ज्ञातिसंमेलनातला एक (नव्हे अर्धा!) दिवस
बुधवार, १० जानेवारी , २०१८ संजीव पटवर्धन

जातपातविरहित समाजाच्या गप्पा कितीही मारल्या तरीही जात्याधारित संमेलने घेण्यात सर्व जाती पुढे आहेत. अशाच एका संमेलनात काढलेला अर्धा दिवस आणि त्यांतून पडलेल्या प्रश्नांविषयी.

जातीय ओळखींवरून महाराष्ट्रातील वातावरण अधिकाधिक ताप(व?)त चालले असलेल्या आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर, नुकताच मला एका ब्राह्मण ज्ञातिसंमेलनात जाण्याचा, यापूर्वी अपरिचित असलेला असा योग आला. अपरिचित अशासाठी की मी अशा जात्याधारित संघटना व मेळाव्यांपासून स्वतःला कटाक्षाने दूर ठेविलेले आहे. महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असल्यामुळे संबंधही विशेष येत नाही. यावेळी या तत्त्वाला तात्पुरती मुरड घालण्याचे कारण म्हणजे सदर संमेलनात माझ्या आईचा कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार व्हायचा होता.

दुसरे म्हणजे ब्राह्मणेतर नजरेचा अंगीकार करून अशा ब्राह्मण जातिविशिष्ट सामुदायिक सोहळ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा होती. सरकारदरबारी माझी नोंद ब्राह्मण अशी असली तरी माझी वैयक्तिक मते व जीवन या ओळखीला छेद देणारे आहे (असावे!). याशिवाय, मी ज्या क्षेत्रात काम करतो, तेथे जातीय नेमनियमांचे पालन करणे निव्वळ अशक्यच नव्हे तर अतिशय धोकादायक आहे आणि तेथे सर्वांना याची पूर्ण जाणीव असते. एखाद्या प्रांताच्या सीमा ओलांडल्यावर त्या प्रांतातील जातीय ओळखींचा अर्थ व शक्ती दोन्ही कमकुवत होतात असेही मी पाहिले आहे. परंतु तरीही जात्याधारित संघटना व मनोभूमिकांचे अस्तित्व आणि प्राबल्य हे एक अखिल भारतीय विदारक सत्य आहे.

सदर संमेलन हे जिल्हास्तरीय होते. ते महाराष्ट्रातील एका अगदी छोट्या शहरात झाले. ब्राह्मण ज्ञातीची महाराष्ट्रातील संख्या ही चार टक्क्यांहून कमी आहे असे समजतो. (जाणकारांनी दुरुस्ती करावी). सदरहू जिल्ह्यातील संख्याप्रमाणही असेच काहीसे असावे. आयोजकांच्या अंदाजानुसार पाच हजार उपस्थिती अपेक्षित होती. पण प्रत्यक्षात सुमारे अडीच हजारच आले. (मला तो समुदायही विशालच वाटला).

पूर्वकल्पना काहीच नसल्यामुळे, साधारणतः बंदिस्त सभागृहात एखादा छोटेखानी कार्यक्रम होणार आहे अशी माझी धारणा झाली होती. पण प्रत्यक्षातला थाट पाहून स्तिमित झालो. शहरात जागोजागी लावलेले स्वागतपर फलक व कमानी, सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा लहरणारे ध्वज व पताका, बिल्लाधारी कार्यकर्त्यांची गर्दी, भव्य सभामंडप, पुष्परचना, ध्वनिघोषयंत्रणा, भोजनव्यवस्था, पारंपारिक वेषभूषा परिधान करून नटलेले ज्ञातिगण, रांगोळ्या, प्रायोजकांच्या जाहिराती, प्रांगणाच्या केंद्रस्थानी फडकणारा भगवा ध्वज वगैरे मला तरी अनपेक्षित होते.

सदर समारोहास शासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांच्या आवश्यक त्या परवानग्या लाभलेल्या होत्या असे दिसून येत होते. बेकायदा असे काहीच नव्हते. उदा. महापालिकेची रुग्णवाहिका, कचरावेचक यंत्रणा वगैरे उपलब्ध होती. प्रत्यक्ष पोलीस मात्र सभास्थळी अजिबात नव्हते. कदाचित सदर ज्ञातीकडून सामूहिक हिंसाचार होण्याची फारशी शक्यता त्यांना दिसली नसेल!

संमेलन एकूण दोन दिवसांचे होते. पैकी पहिल्या दिवशी आम्ही गैरहजर होतो, तेव्हा दिंडी ('ब्रह्मदर्शन यात्रा!), नाट्यसंगीत गायन वगैरे सांस्कृतिक उपक्रम झाले होते. (कार्यक्रम पत्रिका समोर ठेवून वाचत आहे). 'परस्परपरिचय व सुसंवाद' यासाठी विशेष वेळ राखून ठेविलेला होता हे मला कौतुकास्पद वाटले (हा सुसंवाद ज्ञातिविशिष्ट चौकटीतच होणार होता हा भाग बाजूला ठेवू). एका उद्योजकांचे मार्गदर्शनपर व्याख्यानही होते.

सत्कार समारंभ हा दुसऱ्या दिवशी सकाळी झाला. त्याआधी मुलांची श्लोकपठण स्पर्धा घेतली गेली. आईबरोबर इतर काही ज्ञातिजनांचाही सत्कार होता. या समारंभाचे प्रमुख पाहुणे हे आपल्या रसाळ वाणीमुळे सध्या दूरचित्रवाणीवर बरेच लोकप्रिय असलेले एक मराठी ब्राह्मण धर्मोपदेशक होते. तसेच महाराष्ट्रानजिकच्या राज्यातील एक विद्यमान मंत्री उपस्थित होते. श्रोतेवर्गात स्त्रिया व पुरुष जवळजवळ समप्रमाणात होते. मात्र व्यासपीठावर लगबग करीत असलेल्या कार्यकारिणीत कुणीच स्त्रिया दिसत नव्हत्या. सूत्रसंचालनही पुरुष कार्यकर्त्यांच्या हातीच होते. व्यासपीठावर खड्ग व कटिवस्त्रधारी परशुरामाची उभी मूर्ती स्थापिलेली होती.

सामूहिक नांदी व शिवस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञातीचे मुखपत्र मानले जाणाऱ्या (न मानणारेही अनेकजण आहेत!) जिल्ह्यातील एका पाक्षिकाच्या संपादकांनी (हे वैद्यकीय पदवीधारक असून व्यवसायही करतात) भाषण केले. ते कोणत्याही संपादकाला साजेसे असेच होते. पुरेसे साहित्य मिळत नाही, अंक पोचत नसल्याच्या तक्रारी येतात, आर्थिक घडी बसलेली नाही, अंकाची पाने वाढवावयाची आहेत, वाचकांचे सहकार्य आवश्यक आहे इ. इ. ('बिगुल'कारांच्या नेत्रात हा मजकूर वाचताना अश्रू आलेले असणार). सदर पाक्षिकाची वैचारिक भूमिका मला परिचित (पण अमान्य) असल्यामुळे मजवर या विलापाचा विशेष परिणाम झाला नाही पण संपादकांनी आज आपली नेहमीची साधी शर्ट-पाटलोण बदलून विष्णूशास्त्रांसारखे (पेशव्यांसारखे म्हटले तरी चालेल!) जरीकाठी धोतर, भगवा अंगरखा, लालभडक पगडी व उत्तरीय परिधान केले असल्यामुळे दृश्य नेत्रसुखद होते. किंबहुना कार्यवाह, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे हेही धोतर-जाकीट अशा वेषात होते.

तदनंतर ज्ञातीच्या आर्थिक उत्थानाकरिता चालविल्या जाणाऱ्या पतपेढीच्या संचालकांनी (यांचा मात्र सफारी सूट होता!) गतकालाचे विहंगावलोकन करीत सरत्या सालाचा संक्षिप्त ताळेबंद मांडला. 'इतर समाजांच्या पतपेढ्यांसारखे आपण धनाढ्य नाही. प्रामाणिकपणा व सचोटी हीच आपल्या ज्ञातीची ओळख आहे. तेव्हा कर्जमाफीची अपेक्षा ठेवू नये. ऋण बुडवण्याचा प्रयत्न कुणी केल्यास संस्था पोलीस कारवाई करण्यास कचरणार नाही' असा सज्जड इशारा (प्रमुख पाहुण्यांसमोरच!) अवघ्या ब्रह्मवृंदांस देऊन त्यांनी विराम घेतला.

त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला. आईने पूर्वी कलाप्रस्तुतीचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम केलेले असले, तरी गर्दीसमोर भाषण देण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे व्यासपीठकंपकारणे (stage fright) तिचा कंठ भरून आला व तिने चार ओळींचे स्वीकारभाषण दोन ओळीतच आटोपते घेतले. इतरांचेही सत्कार झाले. अखेर जिल्ह्यातील एका ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्वाला मानपत्र देऊन गौरविले गेले. त्यांनी मात्र विस्तृत भाषण केले.

अखेर प्रमुख पाहुणे धर्मोपदेशक यांनी ध्वनिसंचाचा ताबा घेत भाषणास सुरुवात केली. त्यांचे वक्तृत्वकौशल्य विख्यात असल्यामुळे श्रोतेही उत्सुक दिसत होते. प्रपांचे भाषण ऐकताना मी विचारात पडलो. कारण भाषणात हिंदुत्व, ब्राह्मणत्व आणि महाराष्ट्रीयत्व या संज्ञाचा समानार्थी आंतरबदल वारंवार होताना आढळून येत होता. विशेष म्हणजे श्रोतृवर्गास त्यात काही वाटत नव्हते. आबालवृद्ध प्रपांचे शब्द मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते आणि वेळोवेळी टाळ्यांचा कडकडाट करीत होते. त्यांचे काही मुद्दे असे होते (क्रमवार नाहीत. जसे मला आठवतात तसे.): 'ब्राह्मण समाजाने राष्ट्रासाठी अपार त्याग केलेला आहे. हा एकच समाज हिंदुत्वाचा खरा अर्थ समजतो. आपण आपल्या परंपरा सांभाळल्या पाहिजेत. मराठी शब्द असताना इंग्रजी वापरू नयेत (तैलरथ, चक्रधर, संचारध्वनी वगैरे सोदाहरण स्पष्टीकरण), मुलांना साधे अथर्वशीर्षही येत नाही, हे चांगले नाही. हिंदूधर्म लवकरच जगभर पसरणार आहे. एकेकाळी तो तसा पसरलेलाच होता. ब्राह्मणही शस्त्र उचलतो पण ते देशासाठी, स्वार्थासाठी कधीच नाही. रामप्रसाद बिस्मिल हसत हसत फासावर गेले आणि त्यांच्या मातेने त्यांना अभिमानाने निरोप दिला. हजारो वर्षांच्या गैरहिंदूंच्या गुलामगिरीतूनही हिंदूधर्म तगला तो केवळ ब्राह्मणांमुळेच. अंदमानच्या कारागृहात लावलेली कैद्यांची यादी वाचा, जवळजवळ सगळे ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांवर अपार अन्याय झाला पण त्यांनी नेहमीच कष्टाने मार्ग काढला, रडत बसले नाहीत. अण्णासाहेब कर्वे चारशे मैल चालून परीक्षा देण्यास गेले. मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवा' इ.इ.

विशेष लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे कोणत्याही वक्त्याने हिंदू समाजातील इतर जातिसमूहांचे नाव कुठेही घेतले नाही. व्यासपीठावर लावलेल्या आयोजक संस्थेच्या बोधचिन्हातही 'सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे' अशा अर्थाचे शब्द होते. पण बिगरहिंदू समाजांचा मात्र वक्त्यांनी अनेकदा नावानिशी व टीकात्मक उल्लेख केला.

प्रपांनंतर एका महाविद्यालयाचे प्राचार्य ('व्यवसाय मार्गदर्शन') व उपरोल्लेखित मंत्रीमहोदय यांची भाषणेही झाली. पण त्याला आम्ही थांबलो नाही.

संमेलन पाहून-ऐकून झाल्यावर शिल्लक राहिलेले प्रश्न हे असे:

१. इतर समाजांच्या संमेलनांतही असे वैचारिक अंतर्विरोध असतात काय? त्यांचा समन्वय कसा करतात? की अशा प्रोत्साहक समुदायात त्याची गरज पडत नाही?
२. जातीत जन्म घेण्यामागे माझी कामगिरी काहीच नसताना मी माझ्या जातीचा अभिमान व इतर जातींचा तिरस्कार नक्की काय म्हणून बाळगावा? हे म्हणजे मला पिंगट केस आहेत म्हणून मी कृष्णकुंतलधारी किंवा टक्कलधारी व्यक्तीशी वैर धरण्यासारखेच नाही काय?
३. असे जात्याधारित सार्वजनिक सोहळे नक्की कोणत्या धर्मनिरपेक्षतेत बसतात?प्रतिक्रिया द्या6617 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
अनिल फराकटे - बुधवार, १० जानेवारी , २०१८
खरेच सडेतोड. वैचारिक भूमिका अशीच स्पष्ट राहो, ही अपेक्षा.
परशुराम - बुधवार, १० जानेवारी , २०१८
जातीवर आधारित शैक्षणिक/नोकरीतील आरक्षण ज्या धर्मनिरपेक्षतेत बसते, त्याच धर्मनिरपेक्षतेत जात्याधारित सार्वजनिक सोहळे बसतात हो पटवर्धन साहेब........ आणि हो, त्या आरक्षणाविरूद्ध मात्र तुम्ही बोलू नका हो...नाहीतर तुमची जात काढली जाईल... अर्थात तुम्ही ती मानत नसाल तरीही.......

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर