काळी
शुक्रवार, १२ जानेवारी , २०१८ सुगंधा चितळे-पांडे

वर्णावरून माणसाची बुद्धिमत्ता, नीतीमत्ता सर्व काही ठरवण्याची थीअरी काकांच्या कर्मठ घरात नेहमी वापरली जाई. रंगाने सावळ्या असलेल्या बहिणीला कायम याचा त्रास सहन करावा लागला.

माझी सख्खी बहीण माझ्याहून जरा सावळी होती पण अतिशय रेखीव होती. आमच्या कर्मठ घरात मात्र तिला सरसकट काळी म्हटले जाई. तिचे काळेपण तिच्याशी इतके जोडले गेलेले होते की तिचे नावच काळी ठेवलेले होते. सहसा कुत्र्या-मांजरींना रंगावरून ओळखले जाई पण ज्याच्या पाठीशी कोणी नाही त्याची अवस्था जनावरासारखी करायची खासियत आमच्या काकांच्या घरात होती. त्यांच्या कचाट्यात माझी बहीण आयतीच सापडली होती. तिच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट तिच्या रंगाशी जोडून तिचा आत्मविश्वास घालवण्याची एकही संधी आमचे मालक (काका) सोडत नसत.

त्यांनी तिला सांगितले होते की ती जन्माला आली तेव्हा आमचे बाबा तिला नदीत बुडवून मारून टाकायला निघाले होते कारण ती काळी जन्माला आली हे त्यांना आवडले नव्हते. नदीवरून काकांनी बाबांची मनधरणी करून तिला वाचवून घरी आणले होते. तिचे काळेपण असे काकांनी तिच्या जन्माशीच आख्यायिकेइतके पक्के बसवून टाकले आणि हे तिनेही चांगलेच मनावर बिंबवून घेतलेले होते. त्यामुळे बाबा आम्हाला भेटायला आले तरी ती कधीच त्यांना भेटत नसे. काकांनी तिला हेही सांगितलेले होते की माझ्या आईचे वडील म्हणजे आबा हेदेखील तिच्या रंगामुळे तिचा द्वेष करतात. हे तर अजिबातच खरे नव्हते. कारण आबा अतिशय आधुनिक विचारांचे होते. वर्ण, वर्ग, पैसा याच्याशी त्यांना अजिबात घेणे देणे नव्हते. माझ्या बहिणीचा त्यांनी कधीच द्वेष केला नाही. उलट घरातल्यांच्या या दबावामुळे आणि अशा गोष्टी मनवर बिंबवल्या गेल्या कारणाने तिने कधीच कुणाशी नीट संबंध ठेवले नाहीत. किंबहुना आत्मविश्वास गमावल्याने काकांवर ती जास्त जास्त विसंबून राहत गेली आणि त्यांच्यासारखीच बनली. नेमके हेच काकांना हवे असे. माणसाच्या वैगुण्याचे किंवा तथाकथित कमीपणाचे भांडवल करून त्याला इतके नामोहरम करायचे की त्यांच्यासमोर त्याने मिंधे होऊन राहावे. त्यांच्या या नीतीची शिकार म्हणजे माझी सावळी बहीण.

तिचे काळेपण तिने मान्य केले असल्याने त्यावरून तिचा सातत्याने अपमान करणे त्यांना सहज शक्य होते. घरात काहीही विपरीत घडले तर त्याचे पहिले खापर काळी म्हणून माझ्या बहिणीवर फोडले जाई. जणू काळा रंग आणि अशुभ यांचे युगानुयुगाचे नाते होते आणि काळ्या रंगाचा माणूस हा अशुभाचा मूर्तिमंत पुतळाच आहे. हे ठरवणारे स्वतः मात्र गोरे आणि घारे होते. त्यांना त्यांच्या या गोरे असण्यावर इतका गर्व होता की जे त्यांच्यासारखे दिसत नाहीत ते सगळेच त्यांच्या दृष्टीने खालच्या दर्जाचे ठरत. तसे ते अतिशय ठामपणे दुसऱ्यांच्या तोंडावरही बोलून दाखवत. रंग हे माणसाची बुद्धिमत्ता, नीतीमत्ता त्याची आर्थिक स्थिती सर्व काही ठरवते अशी त्यांची थिअरी होती. अन्यवर्णीयांना त्यांच्या भावविश्वात नगण्य स्थान होते. माणसाचे अवमूल्यन करण्यसाठी त्याचे जन्मघर (खानदान), त्याचा रंग, त्याची भाषा, त्याचा पेहराव असे काहीही त्यांना चालत असे. जे त्यांच्यासारखे नाहीत ते सगळे फालतू ही त्यांची पक्की धारणा होती.त्यामुळे इतर जातीचे लोक, आपल्यातलेच पण रंगाने वेगळे लोक, वेगळ्या प्रदेशात राहणारे लोक सर्व तुच्छ होते.

अशा धारणांच्या माणसांमध्ये माझ्या बहिणीचे सावळेपण म्हणजे गुन्हा ठरत होता. त्यामुळे ती अशुभही ठरत होती. तिच्या हातातून काही घ्यायचे तर शक्य होईल तितके स्पर्श टाळून घ्यायचे, तिने घातलेले कपडे घालायचे तर नाहीच त्यांना स्पर्शसुद्धा होऊ द्यायचा नाही असे चालत असे. पंगतीमध्ये तिच्याशेजारी बसावे लागू नये यासाठी घरात चढाओढ असे. बसावे लागलेच तर किमान दोन वितींचे अंतर ठेवून बसत असत. विशेषतः माझी मोठी काकू हे फार पाळत असे. बहिणीने घातलेले गळ्यातले, कानातले आमच्या इतर बहिणी अजिबात घालत नसत. काकू तिला आणताना मुद्दाम डार्क रंगाचे कपडे आणत असे जेणेकरून तिचे काळेपण अजून उठून दिसावे. तिला हवे असलेले हलके पिवळे, गुलाबी, आकाशी रंग टाळले जात आणि डार्क जांभळा, गर्द हिरवा, राणी कलर वगैरेच तिच्या वाट्याला येत. एकतर वापरलेलेच कपडे घालायचे असल्याने फारसा चॉईस नसे, त्यात यांचे हे असे. ती बिचारी निमुटपणे सारे सहन करी. इतर मुलांना दृष्ट लागू नये म्हणून काकू काजळ लावे. एकदा माझ्या बहिणीने म्हटले की मलाही लाव न गं असे काजळ. मोठी काकू पट्कन म्हटली- तुला कशाला हवेय काजळ? तुला तर वरूनच काजळ फासून पाठवलीये ना. माझ्या बहिणीला खूप वाईट वाटले. तिला मी समजावले ज्याची हे भक्ती वगैरे करतात तो कृष्णही काळाच आहे न वगैरे. तिला त्याने तात्पुरता धीर आला पण आतून ती कायमची दुखावली गेली.

तिला जेवतानाही हमखास सगळ्यांच्या शेवटी बसवले जाई, ताटे कमी आहेत वगैरे काहीही करणे सांगून. खरे कारण असे जेवताना तिचा स्पर्श नको म्हणून. नंतर तिला त्याची इतकी सवय झाली की ती आपणहूनच मागे थांबू लागली.

एखाद्याचा द्वेष करायचा म्हणजे किती याचा विधिनिषेध नसणारी माणसे हीच कर्मठ माणसे होय. एकदा भर उन्हातून दमून आलेल्या मोठया काकूला माझ्या बहिणीने तत्परतेन गुळ आणि पाणी आणून दिले, तिने घृणेने त्याकडे पाहिले आणि ते न घेता निघून जाऊ लागली. माझ्या बहिणीचे डोके सटकले, ती पट्कन म्हटली- अगं, ते पाणी काळे नाहीये काही. इतके होऊनही काकूने ते पाणी प्यायले नाही. तिच्या हातून दुधाची किटली घ्यायलाही काकूचा नकार असे कारण दूध काळे होईल. याची तर सगळे चेष्टा करीत पण जाहीरपणे नाही.

याच मोठ्या काकूची मंगळसूत्राची वाटी एकदा हरवली. ती माझ्या बहिणीला सापडली तर तिने लगेच तिला मांडीवर बसवून घेऊन पाप्या घेऊन तिला ड्रेस मटेरियल भेट दिले. माझ्या बहिणीने ते न घेता तिला पाण्याच्या प्रसंगाची आठवण करून दिली.  

बाहेरून येणारे नातेवाईकही तिला तिच्या काळेपणावरून हिणवत असत, तिच्यावर विनोद करत, तिला स्पर्श करायचे टाळत. तेव्हा तर आपल्या वडिलांच्या चुकीबाबत मनातल्या मनात मी त्यांना कोसत असे. आमच्या आईबापांनी आयुष्यात यातले कोणतेही भ्रम जोपासले नाहीत आणि त्यांनी नक्कीच आम्हालाही तसले काही पाळू दिले नसते पण आता परिस्थितीने आमच्यावर जणू सूड उगवला होता म्हणून अशा माणसांमध्ये आम्हाला दिवस काढावे लागत होते.

माझ्या बहिणीने वाढत्या वयाबरोबर मात्र माझ्यासारखीच बंडखोरी करत त्यांच्या समजुतीचे पाय त्यांच्या गळ्यात बांधायला सुरुवात केली. मी काळी आहे मग मी खिसलेले खोबरे तुम्हाला कसे चालते? मी खोबरे किसणार नाही, मी पत्री आणणार नाही. गणपती काळवंडला तर? धार्मिक कार्यात माझी काळी सावली नको तर मी कार्यावेळी कामच करणार नाही असे तिने चालू केले आणि आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा तिला फायदाच झाला.

तिच्यासारखेच माझ्या सावळ्या पण अतिशय सुंदर दिसणाऱ्या मावशीलाही हे लोक हिणवत असत. उत्तम शिक्षण असूनही केवळ रंगामुळे तिचे लग्न जमत नव्हते. त्यावरून आमच्या दोन्ही काकू आजोबांना हिणवत आणि गोऱ्या होण्याच्या क्रीम तिला वापरायला लावायच्या सूचना देत असत. आजोबा सारे काही धुडकावून लावत. मुलीला आयुष्यभर घरात बसवून ठेवेन आणि सांभाळेन असे ठामपणे सांगत असत. तब्बल आठ वर्षे माझ्या मावशीचे लग्न जमले नाही ते केवळ रंगामुळे. त्यापायी जवळपास प्रत्येक कार्यात तिने टोमणे ऐकले. अनेक अर्धवटरावांचा नकार पचवला.

रंगाबद्दलचा यांचा अजेंडा मात्र बाहेर तोकडा पडला कारण बाहेर जग पूर्णपणे बदलेले होते. एकदा माझा एक मित्र घरी आला होता. रंगाने तो काळाच होता शिवाय जातीने वेगळा. हे पाहून आमच्या काकूला चेव आला ती त्याला म्हटली- का रे तुमच्यात सगळेच काळे असतात का? तो पटकन म्हटला- आम्ही तुमच्यासारखे दही दुध ताक नाही ना खात. मासे,मटण खातो... आणि त्याने त्या पदार्थांचे अतिशय संयमी भाषेत पण सविस्तर वर्णन सुरू केले. काकूची वाचा जायची वेळ आली इतके निषिद्ध तो एका दमात बोलला. उत्तराला प्रत्युत्तर मिळाले की हे थंड होतात हे मला त्या दिवशी कळले.

काळ्या मनाचे हे गोरे घारे लोक प्रत्युत्तराला घाबरतात हे सिद्ध झाले. विशेषतः ते त्यांच्याच भाषेत असेल तर अजूनच.

(क्रमश:)

शब्दांकन- शंतनू पांडे

कर्म(ठ)कथा मालिकेतील मागचा भाग वाचा: http://www.bigul.co.in/bigul/2028/sec/11/thugsप्रतिक्रिया द्या3307 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Sambhaji Sawant - शुक्रवार, १२ जानेवारी , २०१८
वा !

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर