फेबुगिरी
गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंगसाइट्सवर व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक पोस्ट्स खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी:

आम्ही कायदा पाळणारच! 
कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला विरोध.

वसई किल्ल्यातील दूरवस्था, मद्यपी, धुडगूस घासणारे, चित्रिकरणाच्या नावाखाली विद्रूप करणारे, अश्लील चाळे करणारे आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात लोकसत्ताने मागील दोन वर्षात भरपूर बातम्या करून आवाज उठवला. अनेक लेख लिहिले. पोलिस, पुरातत्व खात्याच्या निष्क्रियतेविरोधातही लिहिलं. जे दुर्गमित्र किल्ला संवर्धनाचे काम करतात त्यांच्या कामाला भरपूर प्रसिध्दीही दिली. सर्व गैरप्रकारांना आमचा विरोधच आहे आणि राहील.

परंतु दुर्गमित्रांनी जोडप्यांना किल्ल्याताल हुसकावून लावण्याची मोहीम उघडली. (कुत्री हाकलायाला चला असे आवाहन फेसबुकवर करण्यात आले होते)

या मोहिमेत पुरातत्व खाते, किंवा पोलीस नव्हते. उत्साहाच्या भरात या दुर्गमित्रांनी जोडप्यांची "त्या" अवस्थेतील छायाचित्रे काढली, त्यांची ओळखपत्रे घेऊन महाविद्यालयाला कळवले. दुर्गमित्रांचा उद्देश चांगला असला तरी अशा प्रकारे कायदा हातात घेण्याच करण्याचा अधिकार कुणालाच नाही. त्याला "मॉरल पोलिसिंग" म्हणतात. जे करण्याला उच्च न्यायालयानेही हरकत घेतली आहे. पुरातत्व विभागाकडून किल्ल्यात कुणाचीही ओळपत्रे विचारली जात नाहीत. कुणाचीही खाजगी छायाचित्रे काढणे कायद्याने गुन्हा आहे. या झालेल्या प्रकाराची बातमी केली. कायदा, नियम मानणाऱ्यांनी बातमीचे स्वागत करून पाठिंबा दिला.

मात्र मी या अश्लील कृत्यांना पाठिंबा देतो असं समजून अनेकांना दोन दिवस मला भरपूर शिव्या दिल्या, टीका केली. काही 'ढगड' लोकांनी तर मला पेशा सोडा, असा शहाजोगपणाचा सल्ला दिला. ढगातून बरसात व्हावी तसे काही अक्कलशून्य "ढग्यांनी" टीकेची बरसात केली
आम्ही पत्रकार आहोत. कायद्याचे, नियमांचे तंतोतत पालन करतो. कुठल्याही बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन करू शकत नाही, करणारही नाही. आमच्यावर टिका करणा-यांनी आम्ही दुर्गप्रेमींच्या, किल्ला संवर्धनाच्या बाबतीत केलेल्या बातम्या, लेख वाचावे आणि त्यांची संख्याही पहावी मग टिका करावी. घरात चोर शिरला तर त्याची हत्या केली जात नाही. तो चोर असवा तरी तसा अधिकार नाही.

तुम्ही बेकायदेशीर काम कराल आणि त्याला आमच्या पाठिंब्याची अपेक्षा कराल तर ते व्यर्थ आहे. लोकसत्ताच्या सर्व वरिष्ठांचे आभार. ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे आभार.

- सुहास बिऱ्हाडे

......................................

विंचवाविषयी आपल्याला काय माहीत आहे? विंचु डंख मारतो, इतकंच ना?

तुमच्या माहितीत एक अजून भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला.

श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलंच पाहिजे.

विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी. काही तासांनी पिलांना भूक लागते, निसर्गाचा कोप झालेल्या जिवापैकी एक म्हणजे विंचवी.

तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही.. इथे  गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही.आता हळुहळू पिलांची भुक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासाविस होते पण द्यायला तर काहीच नाही. पिलं तिचा चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरून निमुट बसून रहाते. आता पिलांची भूक अनावर होते, ते विंचवीचे लचके तोडायला सुरुवात करतात, पाहता पाहता पिलं पोट भरून तृप्त झालेली असतातआणि विंचवी............. विंचवी..........

हो, ती स्वतः पिलांना तृप्त करण्यासाठी समर्पित झालेली असते.

याला म्हणायचं आईचं 'आई'पण!

- अनिल थत्ते

......................................

मैत्रिणींनो, आपण मध्यमवर्गीय फार्फार तर उच्च मध्यमवर्गात उजवा पाय टाकण्याच्या तयारीत समजू. मला दोन सुना आहेत. तुम्हालाही लेकीसुना असतील. नात्यातील अनेक लग्नं पाहिली ही असतील. मी प्रामाणिकपणे सांगते यापैकी काहीही मी ऐकलं पाहिलं नाहीय अजून. 
1. सासू म्हणजे डस्टबिन .
2. मी किचनमधे पाय ठेवणार नाही. 
3. मी मूल जन्माला घालणार नाही. 
4. मी पुरुषाच्या पार्लरमध्ये जाते. 
5. मी परपुरुषाकडून अंगभर टॅटू काढून घेणार. 
6. मी परपुरुषाकडून लग्नाची साडी नेसून घेणार. 
(असे विषय घेऊन गावोगावी जिथं आजही रुढी परंपरा घट्ट आहेत अशा ठिकाणी व्याख्यान देण्याचे काय प्रयोजन? हे विषय घेऊन हाय क्लास, सिनेसृष्टीचं प्रबोधन करावं ना...... लोकप्रियता आणि टाळ्या प्रसिद्धीसाठी असेल तर अंमळ घातकच. अशी व्याख्यानं ऐकण्या देण्यापेक्षा करवंटीची चवदार चटणी करता येते का पाहणं बरं! )

- स्वाती ठकार

.....................................

“तिरस्करणीय गुलामगिरी नि अमानुष अन्याय यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मलो आहे त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपेशी ठरलो तर स्वतःला गोळी घालीन.”

तू असे म्हणालास आणि खेचून बाहेर काढलेस खोल अंधारात असलेल्या आम्हा सर्वांना आणि दिलास लखलखीत उजेड आमच्या प्रत्येकाच्या ओंजळीत. प्रज्ञावंत क्रांतीसूर्या तू नुसती महान व्यक्ती नव्हतास, समाजक्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी विराट शक्ती होतास. लहानपणी तुझ्या फोटोसमोर हात जोडून डोळे मिटून उभे राहत असू तेव्हा आई पुटपुटत म्हणायची बाबासायबासारखं शिकून मोठं व्हा आणि आमच्या अंगावर शहारे यायचे.

आज सकाळी मी उठायच्या आधी हारफुले घेऊन येऊन तुला वंदन करणाऱ्या छोट्या पुतण्यांना त्यांची आजी हेच म्हणताना पाहिले आणि डोळे भरून आले..

बा भीमा तू असाच खोलवर झिरपत जा समाजाच्या सर्व पिढ्यात..

- सतीश वाघमारे

......................................

बाबरी मशीद कुणी पाडली ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी कोणीही जबाबदारी घेतलेली नाही.

बाळासाहेब ठाकरे ह्यांनी घेतली होती ती जबाबदारी पण ६ डिसेंबर १९९२ रोजी शिवसैनिक त्या मशिदीपाशी पोचलेच नव्हते.

बाबरी मशीद पाडली जात असताना लष्कराने त्याचं शूटिंग केलं होतं.

मात्र इतकी वर्षं उलटून गेली पण ती मशीद कुणी पाडली हे अजून निश्चित झालेलं नाही.

बाबरी मशिदीत रामाच्या मूर्ती प्रकटल्या होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार होतं आणि जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते.

मशिदीत मूर्ती नेऊन ठेवणारे कोण हे कधीही कळलं नाही.

पण मूर्तींची पूजा सुरू झाली आणि पुढे मूर्तीची पूजा होत असे मात्र भाविकांना त्यांचं दर्शन घ्यायला परवानगी नव्हती.

भारत हा चमत्कारांचा देश आहे, इथे मशिदीमध्ये मूर्ती प्रकट होतात त्या मूर्तींची पूजा होऊ लागते.
सर्वांच्या डोळ्यादेखत मशीद पाडल्यावरही ती पाडणारे कोण हे वर्षानुवर्षं समजत नाहीत
आणि मशिदीच्या जागी मंदिर बांधण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातात.

- सुनील तांबे

......................................

अर्धनारीनटेश्वराच्या प्रतिमेचे मला अप्रूप वाटते. एकाच शरीरात प्रकृती आणि पुरुष दोघांना सामावून पूर्णत्व यापलीकडे नाही, असे सूचित केले आहे.

सांख्य खरे तर निरीश्वर दर्शन, पण त्याचे तर्कसौंदर्य एवढे मोहक, की सेश्वरांना त्याचा समावेश श्रध्देयात केल्यावाचून राहवले नाही. सारे खेळ खेळणारी, नाना रूपे नटणारी प्रकृती आणि हे सर्व ज्याच्यासाठी (ज्याला उर्दूत 'मद्दे-नज़र' असा आणखी नेमका शब्द आहे.), ज्याच्या प्रयोजनार्थ करावयाचे तो निर्विकार, साक्षीमात्र पुरुष! दोघांची वर्तुळे आणि त्या वर्तुळात भ्रमणारी दोघांची प्राक्तने ठरलेली! मग पुरुषासाठी प्रकृतीने सारे काही उत्पन्न करावयाचे आणि त्याचे पाहून झाले, की तिनेच तो पसारा आवरता घ्यायचा. अशी अनंत आवर्तने!

"मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते।"

असे भगवंतालाही सांगावे लागले एवढे हे रूपक परिपूर्ण आहे .चिनी द्वैतापेक्षा, यिन आणि यांग यांच्या सनातन युध्दरत युग्मापेक्षा प्रकृति-पुरुषाचे हे द्वंद्वहीन युग्म आणखी मोहक आहे.

जोवर एकदाचा साराच उलगडा होत नाही, तोवर प्रत्येक दर्शन, प्रत्येक स्पष्टीकरणाला मर्यादित चौकटीचा आणि सर्क्युलर युक्तिवादाचा धोका आहेच. कदाचित याचमुळे प्रयोजनाचा प्रश्न हा अतिप्रश्न मानला गेला असावा. 'काय', 'कसे', 'केव्हा' वगैरे प्रश्नांची उत्तरे त्या त्या चौकटीत कधी सहज, तर कधी कष्टाने प्राप्य आहेत. फक्त 'का' हा एकच प्रश्न असा आहे, ज्याचे उत्तर सुलभ नाही. भीती अशीही आहे, की कदाचित त्याचे उत्तरच नाही.

म्हणून, सारी विवेचने सादर मान्य केली, तरी 'का' हा प्रश्न एकदा विचारला, की ती अधांतरी तरंगू लागतात. सारी गृहितकेच या एका प्रश्नाने निकाली निघतात.

मग ग्रीकांच्या नियतिवादाची पूर्ण ताकद जाणवू लागते. जोवर हा एक प्रश्न अनुत्तरित आहे, तोवर सारे घटित नियतीला बांधलेले! कुणीही, कशासाठीही स्वतंत्र नाही. "ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्तीं असू द्यावे समाधान।" ह्यातल्या पूर्वार्धालाही पर्याय नाही, अन् उत्तरार्धालाही पर्याय नाही.

माणसे भविष्यात डोकावू इच्छितात. जर काही तंत्राने भविष्य कळाले, तरी ते बदलता येणे शक्य नाही. कारण ते बदलले, तर ते व्याख्येनुसार भविष्य रहात नाही. ते जाणणे, म्हणजे जाहीर होण्याच्या काही काळ अगोदर परीक्षेचा निकाल धडपडून मिळवणे!

आईनस्टाईनला प्रश्न पडला होता, "ईश्वराला चॉईस आहे का?" आहे म्हणावे, तर तो स्वतःला संपवू शकतो. नाही म्हणावे, तर त्याचे ऐश्वर्य संपते.

अस्तित्वाचे अंतिम रहस्य त्याच्या स्वरूपात नाही, तर त्याच्या प्रयोजनात आहे, या निष्कर्षावर मी आलो आहे. कदाचित तो चूक असेल. कदाचित, प्रयोजनाचेच काही प्रयोजन नसेल. साऱ्याच केवळ संदर्भांच्या, परस्परांत गुंतलेल्या, निरर्थक चौकटी असतील.

पण, या 'का' ला उत्तर असलेच, तर त्याचा विचार होणे अवश्य आहे असे मला वाटते.

- रेणुकादास देशपांडे

......................................

लढाई ‘याचे’ गाव,
याला ‘युद्ध’ ऐसे नाव...

आज सकाळी नेहमीप्रमाणे मंडईत गेलो होतो. घ्यायची ती सगळी भाजी घेतली आणि पिशवी खांद्याला लावून घराकडे परत निघालोच होतो आणि हा दिसला एका बंद दुकानाच्या बाहेर कोपऱ्यावर स्थिरावलेला...

बहुदा पूर्ण अंध असलेली नजर, कृश पण ताठ कण्याची शरीरयष्टी, शर्ट छान इन केलेला, केस व्यवस्थित विंचरेलेले, अंगावरले साधेसेच पण नीटनेटके कपडे, हातातल्या डब्यात आलेपाकच्या वड्या नीट-नेमस्त ओळीत लावलेल्या आणि विजारीच्या उजव्या खिशातून बाहेर डोकावणाऱ्या प्लास्टिक पिशवीत हात घालून बहुधा चण्यांचा ब्रेकफास्ट करत बसला होता हा तरणाबांड मुलगा....

मी तशा बाहेरच्या आलेपाक वड्या घेत नाही पण तितकीच मदत या मुलाला म्हणून जवळ गेलो आणि विचारलं- कितीला दिल्यास रे वड्या मित्रा?

दहा रुपयाला दोन वड्या, माझ्याकडे थेट मान वळवत, त्याचे ते अधू डोळे आता मला जरा जास्तच स्पष्ट दाखवतं तो उद्गारला.

बरं, दोन वड्या दे रे, मी म्हटलं.

उजव्या हातानी थेट बाहरेच्या रांगेतल्या नेमक्या दोन वड्या या पठ्याने उचलल्या आणि माझ्या आवाजाच्या दिशेने पुढे धरल्या. मी ही त्या घेतल्या आणि पाकिटातून दहा रुपयाची नोट काढली आणि त्याच्या पुढे केलेल्या हातात दिली.

अन्य कुणीही तळहात पसरेल तसा हात त्याने न धरल्याचं माझ्या लक्षात आलं लगेच. त्याने हात असा विशिष्ट पुढे केला होता की मला पैसे त्याच्या हातावर ठेवता येणार नाहीत तर त्याने आडव्या धरलेल्या हाताच्या बोटांत माझ्या हातातली नोट मला सरकवावी लागेल. ‘मी याचक नाही तर स्वाभिमानाने पैसे कमावणारा माणूस आहे.’ हे समोरच्याला कृतीतून जाणवून देणारा हा त्याचा दृष्टीकोन मला प्रथमदर्शनीच चांगलाच भावला.

मी दिलेली नोट त्याने हाताच्या पंज्यावर ठेवली आणि हाताच्या वितीने त्याची लांबी मोजली, दुसऱ्या हाताची तीन बोटे त्याने नोटेच्या पलीकडे उरलेल्या रिकाम्या जागेवर ठेवली आणि ती कितीची नोट आहे ते नक्की केलं, पूर्ण नोट दोन्ही हातांनी चाचपडून कुठे फाटली नाहीये ना हे तपासलं आणि दहाची नीट नोट आहे हे नक्की केलं आणि माझ्या दिशेने मान हलवून किंचित हसल्यासारखं केलं, एक हात खिशात घातला, खिशातल्या दहा-वीस-पन्नासच्या नोटांचे बंडल काढलं आणि ही दहाची नोट व्यवस्थित त्या छोट्या नोटांच्या बंडलात सरकवून ठेवली, नोटांचं बंडल खिशात ठेवलं, दोन्ही हाताने बॉक्समधल्या वड्या चाचपडून नीट लागल्या आहेत ना याची खात्री केली आणि पुन्हा चणे खायला सुरुवात केली.

फसवतं का मित्रा कुणी कधी, त्याच्या कानाशी वाकून कुजबुजत प्रश्न विचारला मी.

नाही साहेब, मला आजपर्यंत कधीच कुणीच फसवलं नाहीये आजपर्यंत. जगात खूप चांगली माणसं आहेत असा माझा विश्वास आहे म्हणून कदाचित या वाईट समजल्या जाणाऱ्या जगात मला मात्र आजपर्यंत कुणीच कधीच फसवलं नाहीये असं मी समजतो साहेब, तो साक्षात सकारात्मकतेचा स्वाभिमानी पुतळा उद्गारला.

“खूप डोळसं माणसंसुद्धा भीक मागताना दिसतात- मला पुढे नेमक काय विचारायचं आहे हे लक्षात आलं त्या मित्राच्या नक्कीच आणि म्हणून मला मध्येच थांबवत तो म्हणाला- साहेब, काय वाट्टेल ते झाल तरी मी आयुष्यात भीक म्हणून मागणार नाही. एकवेळ एकही आलेपाक नाही विकला गेला तरी चालेल, एकही पैसा नाही मिळाला तरी बेहत्तर पण भीक म्हणून मागणार नाही हे नक्की.

काय बोलणार होतो या दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे मी पामर यार,

मनातल्या मनात त्याला खूपखूप शुभेच्छा दिल्या आणि घरी परतलो...एक वेगळीच अनामिक ताकत त्या आंधळ्या स्वाभिमानी तरुणाकडून उरात पुरेपूर भरून घेऊन...

चांगभलं....

- मिलिंद वेर्लेकर

......................................

चैत्यभूमीवर २००९ साली पूर्ण रात्र होतो. रात्रभर अनेक लोकांना अनुभवता आल. पार्काला पालाच स्वरूप आलेल... राहुट्या उभ्या राहिलेल्या... पाण्याचे टँकर पोर्टेबल स्वछतागृह , काही सामाजीक संस्थांचे फूड काऊंटर ,मोठ्ठला मंडप सगळंच काहीस नविन अर्थात पहिल्यांदाच हे सगळं बघण्याचा प्रसंग होता. रात्र वाढत होती आजूबाजूला पाला पालावर गाणी रंगात येत होती. तो उत्साह डोळ्यावरची झोप कापत होता. देशभरातून आलेले अनुयायी भीमगीतांच्या मैफिलीत सामील होत होते. सगळं वातावरण भीममय झालेलं.

मुंबईत आल्यापासून सहा डिसेंबरला होणाऱ्या गर्दीत आज स्वतः सामील होण्याचा हा पहिला प्रसंग. निमित्त होतं मानसी पब्लिकेशने केलेल्या डायरीच प्रकाशन आणि त्याची विक्री वैगेरेची जबाबदारी असल्याने इथं येणं झालं.

रांगेत बाबासाहेबांच्या फोटो आणि पुस्तकांची दुकानं थाटलेली. इतक्या रात्री ही लोकं येतात पुस्तकं घेतायत. आणि आमच्या डायरीचे गठ्ठे नुसते बांधून का ठेवायचे म्हणून अमोलला उठवलं म्हटलं चल करूया का सुरवात त्याच्या डोळ्यावर झोप होती. म्हणाला.... ये झोप रे उद्या बघू... नुसत्या ताडपत्री वर मला काय झोप येईना म्हटलं, चला करूया सुरुवात. शंभरचा एक गट्टा सोडला लोक यायला लागले पण गर्दी होईना मग डॉ बाबासाहेब आंबेडकर डायरी फक्त २० रुपये चला फक्त काही प्रति शिल्लकची बतावणी केली आणि सकाळी सात वाजेपर्यंत हा हा म्हणता पाचशे प्रिंट संपत आल्या आणि दहा नंतर सगळ्या डायऱ्या संपलेल्या दरम्यान जितकी लोक भेटली त्यांच्या सगळ्यात एकमेव साम्य सगळे बाबासाहेबांचे दिवाने.... खरं तर त्या डायरीत तस काही विशेष नव्हतं पण ही त्या महामानवाच्या नावाची किमयां

सहा डिसेंबरला इतकी गर्दी का होते, याचं उत्तर त्या दिवशी मिळालं आणि पुन्हा हा प्रश्न कधीच पडला नाही. 
पण काल पावसानं अचानक घोळ घातला आणि ही सगळी माणसं मिळेल त्या आडोशाला आसरा घेताना दिसली.
काळ निघून जातोय... सरकार, यंत्रणा बदलतेय.... यांचे नेते युत्या पालटत अपेक्षित पोझिशन मिळवता आहेत.. बॅनर्सनी गल्ली बोळ भरता आहेत....सरकार दरबारी मोठं मोठाल्या घोषणा होतायत पण यांच अस्तित्व आजही भरकटलेलच ....वर्षातून एक दोनदा इथं येणाऱ्या यांना किमान चार घटका डोक्यावर सुरक्षित छतही मिळू नये यातच आलं सगळं 
बाकी करोडो अब्जो रुपयांच्या योजनांच्या जाहिराती करायलाही लाखोंचं बजेट लागत हो शासन दरबारी.
असो २००९ ला त्याच रात्री सुचलेल्या या ओळी आजही तीतक्यात समर्पक ठरतात .
त्या अशा

"मातीतुनी पुन्हा………… !

अमुचे असेच हे
जीणे जगायचे
मातीतुनी पुन्हा
मातीत जायचे

हा धर्म कोणता
ती जात कोणती
मज वाटते भीती
ही राक्षसी नीती

झाले बहुत हे
होतीलही नवे
मुक्या जनावरा
कसे बोचती थवे

अन सोसल्या झळा
सांगू कशा कुठे
का? लागतो आम्हा
नेता जिथे तिथे

ना संत राहिला
ना रंकही इथे
मेंढारले जीणे
पाळतो इथे तिथे"

- संतोष टाकळे

......................................

शुन्यातून जग निर्माण करताना आपण अनेक जणांना पाहतो. पण ज्या समाजाला, समस्त स्त्रीवर्गाला हजारो वर्ष शुन्याचा सुद्धा दर्जा मिळत नव्हता, तुमच्या मागच्या जन्माच्या पापामुळे तुम्हाला शुद्र जातीत जन्म मिळाला म्हणून गुपचूप अन्याय सहन करून ह्या जन्मात गुलामी केली तरच पुढच्या जन्मात तुम्हाला उच्च जातीत जन्म मिळेल असे सांगुन गुलामीत ढकललेले असते आणि ह्या समजातून समाजाचा एक घटक आणि समस्त स्त्रीवर्ग हजारो वर्ष गुलामी करत असतो.

त्याच समाजातून, एक मसीहा नाही तर माणूसच समस्त पिचलेल्या बहुजन समाजाच्या गुलामी विरुद्ध उभा राहतो आणि ती लढाई स्वतः समोरून लढून जगातील समस्त मानव जातीला प्रेरणा देतो.

मानवतेच्या इतिहासात कसलीही साधनसामग्री नसताना, ती निर्माण करून एक लढा उभा करणे आणि त्यात अंशात: तरी यश मिळवून पुढच्या पिढ्यांना लढण्यासाठी प्रेरणा देनारी उदाहरणे अपवादात्मक रित्या आढळतात.

आज एक उत्कृष्ट वकील, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त त्यांना वंदन करून त्यांनी दाखवलेल्या- शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा वापर करून समस्त समाजात समता स्थापन करण्यासाठी लढण्याची शपथ घेऊया.

- विकास गोडगे

......................................

स्थळ - कोल्हापुरातील श्रीमंत वस्तीतील प्रतिष्ठित हॉटेल (अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान करण्याच्या सुविधेने युक्त)

वातावरण आणि वेळ - सुयोग्य

प्रसंग -

बाजूच्या टेबलावरच्या मेंबरचा फोन रिंग होतो- हे हिंदुशक्ती संभूत दीप्तीतम तेजा...

मेंबर- 'एक मिनिट होल्ड करा'; वळून वेटरला - 'एक ब्लेंडर्स नीप आणि सोडा'....'हा बोल रे, जय महाराष्ट्र'

एका क्षणात साडेतीनशे वर्षांची झेप घेण्याचं सामर्थ्य फक्त एका ब्लेंडर्सच्या नीपमध्ये आहे याचा आज साक्षात्कार झाला!

#पेयपानाची_उड्डाणे

- कौस्तुभ खांडेकर

......................................

राहुल गांधींचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा! १३२ वर्षांचा पक्ष आता त्यांना सांभाळायचा आहे. सोनिया गांधी पायउतार होत आहेत. सीताराम केसरींच्या काळातल्या संपूर्ण खचून गेलेल्या काँग्रेसला सोनियांनी पुनरुज्जीवित केलं आणि सलग दोन वेळा सत्ताही आणून दाखवली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सोनियांनी काँग्रेसची सूत्र हाती घेतली होती. प्रचंड विरोधाला तोंड देत केवळ लोकांच्या साथीनं त्यांनी दहा वर्ष सत्ता आणली. सोनियांचं स्वागतच सुषमा स्वराज यांनी मुंडण करण्याची असंस्कृत घोषणा करून केलं होतं. शरद पवारांनी 'राष्ट्रवादाचा' नारा लावत वेगळा पक्षच काढला. अशा सगळ्या वादळात सोनिया अविचल राहिल्या.

राहुल गांधींच्या समोर आव्हानांचा डोंगर आहे. पहिलं आव्हान गुजरात निवडणुकीचं आहे. त्यानंतर लगेच पक्षाची फेररचना करावी लागेल. दिल्लीतल्या काही मोठ्या लोकांना नारळ देण्याची कामगिरी त्यांना करावी लागेल. पक्षाची पुन्हा बांधणी करावी लागेल. नवा थिंक टँक तयार करून नवा कार्यक्रम द्यावा लागेल. गावोगावच्या कार्यकर्त्यांना नवा आत्मविश्वास द्यावा लागेल.

(स्वागतार्थ) ज्याअर्थी माननीय पंतप्रधानांनी राहुल गांधींना औरंगजेबाची उपमा दिली आहे त्या अर्थी राहुल गांधींची सध्याची दिशा योग्यच असली पाहिजे.

- विश्वंभर चौधरी

......................................

स्वातंत्र्यपूर्व काळातील नेते, विचारवंत किंवा समाजसुधारकांची जयंती, पुण्यतिथी किंवा महापरिनिर्वाणदिन असला की शाळेत असताना रोज म्हटलेल्या प्रतिज्ञेचं एकंच वाक्य माझ्या डोक्यात घुमत रहातं.

'त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन'

हजारो वर्षे टिकलेल्या आपल्या संस्कृतीत शतकभरापूर्वी सुरू झालेल्या परंपरांशी आपली सगळ्यांची नाळ लवकर जुळली तर आपले भविष्य आपल्या हातात राहील.

- आनंद मोरे

......................................

आपल्याकडे एक बरे असते, एकदा का माणूस गेला की त्याला पुतळ्यात चिणत असतात. 
त्याच्या विचारांना विशालकाय स्मारकात दफन करत असतात. 
नुसताच उदोउदो करत महामानव नावाचं दंभसूक्त रचत असतात.
बाबासाहेब तरी याला कसे अपवाद राहतील? उगाच ते या देशात जन्मले!
दलितांनी त्यांना अस्मितेच्या निळाईत बुडवले तर उच्चवर्णीयांनी आपला पोटशूळ तसाच दडवत दरसाली खोटा कुर्निसात केला. 
ज्यांनी जातवर्णाचा वर्चस्ववाद राखण्यासाठी बेंबीचा देठ ओला करून घेतला तेही तोंडदाखला निर्लज्जपणा अंगी बाणवतात,
महापरीनिर्वाणदिनाचे औचित्य साधून ते पुष्पचक्रे वाहत असतात. 
बाबांचे अनुयायी असल्याचा जे आव आणतात ते दलितत्वाचे सौदे बिनबोभाट करत असतात, 
तर दलितांचे मसीहा म्हणवून घेणारेही फुटकळ अमिषात विकले जातात. 
ज्यांच्या राजकीय विचारधारेत जातीय वर्चस्ववादाचा विखार ठासून भरलाय,
तेही आता निळ्या मतांच्या गणितापायी बाबांच्या तसबिरींना हार चढवत असतात. 
खरे तर झोपड्यातले झोपड्यातच आहेत, 
शिवाय गावोगावचे महारवाडे अजूनही शाबूत आहेत, 
आरक्षण घेऊन जीवनमानात बढती मिळालेले कावळे मात्र सभ्यतेच्या शुभ्र तारांवर खरकटी चोच हलवत विष्टत बसले आहेत.

बाबासाहेब तुम्ही उगाच या देशात जन्मलात, 
इथे तुमची जयंती, निर्वाण धडाक्यात साजरे होते,
पण तुम्ही अजूनही अनेकांच्या डोक्यात जाता तर अनेकजण तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात पण कोणीच तुम्हाला डोक्यात ठेवत नाही....

बाबा मला माफ करा, जरा जास्तच कडवट लिहितोय.
पण करणार काय ? हे बाळकडू तुम्हीच तर पाजले आहे...

- समीर गायकवाड

......................................

कधीतरी येणाऱ्या वादळालाही नाव असते आणि रोज येणारे 'पेपरवाले', 'दूधवाले' अनाम राहतात ..

- माधवी कुलकर्णी

......................................

 प्रतिक्रिया द्या4496 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर