शिडे तुटलेल्या जहाजाचे कप्तान- राहुल गांधी
बुधवार, ६ डिसेंबर, २०१७ राज कुलकर्णी

सत्तेबाहेर असण्याची ही पहिलीच वेळ नसली, तरी काँग्रेस पूर्वी कधीच नव्हती इतक्या वाईट अवस्थेत आहे. शिडे फाटलेल्या होडीची जबाबदारी घेणाऱ्या राहुल गांधींपुढे मोठे आव्हान आहे.

लोकशाहीत एखादा पक्ष सत्तेत नसणे काही नवीन बाब नाही. कोणीही 'यावच्चंद्र दिवाकरौ' सत्तेत राहू शकत नाही! कोणाला सत्तेत बसवायचे आणि कोणाला पायउतार करायचे, हे सर्वस्वी जनता जनार्दनाच्या हाती असते. काही पक्षांना तर जनता अनेक दशके सत्तेबाहेर ठेवते! काँग्रेसला जनतेने  सत्तेबाहेर केलेच होते, आजही काँग्रेस सत्तेबाहेर आहे. मात्र आज काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय कठीण आहे. लोकसभेत केवळ ४४ तर राज्यसभेत १२० खासदार, केवळ तीन-चार राज्यांत सरकारे अशी आजची अवघड स्थिती आहे.

काँग्रेस सत्तेत तर नाहीच. मात्र, सत्तेत असताना कधीही विरोधी पक्ष होण्याची क्षमता नसणारा भाजप वा पुर्वीचा जनसंघ आज सत्तेत आहे आणि त्या पक्षास पूर्ण बहुमत असून, देशात त्यांची अनेक राज्यात सरकारे आहेत. शिवाय त्यांना प्रसारमाध्यमांचे प्रचंड समर्थन तर आहेच, त्यासोबतच मोठमोठे उद्योग समूहही त्यांच्या पाठीशी आहेत. काँग्रेस विरोधकांच्या बलस्थानात अशी वाढ होत असताना, सत्तेत असताना लाभ मिळवणारे अनेक काँग्रेसी कार्यकर्ते एकतर थेट विरोधी पक्षातच प्रवेशकर्ते झाले आहेत किंवा होत आहेत! काहींनी स्वतंत्र पक्ष ही स्थापन केले आहेत! एकूण काय, तर सव्वाशे वर्षांचा इतिहास असणारी काँग्रेस तिच्या इतिहासातील सर्वात कठीण व बिकट कालखंडातून प्रवास करत आहे.

स्वातंत्र्य पूर्वकाळातील काँग्रेस हा विषय बाजूला ठेवला तरी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस हीच पक्ष म्हणून सर्वात लोकप्रिय आणि सक्षम अशी राजकीय पार्टी म्हणावी लागेल. सन १९५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१ आणि १९७५ या निवडणुकांत काँग्रेसलाच जनतेने सत्तेवर बसवले. काँग्रेस सर्वात प्रथम १९७७ साली सत्तेतून पायउतार झाली पण त्यावेळी देखील इंदिरा काँग्रेसकडे १५३ एवढी खासदार संख्या होती. त्यावेळी संघटना काँग्रेस इंदिरा कॉग्रेसच्या विरोधातच होती. काँग्रेसमधे गांधी घराण्याचे नेतृत्व नको म्हणणाऱ्यांना जनतेच अनेक वेळा नाकारले, हे काँग्रेसच्या संघटना काँग्रेस, अर्स काँग्रेस, रेड्डी काँग्रेस, सिंडीकेट काँग्रेस या विविध प्रकरच्या काँग्रेसच्या पराभवांतून वारंवार सिद्ध झाले आहे.

राजीव गांधींच्या काळात १९८४ साली काँग्रेसकडे ४०४ एवढे प्रचंड बहुमत होते. १९८९ मधे कॉग्रेस सत्तेबाहेर असूनही १९७ एवढे संख्याबळ होते. त्यानंतर १९९१ ते १९९६ या काळात नरसिंहरावच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा सत्तेत होती. १९८४ पासून २००४ पर्यंतचा आढावा घेतला तर, काँग्रेस सत्तेत नसताना देखील आपला जनाधार टिकवून होती हे विशेष–

साल

काँग्रेस

भाजप 

१९७७ 

१५३ (काँ.आय)

२९८ (जनता पक्ष)

१९८० 

३५३ (काँ.आय)

३१(जनता पक्ष)

१९८४

४१५

२ 

१९८९

१९७

८५ 

१९९१

२३२

१२० 

१९९६

१४०

१६१ 

१९९८

१४१

१८२ 

१९९९

११४

१८२

२००४

१४५

१३८

२००९

२२५

११६ 

२०१४

४४

२८२

(संदर्भ-टाईम्स ऑफ इंडिया १०.४.२००५)

आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. हादेखील असाच कठीण काळ होता. जनतेने जनसंघ प्रणित जनता पार्टीस भरभरून मतदान केले होते पण प्रथमच सत्तेत आलेल्या या गांधी घराण्याच्या विरोधकांना जनतेच्या कल्याणासाठी काम करण्यापेक्षा गांधी घराण्यावर सूड उगवणे महत्त्वाचे वाटले! जनता जनार्दनाला ही सूड घेऊ पाहणारी वृत्ती आवडली नाही. इंदिरा गांधींच्याच नेतृत्वाखालील काँग्रेसला जनतेने पुन्हा १९८० साली सत्तेत आणले. त्यावेळीही इंदिरा विरोधी संघटना काँग्रेस जनता पार्टीसोबतच होती पण इंदिराजीच्या नेतृत्वानेच पक्षास सत्तेत आणले. अगदी त्याच प्रमाणे १९९९ साली, सोनिया गांधी यांनी नेतृत्व स्वीकारले आणि २००४ मध्ये पक्षास पुन्हा सत्ता मिळवून दिली!

विद्यमान लोकसभेतील जागा आणि एकूण मतांची टक्केवारी पाहता, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सत्ताविहीन काँग्रेसची अवस्था, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सत्ताविहीन काँग्रेस पेक्षादेखील बिकट आहे. कारण २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी १९.३% आहे. हीच टक्केवारी १९७७ साली पराभूत काळातही ३४.५२ % होती तर सोनिया गांधींच्या नेतृत्वाच्या काळात सत्तेत नसतानाही ती २८.८२ % होती. म्हणजेच पुर्वी कधीही नव्हती, एवढी ही स्थिती कठीण म्हणावी लागेल!

इंदिरा गांधी यांनी पराभूत काँग्रेसचे १९८० साली नेतृत्व करून पक्षास सत्तेत आणले! राजीवजींच्या हत्येंनंतर सोनिया गांधी राजकारणापासून अलिप्तच होत्या! परंतु काँग्रेसमधील नेत्यांनीच दोन तीन वेळा आग्रह केल्यामुळेच त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले. सोनिया गांधींनी अध्यक्षपद स्वीकारले तेव्हाही पक्ष सत्तेत नव्हता! त्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यावर पक्षास सत्ता मिळवून दिली. आजही काँग्रेस पक्ष सत्तेत नाही आणि प्रमुख विरोधकांकडे लोकसभेत राक्षसी बहुमत आणि अमाप पैसा आहे. अशा स्थितीत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे सुकाणू हाती घेवून एक प्रचंड मोठे 'शिवधनुष्यच' उचलले आहे!

राहुल गांधींकडे आज रोजी गमावण्यासारखे काहीच नाही. जे असेल ते सर्व यशच असणार आहे. म्हणून हे आव्हान राहुल गांधी कशा पद्धतीने पार पाडतील आणि आजी वा आईप्रमाणे काँग्रेस पक्षास पुन्हा देदीप्यमान यश ते खेचून आणतील की नाही, याचे उत्तर काळच देईल!

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार म्हटले की अनेकांनी, एकाच कुटुंबाकडे अध्यक्षपद म्हणून घराणेशाहीचा जुनाच आरोप करायला सुरुवात केली आहे.आज काँग्रेस सत्तेत नसल्यामुळे राहुल गांधींनी नेतृत्व स्वीकारण्यासाठी हाच कालावधी योग्य आहे. अर्थातच काँग्रेसचे नेतृत्व कोणी करावे, हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण पक्ष जेव्हा अडचणीत आला, तेव्हा त्यास अडचणीतून बाहेर काढण्याचे कार्यही गांधी परिवारातीलच सदस्यानेच केले आहे, याचा इतिहास साक्षी आहे! शिवाय काँग्रेस सत्तेत नसली तरी विरोधकांच्या टीकेचा रोख गांधी घराणेच असते, म्हणजे विरोधकांनीही टीकेच्या स्वरूपात का होईना पण ही घराणेशाही मान्य केलेली आहे.

एखाद्या फुटलेल्या आणि शिडे फाटलेल्या तारूचे सुकाणू एखादा खलाशी जवाबदारी स्वीकारून मोठ्या हिंमतीने हाती घेतो आणि त्या तारूस किनाऱ्यावर घेऊन येतो. हे काम त्या खलाशाच्या कुटुंबातील अनेक जण वारंवार यशस्वीपणे करत असतील तर, ही जवाबदारी स्वीकारण्याची, धाडसाची आणि हिंमतीची घराणेशाही म्हणावी लागेल. म्हणूनच पक्ष पराभूत असताना नेतृत्व स्वीकारणे हे खरेतर अत्यंत धाडसाचे काम आहे आणि हे काम राहुल गांधी करत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! त्यांच्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस खूप शुभेच्छा!प्रतिक्रिया द्या2688 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
सोनिया - गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७
राहूल गांधिंनी शिवधनुष्य उचलले, धाडसी खलाश्याप्रमाणे ते काॅंग्रेसचेच तारू किनारयावर घेऊन जातील, दैदिप्यमान यश मिळवतील अशी भरपूर स्तुतीसुमने लेखकाने उधळली आहेत.एवढ्या अपेक्षा तर सोनिया गांधी व काॅग्रेसला पण नसतील त्याच्याकडून !! तर सांगायचा मुद्दा काय की राहूल गांधींनी काहीही ग्रेट काम केलेले नाही. कारण ते प्रमुख झाले असले तरी त्यांना उत्तरदायित्व (accountability) काहीही नाही. उद्या जरी ते निवडणूका एका पाठोपाठ एक हरले तरी काॅंग्रेस त्यांना काही काढायची हिंमत करणार नाही. मग त्यांना टेन्शन घेण्याचा काहीच कारण नाही कारण राहूलला हे माहीत आहे की हरलो तर तो पक्षाचा पराभव असेल व जिंकलो तर ते क्रेडिट आपल्याला दिले जाईल. आणि law of averages च्या नियमानुसार काहीही हातपाय न हलवतां ते आयुष्यात एकदा तरी ते जिंकतीलच व तेव्हा पक्ष त्यांना डोक्यावर घेईल. तूर्तास ते त्या दिवसांनी वाट बंघत आहेत

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर