नाशिकची मिसळ: एक आध्यात्मिक अनुभव
बुधवार, १० जानेवारी , २०१८ राहुल बनसोडे

नाशकातली मिसळ खाताना गप्पा मारणे काय साधे बोलणेही शक्य नाही, अशी ब्रह्मानंदी टाळी पाहुण्याची लागते. चवीपलीकडे काहीच आठवत नाही असा अाध्यात्मिक अनुभव ही मिसळ देते.

खूप लोक आहेत आणिक खूप मिसळीची दुकाने आहेत. शंभरेक तरी असतील. वाईन कॅपिटल हे मिसळ कॅपिटलही आहे. मग मुंबईतले लोक येतात, मग नागपुरातुन लोक येतात, मग दिल्ली सिंगापोरहून लोक येतात. "अरे, तुमच्या नाशकाची अमुक एक मिसळ फार प्रसिद्ध आहे म्हणे". आपण राहतो सिडकोत मिसळ नेमकी नाशिकरोडची, आपण राहावे म्हसरुळात मिसळ नेमकी कँपातली, आपण असतो देवळालीत आणि मिसळ नेमकी पंचवटीतली. त्यात हे पडले पाहुणे आणी नाशकाला असानतसा मान देतायेत म्हणून "आपण उद्या जाऊ नक्की" म्हणावे.

उद्या उजाडतो किंवा मग उजाडतही नाही तोवर मित्राचा फोन. हे असे पाहुणे आले म्हणजे अलार्म लावायची गरज नाही. मग आपण मित्राला पिकअप करायची ऑफर द्यावी जेणेकरून निदान अजून थोडे झोपता येईल आणि काहीतरी कंट्रोल राहील पण मित्र रिक्षावाल्यांच्या मदतीने ऑलरेडी मिसळच्या दुकानावर किंवा मग पायीपायीच मार्गावर. आपण दात घासावे, आंघोळ करावी किंवा करू नये तोवर दुसरा कॉल. आपण यजमान असून आपणच कसे अगोदर पोहचायला पाह्यजे होते याबद्दल गिल्ट देणारा कॉल. मग आपण जावे. अतिप्रसिद्ध दुकान असल्यास तिथे नवश्रीमंतांची गर्दी, कधीकाळी इथे बिचारे हमाल मापाडी येऊन मिसळ खायचे, तिथे आता अर्धपारदर्शी, अर्धावरणीत लोक. मग नंबरची वाट पहावी तो तसा तासभर येत नाही.

मिसळच्या गल्ल्यावर बसणार्‍यापासून तर रस्सा ओतणार्‍यांला चौघा मित्रांत नाशिककर कुठला असेल आणि बाहेरचे कोण असतील हे लगेच समजते. नाशकातले लोक त्रस्त झाल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव त्रासाचे न वाटता गरिबीचे वाटतात, इतके की त्या काळात कधी लेनीन इथे मित्राला म्हणून भेटायला आला असता आणि अशा 'मुकेश गरुड' झालेल्या माणसासोबत मिसळ खायला गेला असता तर त्याने क्रांतीची सुरुवात नाशकातनच केली असती. नाशकातला माणूस पैशाने श्रीमंत झाला तरी भावनिकदृष्ट्या गरीबच रहातो.

मग यथावकाश नंबर येतो, तो लवकर पटकवावा, 'बसा बसा' असा आग्रह करायला जाल तर तोवर दुसरेच कुणीतरी त्या टेबलवर जाऊन बसेल. या बसण्याच्या प्रक्रियेत पंचवटी एक्स्प्रेसने कधीही उभ्याने प्रवास न करणारे लोकच जिंकत असावेत असा माझा अंदाज आहे. हा दावा कदाचित खराही नसेल पण आकाराने जगातली सर्वात लहान जेवणाची टेबलं नाशकाच्या मिसळींच्या दुकानातच मिळतात हे नक्की.

बसायला तीनेक सेकंद जातात. मग मिसळ येते, मग पाव येतात, मग नमनाचा सुरुवातीचा पवित्र रस्सा येतो, इतका पवित्र की याची वर्गवारी सत्यनारायणाच्या शिर्‍यासोबत करायला हवी. मित्राने नेहमीप्रमाणे खात खात गप्पा मारण्याचे इमॅजिन केलेले असते पण तो मिसळचे पहिले दोनेक घास खातो आणि अध्यात्मिक टाळी लागल्याने आपल्याच रसनेच्या स्नायूपाशात बुडून जातो. नाशकात मिसळ खाताना चर्चा तर सोडा पण बोलणेही शक्य होत नाही. पुराणकाळात एखाद्याची कामक्रीडा चालू असतांना दुसर्‍याकोणी त्यात व्यत्यय आणल्यास शाप देण्याची पद्धत होती, नाशकात हे मिसळीच्या बाबतीत सत्य आहे. कित्येकदा बोलणे तर दूर पण खाणार्‍यांच्या डोक्यातले भाषेचे केंद्रही बंद झालेले असते. 'शब्दांच्या पलिकडे' असा 'जे कृष्णमुर्तींचा' जो काही अध्यात्मिक सिद्धांत आहे तो नाशकात विना काही वाचता नुस्ता मिसळ खाऊनच अनुभवता येतो. या भाषेच्या समस्येमुळे रस्सा ओतणारा माणूस अलर्ट नसला तर अनेक लोक झॉम्बी झाल्यागत कोरडा पाव मटकीला टोचून खात रहातात, अशा मेस्मराईज झालेल्या प्राण्याकडे करुणेने पहात रस्सा ओतणारा माणूस लगबगीने येतो आणि न विचारता रस्सा देऊन जातो.

दुसर्‍या वेळी येणारा रस्सा हा मूळ रश्श्याच्या कधी तीन टक्के कमी चांगला असतो तर कधी पाच टक्के. खाणार्‍याला अल्पसे दु:ख होते मग आणखी दोन पाव हाणल्यानंतर आपण आयुष्यभर इथेच बसून मिसळ खाऊ शकत नाही याची जाणीव त्याला होते आणि मग तो आणखीनच दु:खी होतो. दरम्यान आपण आपले मुदलातले दोन आणि एक्स्ट्राचा एक अर्धा पाव संपविलेला असतो, समोर स्वर्गसुखामुळे बथ्थड आणि बावळट झालेला तो जीव न्याहळत न्याहळत आपण वेळ मोजित असतो. मग एकदाचा हा धार्मिक कार्यक्रम आटोपतो आणि आपण हॉटेलच्या बाहेर कसे पडता येईल याचा विचार करतो. मिसळ खाऊन समोरचा माणूस इतका इन्टॉक्सिकेटेड म्हणजेच चिंग झालेला असतो की तो बिल स्वतःच देऊ करतो. तसे तो करीत असल्यास त्याला अवश्य करू द्यावे. कारण मिसळीच्या चवीशिवाय इथे काय काय घडले ते त्याच्या लक्षातही राहणार नसते.

आतापर्यंत दुपारचे बारा वाजून गेलेले असतात. अट्टल सिगरेट पिणाराही नाशकातली मिसळ खाल्यानंतर सिगरेट पिऊन वा अन्य कोणत्याही कारणाने तोंडाचा स्वाद जाऊ द्यायला तयार नसतो. त्याचा मेंदू अजुनही पुरेसा न सावरल्याने माणसाने माणसाशी करायच्या गप्पा शक्य नसतात. मग आपण त्याला रिक्षामध्ये बसवून देतो किंवा मुकाट त्याच्या हॉटेलरूमवर वा नातेवाईकांच्या घरी पोहचवून देतो.

एव्हाना अर्ध्या रवीवारचे भजे झालेले असते. मग प्रवास सुरू होतो. नाशिकरोडहून सिडकोचा, इंदिरानगरहून एकलहर्‍याचा, गंगापूररोडवरून देवळाली कँपचा, मनातल्या मनात नाशकाच्या समस्त मिसळींच्या दुकानांना शिव्या देत.प्रतिक्रिया द्या1674 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Rajkmar D. More - बुधवार, १० जानेवारी , २०१८
बेफाट ! तो मिसळीची चव सांगतोय कि चव काढतोय हेच काळात नाही ! इतक त्याच लिहीण बेमालूम असत !

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर