चमचेचोरीची ऐतिहासिक मोहीम
शनिवार, १३ जानेवारी , २०१८ अमित पडवळ

कोणत्याही घटनेला ऐतिहासिक संदर्भांचा मुलामा मिळाला की ती वेगळी दिसू लागते. ममता बॅनर्जींच्या पथकातील पत्रकारांवर झालेल्या चमचेचोरीच्या आरोपाला दिलेला हा भन्नाट संदर्भ.

वैशाख शुद्ध द्वितीया शके १५८६...औरंगजेबाने आपला सरदार शायस्ता खान याला बंगाल प्रांताची सुभेदारी बहाल केली होती... इंग्रजांना बंगाल प्रांतात व्यापार उदीम करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून तत्कालीन इंग्रज राजसत्तेने आपला मुख्य सरदार पॉल ब्लॅकथॉर्न याच्यासोबत आपले खास दूत शायस्ता खान याला भेटण्यासाठी रवाना केले... हे खास दूत भारतातल्या घडामोडी इंग्रज राजसत्तेपर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यात निष्णात मानले जात... शायस्ता खान हा दूरदर्शी होता... इंग्रज हे आपल्यावर पावणेदोनशे वर्षं राज्य करणार आहेत हे त्याने अगोदरच ओळखले होते... त्यामुळे त्यांना आपल्या वैभवाने दिपवून टाकून त्यांची आपल्यावर मेहेरनजर होणेकरिता त्याने त्यांच्यासाठी जंगी खानपानाचा बेत ठेवला.. सर्व खाना खास चांदीच्या भांड्यात बनवला जाणार होता... जेवणासाठी ताटवाट्या आणि इंग्रजांना लागतात म्हणून काटे चमचेही खास चांदीचे ठेवण्यात आले होते (वेळ पडलीच तर टॉयलेट पेपर ही चांदीचा वर्ख लावून तयार ठेवले होते असे म्हणतात- संदर्भ शायस्ता खान बुर्जी)

आषाढ शुक्ल प्रतिपदा शके १५८६ संवत्सरे रविवारी मेजवानीचा दिवस ठरविला... बंगालप्रांती सुभेदाराच्या हवेलीसमोर खास शामियाना उभारण्यात आला... दरबारी वेष करून सर्व दरबारी हजर झाले... खुद्द शायस्ता खान अंगात रेशमी अंगरखा, पायांत विजार व मस्तकी मोगली पगडी अशा वेशात हजर होता... उभयतांचे शिष्टमंडळ उरोउरी भेटले... जेवणाच्या बैठकी शेजारी तबके घेतलेले सेवक अदबीने उभे होते... त्या तबकांमध्ये चांदीचे काटेचमचे खास भोजनासाठी ठेवण्यात आले होते... नौबती वाजवल्या गेल्या... शायस्ता खानाचे ते वैभवसंपन्न स्वागत बघून पॉल ब्लॅकथॉर्न आणि सोबतचे दूत भारावून गेले... तबकांमध्ये चांदीचे काटे बघून दूतांची नियत खराब झाली... हात धुवून येतो सांगोन ते दूत बाहेर ठेवलेल्या त्यांच्या झोळ्या घेऊन भोजनास येऊन बसले... बिर्याणी, मटण मुघलाई, चिकन रोगनजोश, बटर नान सोबत कापलेले कांदा लिंबू असा खासा बेत होता... खाना झाल्यावर तृप्ततेची ढेकर देत संधी साधून सेवकांची नजर चुकवून इंग्रजांच्या दुतांनी चांदीचे काटे चमचे बरोबर आणलेल्या झोळ्यांमध्ये सरकवले... जेवण समारंभानंतर भांडी मोजताना चांदीचे चमचे गहाळ झाल्याचे चाणाक्ष सेवकांच्या ध्यानात आले पण तोवर वेळ निघून गेली होती... इंग्रज दूत केव्हाचेच आपल्या मार्गाला लागले होते... एक मोठा ऐतिहासिक ठेवा इंग्रजांच्या हाती पडला होता.... औरंगजेब शायस्ता खानावर खफा झाला... त्याने त्याची सुभेदारी बरखास्त करून दिल्लीस माघारी बोलावले... सेवकांस सेवेत कसूर केल्याबद्दल आजन्म कारावास ठोठावला गेला... ह्या सर्व प्रसंगाने सेवकांची मुले उद्विग्न झाली... जोपर्यंत इंग्रजांकडून चोरलेले चांदीचे चमचे परत आणत नाही तोवर जेवताना जवळ झोळ्या बाळगूनच जेवण करू अशी शपथ त्यांनी घेतली आणि पिढी दर पिढी हा संकल्प पुढच्या पिढ्यांकडे सोपवला गेला...

शतक एकविसावे... जानेवारी २०१८... पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा इंग्लंड दौरा ठरला आहे अशी खबर सेवकांच्या वंशजांस मिळाली... शेकडो वर्षे जाऊनही बदल्याची भावना त्यांच्या मनात अजूनही धगधगत होतीच.. हाच तो क्षण हे त्यांच्या चाणाक्ष पत्रकारी बुद्धीने हेरले... मध्यस्त मध्ये घालून या दौऱ्यात पत्रकारांचाही समावेश व्हावा ही गळ घातली गेली... आणि ते ममता दीदींसोबत मोहिमेस रवाना झाले... कामगिरीबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती... या कानाची त्या कानाला खबर लागू नये म्हणून तजवीज करण्यात आली होती... इंग्रजांनी बंगालच्या ऐतिहासिक चांदीच्या ताट-वाट्या-चमचे जेवण समारंभात वापरून ममता बॅनर्जींना खुश करावे म्हणजे योग्य ते दान पदरात पडेल अशा बातम्या योग्य त्या माणसांमार्फत योग्य त्या माणसांपर्यंत पेरल्या गेल्या...

आणि अखेर तो दिवस उजाडला... ममता बॅनर्जीसह सगळ्यांच्याच राहण्याची व्यवस्था लंडनमधल्या अलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली होती. रात्री भोजनाचा कार्यक्रम होता... सेवकांचे वंशज पत्रकार महाशय आपली झोळी घेऊन जेवण समारंभास उपस्थित राहण्यासाठी निघाले असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना झोळी नेण्यास मज्जाव केला... पत्रकार महाशयांनी त्यांना हा नियम आमचा पूर्वजांनी ठरवून दिला असून आजही आम्ही पाळतो असे त्यास ठणकावले... आम्हाला झोळी नेण्यास मज्जाव केल्यास ममता बॅनर्जींना घेऊन परत आमच्या मुलखात जाऊ असेही दटावले... शेवटी झोळी रिकामी करून त्यांना ती सोबत ठेवण्यास परवानगी दिली गेली... मेजावर चांदीचे चमचे दिसताच वंशजांचे डोळे चमकले... आता आपल्या पूर्वजांचा बदला नक्की पूर्ण होणार ह्याची त्यांना मनोमन खात्री वाटू लागली... आपले अनेक पूर्वज स्वर्गामध्ये उभे राहून आपल्यावर पुष्पवर्षाव करत आहेत असाही त्यांना भास झाला... तो भास त्यांनी झटकला... भ्रमात राहून चालणार न्हवते... प्रत्यक्ष कृतीची गरज होती... जेवण संपता संपता इकडचा तिकडचा अदमास घेऊन त्यांनी हळूच मोठ्या चलाखीने ते ऐतिकासिक चांदीचे चमचे आपल्या भारताचा बहुमूल्य ऐतिहासिक वारसा कुणाच्या नजरेस न येईल या बेताने हळूच आपल्या झोळीत सरकवला... पण दुर्दैव आड आले...वचलाखीने त्यांनी उपस्थितांच्या नजरा तर चुकवल्या पण मनाविरुद्ध झोळी नेऊ द्यायला लागली म्हणून दुखावलेल्या सुरक्षा रक्षकाने लपवून त्यांच्यावर रोखलेला कॅमेरा ते चुकवू शकले नाहीत... आणि या ऐतिहासिक मोहिमेची अखेर मात्र अशी दुर्दैवी झाली... आपला देश आपल्या एक ऐतिहासिक ठेवा परत मिळण्याला मुकला... एक झुंज अपयशी झाली... पण स्वातंत्र्योत्तर इतिहासात मात्र हा पराक्रम अगदी सोनेरी नाही पण चांदीच्या शाईने मात्र नक्कीच लिहिला जाईल...

 

 प्रतिक्रिया द्या4999 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Ganesh - शनिवार, १३ जानेवारी , २०१८
म्हणून मोदिजी आजकाल प्रदेश दौरयावर पत्रकारांना घेउन जात नाहीत
Aniket Salunke - शनिवार, १३ जानेवारी , २०१८
Very nicely written
Santosh Chitapure - शनिवार, १३ जानेवारी , २०१८
Apratim...as usual...keep it up raje..

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर