परमहंसपद.. मुल्लाची झेप.. गुरजिएफचा सिद्धांत
गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून..

रामकृष्ण परमहंस हे परमहंसपदाला पोहोचले, असं त्यांच्या शिष्यांना वाटायचं. खुद्द रामकृष्णांना मात्र याची जाणीव होती की त्यांच्यात काहीतरी उणीव आहे, एक टप्पा अजून पार व्हायचाय. अजून 
आपण 'तिथे' पोहोचलेलो नाही.

त्यांचे शेवटचे गुरू तोतापुरी यांना त्यांनी ही व्यथा सांगितली. बाबा तोतापुरी म्हणाले, तू सगळं सोडलंस पण कालीला सोडलं नाहीस, देवाची आस सुटली नाही, तीही सोड. मग पार जाशील.

रामकृष्ण म्हणाले, पण कशी सोडू? आई आहे ती माझी. तिला कसं सोडू? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण, मी ध्यानात जातो तेव्हा ती समोर येऊन उभी ठाकते आणि मला चराचराचा विसर पडतो, मी त्यापुढे जाऊच शकत नाही.

तोतापुरी म्हणाले, आता तू ध्यानाला बसलास आणि काली समोर आली की तलवारीने खांडोळी करून टाक तिची.

रामकृष्ण म्हणाले, तलवार कुठून आणू?

तोतापुरी म्हणाले, काली कुठून आणलीस, तिथूनच.

कल्पनेतल्या देवीला कल्पनेतल्या तलवारीने नष्ट कर आणि द्वैत संपवून परमात्मस्वरूपात विलीन होऊन जा, असं त्यांना म्हणायचं होतं. काली दिसली की आपण हरवून जातो आणि आपलं भान 
हरपतं, असं परमहंसांनी सांगितल्यावर तोतापुरी बाहेर गेले. त्यांनी काचेचा एक तुकडा आणला. म्हणाले, ध्यानाला बस. काली आली की मला कळेलच. मग मी तुझ्या डोक्यावर या काचेने ओरखडेन. तू भानावर ये आणि कालीचे दोन तुकडे करून टाक तलवारीने.

रामकृष्ण ध्यानाला बसले.

त्यांच्या मन:पटलावर काली आली, हे तोतापुरींना कळलं. त्यांनी रामकृष्णांच्या मस्तकावर असा काही ओरखडा काढला की रक्ताची धार लागली. रामकृष्ण आत जागे झाले. त्यांनी कालीची खांडोळी केली आणि असं म्हणतात की जवळपास सहा तास ते निश्चेष्ट अवस्थेत बसून होते… कसलीही हालचाल नव्हती.

डोळे उघडले तेव्हा ते म्हणाले, अखेरची बाधा नष्ट झाली, शेवटची पायरीही पार झाली…

.............................

मुल्ला नसरुद्दीन आणि त्याचा तरुण मुलगा एकदा एका रस्त्याने चालले होते.

वाटेत एक नाला आला. मुल्ला दोन पावलं मागे आला आणि एका ढांगेत त्याने नाला पार केला. त्याच्या मुलानेही तोच प्रयत्न केला. पण, त्याची झेप अपुरी पडली, तो नाल्यात पडला.

कपडे झटकून तो बापाबरोबर निघाला, तेव्हा त्याने मुल्लाला विचारलं, अब्बाजान, तुम्ही तर म्हातारे झाला आहात, माझ्यापेक्षा कमी ताकद आहे तुमच्या अंगात. तरी तुम्ही एका ढांगेत नाला पार केलात. मी एवढा तरुण, सशक्त, तरी नाल्यात पडलो, असं का झालं?

मुल्लाने खिसा वाजवून दाखवला. खिशात नाणी होती. ती खणखणवली.

मुलगा म्हणाला, म्हणजे काय?

मुल्ला म्हणाला, ज्याच्या खिशात पैसा असतो, त्याच्यात आत्मविश्वास असतो, तो ताकदीलाही भारी पडतो. मी पडू शकत नाही, कारण नाणी सांडतील, नोटा भिजतील. तुझा खिसा रिकामा आहे, भिजण्यासारखं काही नाही. मग तुझी झेप अपुरी होतेच.

...............................

जॉर्ज गुरजिएफकडे जो माणूस साधक बनायला जायचा, तो त्याला समोरासमोर बसून काय सांगतो, काय माहिती देतो, याला तो बिलकुल किंमत द्यायचा नाही.

साधक बनू इच्छिणाऱ्याला तो भरपूर दारू पाजायचा. त्याचं भान, त्याची शुद्ध हरपेल इतकी. दारूच्या नशेत तो माणूस काय बरळतोय, हे तो नीट ऐकायचा, त्याच्या नोंदी करायचा आणि त्या आधारावर त्याच्यासाठीची साधना ठरवायचा. माणूस स्वप्नात आणि दारूच्या अशा नशेतच खऱ्या अर्थाने बेसावध असतो आणि त्यामुळेच तो तेव्हाच खरा असतो, असा त्याचा सिद्धांत होता.

.................प्रतिक्रिया द्या3124 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर