जिगरबाज रचना, चमचेचोर पत्रकार इत्यादी..
बुधवार, १० जानेवारी , २०१८ टीम बिगुल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत लंडन दौऱ्यावर गेलेल्या पत्रकारांवर एका उंची हॉटेलातील चांदीचे चमचे चोरल्याचा आरोप ठेवून दंड वसूल करण्यात आला.

चंदीगडहून प्रकाशित होणा-या ‘द ट्रिब्यून’ या इंग्रजी वृत्तपत्राने ‘आधार’ संदर्भातील वृत्त दिले होते. ट्रिब्यूनच्या पत्रकार रचना खेरा यांनी काही एजंट्सशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी अवघ्या पाचशे रुपयांमध्ये रचना यांना एक सॉफ्टवेअर आणि लॉग इन आयडी, पासवर्ड दिला. या सॉफ्टवेअरवर लॉग इन केल्यावर कोणताही आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित व्यक्तिची माहिती मिळवणे शक्य झाले. आणखी तीनशे रुपये दिल्यावर संबंधित एजंट्सने रचना खेरा यांना आधार कार्ड प्रिंट करणारे सॉफ्टवेअरही उपलब्ध करुन दिले होते. देशभरातल्या लोकांनी 'आधार'साठी आपली वैयक्तिक माहिती सरकारकडे दिली आहे. आता देशातल्या कोणत्याही नागरिकाची वैयक्तिक माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी फक्त 500 रुपये आणि 10 मिनिटं खर्च करावी लागतात,अशा आशयाची बातमी त्यांनी दिली. या बातमीमुळे  आधार कार्डशी जोडलेली माहिती सुरक्षित नसल्याचे वास्तव समोर आले. त्यावर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) रचना खेरा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यावरून देशभरातून यूआयडीएआयवर टीकेची झोड उठली असून केंद्रसरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करीत असल्याची टीका होत आहे. एडिर्स गिल्ड, इंडियन न्यूजपेपर सोसायटी, प्रेस क्लब आदी संस्थांनी या घटनेचा निषेध केला असून रचना खेरा यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. रचना खेरा यानी मात्र हा एफआयआर म्हणजे आपली कमाई असल्याच प्रतिक्रिया व्यक्त केली.

चमचेचोर पत्रकार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत लंडन दौऱ्यावर गेलेल्या पत्रकारांवर एका उंची हॉटेलातील चांदीचे चमचे चोरल्याचा आळ घेण्यात आला आहे. त्यांची ही चोरी सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्यामुळे दौ-यावर गेलेल्या भारतीय पथकावर नामुष्कीची पाळी आली. चोरी पकडलेल्यांमध्ये एक नामांकित बंगाली वृत्तपत्राचा ज्येष्ठ पत्रकार आणि दुसरा एका वृत्तपत्राचा संपादक आहे. हॉटेलच्या कर्मचा-यांनी त्यांना चोरी करताना पाहिले परंतु ते चोरी मान्य करीत नव्हते, परंतु चोरी सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ही बाब सार्वजनिक करण्याची धमकी दिल्यानंतर संबंधितांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्याबद्दल त्यांना पन्नास पौंडाचा दंड भरावा लागला. हे दोन्ही पत्रकार ममता बॅनर्जी यांच्यासोबत सतत विदेश दौ-यावर जातात आणि हॉटेलमधील सामान चोरण्याची त्यांची सवयच असल्याचे बंगाली पत्रकारसृष्टीतील काही लोकांचे म्हणणे आहे.

बीबीसीच्या संपादकाचा राजीनामा

बीबीसीमधील असमान वेतनाच्या मुद्द्यावरून बीबीसी चीनच्या संपादक कैरी ग्रेसी यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. बीबीसीमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिले जात, असल्याच्या निषेधार्थ त्यांनी हा राजीनामा दिला आहे. वैशिष्ट्य म्हणजे बीबीसीच्या हिंदी, मराठीसह अनेक सेवांनी ही बातमी प्राधान्याने प्रसिद्ध केली आहे. सुमारे तीस वर्षे बीबीसीसोबत काम करणाऱ्या ग्रेसी यांनी बीबीसीवर 'गुप्त आणि अवैध वेतन संस्कृती'चा आरोप केला आहे. दीड लाख पौंडापेक्षा अधिक पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन तृतीयांश कर्मचारी पुरुष असल्याचे समोर आल्यानंतर बीबीसीच्या विश्वासार्हतेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपण संपादकपदाचा राजीनामा दिला असलात री टीव्ही न्यूजरूममध्ये आपल्या त्यांच्या जुन्या जबाबदारीवर पुन्हा काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान संस्थेत महिलांबाबत कोणताही भेदभाव केला जात नसल्याचे स्पष्टीकरण बीबीसीने दिले आहे. सात जुलै २०१७रोजी बीबीसीला दरवर्षी दीड लाख पौंडापेक्षा अधिक पगार घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन सार्वजनिक करावे लागले होते, त्यातून समोर आलेल्या माहितीनंतर ग्रेसी यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला.

मराठी जगतामध्ये …

आयबीएन लोकमतचे नाव बदलून 'न्यूज १८ लोकमत' बनलेल्या वृत्तवाहिनीमध्ये संपादकपदी डॉ. उदय निरगुडकर रुजू झाले असून एक जानेवारी २०१८ पासून त्यांनी बेधडक या कार्यक्रमाची सूत्रे घेतली आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत घेतली. मुलाखत उत्तम झाली. मुलाखत संपल्यानंतर मुलाखतीतल्या मुद्द्यांचे विश्लेषण करणारे सुमारे चार मिनिटांचे सलग भाषण त्यांनी केले. निरगुडकर यांनी घेतलेली शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या मुलाखतीचीही सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा झाली.

ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या संपादकत्वाखाली सुरू झालेले 'झी मराठी दिशा' हे साप्ताहिक हळुहळू आकार घेत असून संपूर्ण कुटुंबासाठी वाचनीय अशा जुन्या स्वरुपाचे हे साप्ताहिक वाटते. झी टीव्हीवरून प्रसारित होणा-या मालिका पाहणारा वर्ग नरजेसमोर ठेवून या साप्ताहिकाची रचना करण्यात आली असल्याचे जाणवते. त्यामुळे वाचनीयता आणि वैविध्य ही वैशिष्ट्ये असली तरी नाविन्याचा अभाव जाणवतो.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पीपल्स मीडियाला प्रमोट करणारे फाउंडेशन स्थापन करण्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. त्यामार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येणार असून लोकसहभागातून सुरू होणारे वेब पोर्टल हा मुख्य भाग असेल, असे वागळे यांनी जाहीर केले आहे.प्रतिक्रिया द्या2534 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Narendra - बुधवार, १० जानेवारी , २०१८
ममताच्या राज्यातल्या पत्रकारांकडून वेगळी काय अपेक्षा करणार ?

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर