदा पुरस्कार करणारी माणसं अशा किरकोळ प्रश्नांना नेहमीच खांदा देतात!

या कोल्ड शोल्डर ड्रेसेसवरून एक गंमत आठवली.

लहानपणी Black & White मराठी सिनेमे बघताना, त्यात मद्यधुंद व्हीलन जाड्याभरड्या हिरॉईनच्या अंगावर हात टाकायचा. त्यानं टाकलेल्या हातानं हिरॉईनचं ब्लाऊज खांद्यावर फाटायचं.

पण मग तिथेच सीन कट होऊन पुढच्या सीनमध्ये हिरॉईनची 'इज्जत लुटली’गेल्याची चर्चा असल्याचा सीन असायचा.

तर लहानपणची अनेक वर्षं, 'खांद्यावर ब्लाउज फाटणं म्हणजे इज्जत लुटली जाणं’ असा माझा समज होता!!

कोल्ड शोल्डरवरून हे आठवलं इतकंच.

आपली कशालाच काही हरकत नाही. उगाच माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कमेंटीच्या गोळ्या झाडू नका!!

- प्रसाद शिरगांवकर

................................

नेमकं अजून काय हवं होतं म्हणजे अक्षय खन्ना आज टॉप वर राहिला असता? काय नव्हतं त्याच्याकडे? इंटेन्स लूक, जबरदस्त अभिनय क्षमता, चांगली संवादफेक. काही कसर राहून जायला नको म्हणून मोठ्या घराण्याचे बळ. मोठमोठ्या दिग्दर्शकांनी त्याला आपल्या सिनेमात घेतलं होतं. सगळ्या आघाडीच्या नायिकांसोबत काम करून झालं होतं. नेमकं बिनसलं कुठं? त्याचा प्रचंड मुडी स्वभाव आणि मितभाषीपणा बहुतेक आडवा आला असावा. तुझा सगळ्यात आवडता अभिनेता कोण या प्रश्नाला उत्तर देताना आमिर खानने अक्षयचं नाव घेतलं होतं. असा कुठलाच जॉनर नाहीये ज्यात अक्षय खन्नाने आपला ठसा उमटवला नाही. 'दिल चाहता है' मधला इंटेन्स सिड, प्रियदर्शनच्या 'हंगामा' मध्ये स्वतःच्या बापाच्या तिजोरीवरच दरोडा टाकणारा पोरगा, 'हमराज'मधला स्वतःची ambition पूर्ण करण्यासाठी प्रेयसीला पणाला लावणारा थंड काळजाचा खलनायक किंवा 'बॉर्डर' मधला पहिल्यांदा रक्त बघून ओकणारा आणि युद्ध सुरू झाल्यावर आमूलाग्र बदलून गेलेला तरुण सैनिक. नट म्हणून जी मिळतील ती आव्हान त्याने लीलया पेलली. एवढं वैविध्य फार कमी नट दाखवू शकले. 'तारे जमीन पर' मधली निकुंभ सरांची भूमिका मूड स्विंग मुळे त्याने सोडली. अस्थिर कौटुंबिक जीवन, त्यातून सुरू झालेली व्यसनं आणि भावनिक अस्थिरता नट म्हणून त्याच्या कारकीर्दीला मारक ठरली. प्रियदर्शन आणि अब्बास मस्तानसारखे नेहमी त्याच्यावर विश्वास टाकणारे दिग्दर्शकपण त्याच्यापासून दुरावले. अक्षयला नवीन प्रोजेक्ट मिळणं हळूहळू बंद होत गेलं. त्यात स्वतःची मार्केटिंग करण्याची जबरदस्त असोशी त्याच्यात नव्हती. वेगाने विरळ होत जाणारे केस हा फॅक्टर अजूनच त्याच्या विरोधात गेला. पण काहीही असलं तरी जबरदस्त अभिनेता हे बिरुद त्याच्याकडून कुणीही हिरावू शकत नाही. दिल चाहता हैमधल्या त्याच्या सिडने भारतातल्या संवेदनशील आणि अंतर्मुख आणि कुणालाही एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जवळ न येऊ देणाऱ्या लोकांना एक चेहरा दिला. दिल चाहता हैमध्ये एक जबरदस्त सीन आहे. डिंपल त्याच्या घरी त्याची पेंटिंग्ज बघायला येते. त्याच्या पेंटिंग्ज बघून ती त्याच अप्रतिम मनोविश्लेषण करते. यापूर्वी त्याला इतकं चांगलं कुणी समजूनच घेतलं नसतं. ना त्याच्या आईने ,ना समीरने ,आकाशने. त्या सीनमधले त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स अप्रतिम आहेत. आकाश हा दिल चाहता हैचा चेहरा असेल तर सिड हा त्याचा आत्मा होता. सध्या राजकुमार हिरानी संजय दत्तच्या आयुष्यावर रणबीर कपूरला घेऊन चित्रपट बनवत आहे. अर्थातच त्यात सुनील दत्त यांच्या पात्राची भूमिका मोठी आहे. त्यासाठी अक्षय खन्नाचं नाव अंतिम झालं होतं. पण काहीतरी कळ फिरली आणि तो बाहेर जाऊन परेश रावळची एंट्री झाली. अक्षय खन्नाची सर्वोत्तम भूमिका कुठली? माझ्या मते ती 'गांधी माय फादर'मधली हरीलालची. आपल्या आभाळाएवढ्या बापविरुद्ध आयुष्यभर बंड पुकारणारा हतबल पोरगा ही भूमिका अक्षय अक्षरशः जगला होता. हरीलालची स्वतःची एक बाजू होती. मी आयुष्यात जिना आणि हरीलाल या दोनच लोकांना कधी समजून घेऊ शकलो नाही असे गांधीजींचे विधान सर्वश्रुत आहे. हरीलालला त्याच्याजवळचे लोक समजावून घेऊ शकली नाहीत. अक्षय खन्नाला त्याच्याच इंडस्ट्रीचे लोक समजावून घेऊ शकली नाहीत. कधी कधी रीलमध्ये केलेल्या भूमिका रियलमध्ये शिरतात त्या अशा.

- अमोल उदगीरकर

................................

कोणाच्या तरी नकारात्मक टिप्पणीमुळे जर तुमच्या आवडत्या श्रध्दास्थानाचे तुमच्या मनातले स्थान डळमळीत होत असेल तर एकतर ती टिप्पणी तरी खरी आहे किंवा तुमच्या श्रद्धा तरी कमकुवत आहेत....

- वैशाली पालेकर

................................

आणि सगळा डबा संपव. तुझ्या डब्यातलं मित्रांना देऊ नकोस अ‍ाणि त्यांच्या डब्यातलं खाऊ नकोस!!

(स्वार्थाचा पहिला संस्कार)

- वैशाली प्रसाद पराडकर जोग

................................

 प्रतिक्रिया द्या6041 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Jamir Shaikh - शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
वाचन समृद्धिचा ठेवा

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर