आता करा बास, लालित्यपूर्ण इतिहास!
बुधवार, १० जानेवारी , २०१८ प्रा. सतीश वाघमारे

इतिहासात अनावश्यक आणि अतिरिक्त लालित्य घुसवले की त्यातील सत्याचा प्राण हरवतो. महाराष्ट्रात यापूर्वी अनेकांनी इतिहास लालित्यात घोळवला. आता संभाजी भिडेही हेच करत आहेत.

मराठी स्पेशल विषय म्हणून घेण्याआधी माझा इतिहास हा स्पेशल विषय होता. शिकवायला औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालायचे प्रॉडक्ट असलेले एक खंग्री सर होते. सुरुवातीला इतिहास आवडत न्हवता पण ते सर फार भारी शिकवायचे. कुतुबुदिन ऐबकाचा कान कापणे, दुकानदारी करताना मापात पाप केल्यानंतर पाप केलेल्या मापाएवढे व्यापाऱ्याच्या ढुंगनाचे मांस काढून घेणारा अल्लादिन खिलजी तर भयंकर आवडला. वडिलांना कानाखाली मारलेल्या पोराचे हात तोडायची शिक्षा तो द्यायचा हे वाचून भारी वाटले. पुन्हा त्याची लव्हस्टोरीही न्याचरल वाटली, काहीच वावगे नाही . रझिया, बल्बन, अडाणचोट गझनी सगळ्यांच्या करामती आवडू लागल्या. तेवढ्यात दिवाळीनंतर कॉलेजमध्ये कवी संमलेन झाले नी त्यात मी चार दिवसात दोनचार कविता केल्या आणि म्हणल्या तर मराठी स्पेशल असलेल्या वर्गातल्या पोरी दिवाण्या झाल्या आणि ए, घे ना रे मराठी असा लकडा मागे लागून मी त्याला फशी पडलो. एव्हाना आवडू लागलेला इतिहास मागं पडला आणि त्यांच्यासोबत स्वामी छावा पानिपत असले कायबाय वाचू लागलो.. रोमिला थापर, मा. म. देशमुख, जयसिंग पवार टू डायरेक्ट रणजीत देसाई, ना . स. इनामदार, शिवाजी सावंतवर आलो. स्वामी खिन्न हसले, स्वामी मंद हसले, स्वामी गूढ हसले, स्वामी मलूल हसले, स्वामी मुग्ध हसले, स्वामी नुसतेच हसले.. पहाटवारा झुळझुळत होता, टिप्पूर चांदणे पडले होते, शिवबांनी स्नान केले, आई तुळजाभवानीचे आणि माय जिजाऊचे दर्शन घेतले, सदरेवर आले, किनखापी सदरा, मोत्याचा रत्नहार, मोत्याची लगड असलेला मुगुट, चोळणा, तुमान, कट्यार, समशेर, जोडा वगैरे वर्णन वाचून होश उडाला. तो काळ चित्रपटासारखा लक्ख समोर दिसू लागला पण त्या काळातले ऐतिहासिक सत्य-तथ्य पुस्तक मिटल्यावर काही आठवेना. सर्व काळ महाराजांची भव्यदिव्य वर्णने सवाशे हत्ती नि दोन हजार घोडे, पहाटवारा, अफझुल्या उतला मातला, आईभवानीचा साक्षात्कार, औरंग्या पापी नि आधी लगीन कोंढाणा वगैरे वगैरे.. हेच आठवायचे. मग ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून कंटाळा आला. मी पुन्हा जयसिंग पवार, शरद कोलारकर यांच्याकडे वळलो.

तर तेव्हा एक गोष्ट लक्षात आलेली इतिहासात अनावश्यक अतिरिक्त लालित्य घुसवले की त्यातील सत्याचा प्राण हरवतो आणि त्या लालित्याने डोळ्यासमोर चित्रे उभी राहून ती ललित कथा ऐकणारी डोकी गुंग होऊन जातात. थोडक्यात, ऐतिहासिक सत्य बाजूला पडते. महाराष्ट्रात पुरंदरे , बेडेकर आणि भिडे हेच उद्योग करत आलेत. या दोनचार दिवसात भिडे बाबांची भाषणं असलेले काही व्हिडीओ ऐकले, पाहिले. निव्वळ ललित काव्यात्मक बोलतो गडी ..

उदाहरणादाखल त्याची ही वाक्ये, “छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे यांच्या रक्तगटाचा तरुण निर्माण झाल्याशिवाय या भारतभूमीचे कोट कल्याण होणार नाही, तुम्ही आम्ही कुठे राहतो? घरात राहतो, पाखरे घरट्यात राहतात, मासे पाण्यात राहतात, वाघ गुहेत राहतो, चंद्र आकाशात पण शहाजी राजे कुठे राहिले? प्रत्यक्ष मृत्यूच्या जिभेवर! शिवाजी राजे , संभाजी राजे यांच्यासारखे अजोड अतोड बिनतोड उपमा नाही असे जगले तरच तो खरा धर्म धरण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग असणार आहे. भारताच्या एकोणतीस राज्यात शिवाजीराजे संभाजीराजे यांचा इतिहास अभ्यासाला लावला तरच या राष्ट्राच्या उत्कर्षाचं, स्वातंत्र्याच्या बळकटीचं, लोकशाहीच्या टिकाऊपणाचं आणि भारतमातेच्या कोटकल्याणाचं मर्म दडलेलं आहे.” अशी चिक्कार एकामागून एक वाक्ये भिडे गळ्याच्या नसा ताणत ताणत बोलत राहतात आणि पब्लिक माना डोलवत ऐकत राहते .

मला खात्री आहे, त्या गर्दीतून कुणीतरी एकाने जर या गुरुजीस अफझल खान वधानंतर चालून आलेल्या रुस्तुम झमान व फाजलखान यांच्या घडामोडी (पाऊस पडत होता, रात्र सरत होती, मावळे खिन्न होते, शिवराय विचारमग्न होते असे काहीही वायफळ न बडबडता ) सांगा. रुस्तुम झमानच्या फौजेतील किमान चार मराठा सरदारांची नावे सांगा असे आव्हान केले तर भिडेबाबांना सांगता येणार नाही.

थोडक्यात इतिहासात लालित्य पेरणारे लोक गंभीरपणे घेऊ नयेत आणि अशा लोकांच्या नादी लागण्याआधी पोरांना शाळा कॉलेजमधल्या इतिहासाच्या मास्तर लोकांनी त्यांच्या त्यांच्या शालेय महाविद्यालयीन जीवनातच सरळसोपा वस्तुनिष्ठ इतिहास सांगत राहावा. हा एक पर्याय राहतो. मग पुढे भविष्यात अणूयुगात ढालतलवारीने आणि उघड्या अंगाच्या जोर बैठकाने जगज्जेते होता येते असे कुणी गुरुजी म्हटला तर पोरे फक्कन हसतील नि कल्टी मारतील. वास्तव शिक्षण ही काळाची गरज आहे विषय कुठलाही असू दे.

पाच वर्षापूर्वीचा माझा एक इतिहासावर जीव असलेला विद्यार्थी भगवा टिळा लावून कॉलेजमध्ये यायचा आणि लायब्रीत एका पोरीकडे बघत मंत्र उच्चार करत असायचा. पोरगी मराठी स्पेशल असलेली. याला मुळीच भाव देत न्हवती. याने अनेक दिवस ट्राय करून शरणागती पत्करली आणि माझ्यासमोर गाऱ्हाणे गायले. मी त्याला म्हटले तुला सल्ला देईन पण एक खरं सांग, तू दररोज मंत्र कुठले म्हणत असतो? तर त्याने तो मंत्र मला सांगितला तो साधारण असा होता, मुलीचे नाव घ्यायचे तिच्याकडे पहायचे व (.........) मम वश्य कुरुकुरु स्वाहा असे रोज हजार वेळा म्हणायचे असा एक मंत्र आणि अजून असाच दुसरा अवघड मंत्र त्याने सांगितला. मग मी त्याला विचारले, याचा परिणाम का होत नाही? तो म्हटला तेच कळेना सर. मग त्याला मी सल्ला दिला ती पोरगी नास्तिक असेल त्यामुळे अडचण होत असेल. तर आता एवढा पॉवरफुल मंत्र तुझ्याकडे आहे तर हिच्या कशाला मागं लागतो.. सोनाली कुलकर्णी नाहीतर सई ताम्हणकरवर ट्राय मार ना? त्या आस्तिक आहेत. त्यांच्या घरात गणपती बसलेला टीव्हीवर पाहतो की नाही आपण ? मग त्याला हे पटले. शिवाय त्याला हेही सांगितले का या पोरीचा बाप तर साधी गिरणी चालवतो.. लग्नानंतर काय मानपान होणार तुझा? सोनाली सईवर प्रयोग सक्सेसफुल झाला तर आयता फ्लॅट बंगला गाडी मिळेल, भरपूर मानसन्मान, बातच वेगळी. कसं म्हणतो ? तर त्याला ते पटलं आणि त्याने मोबाईलमध्ये वॉलपेपर म्हणून तिचा फोटो ठेऊन त्यावर मंत्र पॉवर वापरायला सुरुवात केली. त्याच्या योगायोगाने सोनाली कुलकर्णी कशाला तरी कुठल्या तरी मॉलमध्ये आलेली आणि हे गाबडं तिथे होत. त्याला वाटले मंत्राची पॉवर पंधरा दिवसात दिसली, रिजल्ट जवळ आला, खुश होऊन तो तिच्याजवळ जाऊ लागला तर दोन ढोल्या माणसांनी याला गुरासारखा बडवला.

पार दुःखी कष्टी होऊन माझ्याजवळ खंत व्यक्त करून मंत्र नि मांत्रिक दोघांची आयमाय काढून गेला. भिडे भाऊ रोम्यांटिक भाषणबाजीत, मुलाखत देत असताना टाकत असलेल्या बोलबच्चनमध्ये अध्येमध्ये अभंग नि मंत्र म्हणत होते त्यावरून हा किस्सा आठवला .

एकूण जगण्यातच वास्तव आणि लालित्याचा मिलाफ किती असावा हे कळायला पाहिजे आणि इतिहास तर अजिबातच लालित्यात घोळवून खेळ खेळायची गोष्ट नाही .

 

 प्रतिक्रिया द्या3099 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर