ठग
बुधवार, १० जानेवारी , २०१८ सुगंधा चितळे-पांडे

लोकांना लुबाडून उपजीविका करणारे अनेक ठग दोन्ही काकांच्या आजूबाजूला होते. कारण,  या ठगांचे असणे ही काकांच्या वर्तुळाची गरज होती. या ठगांहून मोठे ठग दोघे काका होते.

आमच्या कर्मठ काकांच्या आधाराने अनेक ठग सुरक्षित राहत होते.काकांची समाजातील पत आणि त्यांच्या दोन नंबरच्या पैशांच्या दबावाखाली चालणारी राजकीय सिस्टीम याने या ठगांना उत्तेजनच मिळत असे. यात अग्रणी होते मोठ्या काकांचे स्वतःचेच सासरे म्हणजे काकूचे वडील. यांना आम्ही ‘अर्धा वकील’ या नावाने हाक मारत असू. कोणत्याही विषयावरचे अर्धवट ज्ञान अधिकारवाणीने दामटण्यात यांचा हात धरणारा अवघ्या पंचक्रोशीत कोणीही नव्हता. ही त्यांची खासियतच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. पत्रिका पाहणे, लग्नासाठी स्थळे सुचवणे इथपासून शांत करून देणे, सत्यनारायण, साडेसाती सोडवणे, राहू-केतू निवारण, जप सांगणे, शनिवार-सोमवार उपासतापास सांगून किंवा काहीही सांगून लोकांकडून पैसे उकळणे हे ह्यांचे धंदे होते. एकदा तर एकाला याने सांगितले होते की तुझ्यासाठी चांगली मुलगी पाहून ठेवलीये, तू आधीच्या बायकोबरोबर काडीमोड कर. असे याचे धंदे.

बरं आपण लोकांना दिलेले बोलबच्चन कुठलीही जबाबदारी न घेता विसरून जाणे त्यांना उत्तम जमत असे. वेळ आली की असे फसवले गेलेले लोक यांच्या मागावर नातेवाईकांच्या घरापर्यंत पोहचत असत. सगळे नातेवाईक या ठग म्हाताऱ्याच्या करण्यांना वैतागलेले होते. विशेषतः आमचे काका. कारण म्हातारा सगळीकडे यांचे नाव ऐकवून शेखी मिरवत असे. म्हणजे याला धंदा निर्विघ्नपणे मिळत असे आणि कोणी यांच्या हेतूबद्दल शंका घेत नसे.

म्हाताऱ्याचे इतर जावई तर याला उभाही करत नसत.

एकदा या ठग म्हाताऱ्याने एका गावातील लोकांकडून मूल होत नाही तर जप करतो आणि अंगारा पाठवतो सांगून भरपूर पैसे म्हणजे जवळपास १५,००० रुपये घेऊन पोबारा केला. दोन महिने लोकांनी कळ काढली पण अंगारा काही घरपोच मिळाला नाही आणि जपाचा इफेक्टसुद्धा जाणवला नाही. म्हणजे म्हाताऱ्याने आपल्याला फसवले असे समजून लोकं आमच्या काकांच्या साडूंकडे म्हणजे म्हाताऱ्याच्या दुसऱ्या जावयाकडे गेले आणि तक्रार करू लागले. त्यांनी काळजीने लोकांना विचारले- “कधी आलेले म्हणताय तुमच्या गावात?” लोक म्हटले दोन महिन्यापूर्वी. त्यावर त्यांच्या जावयाने सांगून टाकले-“अशक्य. तीन महिन्यापूर्वीच आमचे सासरे गेले. तुमच्याकडे आलेले कोण ते पाहा म्हणजे झाले!!!” शिवाय जपावर पैसे खर्च करण्याऐवजी मूल होण्यासाठी स्वतः काही प्रयत्न कर असे म्हणून त्यांनी त्या पोराची इज्जतही काढली. तक्रारीला आलेली माणसे अक्षरशः थिजली आणि काही न बोलता निघून गेली. जपासाठी पैसे गुंतवणारी माणसे म्हाताऱ्याच्या अकाली मरणाने हबकून गेली. कारण नाही त्या गोष्टींवर स्वतःहून आंधळा विश्वास ठेवायची चटक त्यांना होती. तो किस्सा आम्हाला हसायला पुढचे कित्येक दिवस पुरला पण त्याने म्हाताऱ्याचा मार वाचला हे मात्र नक्की.

एकदा काकांना लोकं सांगत आले की दीड लाखवेळा जप करतो म्हणून सासरेबुवा पैसे घेऊन गायब झालेत. जप झाला नाही झाला माहीत नाही. आता तुम्ही ते पैसे आम्हाला परत द्या. काकांनी तोंडाचा पट्टा सोडला की मला विचारून पैसे दिलेत का? आमचा संबंधच काय? जास्त आवाज केलात तर तुम्हालाच पोलिसात देतो वगैरे म्हणून काकांनी त्या माणसांनाच घाबरवून सोडलं पण ते गपगुमान निघून गेले नाहीत. ते काकांच्या दुसऱ्या साडूंकडे गेले आणि पैशाची मागणी करू लागले. तसे त्याचा मुलगा म्हणजे माझा दादा घेणेकऱ्यांना म्हटला की म्हतारबुवांचे एक धोतर आहे आमच्याकडे ते देऊ का? ते घेऊन जा वसुली म्हणून. तेवढेच त्यांचे धोतर फेडल्याचे तुम्हाला समाधान. ती माणसे घरातल्यांच्या या निर्लज्जपणाने हाय खाऊन तिथून निघून गेली आणि म्हाताऱ्याचे मरण टळले.

मात्र म्हतारबुवांना चान्सच मिळाला. ते अजून अजून ठगगिरी करायला लागले. एकदा तर अंगारा देतो आणि खडे आणून देतो म्हणून त्यांनी आमच्याच वाडीतल्या माणसांकडून चांगलीच मोठी रक्कम घेतली. अर्थात यातले काहीच त्यांनी केले नाही. त्यानंतर ते कधीही यायचे झाले तरी आमच्याकडे लपत छपत येत असत. मी लक्ष ठेवून होते. एके दिवशी ते आले तसे त्याची टीप मी मोलकरणीच्या हाती वाडीतल्या त्यांच्या घेणेकऱ्यांपर्यंत पोहचवली. ते पाच-सहा जण कोयते आणि काठ्या घेऊन आमच्या दारात हजर झाले. म्हातारा आहे का विचारले. काकांनी नेहमीच्या सवयीने नाही म्हणून सांगितले आणि दार लावून घेणार इतक्यात पान थुंकण्यासाठी म्हणून म्हातारा बाहेर आला आणि आयताच कोयतेवाल्यांच्या तावडीत सापडला. त्याने पैसे द्यावेत किंवा आत्ता इथे बसून दीड लाख वेळा जप करून अंगारा आम्हाला द्यावा असा आग्रह त्यांनी धरला. परिस्थिती गंभीर झाली तेव्हा लहान काका मध्ये पडले आणि स्वतः पैसे देऊन म्हाताऱ्याची सोडवणूक केली. नंतरचे काही दिवस म्हातारा विचारत फिरत होता की मी आल्याचे वाडीतल्या इतर लोकांना कसे कळले म्हणून. ते ऐकून मी मनातल्या मनात हसत राहिले.

दोन्ही काकांचे एकमत झाले होते की सासऱ्यांचे त्यांच्याकडे येणे कायमचे बंद करायला हवे होते पण मोठ्या काकूने आडकाठी केली. स्वतःच्या वडिलांच्या निष्पापपणावर तिची नितांत श्रद्धा होती. तिला दुखावता येत नसल्याने म्हातारा येतच राहिला आणि लोकांना फसवतच राहिला.

काकांच्या घरात त्याला आयती गिऱ्हाईके मिळत असत. काकाकडे आलेले दोनजण माझ्या डोळ्यासमोर बघता बघता बळी पडले. काही मिनिटांच्या बोलण्यावर त्या माणसांनी खिशातून ५००० रुपये काढून म्हाताऱ्याच्या हातावर ठेवले आणि म्हातारा तडक गूल झाला.

एकदा काकूच्या वडिलांनी म्हणजे ठग म्हाताऱ्याने तर हाईटच केली. छोट्या काकूची आई अंथरुणावर खिळून होती. हा ठग म्हातारा छोट्या काकूच्या माहेरी जाऊन सांगत बसला की मंतरलेला पवित्र कलश देतो. त्यासाठी लागणारे ११,००० रुपये मला आत्ता द्या. दोन दिवसात कलश आणून देतो. घरातले जवळचे नाते पाहून त्यांनीही म्हाताऱ्याला लगोलग पैसे काढून दिले. एक महिना झाला, दोन महिने झाले. कलशाचा काही पत्ता नाही हे पाहून लहान काकांच्या सासऱ्यांनी काकांना फोन करून सांगितले. त्यांनतर सूत्रे जोरात हलू लागली. म्हाताऱ्याला फोन करून बोलवून घेण्यात आले. समोर बसवून लहान काकांनी त्याला सांगितले की पुढच्या ७२ तासात सगळे पैसे मिळाले नाही तर तुम्हाला पोलिसात देऊ. म्हातारा उठून गावाला गेला. आपल्या वाटणीचा जमिनीचा तुकडा विकून पैसे घेऊन तडक काकांकडे परत आला आणि पैसे देऊन निघून गेला. आपल्या नातेवाईकांच्या फसवणुकीबाबत इतके तत्पर असणारे आमचे काका इतरांच्या फसवणुकीची मात्र चेष्टा करत असत हे मला कायमच सलत असे. आपल्या घामाचा पैसा गोरगरीब यांच्या उरावर घालतात आणि हे सर्रास यांना फसवतात याची मला कायमच लाज वाटे. असे ठग पैदा करणारी दळभद्री सिस्टीम यांनी निगुतीने पाळून ठेवली आहे, ज्यातून अशा परोपजीवी माणसांची चांदी होते आणि गरीब मात्र नाडला जातो.

एक असाच अजून ठग होता. आमच्याकडे राहायला आलेल्या मावसदादाचा काका. हा स्वतःला एका बाबाचा अवतार मानायचा. एका गावात बाबांचे मंदिर बांधायचे, पालखी काढायची म्हणून याने दीड लाख रुपये उचलले. शिवाय गावकऱ्यांकडून भरपूर धान्यही घेतले. उचलताना काकांकडे राहणाऱ्या आपल्या पुतण्याचा म्हणजे आमच्या दादाचा संदर्भ दिला आणि तो गुल झाला. काही महिने गेल्यावर लोकांना संशय आला आणि ते कामाला लागले. ते थेट आमच्याकडे आले. दादालाच नेमके त्यांनी विचारले की तो त्याला ओळखतो का. त्याने होकार देताच लोकांनी त्याला बेदम मारायला सुरुवात केली. दादा गयावया करत होता. काय झाले आहे तेही न सांगता त्यांनी थेट मारहाणच चालू केल्याने दादा बावचळला होता. काकांनी पण हात चालवायला सुरुवात केली. तुफान मारामारी झाली. पोलीस आले त्यांनी आलेल्या लोकांना अटक केली. तोपर्यंत दादाचे तोंड मारुतीसारखे झालेले होते. काही कारण नसताना न बांधलेल्या मंदिराचा प्रसाद दादाला मिळाला होता. मंदिराचे पैसे खाल्लेला मात्र आनंदात कुठेतरी मजा मारत होता. काही दिवसांनी दादाचा तो मंदिरवाला काका आमच्याकडे आला. तेव्हा दादा बाहेर गेलेला होता. तो जसा परत आला तसे दारातून काकाला पाहून त्याने पायातली चप्पल हातात घेतली आणि काही समजायच्या आत काकाच्या तोंडात दोन ठेवून दिल्या. काका गडबडला. प्रत्यक्ष बाबांवर हात उचलतोस का? वगैरे सुरू झाले. दादाने त्याला चोपून काढत त्याच्याकडून वदवून घेतले की त्याने दीड लाख घेतले आणि उडवून टाकले आहेत. दादाने आणि आमच्या काकांनी मिळून त्याला बजावले की पुढच्या महिन्याच्या आत ते पैसे आणून दे नाहीतर तेच त्याला पोलिसात देतील. त्याने खरोखर ते पैसे आणून दिले आणि बाबांचा तो अवतार कायमचा अंतर्धान पावला.

असे सगळे ठग काकांच्या अवतो भवती त्यांनी गोळा झाले होते. कारण त्यांचे असणे हीदेखील काकांच्या वर्तुळाची गरज होती. कारण ते स्वतःच एक ठग होते. संपूर्ण समजाचे नियंत्रण ते आपल्या घाणेरड्या विकृतीतून करू पाहत होते. इतर ठगापेक्षाही ते मोठे ठग होते.

पण ठगालाही कधीतरी महाठग मिळतोच. झाले असे की एकदा आमचे लहान काका अंगणात काही काम करत बसले होते. रस्त्यावरून जाणारा एक इसम त्यांच्याकडे पाहून काही बोलला. ते काकांना चकीत करून गेले. काकांनी त्याला आत बोलवले. त्या इसमाने काकांची हिस्ट्री त्यांच्या नुसत्या चेहऱ्याकडे पाहून सांगितली. अगदी खडानखडा माहिती असल्यासारखा तो बोलत होता. तो जसजसा बोलत होता, काका तसतसे फुलत होते.घरातून मी हे सगळे पाहत होते. मी दादालाही हे पाहायला बोलावले. त्या माणसाने काकांचे प्रॉब्लेम्स सांगायला सुरुवात केली आणि याचे उत्तरही आपल्याकडे असल्याचे सांगितले, काका आत गले आणि ५००० रुपये घेऊन येऊन त्याच्यासमोर स्वत:हून ठेवून ऐकू लागले. त्याने मागितलेही नसताना आमचे काका पैसे आणतात काय तो माणूस जुजुबी काही उपाय सांगून ५००० रुपये घेऊन निघून जातो काय? सगळे नवलच होते. पैशापैशाचा चोख हिशोब ठेवणारे आमचे एक नंबरचे चिक्कू काका आज हातोहात फसवले गेले होते. आम्ही आजही ते आठवून गडबडा लोळून हसतो. मला तर विशेष आनंद होतो. ते संतांनी म्हणून ठेवलंय ना –“ मौका सभी को मिलता है..” ते अगदी खरंय.

क्रमश:

शब्दांकन: शंतनू पांडे

कर्म(ठ)कथेचा मागील भाग वाचा: http://www.bigul.co.in/bigul/2018/sec/11/superstitionsप्रतिक्रिया द्या1170 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर