आयुष्यातील अडगळी काढून टाकू या
शुक्रवार, १२ जानेवारी , २०१८ उदय कुलकर्णी

आपण कधीतरी आढावा घेऊन घरातली अडगळ काढून टाकतो, तशा आयुष्यातल्या अडगळी काढून टाकल्या तर? प्रथांच्या, सामाजिक संकेतांच्या, शिष्टाचारांच्या अडगळी काढूनच टाकाव्या.

रतन टाटांना नॅनोची कल्पना कशी सुचली याबद्दल त्यांनी एकदा सांगितले, एक माणूस, त्याची पत्नी आणि दोन मुले असे चौघेजण कसरत करत एका स्कुटरवरून जाताना त्यांनी बघितले आणि त्यांना वाटले, अशा लोकांसाठी एक स्वस्तातील कार उपलब्ध करून दिली तर त्यांची किती सोय होईल. मग काही वर्षांनी फक्त एक लाख रुपयात टाटा नॅनो कार त्यांनी बाजारात आणली. आपल्या दारात कार असावी असे स्वप्न अनेक मध्यमवर्गीयांचे असते. एक लाख रुपये फार नाहीत, मध्यमवर्गाला सहज परवडू शकते, तरीसुद्धा सुरुवातीला या कारची अपेक्षेइतकी विक्री झाली नाही. शेवटी खुद्द रतन टाटांनी म्हटले आमची स्ट्रॅटेजी चुकली. काय चुकले? भारतात कार घेतली जाते ते स्टेट्स सिम्बॉल म्हणून. श्रीमंत झाल्याचे प्रतीक म्हणून. वापर भलेही महिन्यातून दोनवेळा होईल, पण दारात कार हवी. असा विचार करणारेच अनेक असल्याने त्या लोकांनी ही नॅनो कार घेतली नाही. स्वस्तातील कार म्हटल्यावर स्टेट्स सिम्बॉल कुठे राहिला? पण स्टेट्ससाठी कार विकत घेणारे दोन-चार लाखांच्यावर खर्च करून कार घेतात. खरे तर मध्यमवर्गीय मूल्ये साधेपणाची, तरीही कार मात्र घेतली जाते. जणू एका सामाजिक वर्गातून वरच्या सामाजिक वर्गात गेल्याचे ते प्रतीक. उलट एसीची किंमत फक्त वीस हजार रुपयांपासून सुरू होते. हवामान बदलांमुळे एसी चैन राहिलेला नसून गरज झाला आहे, तरी तो घेण्याकडे कल नसतो. तो घरात लावल्याने इतरांना दिसत नाही, त्यामुळे त्याला स्टेट्सचे मूल्य नाही. महिन्याचे विजेचे बिल वाढते हे कारण पुढे केले जाते, पण कारचाही खर्च असतोच. म्हणजे एसी घेण्याबाबत साधेपणा हे मध्यमवर्गीय मूल्य किंवा संस्कार, शिकवण आड येत असावी. हे जरा वयस्कर पन्नाशी किंवा त्यापुढील लोकांबाबत खरे आहे. तरुण मंडळी कदाचित लगेच एसी घेतील.

एसी घ्या असा आग्रह इथे करायचा नाही, तर परवडत असूनही दोन वेगळ्या वस्तूबाबंत दोन वेगळे विचार असतात ते दाखवायचे आहे. एसी घ्या किंवा घेऊ नका. ती वैयक्तिक बाब आहे. पण या निमित्ताने विचार करावासा वाटतो काळात बदल झाला तरी जुन्या मूल्यांच्या प्रभावामुळे योग्य निर्णय घेण्यात अडथळे येतात का? मूल्य शब्द फार मोठा वाटत असेल तर लहानपणीचे संस्कार किंवा शिकवण म्हणू हवे तर. छोट्या गोष्टींचा विचार करू. पहिली गोष्ट देणे-घेणे घ्या. परगावावरून नातेवाईकांकडे जाताना किंवा काही धार्मिक - घरगुती सभारंभ असेल तर काही वस्तू एकमेकांना दिल्या घेतल्या जातात. कपडे-कापड तर हमखास दिले जाते. पूर्वी खरेदी व्हायची वर्षातून एकदाच- दिवाळीला. त्यामुळे नव्या कपड्यांचे अप्रूप असायचे. आता येता जाता खरेदी होते, सेल लागला की खरेदी होते. पूर्वी लोकांकडे कपड्यांचे जेमतेम दोन-चार जोड असायचे. आता प्रत्येकाकडे ढीग असतात. पुन्हा प्रत्येकाची आवड-निवड वेगळी. मुले तर कपडे आवडले नाहीत तर हातही लावत नाहीत. मग हे दिलेले कपडे पडून राहतात. पैसे वाया जातात. कशाला ही देण्या-घेण्याची प्रथा? नातेवाईक म्हटल्यावर अगदी प्रोटोकॉल कशाला हवेत? देऊच नका, द्यायचेच आहे तर मी म्हणतो, मेमरी कार्ड द्या किंवा पेन ड्राईव्ह द्या! याचा उपयोग न करणारे लोक असतील तर काय करायचे म्हणता? टॉक टाईम गिफ्ट करा ना. सरप्राईझ म्हणून करून टाका रिचार्ज चारशे रुपयांचा, त्यांच्या मोबाईलचा. एक अडचण मात्र होऊ शकते. कापडाचे कसे, आपल्याला मिळालेले आणि नको असलेले पास ऑन केले जाते किंवा देवळात देवीला वाहिलेले स्वस्तात मिळते ते कापड दिले जाते, तसे रिचार्जचे करता येणार नाही. पण ते एका दृष्टीने बरेच. गिफ्ट देणार्‍याला वाटते, पास ऑन केलेले कापड दिले तरी ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येणार नाही. पण ते अगदी हमखास कळते आणि मग जी नाराजी, अढी निर्माण होते ती वेगळीच. संबंध खराब होतात.

प्रथा-परंपरा म्हणून अशा किती गोष्टी केल्या जातात? घरी मुलाची महत्त्वाची परीक्षा आहे, तुमचे त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करून, बाहेरगावी नातेवाईकाकडे सभारंभाला जाणे. ते आग्रह करतात, या, या आणि आपल्यावर दबाव गेलेच पाहिजे की आपल्याला मोह? बरे जातात ते जातात आणि आल्यावर टीका. व्यवस्था बरोबर नव्हती, जेवण बरोबर नव्हते. मग तर वाटते हे आवर्जून जातात ते दोष काढायलाच की काय! करणारे बिचारे त्यांच्या क्षमतेनुसार जमेल तसे करतात. हे दुसर्‍याकडे जाणे जाऊ दे. सण असला की गावाकडे धाव घेणारे अनेक. बस फुल्ल, रेल्वे फुल्ल, स्त्रीवर्गाचे हाल, तरीही अट्टाहासाने जाणे. साठ वर्षाच्या स्त्रीला रेल्वेत बाहेर खिडकीला लटकून प्रवास करताना बघितल्यावर काय म्हणावे कळत नाही. बरेचदा आरक्षण मिळत नाही, सगळे तसेच डब्यात घुसतात आणि स्त्रिया दोन बाकांच्या मध्ये पसरतात. कशाला हा अट्टाहास? पण गावी पोचल्यावर उलट पराक्रम केल्यासारखे किती अडचणीतून आलो त्याचे वर्णन. पंचवीस वर्षात एक वर्षही सणाची फेरी चुकली नाही याचा अभिमान. एका उद्योजकांकडे मराठी व अमराठी दोन्ही प्रकारचे कामगार आहेत. त्यांना विचारले काय फरक आहे दोन्हीत? मराठी कामगार श्रम कमी करतात का? ते म्हणाले अजिबात नाही, तेवढीच मेहनत घेतात. फक्त सण आला गावाकडे धाव घेतात, हा मुख्य प्रश्न आहे.

सुरुवातीला म्हटले तसे या हव्या तर किरकोळ गोष्टी आहेत म्हणा किंवा वैयक्तिक निवड आहे म्हणा. मुद्दा आहे, अशा किती गोष्टी सामाजिक संकेत या दबावाखाली केल्या जातात आणि किती गोष्टी केवळ पूर्वापार चालत आल्या आहेत म्हणून केल्या जातात? एक यादी बनवून त्यातील काय काय गोष्टी आपण का करतो, त्यामुळे काय होते याचा आढावा घेतला तर हाताशी काही लागू शकेल. कधी लहर आली तर आपण घर सफाईची मोहीम काढतो, माळ्यावरची, कपाटातील अडगळ काढून टाकतो. आयुष्यातील अशा अडगळी काय काय आहेत आढावा घेऊन त्या काढून टाकायला काय हरकत आहे? प्रथा म्हणून केवळ सुरू आहेत अशा काय गोष्टी आहेत तपासून बघू या. एका सरकारी कार्यालयातील घटना सांगतात, (हा खूप प्रसिद्ध किस्सा आहे), मराठवाड्यातील एका जिल्ह्यात नवे कलेक्टर आले. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या टेबलावर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आलेले अहवाल आणि त्या अहवालात किती गावातील किती लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यांना कळेना हे कशाला? तपास केल्यावर कळले, दहा वर्षांपूर्वी तिथे दुष्काळ पडला होता. लोक मोठ्या प्रमाणावर गाव सोडून निघून जात होते. त्यामुळे ही आकडेवारी घेणे सुरू झाले, ते दहा वर्षांनंतरही सुरूच. हा सरकारी खाक्या, कळत-नकळत आपल्याकडूनही असे होत असते का?

वर दिलेल्या किंवा इतर गोष्टी तुमच्या प्राधान्यक्रमात असतील तर त्या अवश्य करा, समजून - उमजून करा. पण वर्षानुवर्षे सुरू आहे म्हणून नको. विचार करूया या मुद्दयावर.    

 प्रतिक्रिया द्या2270 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर