डोक्यावरची ओझी.. मुल्लाची युक्ती.. अश्रद्धा दुखावली..
गुरुवार, ११ जानेवारी , २०१८ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि मार्मिक विचार असा सकाळच्या दमदार कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून

डब्यातले सगळे लोक त्याच्याकडे पाहातच राहिले. त्याने आपलं सामान आपल्या डोक्यावर घेतलं होतं. बसल्यानंतरही त्याने ते पायाखाली किंवा वर सामानाच्या रॅकवर ठेवलं नाही.

थोड्या वेळाने एक सहप्रवासी म्हणाला, हे सामान डोक्यावर घेऊन बसण्याची गरज नाही. खाली उतरवून ठेवा की.

फकीर म्हणाला, मी फक्त माझंच तिकीट काढलंय रेल्वेचं. सामानाचं काढलेलं नाही. रेल्वेवर सामानाचं वजन टाकणं मला चुकीचं वाटतं.

हे उत्तर ऐकून डब्यातले सगळे प्रवासी हसू लागले. एकजण हसू दाबत म्हणाला, चाचाजी, अहो, तुम्ही सामान डोक्यावर घेतलं काय आणि पायाखाली ठेवलं काय किंवा रॅकवर ठेवलं काय, रेल्वेवर वजन पडणारच आहे. तुमच्या तिकिटात तेवढ्या सामानाचं पण तिकीट आहेच की. ते उगाच डोक्यावर कशाला बाळगताय?

फकीर हसून म्हणाला, अरेच्चा, हे कळतं होय तुम्हाला? मग आयुष्याच्या प्रवासात तुम्ही सगळे इतकी ओझी डोक्यावर बाळगून का फिरत असता बरं?

......................

मुल्ला नसरुद्दीनने एका शुक्रवारी संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर गप्पांची बैठक जमवली... गप्पांच्या नादात संध्याकाळची रात्र कधी झाली आणि रात्रीची मध्यरात्र कधी झाली, ते कळलंच नाही... मध्यरात्री पोटात कावळे कोकलू लागले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता कुठेही काहीही जेवायला मिळणार नाही...

...मुल्ला म्हणाला, अरे, माझ्या घरी चला... माझी बायको गरमागरम करून वाढेल सगळ्यांना.

दहा-बारा मित्रांची फौज घेऊन साहेब घरी पोहोचले. घरात अन्नाचा कण नसल्याने नजमा आणि मुलं कशीबशी पाणी पिऊन झोपली होती. त्यात मुल्लाने घरी पोहोचून १५ माणसांचा स्वयंपाक रांधायला सांगितल्यावर नजमा भडकली. म्हणाली, तुम्ही शिधा आणायला बाहेर पडलात, ते आता उगवताय. आम्ही शिळपाकं खाऊन झोपलो. आता या १५ माणसांना जेवायला कुठून घालू. इतक्या रात्री उसनं तरी कोणाकडे मागणार?

मुल्लाच्या डोक्यात प्रकाश पडला. पण खूप उशीर झाला होता. बाहेर मित्र वाट पाहात होते. त्यांच्यापुढे जायचं कसं? शेवटी मुल्लाने नजमाला सांगितलं, तू बाहेर जा आणि सांग की मी घरी आलोच नाहीये.

नजमा बिचारी काय करणार? तिने बाहेर जाऊन सांगितलं, तुम्ही सगळे आलात खरे. पण, मुल्लाजी अजून आलेले नाहीत. आल्यावर निरोप देते.

मित्रांनी गदारोळ केला. म्हणाले, भाभीजी, मुल्ला तर आमच्याबरोबरच आला. आमच्या डोळ्यांसमोर आत गेला. आता तुम्ही म्हणताय तो आलाच नाही. असं कसं? आत नीट बघा. आम्ही येऊ का शोधायला?

नजमाने रोखण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतरही मित्र आत शिरू लागले, तसा संतप्त मुल्ला बाहेर आला आणि म्हणाला, कमाल आहे यार तुमची? ती एवढ्या कळकळीने सांगतेय आणि तुम्ही विश्वास ठेवत नाही... ही काय सभ्य माणसांची वागण्याची रीत झाली का? तुम्ही सगळे खरे आणि ती खोटी का? ती म्हणतेय ना मी घरात नाहीये म्हणून. मग मी घरात नाहीये, यावर विश्वास का नाही ठेवत आहात तुम्ही?

................................

श्रद्धावानांनो, 
तुम्ही रोज माझ्या 
अश्रद्धा दुखावत असता, 
त्याचे काय?

....................................

 प्रतिक्रिया द्या1360 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर