फेबुगिरी
शुक्रवार, १२ जानेवारी , २०१८ टीम बिगुल

ताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्‌स खास बिगुलच्या वाचकांसाठी...

हनिमूनला पोळीभाजीचा डबा घेऊन जाताना राधिका कशी बोलली-वागली असेल,

अरे बाप्पा, तुम्ही किस का नाही घेऊन राहिले...

- विजय तरवडे

...........................

तू निघून गेलास, तेव्हाही मी थांबले होते तिथेच... 
स्तब्ध! निश्चल! अजूनही तुलाच अनुभवत..
तुझ्या पाऊलखुणा शोधत.. कदाचित तुलाही....
उन्मळून पडले मी आणि भोवतालही...
काही काळासाठी...
तू निघून गेलास तेव्हा..
हे अगदीच अनपेक्षित.. कल्पनाच नव्हती केली कधी..
तुझ्याशिवाय असलेली मी.
वाटलं होतं, येशील पुन्हा..
तोंडभर मधाळ हसू घेत.
कोसळलेली मी, पुन्हा तुझ्या आठणीनेच सावरले.
माझ्या उन्मळण्याचा कदाचित तुलाच त्रास झाला असता...
उजळले मी पुन्हा, माझ्या मुळ सत्वांसहित..
पूर्वीचीच मुखवटेरहीत मी.
पूर्वीच्याच आवेशात सज्ज झाले...
कैक क्षण लोटले आता.. 
याला मी विरह नाहीच म्हणणार...
पण परतशील का एकदा?
आपल्या कलाकृतीत मी भरलेले रंग पाहायला?

- जयमाला पाटील

...........................

'आत्महत्येची बातमी 
बहुतेकांना काही क्षण का असेना 
पण अस्वस्थ करतेच . 
जीवनलोलुप माणसे त्यामुळे सुन्न होतात .

मध्यंतरी मी एकदा 
ओळखीतील /माहितीतील आत्महत्या केलेल्यांची यादी केली 
तर ती १५/१६ भरली 
आणि मी अवाक झालो. 
तेव्हापासून आत्महत्या हा विषय 
अधिकच जिव्हारी रुतून बसला .

आत्महत्या 
हा 'भ्याडपणा' आहे की 'शूरपणा' आहे?
असे वाद बरेच ऐकू येतात
त्यासंबंधात एवढंच वाटतं 
की त्यात पराकोटीची अगतिकता /एकाकीपणा आहे .

'आत्महत्या' म्हणजे स्वत:चा खूनच
आणि त्यामुळे जो न्याय खुनाला तोच आत्महत्येला 
लावून ती शिक्षापात्र गुन्हा गणली जाते
त्याबाबत वाद संभवतात ... 
माझ्या देहाचे मी वाटेल ते करेन
एखाद्याला जगायचा कंटाळा आला असेल 
तर त्याला ते थांबवायचा कायदेशीर अधिकार का नसावा? 
असा त्यातील मुद्दा आहे .

तर आज हे सारे आठवायचे कारण 
लोकसत्तामध्ये आत्ताच वाचलेली एक बातमी . 
नारायण लवाटे ( वय ८७ ) आणि इरावती लवाटे ( वय ७८) 
हे गेली ३० वर्षे इच्छामरणासाठी रीतसर परवानगी मागत आहेत 
आणि आता त्यांनी ह्यासाठी राष्ट्रपतींकडे अर्ज करून 
तो विचारात न घेतला गेल्यास ३१ मार्च रोजी 
विषप्राशन करण्याची पूर्वसूचना दिली आहे .

एकुणात 'इच्छामरण' हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे .

'माझ्या देहाबरोबरच्या माझ्या व्यवहारात कायद्याने ढवळाढवळ करू नये' 
ह्या मागणीत काय चूक आहे?

- सतीश तांबे

...........................

मला आत्महत्या करावीशी वाटते असं, म्हणणारी कितीतरी माणसं आपल्यासमोर किंवा आपल्या सभोवताली असलेल्या माणसांच्या आयुष्यात येतात. त्यावेळी खचलेल्या माणसाला ताबडतोड ठिकाणावर आणणारे चार उपदेश झाडून आपले हात मोकळे करून घेत असतो. हे माहीत असतं की हा बोलतोय पण हा कसला आत्महत्या करणार.. त्याला ज्या कारणासाठी मरावंस वाटतं ते कारणही किती झाटू आहे हेच ऐकण्यातही येतं. ते कारण भले कितीही झाटू असेल तरीही ते त्या व्यक्तिसाठी त्यावेळी खूप महत्त्वाचं असतं त्याला ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे, ही वेळ तो चूक की बरोबर हे ठरवण्याची नसून त्याला हात व कान देण्याची आहे, हेच समजण्यात आपली गोची होते आहे. समस्या गंभीर असेल तर त्या माणसाला आपण सांगणार की समुपदेशकाकडे जा.. ती व्यक्ती समुपदेशकाकडे हून जाईल, अश्या स्थितीत असते काय.. ती भेलकांडलेली असताना ती ज्या व्यक्तीकडे मनोगत व्यक्त करते त्याच व्यक्ती तिला समुपदेशकाकडे जा असं सुनावून आपला गळा मोकळा करून घेत आहेत हे पाहून अधिकच गर्तेत जायला होते. अश्या व्यक्ती आत्महत्या करतात किंवा जिंवत राहून क्षणाक्षणाला आतआत कोषबंद होत जातात. तीही एकप्रकारे आत्महत्याच आहे दुसरं काय.. अश्या आत्महत्यांना जबाबदार कोण.. लग्न झाल्यानंतर असे आयुष्य जगतानाच मरत असलेल्या कितीतरी स्त्रिया असतात. पुरूषही. संवादाचा अभाव जिथे असतो तिथे तो मेला समुपदेशक तरी काय करेल. सरतेशेवटी ज्याच्यासोबत संसार करायचा असतो त्याला जाग यायला हवी असते. समुपदेशकाचं काम एका पातळीवर येऊन संपत.

- रेणुका खोत

...........................

एक मुलगा होता त्याला नेहमी 70% मार्क पडत पण हल्ली त्याला कमी मार्क पडू लागले आणि तो 60% वर आला. आता घरी काय सांगायचे हा त्याला प्रश्न पडला. मग तो जागतिक संस्थेकडे गेला, त्यांच्या सल्यानुसार घरी कसे सांगायचे याचा अहवाल घेतला आणि तो नाचत नाचत घरी गेला. घरच्यांना अहवाल दाखवला व त्याच्या पेक्षा कमी मार्क मिळवलेल्या मुलांचे मार्क सांगत आपण कसे इतरांपेक्षा हुशार आहोत हे सांगू लागला. सगळे खुष झाले. बाप घरी आला आणि अहवाल वाचला. एक खाडकन कानाखाली लावून म्हणाला 70वरून 60वर का आलास ते सांग, तो अहवाल घाल चुलीत.
Disclaimer.
याचा आणि कमी झालेला जीडीपी व जागतिक बँकेचा अहवाल याचा काहीही संबंध नाही.

- अरुण दीक्षित

...........................

न्यू अॅडमिनिस्ट्रेटीव बिल्डींगमधे काही कामानिमित्त गेलो होतो. येताना रमत गमत आलो. जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन सुरू होते. वेळ होता. एकेक चित्र पहात होतो. एकाहून एकेक देखणी चित्र होती. 
बघता बघता एका भल्या मोठ्या कॅनवासपुढे पोहोचलो. तीन लांबुळके गोल एकमेकांपुढे चितारले होते. पुढे दोन अस्पष्ट रेषा. संपूर्ण काळ्या रंगाच्या. मागे लाल पिवळी पार्श्वभूमी. ..खूप निरखून पाहिले. त्या अमूर्त शैलीतील चित्राने मला पुरते मूर्त केले होते. काही केल्या काही कळले नाही. 
आता न समजता पुढे जायला मन होत नव्हतं.
कॅनवासपासून अंतर कमी जास्त करून, तर कधी तिरक्या अँगलने पाहत होतो.. शेवटी कंटाळून नाद सोडणार इतक्यात मागून आवाज आला 
"डोंगळ्यानं लय तरास दिला जनू"?
मी मागे पाहिलं...गॅलरीत काम करणारे वयस्कर बाबा बोलत होते. ..
"डोंगळा हाय त्यो...काळा...तसा पटकन धेनात येत न्हाई"
मी निरखून पाहिले.
खरच ते एक काळा मुंगळ्याचे चित्र होते ते...
मी त्याच्या ज्ञानावर अवाक्! मारे रसिक बनून गेलो मी, पण मला चित्राचा अर्थ वॉचमन समजावत होता.

"काय नग! गोंधळून जायाला"
"म्याच लावतो की रोज ही चित्रं सकाळच्याला भिंतीवर "
"सायेब सांगतात कधी आज डोंगळा हितं लाव, उद्या डोंगळा तितं लाव"

- बर्नार्ड लोपीस

...........................

धुळे जिल्ह्यात एक बुद्धिमान (राष्ट्रवादी) काँग्रेस नेते आहेत... आमदार व कामगारमंत्रीही...! ते मला नेहमी म्हनायचे, 'तुम्ही आमच्या जिल्ह्याचे महात्मा फुले'' ....''
का? आंबेडकरवादी का नाही??' माझा प्रश्न..... 
ते एकदा मला म्हणाले, 'सर, तुम्ही आता ब्राह्मणवादावर बोलणं सोडून द्या.... लोक आता खूप हुशार झाले आहेत... लोकांना सर्व कळतं.. इंटरनेटचा काळ येतो आहे... पेशवाई वगैरे पुन्हा येऊच शकत नाही... ''
आज ते खूप वयस्क झाले आहेत... त्यांच्याशी काय चर्चा करणार....????.... काही लोक फुशारक्या मारीत की भारताचे संविधान असतांना पेशवाई परत येऊच शकत नाही.... 
--- पण मला बुद्धकाळातही असे काही घडले असेल याचा अंदाज येतो.... त्या काळी काही घटक अशाच फुशारकी मारीत असतील .... ब्राह्मणवाद परत येणारच नाही असे मानून आपल्याच भ्रांतीत लोळत पडले असणार... परिणामी बौद्ध धम्म देशातून हद्दपार... आणि पेशवाई हजर... आजही तेच घडत आहे, घडले आहे... भीमाकोरेगावला 'मार' खाऊन आल्यावर तरी आत्मपरीक्षण झाले पाहिजे... आणि पुढची दिशा ठरविली पाहिजे....

- श्रावण देवरे

...........................

गांधी खरोखरच कोण होते?
दादासाहेब खापर्डे यांच्या मते, गांधी म्हणजे सैतान, ब्रिटिश सरकारचे हस्तक व हेर. सावरकरांच्या मते नेमस्तातील नेमस्त व लाचारातील लाचार.
सावरकरांचे जेष्ठ बंधू बाबाराव सावरकरांच्या मते गांधी म्हणजे देशद्रोही, महापापी.
हिंदू महासभेचे अध्यक्ष ना. भा. खरेंच्या मते, "गांधी हे औरंगजेबाचे अवतार आहेत. हिंदूंचा सर्वनाश करण्याचा औरंगजेबाचा बेत फसला तेव्हा आपले कार्य हिंदू होऊनच करता येणे शक्य आहे अशी खात्री पटल्याने त्याने गांधींच्या रूपात जन्म घेतला."
हिंदूंचा सर्वनाश करण्यासाठी जन्माला आलेल्या मुस्लिमधार्जिण्या गांधींच्या बद्दल मुस्लिम लीग काय म्हणते?
झेड. ए. सुलेरी- जिनांचे उजवे हात त्यांच्या "माय लीडर" या पुस्तकात म्हणतात, "गांधी मुसलमानांचे निर्मुसलमानीकरण करताहेत. गांधीजींचा हेतू मुसलमानांचे "हिंदुकरण" करण्याचा आहे."
खरोखरच गांधी कोण होते?
काहीही असले तरीही ते जबरदस्तच असले पाहिजे.
अनेकांची "दुकानं" गांधीमुळे ओस पडली असावी म्हणूनच हा "पोटशूळ" अनेकांच्या पोटात उठला असावा.

- चंद्रकांत वानखडे

...........................

माणसे थंडीने मरत नाहीत, मरतात ती गरिबीमुळे, लाचारीमुळे! समाज म्हणून आपण काहीतरी करू शकतो. कुणी फुटपाथवर झोपलेलं दिसलं तर मदत करा।

- मनोज देवकर

...........................

२००४-२००९

कॉलेजची पाच वर्षे जेवणाची दोन्ही वेळची चांगली सोय जिथे झाली,  ते हे ठिकाण..  नावाप्रमाणेच "बादशाही"..

कराडहून पुण्यात होस्टेलला राहाताना जेवणाची चांगली सोय होणे हा मोठा प्रश्न होता. कसंही काहीही खायची सवय नसल्याने रास्त दरात चांगली सोय करण्याचं चॅलेंज होतं. सुरुवातीला काही मेस ट्राय करुन पाहिल्या. मात्र जीभ व मन दोन्ही तिथे रमेना. काही मित्रांकडून बादशाहीचं नाव कानावर होतं. पण तेव्हा PEO नसल्याने तिथे जाण्यासाठी सुमारे ६-७ महिने गेले.

पहिल्यांदा गेल्यावरच सगळं जमून गेलं. प्रवेश केल्यापासूनच तिथलं वातावरण, बसण्याची जागा, पाण्याचं तांब्या भांडं, ताटात पदार्थ वाढायची पद्धत, पदार्थांच्या जागा, मनापासून हवं तेवढं, हवं ते, हाका न मारता वाढणारे वाढपी.. सगळं च मनात भरलं होतं. पदार्थांच्या बद्दल काय सांगा.. भाज्या, आमटी, ताक यांनी जिभेला जिंकलंच होतं.

महत्प्रयासानं मेंबरशिप मिळवली. जे लोक कधी बादशाहीचे मेंबर राहिलेत, किंवा ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेत, त्यांना मला काय म्हणायचंय हे समजेल. बाकीचे मित्र तर नुसते जळत होते. कारणही तसंच होतं. रुपये ८००/- प्रति महिना मध्ये ३० दिवस रोज दोन वेळची जेवणाची चांगली चविष्ट सोय होणे हे तेव्हाही शक्य नव्हतं.

दर गुरुवारी रविवारी विशेष मेनू. मे महिन्यात आमरस.. सीझनल सारं, कढ्या, भाज्या.. काय नाही? हे सगळं असताना चवीतलं सातत्य? कमाल!! कदाचित त्यांच्या व्यावसायिक यशाचं रहस्य हेच.

पाच वर्षे जेवणाची काळजी राहिली नव्हती. मन, जीभ तृप्त होत होतं. तिथले वाढपी, मॅनेजर सगळे मित्र झाले होते. परीक्षेच्या काळात जेवणाची वेळ संपल्यानंतरही ताट झाकून ठेवायचे. ३.४५-४.०० वाजता दुपारचं जेवण तेही सदाशिव पेठेत! सांगून कदाचित विश्वास बसणार नाही. अशी ही बादशाही!!

सध्या फारसं जाण्याचा योग येत नाही, मात्र जेव्हा केव्हा जातो, तेव्हा "बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी" या शब्दांनी स्वागत होतं.. न मग सुरू होते हाता-तोंडाची जुगलबंदी..

शेवटी बादशाही ती बादशाहीच..

- ओंकार टोणपे

...........................

बँकेच्या परिसरात CCTV मध्ये तुमची छबी दिसली तरी बँक "चित्रिकरण चार्ज" लावेल असं घडू शकेल...काय वाटतं?

- सचिन गोस्वामी

...........................

नमस्कार!!!

आपलं स्वागत आहे वॉल माझामध्ये... मी सागरिका घोसाळे... पाहूया आजच्या शिळ्या घडामोडींची एक झलक...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत लंडनला दौऱ्यावर गेलेल्या काही वरिष्ठ पत्रकारांनी एका हॉटेलमध्ये डिनरच्या दरम्यान, रात्रीचा दिवस करून चोरले तिथले चमचे

*वूश्श असा तीनदा आवाज*

चोरले तिथले चमचे *वूश्श*

चोरले तिथले चमचे *वूश्श*

होय नुकतंच हे धक्कादायक वृत्त आलंय वॉल माझाच्या हातात, आमच्या हातात दुसरं काय येणार म्हणा, चांदीचे चमचे त्यांच्या हातात आणि नुसतं वृत्त आमच्या हातात. एयर होस्टेस साठी अजूनही ट्राय करतेय, एकदा का लागला ना मटका, की...कंट्रोल उदय कंट्रोल...माफ करा...

तर हे धक्कादायक वृत्त हाती आलेले असून, त्याची इत्यंभूत बातमी तुम्हाला देतोय वॉल माझाचा संवाददाता समीर लाईव्ह थेट लंडनहून...स्वारगेट ते सिम्बायोसिसचं साधं बसचं तिकीट काढलं नाही ह्या समीरने, पण नोकरी पाठवतेय लंडनला...च्यायला, माझा एयर होस्टेसचा मटका एकदा लागला ना, कंट्रोल उदय कंट्रोल...माफ करा...पाहूया समीर लाईव्ह थेट लंडनहून

*समीर एस्किमो सारखे कपडे घालून माईक धरून उभा, बोलताना त्याच्या तोंडातून वाफ*

सागरिका: हा, समीर बोला, काय म्हणतंय लंडन?

समीर: लंडन...लंडन मध्ये खूप थंडी आहे. ही बघ बोलताना वाफ येतेय तोंडातून. उगीच तोंडाची वाफ दवडू नये हे इथे लागू होत नाही. हा हा हा. लंडन खूप हॅपनिंग आहे. लंडनच्या पोरी...

सागरिका *त्याला मधे तोडत*: कंट्रोल उदय, आय मीन समीर...चमच्यांची काय बातमी आहे?

समीर: हा हो...चमचे चोरल्याची घटना खरी आहे. मी त्या हॉटेलमध्ये स्वतः जाऊन आलो. सीसीटीव्ही फुटेज पाहून फुटेज देखील खाऊन आलो. त्यानंतर घेतली त्या वरिष्ठ पत्रकारांची मुलाखत. त्यांच्याबरोबरच्या मुलाखतीनंतर ह्या प्रकरणाला एक वेगळीच लाटणी आय मीन कलाटणी मिळाली आहे.

सागरिका: काय काय कलाटणी, समीर? आपल्या प्रेक्षकांना जरा सविस्तर सांगा

समीर: तुला लगान चित्रपट आठवतोय?

सागरिका: हो,  ब्लॅकने तब्बल ३०० रुपये तिकीट घेऊन पाहिला होता, त्याचं काय?

समीर: तर, ह्या वरिष्ठ पत्रकारांच्या लंडनच्या विमान प्रवासात त्यांनी लगान चित्रपट पाहिला.

सागरिका: अरे, माझा एयर होस्टेसचा मटका लागला असता तर मी ही असते त्या विमानात...कंट्रोल करतेय ना मी...तू बोल पुढे

समीर: तर वरिष्ठ पत्रकार तीन-चार पेग मारून चित्रपट बघून राहिले आणि "डुगना/तिगूना लगान देना पडेगा" हे वाक्य त्यांच्या त्या स्थितीत त्यांच्या मनावर परिणाम करून गेलं. फ्लाईट संध्याकाळी लॅन्ड झाली पण पत्रकार महाशय हवेतच होते आणि तसेच डिनरला गेले. त्यांनी त्याच अवस्थेत चमचे चोरले, ते स्वतःसाठी नाही तर दीडशे वर्षांपूर्वी भारतीयांवर झालेल्या अन्यायाचा बदला, निदान खारीचा वाटा म्हणून घेण्यासाठी चोरले. सिसिटीव्हीमुळे माती खाल्ली नसती तर परतून हेच चमचे राष्ट्रीय खजिन्यात आले असते. त्यांच्या चमच्यांची खरी घटना ऐकून माझ्या अंगावर काटा आला बघ

सागरिका: चल, फेकू नकोस, थंडीमुळे शहारला आहेस तू, बाकी काही नाही. पण धन्यवाद समीर ह्या बातमीमागची सत्यघटना समोर आणल्याबद्दल.

तर पाहिलंत आपण, वॉल माझा ने कसा केलाय पर्दाफार्श. आज चमच्यांनी सुरुवात आहे, उद्या कोहिनुर आणतील आणि कोकणात अंतू बरवा आज किंवा परवा खुश होतील.

वॉल माझा मध्ये आज इतकंच, आय मीन तसं आहे बरंच पण मला इंटरव्यू साठी जायचंय, कुठे ते चाणाक्ष प्रेक्षकांनी ताडलंच असेल

तर, जगभरातील तोडफोडीसाठी...माफ करा...घडामोडींसाठी पाहत रहा वॉल माझा

(५०० मीटर अंतर राखून, आता ही अट शिथिल झालीये पण आमच्याकडे टॅगलाईन बदलायचंही बजेट नाही हो, त्यामुळे हीच राहणार आहे) उघडा डोळे, मारा नीट आय मीन वाचा नीट!

#वॉल_माझा 
- तेजल राऊत

...........................

काल रात्री एका स्टुडंटकडे जेवायला गेलो होतो. त्यांचा कुक मूळचा अफगाण. कुकिंगची खाज असल्याने त्याच्यासोबत किचनमध्येच काय बनवतोय ते पाहत बसलो. तो नावं ओळखीची असलेलेच काही पदार्थ बनवत होता. साधारण तासाभराने मी बाहेर आलो. स्टुडंटच्या वडलांनी दोघांचे पेग भरले. मग त्यांनी विचारलं..."काय हो सर काय झालं? एकदम शांत का झालात?" "पाचशे-सहाशे रुपये किलोच्या मटणात त्याच्यापेक्षा जास्त किंमतीचे बदाम-अक्रोड-पिस्ता-काजू मनसोक्त उधळलेले पहिल्यांदाच पाहिले हो!" ते खळाळून हसले. म्हणाले..."आमचा पठाण ऐकत नाही. पण जेवण मस्त बनवतो."

जेवण बनवायच्या प्रक्रियेत आपण किती गरीब आहोत असं वाटायला लागलं. मग वाटलं की ह्या लोकांना हे ड्रायफ्रुटस् सहज उपलब्ध असल्याने असेल. (अर्थात भारतात हे उधळणं अतिच म्हणा.) आपण नाही का शेंगदाणे आणि कोकण किनारपट्टीवर नाही का नारळ भरभरून वापरतो...एक संस्कृत श्लोक आठवला!

अतिपरिचयात् अवज्ञा संततगमनादनादरो भवति। 
मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्टमिन्धनं कुरुते।।

बाकी जेवण एक नंबर होतं!  😂

- अविनाश वीर

...........................

स्वत:चं गाव, स्वतःचं आभाळ, स्वतःची पांढर, स्वत:ची काळी आई सगळं एका राजकीय निर्णयात परकं झालं आणि कोट्यवधी लोकांच्या आयुष्याचा बळी गेला. भावाला डोळ्यासमोर लोक कापून टाकत आहेत, बापाचं मुंडकं समोर तुटून पडलं आहे, समोर आई-बहीण-बायकोवर बलात्कार करून कापलं जात आहे आणि तशाही परिस्थितीत स्वतःचा आणि स्वतःबरोबर ज्याचा शक्य आहे त्याचा जीव वाचवत भारतात पळून जायचे आहे. भारतात पोचलो खरं, पण येऊन करायचं काय, कुठं जायचं, पोरगा आईला शोधतोय, बाप मुलीला शोधतोय, बायको नवऱ्याला आणि मुलाला शोधतेय आणि त्यातून नवीन आयुष्य उभा करायचं आहे.

ज्यांच्यावर एके काळी आभाळच फाटून पडलं होतं त्या सिंधी आणि पंजाबी लोकाकडे आज पाहिलं तर खरंच हे लोक इतक्या नरक यातनेतून आलेत यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. त्यांनी सावरलं, व्यापारात गुंतले, आणि आज भारतातील एक श्रीमंत, व्यापारी समाज म्हणूनच नावलौकिच मिळवला नाही तर भारताला दोन पंतप्रधान दिले, एक विरोधी पक्ष नेता दिला. आज मला कोणताही सिंधी स्वत:च्या नरकयातना लोकांना दाखवण्यासाठी आत्मचरित्र लिहिण्याच्या भानगडीत पडताना दिसत नाही. फक्त व्यापार, पैसा आणि त्यातंच खरी सत्ता आहे हे त्याला अनुभवातून कळले आहे. नाहीतर त्यातल्या प्रत्येक जिवाकड एक कथा असेल, एक करुण कथा, जिच्या मध्ये प्रेम आहे, हिंसा आहे, वासना आहे, भीती आहे आणि ह्या सगळ्या पेक्षा भारी एक उमेद आहे.

नाहीतर आपला मर्हाठी माणूस, गावाकडून पुण्यात आला, आणि पोरगं जरा इंग्रजी शाळेत जाऊ लागलं की सांगू लागतो, आरे तुला काय म्हाईत, अमी कसं दिवस काढल्यात, नुसत्या डाळीच्या आमटीवर आणि भाकरीवर दिवस काढल्यात, शाळेत एक पेन्सिल चौथीपर्यंत वापरली, मोठ्या भावाची पुस्तकं वापरली, एकदा मला ताप आलता तर आई बापाकडं पैसं नव्हतं” आणि मग तशीच कारकुनी करण्यात तो आयुष्य घालवतो आणि साहित्य चळवळीत एखादी आत्मकथा लिहून योगदान देतो.

एकूण पचवण्यापेक्षा दु:ख रंगवणारा समाज श्रीमंत होऊ शकेल काय?

- विकास गोडगे

...........................

एकटं 
अन् 
एकाकी

दोन्हीही एकाच वेळी असू 
अशी वेळ दुर्मिळ 
अवघड असली 
तरीही दुर्मिळ

यापुढे 
कितीही वर्षं 
कदाचित 
मरेस्तोवर 
टिकू शकतो हा क्षण

ज्या क्षणी 
आहे 
एकटी 
अन् 
एकाकी

या पृथ्वीवर
आहे का कुणी अजून असं 
माझ्यासारखं 
असल्यास 
संपर्क साधावा 
पत्ता फोन मन शोधून

तोवर 
या आकाशगंगेत 
डुबकी मारून 
होऊ पाहीन 
पापमुक्त

आहेय कुणी 
फासाची गाठ मारून देणारं 
दोर खेचणारं?
उतरवणारे काय ते 
नोकरी म्हणूनही उतरवतील 
कर्तव्य उरकत

आहेय कुणी 
मांडी देणारं?
आहेय? आहेय? आहेय?
निदान 
दुसऱ्या आकाशगंगेत...
आहेय?

हाक पोहोचत नाही 
आणि मी टेकते डोकं 
असंख्य जाग्या रात्री 
अश्रूंनी भिजून 
ओल्या झालेल्या कुबट 
उशीवर

ती उशी 
जाळा
माझ्यासोबत 
जळायला
कितीही वेळ लागला तरीही 
थांबा जळेपर्यंत 
जा 
आपापल्या जगात
कवटी 
वाजल्यावर

- कविता महाजन

...........................

आधीच्या सरकारच्या निर्णयांना जोरदार विरोध करून आता सत्तेत आल्यावर तेच निर्णय थोडे चांगले बदल केल्याचे दाखवून घेतल्यावर भक्त मंडळी..

"वा!वा!! छान निर्णय"

"Good move.."

"माश्टरश्ट्रोक.."

वगैरे म्हणतात..

त्यांनी निदान

"पण तेव्हाही विरोध करायला नकोच होता बरका!"

असं तरी म्हणावं..

थोडी जनाची नाहीतर मनाची तरी ठेवावी..

- अनंत अच्युत

...........................

ह्या फॉरेनर लोकांचे खूप नखरे असतात. त्यांच्या देशात इंटरनेट सेवा आपल्यापेक्षा फास्ट असल्यामुळे, एखादी इमेज डाउनलोड व्हायला जराजरी उशीर झाला तरी लगेच कम्पलेन्ट करतात आणि त्यावर त्वरित अॅक्शन सुध्दा घेतली जाते.

च्यायला... इथे जियो असून इमेज डाउनलोड व्हायला पाच मिनीट लागले तरी आम्ही तोंडातून ब्र काढत नाही !!

- निलेश खटी

...........................

लळित

``काय हो निर्मलाताई, आज आला नाहीत, तुम्ही कीर्तनाला! किती सुंदर झालं आजचं कीर्तन, माहितेय?``
``नाही हो, जमलंच नाही. गेले चार दिवस हजेरी लावतेय, पण आजचं शेवटच्या दिवशीचं नेमकं राहिलं. काय सांगितलं आज बुवांनी?``
``बुवांनी सगळ्यांना तासलं. आजकालच्या पिढीला तर सोलूनच काढलं.``
``काय सांगता वत्सलावहिनी! उगाच चुकवलं आजचं कीर्तन. कशावरून एवढी तासंपट्टी केली बुवांनी?``
``अहो मग काय! हल्लीची पिढी देवाचं काही करत नाही, नुसती मोबाईलच्या मागे लागलेली असते, संध्याकाळी शुभंकरोति म्हणणं नाही, मुलांवर कसले संस्कार नाहीत, नुसती दिवसभर धावाधाव! पैशांच्या एवढं मागे धावून तो काय वर घेऊन जायचाय का, असं म्हणाले बुवा!``
``खरंच आहे हो. आमच्याही घरी हेच आहे. रोज कानीकपाळी ओरडून सांगतेय, तरी कुणाला काही फरक पडेल, तर शपथ!``
``बुवा म्हणाले, पाच दिवस काम करायचं आणि उरलेले दोन दिवस सिनेमे बघायला धावायचं, हॉटेलांत हादडायचं आणि कार घेऊन बाहेरगावी वीकेंड साजरा करायला जायचं. कसे संस्कार होणार पुढच्या पिढीवर?``
``अगदी खरंय!``
``मला तर बाई बुवांचे विचार अगदी पटले. आमच्या मुलांना आणि सुनांना एके दिवशी ऐकायला लावायला हवं, बुवांचं कीर्तन!``
``काही उपयोग नाही हो. हल्लीची पिढीच बिघडलेय. आपल्या काळी हे टीव्ही, मोबाईल, सिनेमे, वीकेंडला फिरायला जाणं, असलं काही होतं का?``
``तर काय! नसती थेरं! बरं चला, निघायला हवं.``
``का हो? एवढ्या घाईनं?``
``अहो का म्हणजे काय? साडेआठची सिरियल बुडेल ना, आजची! आज ती सुवर्णा तिच्या सासूला घराबाहेर काढणारेय म्हणे.``
``अगं बाई, हो. माझ्याही लक्षात नव्हतंच. तुमच्याशी गप्पा काय मारत बसले? पहिला ब्रेक संपायला आला असेल एव्हाना. चला, निघते.``
``हो, हो. भेटू. साडेसहा, सात आणि साडेसातला लागणाऱ्या सिरियलचे रिपीट भाग उद्या सकाळी बघणारेय मी. कीर्तनामुळे चार दिवस काही बघायलाच मिळालं नाहीये मला! येते हं. सावकाश जा!``

- अभिजित पेंढारकर

...........................प्रतिक्रिया द्या2866 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर