धार्मिक नरेंद्र.. मुल्लाची साक्ष.. अहंकाराची तृप्ती
शनिवार, १३ जानेवारी , २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि मार्मिक विचार असा दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंसांचे शिष्योत्तम नरेंद्र होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. घरची परिस्थिती फारच वाईट होती. घरात अनेकदा एका वेळचं एका माणसाचंच अन्न असायचं. घरात आई आणि नरेंद्र. अशावेळी नरेंद्र आईला सांगायचा की आज मला अमुक मित्राने जेवायला बोलावलंय. त्याच्याकडे जाऊन येतो. तू जेवून घे.

तो असाच एक फेरी मारून यायचा. येताना चेहरा तृप्त ठेवायचा. आल्यावर आनंदाने त्या काल्पनिक मेजवानीची वर्णनं करायचा.

रामकृष्णांना ही गोष्ट समजली. त्यांनी नरेंद्राला सांगितलं, तू तर परमेश्वराकडून काहीही मागू शकतोस. मातेच्या मंदिरात जा आणि माग काय हवं ते?

नरेंद्राने सांगितलं, तशी इच्छा होत नाही माझी.

तरीही रामकृष्णांच्या आग्रहाने त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. दीड दोन तासांनी तो अतिशय आनंदी मुद्रेने बाहेर आला. रामकृष्णांनी विचारलं, पोट भरलं का?

नरेंद्राने होकार दिला. पण, रामकृष्णांनी विचारलं, कोणती पक्वान्नं चाखलीस, तेव्हा नरेंद्राने विचारलं, कसली पक्वान्नं? मी भोजन मागितलंच नाही. विसरलो.

असं पुढे तीन-चार वेळा झालं. दरवेळी रामकृष्ण नरेंद्राला कालीमातेच्या गाभाऱ्यात पाठवायचे. दरवेळी नरेंद्र तृप्त मनाने बाहेर यायचा. दरवेळी तो भोजन मागायला विसरलेला असायचा.

रामकृष्णांनी त्याला विचारलं, असं का होतं? गाभाऱ्यात जाऊन तू करतोस तरी काय मग?

नरेंद्र म्हणाला, मी गाभाऱ्यात गेलो की मला काही मागावंसं वाटत नाही परमेश्वराकडे. उलट माझ्यात स्वत:ला समर्पित करण्याची इच्छाच प्रबळ व्हायला लागते. त्यातूनच माझं पोट भरतं. अपरिमित आनंद मिळतो.

रामकृष्ण आनंदाने म्हणाले, तुझं मागणं संपलं, म्हणजे खऱ्या अर्थाने धार्मिक झालास.

...................................

माजुद्दीन हा अतीव माजोरडा सरदार होता. अनेकांचा त्याच्यावर राग होता. पण, तो दरबारी असल्यामुळे कोणाची त्याला बोलण्याची हिंमत नव्हती. रस्त्यातून जाता येताही तो अनेक सामान्य माणसांना छळत असे. एक दिवस त्याने म्हाताऱ्या रहीमचाचांची भर बाजारात काहीतरी खोड काढली.रहीमचाचा भला माणूस. पण, त्या दिवशी त्यांचाही बांध फुटला, संयम सुटला आणि ते दोनपाचशे लोकांसमोर गरजले, 'नालायक, नीच, हलकट, पाजी, नराधम!!!'

दोनपाचशे लोकांसमोर आपली बेइज्जती झाली म्हणून माजुद्दीनने रहीमचाचांवर खटला भरला. सगळा गाव त्या खटल्याला लोटला होता.

न्यायाधिशांनी रहीमचाचांना विचारलं, तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?

रहीमचाचा म्हणाले, नाही. मी नालायक, नीच, हलकट, पाजी, नराधम हे शब्द उच्चारले, पण मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. बाजारात दोनपाचशे माणसं होती तेव्हा. त्यामुळे सरदार माजुद्दीन यांनी ते व्यक्तिगत घेण्याची काहीच गरज नव्हती.

माजुद्दीनच्या वतीने साक्ष द्यायला मुल्ला नसरुद्दीन उभा राहिला.

तो म्हणाला, रहीमचाचांनी सरदार माजुद्दीन साहेबांचा अपमान केला, त्यांचा भर बाजारात पाणउतारा केला ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे.

न्यायाधीश म्हणाले, पण, रहीमचाचा तर म्हणतात त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही.

मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, ते खरंच आहे, पण, ही लंगडी सबब आहे. कारण,त्यांनी ते शब्द उच्चारले, तेव्हा बाजारात नीच, पाजी, नालायक, हलकट, नराधम असा दुसरा कोणी नव्हताच. म्हणजे हा माजुद्दीन साहेबांचाच अपमान झाला नाही का?

..........................................

अहंकाराच्या तृप्तीसाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात…

एखादा वित्तेषणेने प्रेरित माणूस उदाहरणार्थ एक मोटार घेतो, तशा मोटारी अनेकांकडे आल्या, तर त्यांच्यापेक्षा भारी मोटार घेतो… त्याने त्याच्या अहंकाराची तृप्ती होते…

मोटार घेण्यासाठी त्याला काही कामधंदा, काही व्यापारउदीम,किमान चोऱ्यामाऱ्या का होईना कराव्या लागतात, म्हणजेकोणत्या ना कोणत्या प्रकारची मेहनत करावी लागते…

दुसरा मार्ग असतो फुकट-फकिरीचा…

त्यात माणूस अनवाणी चालू लागतो…

रस्त्यातल्या काट्याकुट्यांचा थोडा त्रास होतो सुरुवातीला, पण नंतर चामडी निबर होत जाते…

तो अनवाणी चालतो आहे, म्हणजेच तो काही महान पदाला पोहोचला आहे, असं मानून भारीतली भारी मोटारवाला माणूसही त्याच्या पायाबिया पडतो… आपली मोटार त्याच्या दिमतीला देतो, कधी सेवेला लावतो…

याला बरं वाटतं…

त्याने घेतली असेल लाखो रुपयांची मोटार, पण, शेवटी माझ्याच पाया पडतोय, मी न कमावता ती माझ्या उपयोगाला येतेय,  म्हणजे मी मोठा…

जंगली जनावरंही हजारो वर्षं अनवाणी चालत आलेली आहेत, त्यात जशी त्यांची काही थोरवी नसते, तसंच नुसतं अनवाणी चालून, शरीर कष्टविल्यानेही कोणा माणसाचंही आत्मिक पातळीवर 
काही उन्नयन झाल्याचं ऐकिवात नाही…

-ओशोच्या ईशावास्य उपनिषदांवरील प्रवचनांवर आधारित

......................................प्रतिक्रिया द्या2120 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर