फेबुगिरी
शनिवार, १३ जानेवारी , २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी...

गडकरी, नौदल आणि दक्षिण मुंबई...

तरंगत्या हॉटेलच्या परवानगीच्या मुद्दयावरून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या नौदलाला उद्देशून जी काही मुक्ताफळं उधळली, ती आश्चर्यजनक आहेत. गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत, त्या जहाजवाहतूक खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मालवाहतुकीच्या जहाजांना समुद्री चाच्यांपासून संरक्षण पुरविण्याचं काम भारताच्या युद्धनौका आणि तटरक्षक दलाच्या गस्तीनौका 2008 पासून सातत्याने करीत आहेत. त्यामुळे अरबी समुद्राच्या क्षेत्रातील जोखमीचं क्षेत्र आंतरराष्ट्रीय समुदायाने कमी केलं आणि त्यातून भारताचं मोठं परकीय चलन वाचलं, या गोष्टींचा गडकरींना विसर पडला असावा. सुरक्षेच्या काळजीपेक्षा दक्षिण मुंबईवरची पकड ना गडकरींना सोडायची आहे, ना नौदलाला....हा मुद्दा चिंतेचा आहे. पण नौदलाच्या या दक्षिण मुंबईकेंद्री मानसिकतेविषयी नंतर...आधी गडकरींच्या विधानाच्या पहिल्या भागाविषयी...
नौदलाने पाकिस्तान सीमेवर लढावं, इथे दक्षिण मुंबईत जागा मागू नये, असं गडकरी यांनी सुनावलं. एक तर या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. नौदलाचे अधिकारी, नौसैनिक सागरी सीमांवर लढतात, तेव्हा युद्धनौकांवर राहतात. त्यांचे कुटुंबिय मुंबईत किंवा नौदल तळासभोवती असलेल्या वसाहतींमध्ये राहतात. गेल्या काही वर्षात मुंबईचा भरपूर विकास झाला, किनारपट्टीवर व्यापारउदीम आणि उद्योग-आस्थापना वाढल्या. असं असताना मुंबईच्या नौदल तळाचा विस्तार झालेला नाही. किनारपट्टीवरील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नवनव्या प्रकारच्या युध्दनौकांची भर पडते आहे. त्या उभ्या करण्यासाठी नौदल तळाची जागा अपुरी पडत आहे. मुंबईच्या नौदल तळाचा विस्तार म्हणून कारवारला आणखी एक तळ उभारला. तिथे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थलांतरित व्हायचं नसतं, ही गोष्ट खरी असेलही. परंतु त्यामुळे नौदल वसाहतींसाठी मुंबईत कायदेशीर मार्गाने जागाच मागू नये, हे म्हणणं योग्य नाही. आदर्श प्रकरणाप्रमाणे जर कुणी नौदल अधिकारी कारगील युद्धातील शहिदांच्या नावाने असलेल्या जागा लाटू पाहत असतील, तर त्यावर अंकुश ठेवाच. पण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील जागेचा व्यापारी वापर करताना, जर नौदलाने नौसैनिकांच्या वसाहतींसाठी कायदेशीररीत्या जागा मागितली, तर त्याची खिल्ली उडवायचं कारण नाही. सीमेवर जा, इथे जागा कशाला, हा पर्याय होऊ शकत नाही. त्यांच्या अशा मागण्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांविषयी मत कलुषित होईल, त्यापलिकडे काही होणार नाही. पाणबुडी किंवा युध्दनौकेवर नौसैनिक त्यांच्या कुटुंबियांसह राहतात, असं गडकरींना वाटतं की काय, अशी मल्लिनाथी एका माजी अधिकाऱ्याने केली. ती रास्तच वाटते.
आता प्रश्न नौदलाच्या परवानगीचा. मुळात तरंगत्या हॉटलेला परवानगी द्या, अन्यथा एक इंचही जागा देणार नाही, असं म्हणणं म्हणजे सुरक्षेशी सौदेबाजीच झाली की एकप्रकारे. म्हणजे जागा हवी, तर परवानगी द्या, असा अर्थ होतो का? तरंगत्या हॉटेलविषयी न्यायालयाने सांगितल्यानुसारच नौदल आणि तटरक्षक दल यांचं मत मागविण्यात आलं होतं. त्यात जर गुप्तवार्ता विभागाकडून सुरक्षा ऑडिट करून घ्यावं, असं सुचविण्यात आलं असेल, तर गैर काही नाही. ते करून घ्यायला हवं. तसंच सुरक्षेच्या काळजीपोटी जर काही मुद्दे उपस्थित करण्यात आले असतील, तर त्याचं निराकरण करायला हवं. त्यावर मार्ग निघूही शकतो. थांबा, परवानगी कशी देत नाही ते पाहतो, अशा वल्गना करण्याने केवळ डिफेन्सवाल्यांना मी घाबरवलं, एवढाच आनंद मिळू शकतो. मुंबईच्या विमानतळाला खेटून ताज-जीव्हीकेचं एक पंचतारांकित हॉटेल उभं राहिलं आहे. इथे तर धावपट्टीचं दर्शन देणाऱ्या रुम्स बांधण्यात आल्या आहेत आणि त्यांचं विशेष भाडं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सुरक्षा धोक्यात येते आहे, असं कळल्यावर त्याला अजून सीआयएसएफची परवानगी मिळालेली नाही. परंतु हॉटेलला आता सीआयएसएफची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. सरकारी अखत्यारीतील सीआयएसएफची सुरक्षा अशी खासगी हॉटेलना द्यावी का, हा प्रश्नच आहे. परंतु ते घडलेलं आहे. खासगी हॉटेलांसाठी आपल्याकडे अशा तडजोडीही घडतात. 
आता मुद्दा सुरक्षेचा. जेट्टी बांधल्याने सुरक्षा धोक्यात येते का, याचा वस्तुनिष्ठ विचार करायला हवा. कदाचित उगाच बागुलबुवा उभा केला असेल, तर त्यावर विचार करता येईल. परंतु सुरक्षा ऑडिट न करताच त्यावर बोलणंही गैर आहे. शिवडी-न्हावाशेवा पूल, पूर्वेकडची रो रो सेवा, घारापुरी, बूचर आयलंडसभोवतीची वाढती वाहतूक व विकास यामुळे सुरक्षेवर ताण येणार आहेच. पण त्याला तोंड द्यावं लागेल. 
आता मुद्दा दक्षिण मुंबईचा. गडकरी असोत किंवा नौदल, सर्वांनाच दक्षिण मुंबई कवटाळून बसायची आहे. विक्रांत विमानवाहू युध्दनौका वाचवून त्यावर संग्रहालय करण्याचा प्रकल्पही असाच अव्यवहार्य ठरत गेला. आधी त्यावर हेलिपॅड उभारता येईल, इथे परिषदा, संमेलनं यासाठी जागा देता येईल, असं नौदल सांगत होतं. नंतर मात्र हेलिपॅडला परवानगी देता येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे खासगी उद्योजकांनी त्यातून अंग काढून घेतलं. मुळात ही नौका दक्षिण मुंबईत उभी करण्यापेक्षा डहाणू, अलिबाग, अशी कुठेतरी दूरवर कायमस्वरुपी उभी करून तिचं संग्रहालयात रुपांतर करायला हवं होतं. ज्यायोगे तिथे पर्यटन वाढलं असतं. परंतु नौदलाच्या चष्म्यातूनही मुंबई म्हटली की दक्षिण मुंबईच दिसते आणि या मानसकितेचा परिणाम म्हणजे नौदलाच्या गरजांविषयी कधीच जागरुकता निर्माण होत नाही. 
मुंबईत नौदलाच्या पश्चिम कमांडचं मुख्यालय आहे आणि तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्रातील गस्तीनौकाही इथेच असतात. स्वदेशी नौकाबांधणी करणारी माझगाव गोदीही मुंबईतच आहे. परंतु या कशाचाही फील मुंबई शहरात कुठेही जाणवत नाही. कोणत्या चौकात साध्या एखाद्या नौकेचं इन्स्टॉलेशन वगैरेही दिसत नाही. 
पोर्ट ट्रस्टला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा द्यावा, अशी एक मागणीही गडकरींनी केली आहे. मुंबईचा आपण संपूर्ण शहर म्हणून कधी विचार करणार? कधी एमएमआरडीएला वेगळा नियोजन प्राधिकरणाचा दर्जा तर कधी पोर्ट ट्रस्टला. मुंबईला रस्ते, पाणी, वीज, गटार या मूलभूत गरजा पुरविणारी महापालिका मात्र नियोजनाचा विचार करण्यापासून अडगळीत. पोर्ट ट्रस्टच्या जागेवर छान सेन्ट्रल पार्क उभं राहील, मरीना येईल, परंतु इथला कचरा कोणत्या डम्पिंग ग्राऊन्डवर जाणार, इथे पाणी कुठून येणार...हे सगळं एकाच व्यवस्थेतून येणार ना? मग त्या सर्वांचं नियोजन समग्रपणेच व्हायला नको का? 
तरंगती हॉटेल, मरीना, सेन्ट्रल पार्क या सर्व सुविधा, आकर्षणं मुंबईत असायलाच हवीत. परंतु तिचा एकूण मुंबईच्या विकासाशी निगडित विचार करावा. दक्षिण मुंबईची पूर्वापारची आकर्षणं होती चौपाटी, मरीन ड्राइव्ह, इत्यादी. त्यांची सद्दी आता संपली म्हणून केवळ नवी आकर्षणकेंद्र उभारण्याकरात पोर्ट ट्रस्टच्या जमिनीचा विचार होतोय का?

- समीर कर्वे

.......................

सकाळपासूनच कसंतरी होत होतं म्हणून आज ऑफिसमधून जरा लवकरच निघाले.  घरात पाऊल ठेवताच सासूबाईंचा नेहमीचा प्रश्न.... संध्याकाळच्या  जेवणाचा काय बेत? त्यांच्याकडे  दुर्लक्ष करतच आत गेले.  Fresh झाले व थोडावेळ पडून राहिले....तोच किचनमधून भांड्यांचा व सासूबाईंचा एकत्र आवाज.....निमूट उठले नि किचनमध्ये गेले.  स्वयंपाक करताना पुन्हा सकाळचाच अनुभव .... उलटीची भावना...वासच सहन होईना... भीतीने पुन्हा  पोटात धस्स झाले.

रात्री झोपताना नवऱ्याला सांगितले तर त्याने हसण्यावारी नेले.  म्हणाला..."अग ! या वयात शक्य तरी आहे का? मनात म्हटले, 'अरे! पण पाळी तर या वयातही regular येते.'  भीतीने पुन्हा शहारले..... कारण गेले ३/४ महिने झाले मासिक पाळी चुकलीय्..... रात्रभर तळमळत राहिले.

सकाळी ऑफिसला निघाले.....पण मग विचार बदलला नि ऑफिसला हाफ डे येतेय् असा निरोप पाठवून डॉ. निलम यांच्या दवाखान्यात गेले. तपासून झाल्यानंतर डॉक्टर येईपर्यंतची ती ३-४ मिनिटे अगदी असह्य झाली. डॉक्टर हसत हसत बाहेर आल्या नि good news म्हणून माझे  अभिनंदन केले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली.... डोळ्यात येणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न करत डॉक्टरांना म्हटले, "मला हे बाळ नकोय्... या वयात तर नकोच आहे."  त्या म्हणाल्या, "आता काहीही करणे शक्य नाही. ४ था महिना चालू आहे.

दवाखान्यातून बाहेर पडले.  नवऱ्याला call केला, meeting मध्ये आहे सांगून त्याने तो cut केला. ऑफिसच्या कामात लक्षच लागेना. सारखा एकच विचार.....लोकं काय म्हणतील? मुलांना काय वाटेल? मित्रमैत्रिणींना कसे तोंड दाखवू? काहीही सुचेना...

रात्री नवऱ्याला सारे सांगताच तो माझ्यावरच उखडला.....'अक्कलशून्य ! एवढंही कळू नये !' त्याचा हा अवतार पाहून रडूच आले....'अरे! हा सगळा तुझाच प्रताप ना! मग सगळा दोष मला का?'  संपूर्ण रात्र रडून काढली.

सकाळी नवरा काहीही न बोलता ऑफिसला गेला. मुलगी कॉलेजला गेली नि मुलगा शाळेत. आज मी ऑफिसला जात नाही हे कळताच सासू खुश होऊन लेकीकडे गेली. घरात मी एकटीच..... काहीही न करता नुसते बसून राहिले.  विचार करून डोकं अगदी भनभनलं.  शेवटी देवघरात गेले. देवासमोर हात जोडले नि मनोमन देवाची प्रार्थना करत आसवांना वाट करून दिली..... कितीतरी वेळ तशीच बसून राहिले. पोटातल्या बाळाला म्हटले, "का रे असा अवेळी येतोस? माझी अगतिकता कळत नाही का रे तुला? Please नको ना येऊस ! तुझ्या या अभागी आईला समजून घे ना रे बाळा !"

त्याच रात्री अचानक पोटात जोरदार कळा सुरू झाल्या.  उठून बसले. पाहते तर....... माझे ते गुणी बाळ... मला सोडून जात होते.  आपल्या आईची अगतिकता बघून त्यानेच या जगात न येण्याचा समंजसपणा दाखवला होता.  मी मात्र डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारा न रोखता माझ्या सोनुल्याला बघत होते... कधीही पुसला न जाणारा अपराधीपणाचा एक सल कायमचा काळजात घेऊन, मी माझ्या त्या न उमललेल्या कळीला शेवटचे पहात होते.....!!            ..  

- संगीता वाझ

.......................

'आतला आवाज' सर्वोच्च !
--- 
साम दाम दंड भेद सारं सारं वापरुन तुम्हाला नाही गिळंकृत करता येणार सत्य. पैशाने विकत घेता येईल काहीबाही. बळाने होता येईल शिरजोर. भयाचे सावटही करता येईल निर्माण. भेद निर्माण करुन कालवता येईल विष.
पण आमचा 'आतला आवाज' आहे सर्वोच्च जो भेदून जाईल तुमच्या कूटनीतीला. 
सदसद्‌विवेकाचा आतला आवाज ऐकत आज चार न्यायमूर्तींनी लोकशाहीविषयी, न्यायव्यवस्थेविषयी गंभीर चिंता व्यक्त करत, पारंपरिक संकेतांचा भंग करत पत्रकार परिषद घेतली. आज आम्ही बोललो नाहीत तर येणाऱ्या पिढीला आम्ही आमचे आत्मे विकले होते,असे वाटेल, इतकं भावगर्भ निवेदन करत हे न्यायाधीश समोर आले. भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यरत न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. लोकांचा विवेक जागृत होण्यासाठीची ही कृती अत्यंत महत्वाची आहे. सरन्यायाधीशांना पत्र लिहून, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र सरन्यायाधीशांनी या गंभीर मुद्यांकडे साफ दुर्लक्ष केलं. नाइलाजाने न्यायाधीशांना माध्यमांपुढं यावं लागलं. न्यायव्यवस्थेचं पोखरलं जाणं आणि माध्यमांवरील अवलंबित्व वाढणं वेदनादायी आहे;पण सत्य समोर येण्यासाठी या मार्गाचा अवलंब न्यायाधीशांना करावा लागला. आता तरी पक्षीय दृष्टिकोनाच्या पलिकडे जाऊन देशाच्या मूलभूत अधिष्ठानाबाबतचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे याचं भान आपल्याला येईल, अशी आशा. 
तुकोबांनी म्हटलं आहे- 
सत्य असत्याशी/ मन केले ग्वाही/ मानियले नाही/ बहुमता ! 
त्यासाठीच ऐकावा लागेल आतला आवाज. या कठीण परीक्षेला आपणा सर्वांना सामोरं जावं लागेल, हा रस्ता अटळ आहे !

- श्रीरंजन आवटे

.......................

: हे बघा, अशी प्रक्षोभक भाषणं का करता हो तुम्ही?

: मी? प्रक्षोभक भाषणं? नाही बा! मी कुठं?

: बनवताय काय? तुम्हीच ते!

: कशावरून?

: या अशा झुबका-झुबका मिश्यांवरून सहज कळतं की गुर्जी! ते तुम्हीच!!

: अरेच्च्या! आत्ता आलं लक्षात. अहो तो प्रक्षोभक भाषणवाला मी नव्हे,
मी भालचंद्र नेमाडे. उदाहरणार्थ साहित्यिक वगैरे...

: छ्या बुवा! पुन्हा घोटाळा झाला. परवादेखील एका बाप्याला धरला,
तर तो अशोक नायगावकर नावाचा कवी निघाला!

- गजू तायडे

.......................

अतर्क्य आणि अशक्य!

सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधिशांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या तक्रारी नोंदवल्या, काही अतिशय गंभीरआरोप केले आणि राजकीय भूकंप झाला. त्यात प्रामुख्याने मुख्य न्यायाधीश हे सरकारच्या बाजूने निर्णय देणाऱ्या बेंचची निवड करतात असा स्फोटक आरोप आहे.

यावर विरोधकांनी त्यांचे राजकारण सुरू केले आणि सरकारने त्यांचे.

न्यायाधिशांच्या उठावा नंतर लगेच पंतप्रधान यांनी उच्च पदस्थ लोकांची सभा घेतली. मात्र या उठावावर काहीही भाष्य केले नाही. ना हे प्रकरण माननीय राष्ट्रपती यांच्या कडे सोपवले. याबाबतीत मौन ठेवण्याचा सरकारचा मानस दिसतो आहे म्हणून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता सरकारने दावा केला आहे की industrial growth rate 2.2 होता तो आता 8.2 इतका वाढला आहें.

२९ डिसेंबरला FM अरुण जेटली यांनी लोकसभेत मान्य केले होते की GDP कमी झाला आहे. आर्थिक विकास दर घटला आहे २०१५-१६ मधे. नोटबंदी आणि त्याचा झालेला वाईट परिणाम आणि २०१७ मधील आकडेवारी विषयी त्यांनी बोलणे टाळलें होतें.

उण्यापुऱ्या १५ दिवसात industrial growth rate कसा काय इतका वाढला ब्वा?

एक शक्यता नाकारता येत नाही की २०१७ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रातील (quarter) मधील वाढलेले industrial production ( नोटबंदीच्या खोड्याला मात करत पुन्हा एकदा आर्थिक उसळी घेत होते) याची माहिती मुद्दाम गुलदस्त्यात ठेवली होती आणि आता जेव्हा सरकार वर प्रचंड टीका होइल तेव्हा ती जाहीर करण्यासाठी ठेवली होती. असो.

इतके करूनही जवळजवळ ५३००० न्यायाधिशांची निवड करून त्यांना कामावर रुजू करणे हे प्रचंड काम सरकारला करयचे आहे. तेव्हाच न्यायाधिशांच्या अपुऱ्या संख्येचा प्रश्न सुटेल आणि कोट्यावधी थकित केसेस ला न्याय मिळ्वून देण्याच्या कामाला सुरुवात होइल. हे दीर्घकाळ चालणारे आहे.

तूर्तास मात्र सरकारवर उडालेले शिंतोडे हे सरकार कसे हाताळते ते बघणे औत्सुक्याचे ठरेल.

- गायत्री चंदावरकर

.......................

संध्यापाकदर्पण उर्फ बदामबहार. 
म्हणजे नल राजाने केला त्याचे असे भारी नाव. 
राजाच्याच पाककृती. 
त्याही भारी असणारच. 
मग भारी संध्याने भारी पाककृती केल्यास असलेच नाव द्यावे लागणार. 
कवठ संपवले. पण आणखी लायनीत काय काय आहेच. 
मग घेतले बदाम. 
आणि बदामबहार सुरु केले. 
एक केली बदामवडी. 
म्हणजे बदाम भिजवून साली काढल्या. 
मिक्सरमध्ये पाणी न घालता रवाळ दळले. 
तुपावर गुलाबी रंगावर परतले. 
मग किंचित दूध घातले आणि साखर घातली. 
त्यातच दोन चमचे कोकोनट मिल्क पावडर घातली. 
गोळा झाल्यावर तूप लावलेल्या ताटात थापून वड्या पाडल्या. 
आधीच बदाम. त्याला आणखी जड नको म्हणून काहीही सजवले नाही. 
पण अर्थातच बेदाणे चालले असते.

दुसरी लई भारी रेसिपी. 
लोक काजूची उसळ खातात तर बदामाची का नको?
मग ते भिजवून साली काढलेले बदाम कुकरमध्ये भात शिजवताना शिजवून घेतले. 
ते जरासे क्रंचीच राहिले. अगदी शिजून गोळा झाला नाही. 
मग केळकरांचे वऱ्हाड पुन्हा मदतीला. 
कांदा, कढीपत्ता फोडणीत परतून मग ओला नारळ घातला. 
तो किंचित परतून त्यात केळकरकृती घातली. 
हे वाटण खरे तर मिक्सरमधून काढावे असा विचार होता. 
पण कंटाळा केला. 
त्यात शिजवलेले बदाम घालून जरासे गरम करून gas बंद केला. 
कोथिंबीर नव्हती. तरी तसे अडले नाहीच. 
एकूण बदाम केवळ फेसबुकवरच कशाला खायचे?
अशी उसळ करून खावे. 
तर जन हो, घ्या हे राजस दान.

- संध्या सोमण

.......................

जर त्या चौघा न्यायाधिशांना मुली नसतील तर ते लैच नशिबवान. नाहीतर गलिच्छगीरी सुरू होईल!

- अविनाश वीर

.......................

'सौजन्यशील व्यक्‍ती' म्हणवला जाणारा देशाचा एक केंद्रीय मंत्री, एका हॉटेलला परवानगी नाकारली, म्हणून देशाच्या संरक्षण दलांपैकी एक असलेल्या नौदलावर आगपाखड करतो, त्यांना घरांसाठी अजिबात जागा देणार नाही अशी धमकी देतो; हे उदाहरणार्थ विलक्षण देशप्रेमाचे उदाहरण आहे.

'आपला हा देश (अशा नेतृत्वाखाली) प्रग्तीच्या उच्च पथावर आहे. यांच्या थोर यशोंदुंदुंभींचा नंगांरा गंगंनंचुंबिंत आकाशापर्यंत भिडल्याल्या' दिसून येईल अशी आशा आहे.

#पाण्यावरचीवरात
#रडरडकरी

- मंदार काळे

.......................

कीर्तनकारांचं काम मनोरंजन करणे आहे. दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी जेवणं झाल्यावर मंदिरात जमून थोडावेळ देवा-धर्माच्या कथा-कहान्या ऐकणे, भजनं करणे हे जुन्या काळातले नेहमीचे चित्र होते. त्यातून कथा फुलवून सांगू शकणार्‍या लोकांचा म्हणजेच कीर्तनकारांचा जन्म झाला. अभंग, ओव्या, पुराणकथा छान फुलवून सांगून त्यातले मर्म उलगडून दाखवणारे श्रेष्ठ किर्तनकार झाले. पण किर्तनकार म्हणजे संत नव्हे हे तेव्हाच्या समाजाला समजत होते. किर्तनकार म्हणजे फक्त कथा सांगणारा. शिक्षक, मार्गदर्शक, गुरु, आदर्श मनुष्य, महात्मा नव्हे. पण आजकाल कीर्तनकारांनाच मार्गदर्शक महात्मा समजण्याचा भयंकर वेडेपणा भारतीय समाजाच्या सर्वच क्षेत्रात सारख्याच आणि घातक प्रमाणात पसरला आहे. त्याचा ठायीठायी अनुभव येत आहेच. धार्मिक कथा सांगता सांगता आता ऐतिहासिक घटनांना आपल्या साहित्यिक प्रतिभेने आणि छुप्या अजेंड्याने मोडून तोडून मांडणारे किर्तनकार निर्माण झाले आहेत.

मोठ्या शहरांतल्या कपोलकल्पित घटना खेड्यापाड्यांतून जाऊन हजारोंच्या जमावाला शिकलेल्या स्त्रियांबद्दल उलटसुलट सांगणार्‍या एक विदुषी अनेकांना परिचित आहेत. त्यांचाही अजेंडा आहेच. खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात स्त्रिया शिकू लागल्या तर त्यांनी परत चूलमूल यातच अडकून राहावे, मुक्त होऊ नये, इथल्या तरण्या मुलांनी शिक्षणाचे मनावर घेऊ नये, अशिक्षित, बेरोजगार राहावे नाहीतर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणार्‍या एका वर्गाला स्पर्धा निर्माण होईल म्हणून हे दोन्ही-तीन्ही मार्गदर्शक (अजूनही असतील, आहेत) अहोरात्र मेहनत करत आहेत. हा धोका लवकर ओळखला गेला पाहिजे. सुशिक्षित शहरी मुलींबद्दल कपोलकल्पित किस्से सांगून कळलावी व्याख्याने करणार्‍या व्यक्तीला "काय नाहीहो, लोक ऐकुन सोडून देतात, खरोखर मनावर घेत नाहीत" अशी सारवासारव करुन पाठीशी घालणारे 'विशिष्ट' लोक आहेत हे मला स्वानुभवाने माहिती आहे.

आजच्या काळात 'जेवढा जास्त शिकलेला तेवढा हुकलेला' म्हणणारे कीर्तनकार, 'मुली शिकल्या तर तुमचे कुटुंब तोडतील, तुम्हाला निर्वंश करतील' अशी व्याख्याने करणार्‍या बाई आणि ऐंशी वर्षांआधीचे गाडगेबाबांसारखे 'एक वेळ जेऊ नका, एक धोतर घेऊ नका, एक लुगडं घेऊ नका पण पोरांना शाळेत शिकवा' म्हणणारे, हजारो मैल तंगडतोड करुन शाळांसाठी निधी जमवणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मठांचा विरोध अंगावर घेऊन स्त्रियांना शिक्षणाचे दारे उघडणारे फुले दाम्पत्य, महर्षी कर्वे, यांसारख्या खरोखर आयुष्य वाहून दिलेल्या अस्सल तपस्वी महात्मे यांच्यातल्या हेतूंचा फरक ओळखा.

शंभर वर्षांआधीच भारताने, महाराष्ट्राने ही जात-धर्म-अस्मिताहीन अशी दिग्गज माणसे पाहिली, आज ज्या दर्जाच्या माणसांना महाराष्ट्र डोक्यावर घेतोय ते बघता आजच्या महाराष्ट्राबद्दल फार फार वाईट वाटत आहे.

- संदीप डांगे

.......................

आत्ता एका मित्राच्या फोटोच्या दुकानात बसलेलो, एक कॉलेजच्या पोरांची टोळी आली, चित्रविचित्र फोटो काढले आणि उद्या द्या बघा नक्की म्हणून गेले पण, नंतर तो माझ्यासमोर ते फोटो एडिट करू लागला कुणाच्या हातात झेंडा तर कुणी महाराजांच्या मूर्तीसमोर मुजरा करतंय, कुणी ते डोंगरावर एकटाच उभा आहे. मला हसू आवरेना मी विचारलं हे कशासाठी करतात असं.? त्याने सांगितलं ही गँग आठवड्यातून एकदा तरी माझ्याकडे येतेच आणि हे फेसबुकवर फोटो टाकता यावेत यासाठी हे करतात असं.....आपण अजून बरेच मागे आहोत अशी समजूत करून घेऊन मी तिथून निघालो.... 😊

- सचिन गवळी

.......................

चला 'आपली' माणसं तयार ठेवा. टॉपच्या काही अपॉईंटमेंट्स करायच्या आहेत. पात्रा, कोहली, लेखी, एन सी, उपाध्ये, भातखळकर.... सर्वांना समर्थनाची तयारी करायला सांगा .

- दिलीप आठवले

.......................

निकॅनोर पाराची कविता : तरुण कवी

हवे ते लिहा हो
तुम्हाला आवडेल त्या कोणत्याही शैलीत
खूपच रक्त वाहून गेलेय पुलाखालून
एकच मार्ग बरोबर असतो
असे मानत राहण्यात

कवितेत काहीही चालते

पण अर्थात एक आहे बुवा अट
कोरे पान आहे तसे राहू नये
अबोल

- चं. प्र. देशपांडे

.......................

तुमची #वसई खुप थंडगार आहे हो... 
हो आहेच आमची वसई थंडगार, इथला निसर्ग आणि त्याला वाचवणारे अनेक पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते त्यासाठी जीवाच रान करतात. त्यांना होणारा त्रास कदाचित कुणाला दिसणार नाही. तरीही याच माणसांमुळे आज वसईमधे हिरवं पान टिकून आहे.

मागील काही वर्षात इथे बिनकण्याची मोठी जमात जन्माला आली. त्यामुळे झाडांच्या जागी सिमेंटच जाळ उभं करून पैसा जमा केला गेला. #पर्यावरणाचा_समतोल_पाळा अशी टॅग लाइन घेऊन इथली महानगरपालिका आमचे दाखवायचे दात वेगळे आहेत. असच कायम दर्शवत आहे. त्यामुळे हसू येतं.

प्रश्न इतकाच आहे. पुढल्या पिढीला हिरवे पान फक्त फोटोमधून दाखवायच का ?? प्रचंड तोड झाल्यावर इथल्या वाळवंटात खजूर उगवायचे का?? किती कमवाल? किती खाल?? पर्यावरण वाचवण्याचा आव आणला की इथल्या लोकप्रतिनिधीची अधिकाऱ्यांची जबाबदारी संपते?

वृक्षप्राधिकरण विभाग आता बंद करण्याची वेळ आली आहे. मुंबईसह आजु बाजूच्या प्रदेशाचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या वसईला #कर्करोग झालाय. त्यामुळे शुद्ध हवा येत्या काळात नसणार आहे. याच वृक्षवल्ली वर अवलंबून असलेली पक्षी, प्राणी संपदाही संपुष्टात येतीलच, अर्थात थंडी हां प्रकारही कालोघात नाहीसा होईल. आता लोकांनी ठरवायचयं तुम्हाला काय हवयं?

- अमर म्हात्रे

.......................

 प्रतिक्रिया द्या1775 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर