भाजपची शेकली तरी नाक वरच
बुधवार, ६ डिसेंबर, २०१७ उदय नारकर

उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात भाजपने सपाटून मार खाल्ला, तरी प्रसारमाध्यमे भाटगिरी सोडत नाही आहेत. गुजरात निवडणुका समोर ठेवून डंका वाजवणे सुरू आहे. 

प्रसारमाध्यमे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणायचे आता सोडून देऊ या. भारतातली प्रमुख माध्यमे बड्या भांडवलदारांच्या दावणीची मुकी बिचारी मेंढरे बनली आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले. मालक सांगेल त्या दिशेने जातात. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील, उपग्रह वाहिन्यांतील अॅन्कर्स मालकाच्या इशाऱ्याबरहुकूम बें बें करत कोकलत रहातात. मोदी - शहा वाका म्हणाले तर हे रांगायलाच लागतात. लोकांना काय सांगायचे, किती सांगायचे हे ठरवतात. उत्तर प्रदेशातील नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाबाबतीत हे पुन्हा एकवार दिसून आले आहे. या निवडणुकात भाजपने अतिशय मोठा विजय मिळवला, जनता कशी मोदींच्या बाजूने आहे, विरोधकांची कशी फरपट झाली याचे नगारे जोरजोरात माध्यमांनी वाजवले. हेतू स्वच्छ होता. त्यांचा आवाज गुजरातच्या मतदारांच्या कानावर आदळत राहिला पाहिजे. त्या आवाजात त्यांचे कान बधीर झाले की विरोधकांच्या टिमक्यांचा काय पाड असा त्यांचा कयास असणार. आपल्याच टिऱ्या बडवून भाजपवाले इतके बेहोश झाले की बडवून बडवून त्यांना मुंग्या आल्याचेही त्यांच्या ध्यानात येईना. सपशेल आपटून शेकली तरी नाक वर म्हणत ते उसने अवसान आणतच आहेत.

या माध्यमांनी दडवून ठेवलेली माहिती बाहेर यायची राहिली नाही. या निवडणुकात १६ पैकी १४ महापौर भाजपचे आले, हेच ते वाजवत राहिले. पण महापालिकांत त्यांचे सदस्य किती आले? एकूण १३०० जागांपैकी ७०४ ठिकाणी त्यांच्या विरोधी उमेदवार निवडून आले. त्यातही आजवर त्यांनाच मिळत राहिलेल्या अलिगड आणि मेरठ महापालिकांचे महापौर झाले बहुजन समाज पक्षाचे उमेदवार. तसे पाहता, उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरातील मतदार हा परंपरेने भाजपसोबतच राहिलेला आहे. पण जसजसे तळाशी खेड्याकडे जावे, तसतसे चित्र बदलत गेले आहे. महापालिकांसोबत नगरपंचायती आणि नगर परिषदांचीही निवडणूक झाली. या ठिकाणी भाजपने सपाटून मार खाल्ला आहे.

गावागावात भाजपने किती मार खावा?

४३८ नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यात भाजपचे फक्त १०० आले. एकाचा निकाल जाहीर व्हायचा होता. म्हणजे ३३७ आपटले. नगर परिषद अध्यक्षपदासाठी निकाल जाहीर झालेल्या १९५ जागांपैकी भाजपला मिळाल्या ६८ आणि त्यांचे त्याहून दुप्पट म्हणजे १२७ उमेदवार आपटले. सदस्यांच्या बाबतीत तर परिस्थिती भाजपच्या दृष्टीने जास्तच वाईट आहे. वर म्हटल्याप्रमाणे महापलिकांत १३०० जागात ७०४ जागी तो पक्ष हरला. नगरपंचायतींच्या सदस्यात ५,४३४ पैकी निवडून आले ६६२ म्हणजे पडले ४७२८. नगरपरिषदांतील जाहीर ५,२१७ जागांपैकी जिंकले ९१४ आणि हरले ४,३०३. याला मोठा विजय म्हणणाऱ्यांना महामूर्ख म्हणावे की आपमतलबी? भाजपवाल्यांना आणि त्याच्या पाठीराख्यांना निवड करायला दुसरा वावच नाही. अमेठी आणि रायबरेलीत भाजप निवडून आला म्हणून मांडे खाणारे भाजपवाले मुख्यमंत्री आदित्यनाथांनी मतदान केलेल्या गोरखपूरच्या वॉर्ड क्र. ६८ मध्ये भाजपच्या माया त्रिपाठींचा अपक्ष उमेदवार नादिरा खातून यांनी पराभव केल्याबद्दल मूग गिळून का गप्प बसले आहेत? या योग्याची तपस्या नादिरासारख्या परधर्मीय स्त्रीला पराभूत करायला कुठे बुवा कमी पडली असावी?

ढासळणारे बुरूज

केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी मोठे बहुमत मिळवलेल्या या पक्षाचे अपयश त्याला लाज आणणारेच आहे. पण कमरेचे काढून डोक्याला गुंडाळलेल्यांना त्याचे काय? २०१४ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील एकूण ८० जागांपैकी तब्बल ७१ म्हणजे ८९ टक्के जागा भाजपने आपल्या खिशात घातल्या होत्या. विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ झाला होता. नंतर झालेल्या फेब्रुवारी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही त्या पक्षाला ४०३ पैकी विक्रमी ३१२ म्हणजे ७७ टक्के जागा मिळाल्या होत्या. मतेही जवळजवळ ४० टक्के मिळाली होती. त्या मतात एकदम ९ टक्के इतकी मोठी घट झाली आहे. विधानसभेत मिळालेल्या ३९.७ टक्के मतात घट होऊन ती आता झाली आहेत, ३०.८ टक्के. खरे तर विधानसभेत भाजपने तीन चतुर्थांश जागा हडप केलेल्या असल्या तरी एकूण मतांत भाजप अल्पमतातच आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली एकूण मते होती ३ कोटी ४४ लाख; आणि समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेस यांना मिळालेली एकूण मते आहेत ४ कोटी ३५ लाख. म्हणजे विरोधकांपेक्षा भाजपला त्याच वेळी एक कोटीहून कमी मते मिळाली होती. आणि आता सुामरे ३० लाख मतदारांनी भाजपला झिडकारले आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने सतत जातीधर्मात भांडणे लावणाऱ्या आणि विकासाची पोपटपंची करणाऱ्या भाजपचा चांगलाच मुखभंग केला आहे. तसे काही झाले नसून जनता आमचे गाल कुरवाळतच असल्याची आवई तो पक्ष उठवत आहे. आणि चॅनलवाल्यांचे कर्णे कर्कश्श आवाजात ते लोकांच्या कानावर आदळवत आहेत.

गुजरातमध्ये पायाखालची सरकू लागलेली वाळू

भाजपचा हा सारा खोटारड्या बातम्या पसरवायचा खटाटोप एकाच कारणासाठी चालू आहे. मोदी - शहा दुकलीला काहीही करून गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकलीच पाहिजे. त्यासाठी आपण अपराजित असल्याचे डिंडिम वाजवले जात आहेत. गुजरातमध्ये आजवर जातीपातीच्या गलिच्छ राजकारणातूनच भाजप सत्तेवर टिकून राहिली आहे. पण ते समीकरणच आता अंगाशी येऊ लागले आहे. गेली तीस वर्षे भाजपची मुजोरी चालली ती पटेलांच्या धनशक्तीवर आणि मनगटशाहीवर. रथयात्रा असोत, वा गुजरातमध्ये देशी-विदेशी भांडवलदारांना पायघड्या घालणारे लखलखाटी इव्हेन्ट्स. पटेल समाजच भाजपला आपली रसद पुरवत आला आहे. पण तो समाज आता दुखावून दुरावला आहे. राखीव जागांच्या प्रश्नावरून तो समाज पहिल्यांदाच लत्ताप्रहारांनी भाजपची चांगलीच शेकत आहे. पटेलांनी केलेल्या आंदोलनात आजवर १४ तरुण भाजप सरकारने केलेल्या गोळीबारात ठार झाले आहेत. त्यामुळे त्या समाजाचा संताप होणे साहजिकच आहे. त्यात भर पडली आहे दलितांवरील अमानुष अत्याचारांची. उनाचे नाव आपल्या रानटी वर्तनाने जगाच्या नकासावर कोरायची बहादुरी मोदी - शहांनी करून दाखवली. यांच्या पूर्वजाने आधी म. गांधींना “सदेह वैकुंठाला” पाठवले. आता त्याच महात्म्याच्या भूमीत त्याच्या कार्याला मूठमाती द्यायचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. त्याविषयीच्या संतापाचे कढ दलितांना अस्वस्थ करत आहेत. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवानी यांनी मोदी - शहाच्या बादशाहीला खालून आव्हान उभे केले आहे. भुईमुगाला किमान आधार भाव ४३ रुपये असताना प्रत्यक्षात तो ३२ रुपयाला विकावा लागतो. कापसाच्या शेतकऱ्याच्या आयुष्याचा तर कोंडाच झाला आहे. २००२ साली हजारो आप्तस्वकीयांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या मुसलमानांना पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायची संधी येत आहे. या संतापाच्या आगीत पाच कोटीचा सूट आणि वर्षा - दीड वर्षात १६ हजार पट वाढलेली संपत्ती त्यांच्या मालकांचा बचाव करते का पहायचे.

गुजरात प्लॅन आणि लेडी मॅक्बेथ

स्वतंत्र भारताचा विकास कसा करावा, यासाठी स्वार्थी भांडवलदारांनी भारताच्या विकासाचा ‘बॉम्बे प्लॅन’ आखला होता. तो पस्तीस वर्षे राबवून झाल्यावरही १९७० च्या सुमारास इंदिरा गांधींना गरीबी हटावचा नारा द्यावा लागला होता. संस्थानिकांचे तनखे रद्द करावे लागले होते. भांडवलदारांच्या बँकांचे राष्ट्रियीकरण करावे लागले होते. विकासाच्या बॉम्बे प्लॅननुसार जनतेची करता येईल तितकी लूट बड्या भांडवलदारांनी केली. त्या प्लॅनची क्षमता संपल्यावर भांडवलदारांनी मुंबईच्या उत्तरेला सरकत गुजरातमध्ये घर केले आणि देशासमोर विकासाच्या ‘गुजरात प्लॅन’ चे गाजर धरले. त्यातून जनतेला फसवायचा उद्योग चालू आहे.

गुजरातमध्ये हा प्लॅन शिजत असताना दुसरेही प्लॅन शिजत होते. मुस्लिमांची सामुदायिक हत्त्याकांडे होत होती आणि त्यातून सुटलेल्यांचे पद्धतशीर एन्काऊन्टर. हे प्लॅन यशस्वीपणे राबवल्याबद्दल रा. स्व. संघाने एकाला केले पंतप्रधान आणि दुसऱ्याला आपले राजकीय हत्यार चालवणारा सेनापती. शेक्सपियरच्या मॅक्बेथ या नाटकात मॅक्बेथ आणि त्याची पत्नी लेडी मॅक्बेथ अनेकांचे मुडदे पाडून राज्य ताब्यात घेतात. पण त्या रक्तपिपासू राणीला तिची सदसद्विवेकबुद्धी छळतच राहते. हाताला लागलेल्या रक्ताचा वास जातच नाही. म्हणून अरबस्तानातून मागवलेल्या अत्तरांनी ती हात धुवायचा प्रयत्न करते. पण रक्तरंजित स्मृती तिला छळतच रहातात. ती उद्‌गारते, “All the perfumes of Arabia will not sweeten this hand.” अरबस्तानातली कितीही अत्तरे लावली तरी या हातांना सुगंध काही यायचा नाही!

भाजपसाठी अत्तराचा पुरवठा करायचे कंत्राट भारतातल्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या समूहांनी घेतले आहे. त्या बातम्या वाचून, पाहून मोदी-शहांना खरेच सुखाची झोप लागत असेल?
 प्रतिक्रिया द्या1873 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Rahl - गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७
अहो साहेब लोकशाहीत ज्या पक्षाला इतर पक्षांपेक्षा जास्त जागा मिळतात त्यांना सहसा विजयी ठरवले जाते. आता उत्तर प्रदेशमध्ये जरी भाजपाला निम्मयापेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी इतर कोणत्याही एका पक्षाला भाजपापेक्षा जास्ती जागा मिळाल्या नाहीत. मग भाजपला जर इतरपक्षांपेक्षा जास्ती जागा मिळाल्या असतील तर भाजपच विजयी झाले असे म्हणावे लागेल, हे शालेय मुलगासुद्धा सांगेल. एवढी साधी गोष्ट जर तुम्हाला कळत नसेल तर तुमची कीव करावी तेवढी थोडीच.
संजय रामनाथ जगताप - बुधवार, ६ डिसेंबर, २०१७
जबरदस्त वास्तववादी सणसणीत रिपोर्ट

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर