झेन लघुकथा.. माजुद्दीनचा अवमान.. अज्ञानी अभिमान
शुक्रवार, १२ जानेवारी , २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि मार्मिक विचार असा दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

झेन लघुकथा

१.

एका मठात नवीन आलेल्या शिष्याने गुरू जोशुंना विचारलं, मी इथे नवीन आहे. तुम्ही मला काय शिकवण द्याल?

जोशुंनी विचारलं, तू खिचडी खाल्लीस का?

तो म्हणाला, हो.

जोशु म्हणाले, मग भांडी धू.

असं म्हणतात ती तत्क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली.
...
...
...
...झेन परंपरेमध्ये आजही या कथेचा कूटार्थ उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेकडो साधकांनी अनेक प्रकारचे अर्थ लावले आहेत. तरीही तिचं आव्हान कायम आहे.

..........................

२.

एका मठात एका अभ्यागताने मठाधिपतींना विचारलं, या मठात 
तुम्ही काय शिकवता?

मठाधिपती म्हणाले, विस्मरण.

अभ्यागताने विचारलं, कसलं विस्मरण?

मठाधिपती म्हणाले, विसरलो.

...............................................

मुल्ला नसरुद्दीनवर बदनामीचा खटला भरला गेला होता... त्याने माजुद्दीनचा अपमान केला, बेअब्रू केली, असा त्याच्यावर आरोप होता.

माजुद्दीनला बादशहाने राज्याचा वजीर बनवला होता. माजुद्दीन हा बेरकी बोका आहे, असं मुल्ला नसरुद्दीन भर बाजारात बोलला होता. ते माजुद्दीनच्या कानावर गेलं आणि त्याने साक्षीदार गोळा करून मुल्लावर खटला भरला.

न्यायाधिशांसमोर मुल्ला म्हणाला, हुजूर, मी अडाणी माणूस आहे. माझी भाषा खेडवळ आहे. त्यामुळे तोंडून काहीतरी निघून गेलं असेल. त्याबद्दल मी माफी मागतो.

न्यायाधिशांनी माफी स्वीकारून खटला निकाली काढला. मुल्लाला कोर्टात खेचून माफी मागायला लावल्याचा आनंद माजुद्दीनच्या मुद्रेवर विलसू लागला... मुल्ला म्हणाला, हुजूर, एक गुजारिश आहे. भविष्यात माझ्याकडून किंवा इथे उपस्थित कोणाकडूनही असा गुन्हा होऊ नये, म्हणून विचारतो. वजीरसाहेबांना बेरकी बोका म्हटलं तर तो त्यांचा अपमान आहे, त्यांची मानहानी आहे... पण, मी एखाद्या मस्तवाल, उन्मत्त, गलिच्छ मनोवृत्तीच्या बोक्याला वजीरसाहेब अशी हाक मारली तर त्यातून कुणाचा अपमान होतो का?

न्यायाधीश म्हणाले, बोक्याला कोणी वजीर कशाला म्हणायला जाईल... पण, कोणी तसं केलंच तर त्यात काही गुन्हा नाही, काही आक्षेपार्ह नाही.

नम्रपणे मान तुकवून मुल्ला निघाला आणि माजुद्दीनसमोर आल्यावर खणखणीत आवाजात म्हणाला, निघतो मी, वजीरसाहेब!!!

..................................

'आपली' संस्कृती श्रेष्ठ असं सांगणारा माणूस

खरंतर त्याला बाकी कोणत्याच संस्कृतीबद्दल

काही माहिती नाही,

इतकंच सांगत असतो.

................................... प्रतिक्रिया द्या1905 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर