फेबुगिरी
बुधवार, ६ डिसेंबर, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंगसाइट्सवर व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक पोस्ट्स खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी:

लिनोवो फोनचं चार्जर घेण्यास मी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला गेलो..... 
बाहेर वेटिंग लॉबीमध्ये एक टिकटॉक प्रेक्षणीय स्थळ बसलेलं. 
आत रिसेप्शन काउंटरवर एक डॉमिनोज तरुण. 
त्यानं मला नऊशे रुपये किंमत सांगितली, मी लगेच गुगळून पाहिलं तर तीनशे नव्वद, तीनशे ऐंशी अशा किंमती समोर आल्या, मी त्याला दाखवल्या. 
तो म्हणाला 
"सर आम्ही ओरिजिनल देत असतो."
"मग हे कुठं डुप्लिकेट देत आहेत?"
"ते माहीत नाही सर पण आमच्याकडे कंपनीचे रेट असतात."
"कंपनीच्या चार्जरमध्ये काय सोन्याच्या तारा आहेत का? पन्नास शंभर रुपयांचा फरक असता तर काही वाटलं नसतं, पण सरळ पाचशेपेक्षा जास्त फरक पडतोय! हे कसं?"
"कंपनी जे देईल तेच रेट आम्ही लावतो सर!"
"ठीक आहे, घ्या नऊशे! पण मला नाव, गाव, पत्ता, जीएसटी, सीएसटी, माझ्या फोनचा IMEI नंबरसह लिनोवो कंपनीचं बिल पाहिजे."
"मिळेल की सर! प्लीज बसा दहा मिनिटं."

मी बाहेर आलो व त्या टिकटॉकला हे सांगितलं. मग तिनंही तिचं गाऱ्हाणं गायलं. तिच्या फोनचं ऑन ऑफचं बटण खराब झालं होतं, तिचा फोन वॉरंटीमध्ये होता, कुठेही डॅमेज झालेला नव्हता, तरीही तरी तिला सातशे रुपये सांगितले होते.

पंधराएक मिनिटांनी डॉमिनोज बाहेर आला, चेहरा पडलेला, मला खुणेनंच आत बोलावलं. मी आत गेल्यावर हळूच म्हणतो ...

"सर, फक्त तीनशे सत्तर रुपये द्या. पाच मिनिटांत ऑनलाईन बिल काढतो व देतो."

पैसे चुकते करून मी बाहेर आलो व त्या टिकटॉकला माझी लागलेली लॉटरी सांगितली.

मी तिला म्हणालो ---

"तुम्ही पण मी मागितलं तसं बिल मागा, कदाचित माझा फंडा तुमच्याही कामी येईल. नाहीच तर ग्राहक मंचात जाऊ शकता."

तिचा चेहरा खुलला...

"थँकयू हं, नक्की तसंच करते !"

मी चार्जर आणि त्याचं बिल घेऊन बाहेर पडताना तिला ....

"ऑल दि बेस्ट!"

''थँक यू, वन्स अगेन सर!" तोच मंजुळ आवाज.

--- जागरूकग्राहकवंत

- सिद्धू चिलवंत

..............................................

राजनाथ सिंगांचा मुलगा, यशवंत सिन्हांचा मुलगा, प्रमोद महाजनांची कन्या, गोपीनाथ मुंडेंची कन्या, मनेका गांधीचा मुलगा, कल्याणसिंगांचा मुलगा, दानवेचा मुलगा, खडसेकाकांची सुनबाई, फुंडकरकाकांचा लेक ही सगळी लेकरं बालवाडीत निवडणूक लढवून आपापल्या वर्गात निवडून आलेली.

त्यांचे नेतृत्वगुण, बालवयात संघटन कौशल्य, संभाषण आणि वक्तृत्व ह्यातलं कौशल्य बघून त्यांना प्राथमिक शाळेतच भाजपच्या कामाला वाहून घेण्याची संधी देण्यात आली.

सबब त्यांचे वाडवडील राजकीय नेते आहेत हा निव्वळ योगायोग आहे. 
ही सगळी लेकर आपापल्या कर्तृत्वावर राजकीय आणि सत्तेच्या पदावर पोहोचलेली आहेत.

लेकरांच्या यादीत कोण उरलं असंल तर कॉमेंटमध्ये सांगा, यादी वाढवत नेऊया.

- आनंद शितोळे

..............................................

एलेना, कतरिना, लिली... कशी छान छान नावे देतात तिकडे वादळांना देखील... नाहीतर आमचे बघा: ओखी! 
निदान सखी तरी ठेवायचे नाव

- संजय भास्कर जोशी

..............................................

इंग्रजी ज्ञानभाषा वगैरे ठाम समज करून घेतलेल्या आणि मराठीला ते शक्यच नाही असे समजणार्‍यांसाठी माझा एक अनुभव.

डिजाइन थिंकिंग ह्या विषयावर मी मराठीतून लिहिले आहे. डिजाइन थिंकिंग ही मूळ संकल्पना आणि त्यावरचे काम हे मुख्यत्वे परदेशात इंग्रजी भाषेत झालेले आहे. उपयोजित कला सोडल्या तर इतर क्षेत्रांमधून ह्या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू व्हायला फार नाही चार पाच वर्षेच झाली आहेत. भारतातही ही संकल्पना तशी नवीच आहे. त्यामुळे त्याबद्दलचे सगळे संदर्भ हे इंग्रजीतून उपलब्ध आहेत. म्हणजेच हे ज्ञान इंग्रजीतूनच उपलब्ध आहे.

आता बघा, गेल्या पंधरा दिवसात मी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ह्या संकल्पनेवर आधारित तीन कार्यशाळा घेतल्यात. ह्या संपूर्ण मराठीतून होत्या. मुळात ही संकल्पना माहीतच नाही, त्यात ती इंग्रजीतून सांगितली तरी समजणार नाही. मग आपल्या नेहमीच्या भाषेत हे ज्ञान वाटले. समजून घेतांना कोणालाही काही अडचण आलेली नाही. तेव्हा संकल्पना आणि ज्ञान-माहिती हे कोण्या भाषेचे मांडलिक नसतात. समजून घेता येत नसेल किंवा समजावून सांगता येत नसेल तर त्याचे कारण वेगळे असते.

इतर भाषांतले ज्ञान आपल्या भाषेत आणून ते वाटायची तळमळ हवी असते. आणि आपल्या भाषेत आणणे म्हणजे शब्दार्थ, अनुवाद करणे नव्हे. मॅग्नेटिकला चुंबकीय, अॅटमला अणू म्हणायचं का असे खिल्लीबाजी करणारे लोक असतील तर त्यांना ज्ञान म्हणजे काय हे तरी कितपत कळते ह्याची शंका आहे.

- संदीप डांगे

..............................................

ओखी ह्या चक्रीवादळाचा फटका तामिळनाडू आणि केरळच्या समुद्रकिनार्‍याला बसला. 
तिथून ते वादळ गुजरातच्या दिशेने सरकू लागलं. 
ह्या वादळाची उपग्रहावरून घेतलेली छायाचित्रं भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जात होती. ह्या वादळाचा प्रवास कसा होणार आहे ह्याचाही अचूक वेध घेण्यात आला होता. 
विविध उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांचं अॅनिमेशनही या विभागाच्या वेबसाइटवर होतं.

ह्यासंबंधात एनडीटीव्ही इंडिया आणि अन्य वेबसाइटवर तपशीलवार बातम्या प्रसिद्ध होत होत्या. 
मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा सर्वत्र देण्यात आला होता.

ह्या संबंधातील आयएमडीचा अहवाल २ डिसेंबर रोजी मी फेसबुकवर पोस्ट केला होता.
व्हॉट्स अॅपवर ही टाकला होता.

मुंबई एक बेट आहे. त्याच्या तीन दिशांना समुद्र आहे, सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्य भूमीवर आंबेडकरवाद्यांचा महासागर उसळतो. 
ओखी चक्रीवादळाची खबर आणि अपडेटस् त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहीजेत हे भान लोंढा प्रसार माध्यमं, सोशल मिडिया, महानगरपालिका, राज्य सरकार कोणालाही नव्हतं. त्यामुळे लाखो आंबेडकर अनुयायांची तारांबळ उडाली.
वादळी पावसाने हजेरी लावल्यानंतर मदत कार्याला सुरुवात झाली. 
भारतीयांना कशाचंही नीट नियोजन करता येत नाही, त्वरेने यंत्रणा उभारता येत नाहीत. अतिशय खेदजनक आहे हे सर्व.

- सुनील तांबे

..............................................

निसुलताना रे.. अख्ख्या गाण्यात या दोनच ओळींवर बागडणारा शशी आठवला आज. मग एकामागोमाग एक त्याची गाणी नजरेसमोर तरळून गेली. शशी म्हटल्यावर झटकन आठवतात ती त्याची सदाबहार गाणी... पडद्यावर त्याला गाणी गाताना पाहताना कधीच कंटाळ आला नाही..
लिखे जो खत तुझे... बेखुदी में सनम.. चले थे साथ मिलके.. कभी रात दिन हम दूर थे.. आपको दिल में बिठालूं तो चले जाईयेगा.. सारेगमपा.. ही अशी रोमॅँटिक गाणी पडद्यावर गावी ती शशीनेच.
नैन मिलाकर चैन चुराना... ओ दिलबर जानिये.. थोडा रूक जाएगी तो... ओ मेरी ओ मेरी, शर्मिली.. ले जाएंगे दिलवाले दुल्हनियां.. या सारखी नटखटपणाची गाणी फक्त आणी फक्त त्यानेच सादर करावीत.
एक रास्ता है जिंदगी सोबत कह दूँ तुम्हे या चूप रहूं गाणी केवळ त्याच्या अस्तित्वामुळेच आनंद देतात.
परदेसीयोंसे ना अखियां मिलाना, तुम बिन जाऊ कहा.. घुंगरू की तरह .. ही दर्दभरी गाणी त्याला सुट होत नसली तरीही त्याच्या दर्दभऱ्या उदास हास्याने त्याने ती अमर केलीत.
एक था गुल... खिलते है गुल यहां ही गाणी म्हणजे खास शशीसाठीच बनलेली होती. तेरा मुझसे है पहले का नाता कोई ह्या गाण्यासाठी मी आ गले लग जा वारंवार पाहिला...
अमिताभबरोबर त्याने अनेक गाण्यात मजेदार रंगभरले.
कभी कभी मेरे दिल में समथिंग समथिंग आता है... हे तो सिनेमात ज्या मिश्किलतेने राखीला म्हणतो, ते मला सॉलीड आवडलेले.
शशीला फिल्मफेयर अॅवार्ड, नॅशनल अॅवार्ड मिळालेत. त्याने गंभीरपणे सिनेनिर्मितीही केली. पृथ्वी थिएटरसाठी झटला तो. अभिनेता, निर्माता म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केले खरे पण माझ्यासारख्या सिनेशौकींनांना तो लक्षात राहील तो त्याच्या गाण्यांनी. हा कपूर पडद्यावर अभिनय नव्हे तर छान छान गाणी गाण्याकरीता आलेला होता. शशी तू म्हणालास खरा...परदेसीयोंको है एक दिन जाना...पण तुझी गाणी सदैव आमच्यासोबत राहतील अन् जोडीला तूही.

- राजू तुलालवार

..............................................

सोशल मीडियाचा फायदा किती, फटका किती, ही चर्चा नुकतीच साम चॅनलवर पाहिली. सोशल मीडिया न वापरणारे "तज्ज्ञ" या चर्चेत का बोलावले, ते समजलं नाही. सोशल मीडिया हा मीडियाच नव्हे असं ते ठासून म्हणत होते. मी फेसबुकवर नाहीच, हे सांगण्यातली त्यांची आत्मप्रौढी खटकली. आणि त्यांनी सोशल मीडियातून जे व्यक्त होतं, त्याची सरसकटपणे वावदूक म्हणून संभावना करणं फारच अतिरेकी वाटलं. कंप्युटर आला तेव्हाही अशाच काहींनी त्याचीही संभावना केली होती. चर्चेतले पत्रकारमहोदय सोशल मीडियाची सतत वृत्तपत्राशीच तुलना करत होते. म्हणजे त्यांना दोहोंतला फरकसुद्धा कळत नाही, याला काय म्हणावं? संजयने त्यांना पुरतं बोलू दिलं, हे चांगलं केलं. अर्थात अशा ढुढ्ढाचार्यी वक्तव्यांमुळे काहीच फरक पडणार नाहीये. तरुणांना मिळालेलं हे माध्यम आहे. ते कसं वापरायचं, ते तरुणांनाच ठरवूदे की! विश्वास ठेवा की हो तरूण पिढीवर. सोशल मीडियाचे लाभच जास्त आहेत, यात शंकाच नाही. सम्राट फडणवीस, आलोक जत्राटकर आणि विनायक पाचलग यांना धन्यवाद. हे तिघंही अगदी मार्मिक बोलले.

- मेधा कुलकर्णी

..............................................

सोशल मीडियावरचे युजर्सचे निरनिराळे प्रताप बघितले की वाटतं टीनेजर्सपेक्षा मोठेच मोबाईलने जास्त बिघडत चालले आहेत.. काय वाटतं?

- मुक्ता चैतन्य

..............................................

गेल्या १०-१२ दिवसांपासून फेसबुक अकाउंट डिऍक्टिव्हेट केले होते... त्या दिवशी अस्वस्थ होऊन ज्या कारणाने गेले आज त्याच कारणाने परत आले. एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणार काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं....बाराएक दिवसाआधीची गोष्ट असेल रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठ 'मुख्य' पोलीस स्टेशनही आहे. सात वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत पूर्ण कट झालेला हात दाखवत पंधराएक वर्षाचा मुलगा पुढे आला, हिला औषधाला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती दहा-वीसची एक नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर येत राहिला. काय झालं असेल.. का झालं असेल? अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा सहा वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेला हात पुढे करत ८-९ वर्षांचा मुलगा पुढे आला. त्या एवढ्याश्या चिमुकलीचा हात इतका भाजला होता जणू उकळत्या तेलात तळून काढलाय. जीव कळवळला, माझा मुलगा डोळ्यासमोर आला. भोवळ यायची बाकी राहिली. त्या पोराला बोलले चल दवाखान्यात हिच्यावर उपचार करू तर भरभर चालत रस्ता ओलांडून निघून गेला. मी सरळ गाडी पोलीस स्टेशनात घेतली. आत जाऊन रीतसर तक्रार नोंदवली... दिवसभर मन लागलं नाही इतक्या इतक्या चिमुकल्या मुलींसोबत काय होतंय, हे इतकं बाहेर दिसतंय तर एकट्यात आत काय काय होत असेल विचार करून डोक्याचा भुगा. आत आत खूप गहिवरून येत होतं, चलबिचल चलबिचल होत राहिली. स्वतःच स्वतःचा राग आला. बाहेर हे सगळं असं काय काय चाललंय आणि आपण काय करतोय? आभासी जगात दाखवल्या जाणाऱ्या कित्तेक गुडी गुडी गोष्टींना सत्य मानून आनंदात जगतोय. डोळे झाकल्याने सत्य बदलणार आहे का? डोळ्यावरची झापडं काढायला हवीय .. आणि त्याच दिवशी फेसबुकमधून परांगदा झाले...जरा अलिप्त व्हावं वाटत होतं. रोज इथे येऊन एकमेकांचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या अनेक मित्रांपैकी ८-१० मित्रांशिवाय ते फारसे कुणाला कळलेही नाही .. किती बिझी झालोय आपण. आपल्या बाजूचा रोज दिसणारा माणूस एकदिवस असा नाहीसा होतो आणि आपल्याला पत्ताही लागू नये. मागे असेच चित्रपट सृष्टीतल्या कुठल्याश्या निर्मात्याने सुसाईट नोट टाकली फेसबुकवर .. त्यानं काय लिहिलंय, किती दुःख किती अस्वस्थता त्या लेखातून झळकते आहे याचा जराही लवलेश लावून न घेता नेटिझन्स त्या पोस्टला लाईक करत सुटले. कित्येकांनी गमतीच्या प्रतिक्रियाही दिल्या ...त्याला खरं सांत्वन हवं होतं- कुणाचे तरी आधाराचे शब्द हवे होते. चुकीचं करायला थांबवणारी साथ हवी होती, तेव्हाच नेमके हे जग किती तकलादू, इथले लोकंच कसे आभासी आणि इथे मिळणारी सोबत किती फसवी आहे याची प्रकर्षाने जाणीव होऊन व्यथित होऊन त्याने आत्महत्याचे पाऊल शेवटी उचललेच. आत्ता आत्ताच इथे पोस्ट टाकणारा त्याच्याशी घडलेल्या गोष्टी इतक्या तळमळीने शेअर करणारा, कॉमेंट मधून तटतटून भांडणारा, रोजच दिसणारा, हाकेच्या अंतरावर जाणवणारा आपल्या मित्र यादीतला इसम आत्ता बघता बघता स्वतःला जीवे मारतो, निघून जातो आणि आपण काहीच करू शकत नाही हे सत्य नंतर कित्येकांच्या पचनी पडले नाही.. पण त्यानं काही झालेही नाही. अजून आपण तिथेच गरगर फिरतोय स्वतःतच गुरफटले गेलो आहे. यापलीकडे काय घडतंय याच्याशी काडीमात्र घेणेदेणे नाही. जगबुडी होईपर्यंत आम्ही असेच घाणीच्या बैलासारखे फिरत राहणार आहोत का ? .... असो

तर मी तक्रार नोंदवल्यानंतर ऑफिसला जाता येता या चौकात आवर्जून लक्ष देणं सुरू होतं .. पूर्ण १२ दिवस लहान मुलं तर सोडा साधे दुसरे भिकारीही दिसले नाही.. वाटलं चला आपल्या तक्रारीने काहीतरी सकारात्मक फरक पडला असावा, चिमुकल्यांना पोलिसांनी या घाणीतून काढले असावे..पण तसे नव्हते..आज सकाळी पुन्हा अगदी 5-6 वर्षांची नवी पोर हात पूर्ण लदलद जळालेल्या अवस्थेत पुढ्यात आली. पोलीस स्टेशनला जाऊन मी पुन्हा जरा हिसका दिला ... त्याचा उपयोग पुन्हा ४ दिवस होईलही, पण अश्या किती चिमुकल्या नरकयातना भोगत राहणार आहे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मी एकटीने तरी काय करावे हवे तसे उत्तर सापडतच नाहीये. म्हणून मग परत येऊन हे तुम्हा सगळ्यांना सांगावं वाटलं .. वाटलंच कुणाला जरा आपल्या कोषातून बाहेर येऊन कुठेतरी काहीतरी यासाठी करावं तर, कुणी सांगावे... बिचाऱ्या अत्याचार होणाऱ्या चिमुकल्यांना चुकून माकून मदत व्हायची.... आणखी काय?

- रश्मी मंडणकर

..............................................

शशी कपूर वेगळाच होता.. राज कपूरकडे चित्रपटांपुरताच समाजवाद खुबीने वापरून धंदा आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळवण्याची अक्कलहुषारी होती.. शम्मी 'गड्या अपुला गाव बरा' म्हणत सिमला-काश्मीर-ओपी-शंकर जयकिशन-रफी या चौकटीच्या बाहेर पडला नाही.. शशीची मात्र मधल्यामध्ये घुसमट होत असणार.. कुठलाच कपूर फारसा शिकलेला नसला तरी या कपूरची अभिरुची मात्र फारच वरच्या दर्जाची होती. म्हणूनच अभिनेता म्हणून पदरी पडतील ते सिनेमे नाईलाजास्तव केले तरी निर्माता म्हणून हे सगळे पैसे त्याने कलयुग, 36 चौरंगी लेन, जुनून, विजेता, उत्सव अशा कलात्मक, आशयघन सिनेमांवर उधळले.. तेव्हा मल्टिप्लेक्स असते तर हे सिनेमे कदाचित सुपरहिट झाले असते.. पण आपल्या अभिरुचीची तहान भागवण्याच्या नादात शशी कपूर कर्जबाजारी झाला. मोठ्या भावाचं व्यावसायिक चातुर्य त्याच्याकडे नव्हतं. नाहीतर त्यानेही कुठल्या तरी इझमचं आवरण ओढून बक्कळ पैसा कमावला असता.

- चिंतामणी भिडे

..............................................

गुजराती परराज्यात पोटापाण्यासाठी येत नाहीत हे मोदी लै खोटं बोल्ले. 
जयसिंगपूर आणि इचलकरंजीत निम्मी गुजरातीच हायीत. 
खुद्द माझ्या मित्राची प्रेयसी ही गुजराती आहेय.  ☺

- श्रेणिक नरदे

..............................................

स्टोरीटेल भारतात लॉन्च झालंय.... पाठोपाठ ऑडीबल सुद्धा येतंय.... पुढच्या दोन तीन वर्षांत मराठी पब्लिशर्ससमोर मोठं आव्हान असेल ते लेखकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याचं .... ऑडियोबुक्स ही कित्येक बिलीयन डॉलर्सची इंडस्ट्री असणार आहे.... 
स्टोरीटेलने मराठीमध्ये सुद्धा अगदी सुरुवातीपासूनच ओडिओबुक्स द्यायला सुरुवात केलीये...

ऑडिओबुक्स मराठीत उपलब्ध नाहीयेत असा भाग नाहीये. काही जणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण ज्या प्रकारे स्टोरीटेल आणि ऑडीबल मार्केट मध्ये येतील, त्यासमोर हे प्रयत्न कितपत टिकेल हा प्रश्न सध्या मला अस्वस्थ करतोय. शेकडी कोटी रुपये यांच्या खिशात आहेत. एकाही नावाजलेल्या मराठी पब्लिशरकडून असा व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर प्रोफेशनल अप्रोच घेऊन असा प्रयत्न होत असल्याचं माझ्या माहितीमध्ये नाहीये. (कोणाकडे या संदर्भातील माहिती असेल तर प्लिज इनबॉक्स करा )

मागे, एक मित्र असा प्रयत्न करत असल्याचं माहिती होतं. सध्या तो काय करतोय याची फार माहिती नाही.

पण एकाचवेळी या क्षेत्रातील दोन मोठे स्टार्टअप जेव्हा भारतीय मार्केटमध्ये येतील आणि वाचकांकडून सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळेल, तेव्हा मोठे लेखक आणि कवी या मराठी पब्लिशर्सकडे टिकतील का ?

आधीच साहित्यिक मंडळी हक्काचं मानधन वेळेवर मिळत नसल्याने आपल्याकडच्या पब्लिशर्स ला बऱ्यापैकी वैतागली आहेत. कित्येकवेळा पुस्तकांच्या अनेक आवृत्या संपल्यातरी पैसे मिळत नाहीत. या अशा गोष्टींमुळे साहित्यिक मंडळीसाठी मात्र ही संधी असेल.

पण कल्पना करा, मराठी साहित्यविश्व अमेरिका आणि स्वीडन मधील स्टार्टअप डॉमिनेट करतायत म्हणून ..... अर्थात याला आणखी काही वर्षे जातील. पण फार वेळ लागणार नाहीये.

दुसरी गोष्ट, किती साहित्य संमेलनांमध्ये या विषयावर गंभीरपणे चर्चा झालीये?
मराठी प्रसारमाध्यमे अजूनही स्टार्टअप या विषयाला प्राधान्य देत नाही.

स्टार्टअप सगळा गेम बदलतात तो असा... तर दुसरीकडे मराठी उद्योजक अजूनही त्याच जुन्या कन्सेप्ट घेऊन, पारंपारिक उद्योगक्षेत्रात रमत आहेत. जे established मराठी उद्योजक आहेत, त्यांचा सुपर इगो त्यांना स्वतःला आणि त्यांना फॉलो करणाऱ्या इतर लहान / नुकताच बिझनेस सुरू केलेल्या उद्योजकांना घेऊन बुडतील.

मराठी उद्योगजगत आणि त्यातले सो कॉल्ड मोठे आदरणीय वगैरे वगैरे असलेल्या मराठी उद्योजकांना सत्कार सोहळे आणि मानपान यातच आनंद वाटतो.

आत्ताचा विचार नका करू यार.... आणखी पाच वर्षानी परिस्थिती किती बदलू शकते याचा विचार करा. ही पोस्ट तुम्ही फेसबुक वर वाचत आहात. पाच वर्षापूर्वी फेसबुकचा तुम्ही किती वापर करत होतात ?

- कुणाल गडहिरे

..............................................

काँग्रेस हे उलटसुलट हितसंबंधांचं गाठोडं आहे. एखाद्या शहरी भूभागातल्या (कारण शहरात सांस्कृतिक घुसळण जास्त असते) काँग्रेसी उमेदवारांची तपासणी केली, तरी बदलत्या लोकजाणिवेची चाहूल घेता येते. या उलटसुलट तणावांमध्ये सामायिकता हीच की संपूर्ण भारतीय समाजाप्रमाणे काँग्रेसदेखील परंपराग्रस्त असली तरी कुठल्याही दिशेने खेचण्याला तिथे मान्यता, स्वीकार आहे.

आणि ही गांधी-नेहरूंची कृपा आहे. याचं ढोबळ, तरीही आश्वासक चिन्ह म्हणून काँग्रेसी नेतृत्व नेहरू घराण्याकडे राहिलेलं आहे.

आणखीही कारणं आहेत ...

- हेमंत कर्णिक

..............................................

आज जर आचार्य असते तर
दहा हजार वर्षात असा मार्गशीर्षात पाउस पडलेला नाही. अात्ता या घडीला मी ठाणे हे थंड हवेचे ठिकाण आहे अस मी लिहू शकतो, असे म्हणाले असते.

पुल असते तर बिचारे नभ मेघांनी आक्रमिले वातावरण असल्याने गुढघे चोळीत बसले असते.

शिरीष कणेकर यांच्या भाषेत म्हणजे आभाळ मेघांनी फरीदा जलालसारखे गच्च भरल आहे.

चि. त्र्यं. खानोलकर म्हणाले असते- अंधाराचे सावट वास्तुजातावर राखे सारख पसरल आहे.

पु. भा. भावे लिहिते झाले असते- आसिंधु सिंधूपर्यंत आज सहस्ररश्मी उद्दाम तेजोनारायणाचे गर्वहरण झाले आहे .पारतंत्र्यातील हिंदूंच्या भावनेचा कल्लोळ शतधारांनी भारत भू वर सिंचन करीत आहे.

तात्यारावांना यात कदाचित ब्रिटीश साम्राज्यावरील मावळलेला सूर्य दिसला असता.

कुरुंदकर म्हणाले असते- या घटनेकडे आपण त्रयस्थ आणि सापेक्ष बुद्धीने पाहायला हवे.

लोकमान्य गरजले असते- इंद्र देवाचे डोके ठिकाणावर आहे का?

श्री. ना. म्हणाले असते- सारवलेली खळी उखडली गेली, कृष्णाभट घाईघाईने लपलपत्या साकवावरून वणदे नदी पार करीत होता, त्याच्या कोल्हापुरी बांधून घेतलेल्या वाहणा रपरप चिखलात रुतत होत्या, पावसाने शंकराच्या पिंडीवर संतत धार धरावी तसा अभिषेक धरला होता.

गो. नी. दांडेकर म्हणाले असते- आकाशाला पाझर फुटला, हरवलेल्या बालकाच्या आठवणीने ओलेत्या बाळंतीणीच्या पदरा आडून धार सुटावी आणि ती सैरभैर चिंब व्हावी तशी धरित्री दिसत होती.

रणजीत देसाई म्हणाले असते- मार्गशीर्षातील अशीच एक संध्याकाळ, गडावर हळूहळू गारठा पसरत होता. गडकरी आणि चौकीदार शेकोटीच्या आश्रयाने मुंडासं घट्ट करून हात पाय शेकवीत बसले होते एवढ्यात आकाशात मेघ दाटले. महाराजांचा गनिमी कावा पावसाच्यादेखील अंगी मुरल्यासारखा पाऊस सहस्रधारांनी अवचित गडावर कोसळला.

- श्रीनिवास चितळे

..............................................

जीवाला या किती म्हणून बोल लावू 
आता अजून कसलं जगणं 
मी जगून पाहू ?

नवरा नकोसा झालाय 
तरी पाळतेय त्याला
मांजरासारखा
कारण पोरींना लागतोच बाप
कसाही असला तरीही

हुरडफुक्या तीन टाईम जेवतो
बाहेर उधारपादार पत्त्या पिसतो
घरात घुबडागत टीव्ही बघतो
रातीला फुकट झवतो
त्याला कवडीची अक्कल 
कशी येत न्हाय?

हात शिवशिवतात 
वाटतं मारून टाकावं सगळ्यालाच
अन् एकदाचा खतम करून टाकावा
हा खेळ दोरीवरचा

पण पोरींकडं बघून
अजून आशा वाटते

अन्

मी राबायला घराबाहेर निघते
दिवसभर जीव आंबवून
चार पैसं गाठीला बांधायला.

परवा तीनशे चपात्या लाटल्या
तेरवा हजारभर भांडी धुतली
काल दोन पोती गहू चाळला
आज धुणं हाय चार बादल्या

मरण तर येत न्हाय तवर जगायचंय
पोरींना शिकवून एक दिवस
लय मोठं करायचंय...

- इर्शाद बागवान

..............................................

अवचित आणि अवकाळी... खूप फरक आहे दोघांत
अवचित येणं आनंदाचं... अवकाळी येणं नकोसं, काही वेळा घाबरवणारंही...
मग तो पाऊस असो की...

- अमिता दरेकर

..............................................प्रतिक्रिया द्या2990 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर